(नवीन वाचकांनी हा लेख वाचण्यापूर्वी आधी ‘सोडियम’ वरचा लेख जरूर वाचावा: https://www.misalpav.com/node/43167).
* * *
सोडियमचा भाऊबंद असलेले हे मूलद्रव्यसुद्धा (K) शरीरासाठी तितकेच महत्वाचे आहे. जरी ही दोन्ही मूलद्रव्ये शरीरात एकत्र नांदत असली तरी त्यांनी आपापला प्रभाव असणाऱ्या हद्दी आखून घेतलेल्या आहेत. मागील लेखात आपण पहिले की सोडियम हा प्रामुख्याने पेशीबाह्य द्रवांत असतो. पोटॅशियमचे मात्र बरोबर उलटे आहे. शरीरातील ९८% पोटॅशियम हा पेशींच्या आतमध्ये वास्तव्य करतो. तिथे तो क्षाररूपांत असतो. रक्तातील त्याचे प्रमाण हे अत्यल्प, म्हणजेच सोडियमच्या अवघे एक पस्तीसांश असते.
पोटॅशियमचे आहारातील स्त्रोत व प्रमाण, त्याची सोडियमच्या प्रमाणाशी तुलना, शरीरातील चयापचय व कार्य, त्याची रक्तपातळी आणि संबंधित आजार या सर्वांचा आढावा या लेखात घेतला आहे.
आहारातील स्त्रोत:
त्यांची यादी सादर करण्यापूर्वी एका वाक्यात असे म्हणता येते की ‘’फळे व भाज्या भरपूर खाव्यात”, म्हणजे मग Kची चिंता नको. काही प्रमुख स्त्रोत असे:
१. टोमॅटो, सालासह बटाटे, ब्रोकोली, वाटाणे.
२. केळे, संत्रे, लिंबू , जर्दाळू
३. मांस व मासे
४. दूध व दही
यावरून लक्षात येईल की वनस्पती जगतात पोटॅशियम मुबलक आहे. त्याच्या शोधादरम्यान ते वनस्पतींच्या राखेत (ash) आढळले होते. म्हणूनच त्याला ‘पोटॅशियम’ हे नाव मिळाले.
आहारातील प्रमाण:
हा कळीचा मुद्दा आहे आणि त्यावर मतांतरे आहेत. एका शिफारसीनुसार निव्वळ पोटॅशियमचे प्रमाण ठरवण्यापेक्षा त्याचे व सोडियमचे तुलनात्मक प्रमाण महत्वाचे आहे. त्यानुसार सोडियम व पोटॅशियमच्या प्रमाणाचे गुणोत्तर १.२ असावे.( युरोपीय समुदायाच्या शिफारसीनुसार आहारातले रोजचे सोडियम २.३ ग्रॅम तर पोटॅशियम २ ग्रॅम असावे). आधुनिक खाद्यशैलीत हे गुणोत्तर वाढत्या दिशेने ( >२) जाताना दिसते कारण खारावलेले (सोडियम +++) प्रक्रियाकृत पदार्थ जास्त खाल्ले जातात. इथेच उच्चरक्तदाब आणि हृदयविकाराची बीजे रोवली जातात. यावर उपाय म्हणून ‘पोटॅशियमयुक्त मीठा’ची संकल्पना चर्चेत आली.
पोटॅशियमयुक्त मीठ : एक दृष्टीक्षेप
वर उल्लेखिल्यानुसार बिघडलेली आहारशैली सुधारण्यासाठी NaCl ऐवजी KCl हा आहारातील मिठाचा पर्याय म्हणून चर्चेत आला. NaCl हे मुळात चवदार आहे हे सांगणे नलगे. याउलट शुद्ध KCl हे कडू आणि बेक्कार वासाचे आहे. म्हणून मग शुद्ध KCl मध्ये काही चव सुधारणारे घटक मिसळून सुधारित ‘मीठ’ केले जाते. याबाबतीतील संशोधनातून असेही एक ‘मीठ’ तयार केले गेले की ज्यात NaCl, KCl व MgCl असे तीन घटक योग्य प्रमाणात मिसळलेले असतात. या मिठात सोडियमचे प्रमाण नेहमीच्या मिठापेक्षा निम्म्याने कमी असते.
आता ‘हया सुधारित मिठाचे काही तोटे आहेत का ?’ हा प्रश्न उपस्थित होतो. ज्या रुग्णांना पोटॅशियमची रक्तपातळी वाढण्याचा धोका असतो त्यांनी याच्या अजिबात नादी लागू नये. खालील प्रकारचे लोक या गटात येतात:
१. दीर्घकालीन मधुमेह
२. मूत्रपिंडविकार
३. उच्च रक्तदाबाचे वय ६० चे वरील रुग्ण जे अशी औषधे घेत असतात की त्यांमुळे पोटॅशियमची पातळी वाढते.
नेहमीचे की ‘सुधारित’ मीठ? हा प्रश्न अधिकाधिक संशोधनानंतर वादग्रस्त झाला आहे. अनेक संदर्भ पाहिल्यानंतर माझे असे मत आहे की :
शरीरातील सोडियम-पोटॅशियमचा समतोल राखण्यासाठी खालील उपाय करता येतील:
१. निरोगी व्यक्तींनी सोडियमचे प्रमाण शिफारशीइतकेच काटेकोर ठेवावे आणि त्याच्या जोडीला आहारात फळफळावळ व भाज्या भरपूर खाव्यात. हीच खरी निसर्गस्नेही आरोग्यदायी खाद्यशैली होय.
२. उच्चरक्तदाबाच्या रुग्णांनी सोडियम हे शिफारशीपेक्षा थोडे कमीच ठेवावे, आणि
३. रुग्णांनी पोटॅशियमयुक्त सुधारित मिठाचा वापर हा गरज आणि वैद्यकीय सल्ल्यानुसारच करावा.
शरीरातील अस्तित्व आणि कार्य:
वर उल्लेखिल्याप्रमाणे शरीरातील ९८% पोटॅशियम हा पेशींच्या आतमध्ये असतो. तिथे तो फॉस्फेटशी संयुगीत असतो. खऱ्या अर्थाने तो पेशींमधील रासायनिक क्रियांचा राजा आहे. त्याची विविध कार्ये अशी आहेत:
१. पेशींतील मूलभूत प्रक्रियांत आवश्यक .यातून ऊर्जानिर्मिती होते
२. रक्तातील हायड्रोजनचे प्रमाण(pH) सोडियमच्या मदतीने स्थिर राखणे
३. मज्जातंतूंच्या संदेशवहनात मदत.
४. स्नायूंची वाढ व विकास
शरीरातील चयापचय:
आहारातील पोटॅशियम रक्तात सहज शोषले जाते. त्याचे शरीरातून उत्सर्जन हे मुख्यतः लघवीतून आणि अल्प प्रमाणात शौचातून होते. लघवीतून जाणारे प्रमाण आहारातील प्रमाणाशी थेट निगडीत असते. हे उत्सर्जन व्यवस्थित होण्यासाठी मूत्रपिंडाचे कार्य व्यवस्थित असले पाहिजे आणि या कामात Aldosterone हे हॉर्मोन महत्वाची भूमिका बजावते.
पोटॅशियमची रक्तपातळी:
सोडियमच्या तुलनेत ही खूपच कमी असते. ती अवघी ३.५ – ५.१ mmol/L असते. सामान्य आजारांत ती बिघडत नाही आणि ती मोजण्याची गरज नसते. ही चाचणी रुग्णालयात दाखल केलेल्या बऱ्याच रुग्णांत मोजली जाते. पातळी खूप कमी असल्याने त्यातील एकेक दशांशाचा बदलही महत्वाचा ठरतो. फार मोठे बदल हृदयासाठी घातक ठरतात.
रक्तातील पोटॅशियम कमतरता :
ही खालील आजारांत आढळते:
१. तीव्र उलट्या व जुलाब
२. मूत्रप्रवाह वाढवणाऱ्या काही औषधांचा दुष्परिणाम
३. मूत्रपिंडासंबंधी काही हॉर्मोन्सचे आजार
अशा रुग्णांना अशक्तपणा, स्नायूंत पेटके येणे ही लक्षणे जाणवतात. पातळी जास्तच खालावाल्यास नाडीचे ठोके वाढतात आणि हृदयकार्यावर परिणाम होतो. पातळी ३ चे खाली गेल्यास ते गंभीर असते.
रक्तातील पोटॅशियम अधिक्य:
याची प्रमुख करणे अशी:
१. दीर्घकालीन मूत्रपिंड विकारात जेव्हा चाळणी यंत्रणेचे काम कमी होत जाते तेव्हा.
२. मूत्रपिंडासंबंधी काही हॉर्मोन्सचे आजार
३. मोठ्या स्नायूंना गंभीर अपघातात होणारी इजा.
जशी ही पातळी वाढू लागते तसा रुग्णाचा मानसिक गोंधळ होऊ लागतो. त्यापुढे पक्षघात आणि श्वसनदौर्बल्य होते. पातळी खूप वाढल्यास हृदयक्रिया बंद पडते. पातळी ६चे वर जाऊ लागल्यास ते गंभीर असते.
सारांश
तर असे हे धातूरुपी मूलद्रव्य- पोटॅशियम. आपल्या पेशींत वास्तव्य करणारे आणि जीवनावश्यक. आहारातील भाज्या व फळांतून ते सहज मिळते. आहारात त्याचे व सोडियमचे तुलनात्मक प्रमाण योग्य राखणे हे हितकारक. त्यासाठी भाज्या व फळे भरपूर खावीत. म्हणजे मग आहारातील सोडियमचा बाऊ करण्याची गरज नाही.
****************************************
प्रतिक्रिया
22 Aug 2018 - 8:56 am | कुमार१
सा सं यांना विनंती
22 Aug 2018 - 11:57 am | दुर्गविहारी
सुंदर माहिती ! धन्यवाद, पुढील धाग्याच्या आणि मुलद्रव्याच्या प्रतिक्षेत.
22 Aug 2018 - 12:10 pm | टर्मीनेटर
नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण लेख.
22 Aug 2018 - 5:33 pm | कुमार१
दुर्गविहारी व टर्मिनेटर,
प्रोत्साहनाबद्दल आभार .
23 Aug 2018 - 11:17 am | अनिंद्य
@ कुमार१,
उत्तम लेख.
एक प्रश्न आहे :-
जिममध्ये घाम गाळणाऱ्या मित्रमंडळीत 'K वॉटर' आणि एकूणच पोटॅशियमयुक्त आहाराचे कौतुक फार आहे. त्यांना व्यायामामुळे होणारी स्नायूदुखी (muscle cramps) बरी होण्यासाठी हे अधिकचे पोटॅशियम आवश्यक असते म्हणे. यात कितपत तथ्य आहे ?
23 Aug 2018 - 12:34 pm | सुबोध खरे
जिम मध्ये घाम गाळणाऱ्या मित्रमंडळीत बरेच गैरसमज असतात आणि ते तेथे असलेले व्यायाम शिकवणारे त्याला अनवधानाने/ अर्धवट ज्ञानाने/स्वार्थासाठी हातभार लावत असतात.
भरपूर व्यायाम केल्यास साधे साखरपाणी मीठ टाकून घेतले तरी पुरते.त्यातून जर एखादा कॅलरी कॉन्शस असेल तर त्याने नारळाचे पाणी प्यावे.
खरं तर व्यायाम केल्याने आपल्या शरीरातून क्षारांचा व्यय होतो हाच एक मोठा गैर समज आहे. साधे पाणी भरपूर
प्रमाणात पिणे आवश्यक आहे
A 2012 study in the Journal of the International Society of Sports Nutrition found that neither coconut water nor sports drinks were better than water in hydrating young men after hourlong workouts.
https://www.nytimes.com/2014/07/30/dining/coconut-water-changes-its-clai...
जर आपण एक तास फार जोरात व्यायाम केला तर साधारण १ ग्राम सोडियम घामावाटे जाते.हे आपण साधे लिंबू सरबत पिऊन मिळवू शकतो
व्यायाम करण्यात पोटॅशियम शरीराबाहेर जात नाही.
त्यातून पोटॅशियम वॉटर वगैरे गोष्टी तर थुका लावायचे धंदे आहेत.
साध केळं तुम्हाला ४२२ मिग्रॅ पोटॅशियम देते एक लिटर नारळपाण्यात ६६० मिग्रॅ पोटॅशियम असतं आणि महत्त्वाचे म्हणजे आपला साधा एक बटाटा १००० मिग्रॅ पोटॅशियम देतो.
दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये.
23 Aug 2018 - 12:47 pm | कुमार१
सुबोध ,
सहमती व आभार.
23 Aug 2018 - 12:49 pm | अनिंद्य
@ सुबोध खरे,
माहितीबद्दल आभार.
असे काही 'स्पेशल' वापरले नाही तर जिमकरांना मजा येत नसावी. :-)
23 Aug 2018 - 4:03 pm | मार्मिक गोडसे
जर आपण एक तास फार जोरात व्यायाम केला तर साधारण १ ग्राम सोडियम घामावाटे जाते
अशा वेळेस साधे पाणी भरपूर पिल्याने रक्तातील सोडिअमची पातळी कमी होत नाही का?(रक्त डायल्युट झाल्याने)
23 Aug 2018 - 4:32 pm | कुमार१
ती थोडी कमी होते पण दखल घ्यावी इतकी नाही.
अर्थात अशा व्यायामानंतर नुसतं पाणी दमादमानेच प्यावे.
23 Aug 2018 - 7:13 pm | सुबोध खरे
साधे पाणी भरपूर पिल्याने रक्तातील सोडिअमची पातळी कमी होत नाही का?(रक्त डायल्युट झाल्याने)
आपली मूत्रपिंडे व्यवस्थित काम करत असतील तर हि स्थिती फारच क्वचित येते
सामान्य माणसाच्या शरीरात ०. ४ % सोडियम असते म्हणजेच ६० किलोच्या माणसात २४० ग्राम सोडियम असते. यातील साधारण ६० ग्राम सोडियम हे रक्त आणि पेशीबाहेरील द्राव यात असते १ ग्राम कमी झाल्याने फारसा फरक पडत नाही. (शरीरात पेशी पेशीबाहेरील द्राव आणि रक्त असे तीन कप्पे असतात यात सोडियम सहज इकडे तिकडे जाऊ शकते.)
जे व्यायामपटू( सायकल स्वार, मॅरेथॉन धावणारे) किंवा खेळाडू( क्रिकेट फुटबॉल इ) जे भरपूर वेळ व्यायाम करतात त्यांना सोडियमची कमतरता भासू शकते. परंतु त्यांना सोडियम पेक्षा पाण्याची जास्त गरज भासते कारण दर तासाला एक लिटर घामावाटे गेलेले पाणी भरून काढणे जास्त आवश्यक आहे.
लक्षात ठेवा अति पाणी पिण्याने फारसे नुकसान होत नाही.( अशी स्थिती फक्त गोड्या पाण्यात-- नदी किंवा तलावात बुडाल्यावर येते). पण डिहायड्रेशन ( शरीरातील पाणी कमी) झाले तर त्याचा शरीराला त्रास जास्त होतो)
23 Aug 2018 - 11:22 am | गवि
ते जरा जरी जास्त प्यायले तर हृदय बंद पडते असं ऐकलं होतं. एक पोटॅशियम सिरप काही अन्य कारणांनी दिलं असताना भरपूर पाण्यासोबत एक एक सिप पाच दहा मिनिटांनी घ्या असं सांगितलं होतं.
23 Aug 2018 - 6:58 pm | सुबोध खरे
पोटॅशियम चे सिरप हे पोटॅशियम कमी झाले तर वापरले जाते. हि स्थिती बऱ्याच वेळेस रक्तदाबाच्या रुग्णांना मूत्र जास्त होण्याचे औषध (diuretic) दिले जाते त्यामुळे येऊ शकते.
परंतु ज्या रुग्णाची मूत्रपिंडे व्यवस्थित काम करतात त्याला हे सिरप भरपूर पाजले तरी फार फरक पडत नाही. त्याचे हृदय बंद पडण्याची शक्यता जवळ जवळ नाहीच.
ज्याची मूत्रपिंडे खराब आहेत अशा रुग्णाला मात्र हे जपून द्यावे लागते.
सामान्य रुग्णाला हे हळूहळू प्यावे सांगतात याचे कारण त्यातील क्षाराची मात्रा. यामुळे रुग्णाला पटकन "उलटी" होण्याची शक्यता असते . (मिठाचे पाणी प्यायल्यास जी स्थिती होते तसेच)
23 Aug 2018 - 8:38 pm | गवि
धन्यवाद. __/\__
23 Aug 2018 - 11:33 am | कुमार१
अनिंद्य, जर पोटॅशियम युक्त आहार व्यवस्थित असेल तर काळजी नसावी. ते पाणी मात्र गरज वाटल्यास जपून प्यावे.
गवि, तुमचा मुद्दा बरोबर आहे.
व्यायाम तज्ञ योग्य मत देऊ शकतील
24 Aug 2018 - 12:10 pm | चौकटराजा
दीर्घकालीन मूत्रपिंड विकारात जेव्हा चाळणी यंत्रणेचे काम कमी होत जाते तेव्हा. हे वाक्य माझ्या बाबतीत महत्वाचे आहे. आता हा " दीर्घकाल " माझ्या बाबतीत किती हे काळच ठरवील ! कार्डीएक रिदम मध्ये पोटॅशियम चा काही रोल असतो का ?
24 Aug 2018 - 12:38 pm | कुमार१
हृदय स्नायूंच्या मूलभूत action potential शी K, Na, Ca या सर्वांचा संबंध असतो.
25 Aug 2018 - 6:29 am | सुधीर कांदळकर
रोचक आणि उपयुक्त माहितीबद्दल तुम्हाला तसेच डॉ. खरेंना धन्यवाद.
27 Aug 2018 - 9:24 am | कुमार१
यापुढचील लेख Ca &P वर असून तो इथे आहे :
https://www.misalpav.com/node/43212