अरि

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
15 Dec 2017 - 8:09 am

अरि
.......
त्यावर्षी पहिल्यांदाच एका भारतीय मुलाने शाळेत admission घेतली. अरिंधम त्याचे नाव. पण इतके अवघड नाव काय या अरबी मुलामुलींना घेता येईना. साहजिकच त्याचा अरि झाला. अकरावीत शिकत होता. तो म्हणजे आम्हा सर्व भारतीय शिक्षकांच्या जिव्हाळयाचा विषय! माझ्या जास्त जवळचा. कारण त्याने अकरावीला इंग्लिश साहित्य ठेवले होते, आणि पंजाबी असून महाराष्ट्रात बरीच वर्षे काढल्याने चांगले मराठी यायचे. म्हणजे, आमचे किती गूळपीठ असेल पहा!!

तर वार्षिक क्रिडा महोत्सव सुरु झाला. हा जोश, हा उत्साह!! नुसती खुन्नस, टाळ्या, चिडवा चिडवी, हुरर्यो, बघून घेईन, आनंद, कौतुक, आरोळ्या, चा चा चा, रडीचा डाव, पडका डाव, चिडका बिब्बा.... सगळं सगळं साग्रसंगीत चाललं होतं. जगाच्या पाठीवर कुठलीही शाळा असो, हे असंच असतं.
तीन दिवस चाललेल्या या जल्लोषात अरि सगळीकडे अव्वल. ते तीन दिवस माझ्या चेहऱ्यावरचे हसू कायम कॉर्नर टू कॉर्नर. मग! एक भारतीय मुलगा सगळ्या अरबांना मागे टाकून सर्व events मध्ये झेंडे रोवतो, म्हणजे आम्हा सर्व भारतीय शिक्षकांचा ऊर किती अभिमानाने भरून, अरबी समुद्र ओलांडून, असा ‘तव चरणतलाशी’ हज्जारदा शिवून आला असेल!

१००, २००, ४०० मिटर्स, बाकी सगळ्या रिलेज, marethon मध्ये हा वाऱ्याच्या वेगाने धावे. सगळीकडे बक्षिसे, मेडल्स.... हेsssss कौतुक. सगळी अरबी मुले त्याच्याकडे आधी जरा खुन्नसने, नंतर कौतुकाने आणि आश्चर्याने पाहू लागली. त्यांचा तो आदर्शच झाला! अरबी मुली लिहाफचा फारसा मुलाहिजा न बाळगता त्याच्याकडे पाहून हसायच्या, बोलायच्या, ‘मब्रूक’, ‘मुमताज’, ‘झेन’ म्हणायच्या. आम्ही हे कौतुकाने पाहायचो. मन ही मन में हसायचो.
सोहळा पार पडला. नंतर मधल्या सुट्टीत अरबी मुलांनी कोंडाळे करून अरिला विचारलेच, 'यारा, तू इतका फाष्ट कसा काय पळतोस?’
अरिने त्यांना मोठे गुपित सांगावे तसे सांगितले, ‘यू नो, इंडियात रेल्वे किती फाष्ट धावते! आम्हालाही तिच्या मागे तसेच धावावे लागते.... मग काय आपोआप सवयच होते फाष्ट पळायची!’ ;-)

इथल्या अरबी मुलांनी दुबईत, हिंदी सिनेमात, युरोपात जी रेल्वे पाहिली, त्यावरून अंदाज केला, आणि ‘असेल लेका... आपल्या देशात काय अजून रेल्वे नाही. आपण कार मधून हिंडतो.... जेव्हा रेल्वे येईल, तेव्हा बघू...’ म्हणत आपापल्या वर्गात निघून गेले. अरिच्या ओठांवर मिश्किल हसू.

शाळा सुटताना पोरींचा घोळका मागे रेंगाळला. अरि जवळ येताच, त्यातल्या अबीर नावाच्या बोलक्या मुलीने त्याला डोळे मोठेमोठे करत कौतुकाने विचारले, ‘ अरि, तू इतका फाष्ट कस्काय पळतोस? सांग की!’
इतक्या अरबी मुलींचा गराडा पाहून तो जरासा बुजला, पण मुळातच स्पोर्ट्समन असल्याने ग्रेसफुली थांबला. क्षणभर विचार करून हसत म्हणाला, ‘यू नो, इन इंडिया, एव्हरी शाहरुख रन्स फॉर हिज काजोल लाईक धिस!’ :-)
झाssssssलं असलं खतरा उत्तर ऐकून पोरी एकदम खुश!!
त्यांच्यात मग वाद सुरु झाला ... ‘त्या सिनेमात कोण धावतं? हो गं .... शेवटी नाही का.... रेल्वे स्टेशनवर.... शाहरुख धावतो?.... हो हो हो.... अगं नाही... काजोल धावते... मग शाहरुख तिला हात देतो....मग अरि काय म्हणाला......?’

.... आणि आमचा हा भारतीय धावपटू मस्त हसत हसत मुलींच्या घोळक्याकडे पहात, घराकडे जायला वळला.

-शिवकन्या

वाङ्मयकथाविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानअभिनंदनप्रतिभा

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

15 Dec 2017 - 10:19 am | टवाळ कार्टा

that's cheesy but not so cheesy pickup line ;)
आवडेश

आनन्दा's picture

15 Dec 2017 - 11:31 am | आनन्दा

मस्त.

राजाभाउ's picture

15 Dec 2017 - 11:31 am | राजाभाउ

मस्त !!!

असेल लेका... आपल्या देशात काय अजून रेल्वे नाही. आपण कार मधून हिंडतो.... जेव्हा रेल्वे येईल, तेव्हा बघू..

हे भारीय !!!

एस's picture

15 Dec 2017 - 1:32 pm | एस

छान.

प्रभाकर पेठकर's picture

15 Dec 2017 - 2:08 pm | प्रभाकर पेठकर

ब्येस्ट लक अरी...
सुंदर लेख.

अरविंद कोल्हटकर's picture

16 Dec 2017 - 1:31 am | अरविंद कोल्हटकर

अरिंधमचा अरि झाला ह्यावरून मला शत्रुघ्नचा शत्रु झाला हे आठवले (संदर्भ - शत्रु हाच तरुणींचा खरा मित्र आहे इति वि.आ. बुवा)

आणि हो, अरिंधम नाही - अरिंदम (अरि म्हणजे शत्रु, त्यांचे दमन करणारा)

शिव कन्या's picture

17 Dec 2017 - 9:42 pm | शिव कन्या

अरविंदजी, अर्थ सांगितलात खूप आभार.
शत्रु हाच तरुणींचा खरा मित्र आहे इति वि.आ. बुवा :-) :-)

ज्योति अळवणी's picture

16 Dec 2017 - 1:44 am | ज्योति अळवणी

साधीच... पण आवडली

शिव कन्या's picture

17 Dec 2017 - 9:43 pm | शिव कन्या

सर्व जाणत्या वाचकांचे आभार.