तो आणि ती..... प्रस्तावना: https://www.misalpav.com/node/42956
तो आणि ती.... देवकी!: https://www.misalpav.com/node/42957
तो आणि ती.... यशोदा!: https://www.misalpav.com/node/42969
तो आणि ती.... राधा!: https://www.misalpav.com/node/42980
तो आणि ती ........ कुंती!
"श्रीकृष्णा, तू जरी माझा भाचा असलास तरीही माझ्या आयुष्यातील तुझं स्थान वेगळ्या भावनेने व्यापलेलं आहे. तुझं असणं माझ्या पाचही मुलांच्या आयुष्याचं संरक्षण कवच; हे मी कधीही विसरणार नाही. केवळ त्यांच्याच बाबतीत नाही तर तू मला देखील अनेकदा धर्म संकटातून वाचवलं आहेस. द्रौपदीला घेऊन अर्जुन दारात उभा राहिला होता; तो प्रसंग तर मी आयुष्यात विसरणार नाही."
"आते, मी द्रौपदीला समजावलं हे खरं असलं आणि त्यासाठी तू मला कितीही महत्व दिलंस तरीही तुझ्या मनातील सत्य मी का जाणत नाही? द्रौपदीच्या अनन्यसाधारण सौंदर्यामुळे तुझ्या पाचही पुत्रांमध्ये फूट पडू नये म्हणून त्याक्षणी तू घेतलेला तो निर्णय योग्यच होता. त्यामुळे तू घेतलेल्या निर्णयाला शास्त्राधार देणं हे माझं कर्तव्यच होतं."
"मुकुंदा! हस्तिनापूराच्या महासभेत तू खांडववनाचा हिस्सा मान्य केलास त्यावेळी माझा तुझ्या त्याच शास्त्राधारावर गाढ विश्वास होता. त्यानंतरची द्यूतक्रीडा तू थांबवू शकला असतास. हे अनेकदा माझ्या मनात आलं; मात्र ज्याप्रमाणे द्रौपदी पांडवांची पत्नी व्हावी हे विधिलिखित तू ओळखलं होतंस; त्याचप्रमाणे द्युतक्रीडा आणि पांडवांचा बारा वर्षांचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास देखील विधिलिखित असावं याची मला कल्पना होती. मात्र द्रौपदीने त्यांच्याबरोबर हा वनवास भोगू नये असं मला त्यावेळी खूप वाटत होतं."
"आते, तिचं पांडवांबरोबर असणं आवश्यक होतं ग. नाहीतर माझ्या प्राणप्रिय सखीला मी असं रानावनात जाऊ दिलं असतं का?"
"खरंय तुझं मधुसूदना! त्या तेरा वर्षानंतरची तुझी कौरवसभेतील शिष्ठाई आणि त्यानंतरचं युद्ध...."
"आते, आज तुझे पुत्र जेते आहेत आणि धर्मप्रस्थापना झाली आहे. मग हे असं भूतकाळातील घटनांबद्दल तू का बोलते आहेस? तुझे पाच पुत्र माझे कोणीच नसल्यासारखे का बोलते आहेस? तुला का माहित नाही....."
"थांब श्रीकृष्णा! आज मी तुला भूतकाळाबद्दल बोलण्यासाठी पाचारण नाही करवलं. आज आयुष्याच्या संध्याकाळी.... विविध चढ-उतारांच्या अनुभवातून गेल्यानंतर माझ्या मनात आयुष्याबद्दल कोणतीच शंका नाही. मात्र हे जग्दनियंत्या, मनात एक किंतु आहे; त्याचे निरसन झाले नाही तर मृत्यूसमयी मला शांती मिळणार नाही."
"आते, काय बोलते आहेस? तू ज्यावेळी अल्लड पृथा होतीस त्यावेळी देखील कदाचित् मनात किंतु आणला नसशील. मात्र आता सर्वच उत्तम झालं असताना तुझ्या मनात किंतु यावा हे माझ्या आकलना बाहेरचं आहे."
"मोहना, तुझ्या आकलना बाहेर चराचरातील बिंदू देखील नाही. तरीही.... तुला माझ्या मुखातूनच ऐकायचे आहे आणि मला देखील तुला स्पष्ट विचारायचे आहे. मिलिंदा.... अनेक दिवसांच्या प्रयत्नाअंति आज मी धाडस एकटवलं आहे; बोलुदे मला!"
"जशी तुझी इच्छा..... तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यास मी बांधील आहे."
"हे श्रीकृष्णा, कुरुक्षेत्रावरील युद्ध नक्की होणार हे ठरल्यानंतर केवळ तुझ्या सांगण्यावरून मी माझ्या सर्वात मोठ्या पुत्राकडे गेले होते...."
"ती काळाची गरज होती आते...."
"मान्य मधुसूदना.... त्याबद्दल माझी काहीच तक्रार नाही. नकळत्या वयात असली तरी चूक ती चूकच हे मी मान्य करते. माझा प्रश्न निराळा आहे. कर्ण माझा पुत्र आहे; पांडवांचा ज्येष्ठ बंधू आहे हे समजताच माझ्या पुत्राने युधिष्ठिराने मला उद्देशून समस्त स्त्रीजातीला शाप दिला.... 'यापुढे आम्ही कोणतेही गुपित उदरात सामावून ठेऊ शकणार नाही!' जग्दउद्धारा, कर्णाच्या जन्माचे सत्य मी इतर पाचांना सांगू नये; हे तूच मला सांगितले होतेस. मग ज्यावेळी माझाच पुत्र मला उद्देशून मात्र समस्त स्रीजातीला शापित होता त्यावेळी तू मध्ये का नाही पडलास? त्या घटनेने मी शब्दातीत झाले होते. परंतु संपूर्ण सत्य माहीत असणारा; किंबहुना ते घडविणारा तू समोर असूनही त्यावेळी तो शाप तू थांबवला नाहीस.... का?"
"कुंतीआते, युधिष्ठिराच्या शापामुळे स्रीजातीला गुपित सांभाळता येणार नाही; असे खरच तुला वाटते का? पुरुष कायमच सर्व गुपिते स्वतःजवळ ठेवतात आणि ठेवतील; यावर तुझा पूर्ण विश्वास आहे का?"
"श्रीविश्वेश्वरा, प्रश्नाचे उत्तर प्रश्नाने नको देऊस. आता कोडी सोडविण्याचे बळ माझ्या अंगात राहिलेले नाही."
"बरं! आते, केवळ तुला म्हणून सांगतो.... सत्य समजल्या नंतर धर्माधारावर चालणाऱ्या युधिष्ठिराचे मन त्याला खाऊ लागले. नकळत का होईना आपल्याकडून आपल्या ज्येष्ठ बंधुवर अन्याय झाला आहे; आणि त्याबदल्यात कर्णाने मात्र सर्वस्व जाणून अर्जुनाचे प्राण आपल्या झोळीत टाकले आहेत; हे सत्य त्याचे मन जाळू लागले. त्या आंतराग्नीच्या ज्वाला युधिष्ठिराला सहन होईनात. त्यामुळे केवळ मन:शांति प्राप्तीसाठी त्याने तो शाप उच्चारला होता."
"जर हे सत्य असेल...."
"अहं! आते, मी तुझ्या प्रश्नांचे उत्तर देण्यास बांधील आहे; हे जितके सत्य आहे... तितकेच सत्य हे देखील आहे की जगद् चक्र चालण्यासाठी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणे योग्य नाही; येतो मी. सुखम्sभवतु!"
प्रतिक्रिया
16 Jul 2018 - 10:32 am | प्राची अश्विनी
सुरेख.
16 Jul 2018 - 12:14 pm | यश राज
छान लिहीलय
16 Jul 2018 - 12:56 pm | टर्मीनेटर
क्या बात...
16 Jul 2018 - 7:47 pm | ज्योति अळवणी
धन्यवाद.