✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भीतीच्या भिंती: ८. मॉक ड्रिल

आ
आतिवास यांनी
Mon, 06/15/2015 - 12:44  ·  लेख
लेख
भाग १ २ ३ ४ ५ ६ ७ एक दिवस सकाळी सहा वाजता मजिदचा फोन आला. “आज तुला घ्यायला गाडी अर्धा तास उशिरा येईल, चालेल का?” असं विचारायला. त्यादिवशी मला काही अमुक ठिकाणी अमुक वाजता पोचायचं नव्हतं; ऑफिसमध्ये बसून एक रिपोर्ट पूर्ण करायचा होता फक्त; त्यामुळे अर्धा तास उशीर झाल्याने काही बिघडणार नव्हतं. मी होकार दिला आणि सहज ‘अडचण काय आहे’ ते विचारलं. माझ्या एका सहका-याला ‘ग्रामीण विकास आणि पुनर्वसन मंत्रालयात’ प्रशिक्षणासाठी जायचं होतं; त्याला पोचवून गाडी मला घ्यायला येणार होती. हा सहकारी माझ्याच हॉटेलमध्ये राहत होता. मला एकदम सुचलं. मी मजिदला म्हटलं, “हरकत नसेल तर मी त्याच्याबरोबर जाते आणि त्याला तिथं सोडून ऑफिसमध्ये येते.” माजिदला गंमत वाटली. सहका-यासाठी सुरक्षा सोपस्कार आधीच पार पडले असल्याने काही अडचण नव्हती. “ट्रॅफिक जाम असला तर नंतर तक्रार करू नकोस” अशी सूचना मला देऊन तो पुढच्या कामाला लागला. आणि ‘आज नवा रस्ता पाहायला मिळणार’ म्हणून मी खूष झाले. “दारूल अमन” रस्ता मला ऐकून माहिती होता. या रस्त्यावर बरेच बॉम्बस्फोट होतात आणि बरेचदा निदर्शनं होतात हे आजवर आलेल्या अनेक ‘सुरक्षा संदेशां’मुळे मला माहिती होतं. हा रस्ता ज्याअर्थी तालिबानचं सतत ‘लक्ष्य’ असतो, त्याअर्थी तो दिल्लीच्या 'राजपथ' सारखा महत्त्वाचा रस्ता असणार हे लक्षात आलं होतं. अनेक महत्त्वाची मंत्रालयं, राष्ट्राध्यक्ष निवास, संसद या रस्त्यावर आहेत. "दारूल अमन" म्हणजे "अल्लाचं निवासस्थान". या शब्दांचा “शांतीचं स्थान” असाही एक अर्थ सांगितला जातो. तिथं इतका रक्तपात होत रहावा हा एक विरोधाभास. याच रस्त्यावर “दारूल अमन राजवाडा” आहे. १९२० च्या आसपास राजा अमानुल्ला खानने काबूल शहरापासून १६ किलोमीटर अंतरावर हा राजवाडा बांधला. हा राजवाडा अफगाणच्या सुधारणेचा एक भाग होता. पण अमानुल्लाला सत्तेवरून पायउतार व्हावं लागलं आणि राजवाडा दुर्लक्षित झाला. १९६९ साली या राजवाड्याला मोठी आग लागली. मग १९७० ते १९७८ या काळात 'संरक्षण मंत्रालय' तिथ कार्यरत होतं. १९७९ च्या कम्युनिस्ट आक्रमणात ही इमारत पुन्हा आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. मग रशियनांचा पराभव करण्यसाठी मुजाहिद्दिन आणि त्यांचा पराभव करायला तालिबान या राजवाड्याचा उपयोग करत राहिले. आज हा राजवाडा भग्नावस्थेत आहे. त्याची पुनर्बांधणी करून अफगाण संसद तिथं भरेल अशी योजना आहे; पण अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. राजवाड्यात जाण्याची मला परवानगी नसल्याने (पुढेही अनेकदा या रस्त्यावर गेले तरी प्रत्येक वेळी) मी हा राजवाडा फक्त लांबून पाहिला! या रस्त्यावर भिंती कमी होत्या आणि पसरत जाणा-या काबूल शहराचं एक वेगळं (रोजच्यापेक्षा वेगळं) दर्शन मला झालं. नवख्या माणसाला हे शहर नॉर्मल वाटावं इतकी गर्दी रस्त्यावर होती. भोवतालच्या टेकड्यांवर घरं दाटीवाटीने उभी होती. kabul1 लोक तिथं कसे पोचत असतील, त्यांच्यासाठी किमान सोयी तरी तिथं असतील का असे अनेक प्रश्न मनात आले. कोणत्याही शहरात ग्रामीण भागातून माणसं येतात ती मुख्यत्वे ‘जगायला’ हा आपल्याकडचा प्रवाह तिथंही आहेच. गावातून इथं लोक येतात ते जीव वाचवण्यासाठीही – शब्दश: जगायला!. इतक्या सगळ्या आंतरराष्ट्रीय संस्था आहेत त्यांना स्थानिक कर्मचारी घ्यावे लागतातच, त्यामुळेही इथं गर्दी आहे. श्रीमंत लोक जिथं असतील त्या परिसरात जवळच गरीबांची वसाहत असते (कारण ‘चीप लेबर’) हा ‘शहरीकरण’ या विषयाच्या अभ्यासात शिकलेला सिद्धान्त इथं पुन्हा एकदा प्रत्ययास आला. आता काबूलमध्ये बहुमजली इमारती बांधल्या जात आहेत ख-या पण त्याच्या किंमती सामान्य माणसांच्या आवाक्याबाहेर आहेत. bldg राजकारणी (त्यातही सत्ताधारी) आणि बांधकाम व्यावसायिक यांच्यातल्या नातेसंबधांच्या अनेक सुरस आणि चमत्कारिक कहाण्या ऐकायला मिळाल्या. इथं येण्यापूर्वी ‘अतिशय कठीण परिस्थितीत देशाची जबाबदारी निभावून नेणारा नेता’ म्हणून तत्कालीन राष्ट्राध्यक्ष श्री. हमीद करझाई यांचं मला कौतुक वाटायचं. इथं आल्यावर मात्र त्यांच्याबद्दल अशा अनेक गोष्टी कळल्या, की स्वत:च्या भाबडेपणाचं हसू आलं. भारतीय नागरिक या नात्याने इथल्या भ्रष्टाचाराच्या कहाण्यांना नावं ठेवण्याचा नैतिक अधिकार मला नाही याची मला अर्थातच जाणीव होती; आजही आहे. वाटेत दिसणा-या या कालव्याजवळ ‘खुदा गवाह’ या चित्रपटाचं चित्रीकरण झालं होतं आणि ते दाखवायला एक वाहनचालक मला घेऊन गेला होता. २०१५ मधली ही दुर्दैवी घटना या कालव्याच्या साक्षीने झाली! canal एक दिवस ऑफिसमधून घरी येताना गाडी वेगळ्या रस्त्याने येत होती आणि त्या रस्त्यावर राहणारे काही सहकारी सोबत होते. एचआरने केलेल्या ओळखपरेडमध्ये यांच्याशी फक्त जुजबी ओळख झाली होतं. किरकोळ बोलणं झालं आणि ‘आज रस्ता का बदलला आपण’ असं मी विचारल्यावर एकाने “आम्ही तुझं अपहरण करतोय” असं म्हटलं. त्यातली गंमत जाणून मीही हसत “माझ्या घरचे लोक काही तुम्हाला पैसे देऊन मला परत घेणार नाहीत. मला तुमच्याकडून परत घेण्यासाठी कदाचित ते तुम्हालाच पैसे मागतील” अशी पुस्ती जोडली. त्यावर दुसरा म्हणाला, “तुझ्या घरच्या लोकांना थोडेच मागणार आम्ही? आम्ही युएनकडे मागू पैसे. तुझा जीव वाचवण्यासाठी युएन देईल हवे तितके पैसे.” पुढे तिसरा म्हणाला, “शिवाय आम्ही तुला पाकिस्तान तालिबानला विकू अशी धमकी दिली, की तुमचं सरकारही दबाव टाकेल युएनवर”. त्यावर सगळे हसले आणि असं काही होऊही शकतं याची मी नोंद घेतली. मग मी शहाणपणा दाखवत विषय बदलला. ‘अलिबाबा आणि चाळीस चोर’ गोष्टीतले वाटावेत असे मोट्ठे रांजण मला दिसले. raanjan यात ‘नान’ बनवले जातात असं कळलं. अर्थात अपहरणाची घटना घडू नये म्हणून सुरक्षा व्यवस्था नको इतकी काळजी घेते याचा अनुभव मला लगेच आला. एकदा मी शहराच्या दुस-या टोकाला दुस-या एका आंतरराष्ट्रीय संस्थेत एका अधिका-याला भेटायला गेले. साधारण तासभराची मिटिंग, त्यासाठी रीतसर परवानगी घेतली होती. मी तिथं पोचून पाचेक मिनिटं झाली असतील–नसतील, जॉर्जचा फोन आला. “तू कुठे आहेस?” त्याने विचारलं. मी ऑफिसचं नाव – जे जॉर्जला माहिती होतं – ते पुन्हा सांगितलं. “तू त्या ऑफिसमध्ये आहेस का गेटमध्ये?” त्याने विचारलं. “आत आहे. पाच मिनिटं झाली. एक तास लागेल अजून.” मी सांगितलं. “तुझी मिटिंग कुणाबरोबर आहे?” त्याचा पुढचा प्रश्न. त्या अधिका-याचं नाव मी जॉर्जला सांगितलं. “त्याला फोन दे,” जॉर्ज म्हणाला, मी दिला. अर्धा मिनिट जॉर्ज बोलला, तो अधिकारी फोन माझ्या हातात देत म्हणाला, “सॉरी, मला एक तातडीचं काम आहे. आपण पुन्हा कधीतरी भेटू.” इतकी आधी ठरवलेली मिटिंग हा माणूस जॉर्जच्या फोननंतर रद्द करतोय हे माझ्या नजरेतून सुटलं नव्हतं. काहीतरी गडबड होती हे नक्की. तरीही मी म्हटलं, “मी थांबू शकते थोडा वेळ. तुम्ही तुमचं काम आटोपून या. किंवा मी तुमच्या असिस्टंटशी बोलते.” “नाही. तुम्ही निघा,” असं म्हणून तो उभा राहिला, त्याने कुणालातरी हाक मारली. एक सैनिक माझ्याजवळ आला आणि त्याने मला दाराकडे येण्याची विनंती केली. खरं तर त्या क्षणी ‘हे लोक मला हाकलून देताहेत’ असं मला जाणवत होतं. राग, अपमान, आश्चर्य, वैताग अशा मिश्र भावना काबूत ठेवत सैनिकासोबत मी गाडीजवळ आले. मी येण्यापूर्वीच चालकाने गाडी सुरु केली होती त्याअर्थी जॉर्जचा त्यालाही फोन आला होता. परत जॉर्जचा फोन. “गाडीत बसलीस का तू” हे विचारण्यासाठी. चालकाने गाडी सुसाट सोडली. ज्या रस्त्याने आम्ही आलो, त्यापेक्षा वेगळ्या रस्त्याने परत जात होतो आम्ही. “काय झालं?” मी चालकाला विचारलं. “कुठे काय? आपण ऑफिसमध्ये परत जातोय,” चालक म्हणाला. एरवी भरपूर गप्पा मारणारा चालक आज बोलायला तयार नव्हता, मी सोडून दिलं विचार करणं. ऑफिसमध्ये आल्यावर जॉर्जला विचारलं, “काय झालं?” तो म्हणाला “कुठे काय? काही नाही”. “Only those who MUST know, SHOULD know” हे ‘सुरक्षा तत्व’ मला माहिती होतं. आपल्याला काही सांगितलं जाणार नाही हे जाणून मी गप्प बसले. योगायोगाने दुपारच्या जेवणाच्या टेबलावर अचानक दोन श्रीलंकन सेनाधिकारी भेटले. सुचिथमुळे यांच्याशी मैत्री झाली होती. एकाने विचारलं, “आज काय विशेष?”. मी काही उत्तर द्यायच्या आत दुसरा पहिल्याला म्हणाला, “ओके सगळं?” त्यांच्या आपापसातल्या बोलण्यात असे काही शब्द आले, की मी कान टवकारले. मी सकाळी ज्या भागात होते, ते नाव आलं आणि मला संदर्भ लागला. मी सकाळी ज्या भागात होते, तिथं भारतीय स्त्रीचं अपहरण होण्याच्या शक्यतेचा ‘रेड अ‍ॅलर्ट’ मिळाला होता. म्हणून जॉर्जने मला त्या भागातून तातडीने बाहेर काढलं होतं तर! एक पोलीस गाडी आमच्या गाडीच्या सतत मागे का होती तेही समजलं. अर्थात मीच लक्ष्य असेन असं नाही. माझ्या चेह-याकडे पाहून ते अधिकारी काय समजायचं ते समजले. पहिला अधिकारी म्हणाला, “इंटेलिजन्सला जी माहिती मिळते ती १००% खरी ठरते अशातला भाग नाही, पण आपण धोका पत्करत नाही कधीच. आपल्या सिक्युरिटी व्यवस्थेवर विश्वास ठेव. ओके. काय घेणार आहेस तू? इथं पिज्झा मस्त मिळतो. आजचं जेवण माझ्यातर्फे.” मग आम्ही इतर गप्पा मारत राहिलो. हा धोका खरा होता की फक्त एक मॉक ड्रिल? हे मला कधीच कळणार नाही. इथं आल्यापासून माझ्यात परिस्थितीवश झालेला एक बदल म्हणजे “सदैव जाण्याच्या (म्हणजे पळून जाण्याच्या) तयारीत असणं!” लॅपटॉप आणि फोन सतत पूर्ण चार्ज्ड ठेवणं, बॅग नेहमी भरलेली ठेवणं, अगदी मध्यरात्रीही एका मिनिटात बाहेर पडता येईल अशा रीतीने पासपोर्ट, युएन ओळखपत्र आणि पुरेसे डॉलर्स जवळ बाळगणं इत्यादी . माझ्या खोलीच्या समोर चोवीस तास सुरक्षारक्षक असायचाच. हे सगळे भारतीय गुरखा पलटणीतले निवृत्त सैनिक. जातायेता आमच्या गप्पा व्हायच्या. काडतुस काढून त्यांनी मला बंदूक हाताळायला दिली. तिचं वजन न पेलता आल्याने बंदूक चालवायला शिकण्याचा माझा उत्साह मावळला. हे उमदे गुरखा अत्यंत सभ्य होते, त्यांचा आधार वाटायचा. पण चोवीस तास ते समोर नको वाटायला लागले. वरच्या मजल्यावर कोप-यातली, आकाश दिसणारी खोली मला एक दिवस मिळाली खरी पण काही तासांत माझी रवानगी परत जुन्या खोलीत केली गेली. का? माहिती नाही. एका शनिवारी दोन गुरखांशी बराच वेळ गप्पा मारत बसले होते. मी सहज विचारलं, “शत्रूला तुम्ही मारता, तेव्हा....?” मला प्रश्न पूर्ण न करू देता माझ्यावर नजर रोखत एकजण शांत आवाजात म्हणाला, “हम किसी को मारते नहीं; हम तो केवल आप जैसे बेगुनाह लोगों की रक्षा करते है”. सैनिक ही काय चीज असते याचा साक्षात्कार घडवून आणणारा क्षण होता तो. मी आल्यावर पहिले दोन तीन दिवस जॉर्ज “बंकर पाहिलास का” अशी सारखी विचारणा करत होता. तो अखेर एकदाचा पाहिला. ती एक दहा बाय बाराची खोली, त्यात दोन सोफा, दोन खुर्च्या एक पाण्याचं भांडं आणि दोन ग्लास. विशेष काही वाटलं नाही मला. समोर सुरक्षारक्षक असल्याने माझी खोली सुरक्षित आहे आणि इथून पळत जायला बंकर जवळ आहे हे बंकर भेटीनंतर लक्षात आलं. एक दिवस सकाळी ऑफिससाठी बाहेर पडताना पहा-यावरच्या सैनिकाने एक कागद हातात दिला. आज संध्याकाळी साडेसात वाजता ‘बंकर मॉक ड्रिल’ होती. ऑफिसमध्ये पोचल्यावर मी सगळ्या सूचना व्यवस्थित वाचून काढल्या. ही ड्रिल एक रुटीन दिसतंय इथलं असं म्हणून मी निवांत बसले. संध्याकाळी सातच्या सुमारास जिममध्ये व्यायाम करून, येताना रिसेप्शनवरच्या मुलीशी गप्पा मारत उभी होते. तितक्यात सायरन वाजला. मी गोंधळून तशीच उभी होते ते पाहून ती म्हणाली, “बंकरमध्ये पळा.” मी पळत तिकडं गेले. आम्ही सगळे बुलेटप्रुफ जाकिट, कागदपत्रं वगैरे न घेताच रिकाम्या हातांनी तिथं पोचलो होतो. काही लोकांनी तर यायला पाच मिनिटं घेतली तर काही निवांत फोनवर बोलत चालत आले. रशीद, जो आमचा वॉर्डन होता, त्याने आमचं जोरदार बौद्धिक घेतलं – सूचनांचं काटेकोर पालन कसं गरजेचं आहे यावर. “पण ड्रिल तर साडेसातला होती, तुम्ही ती अचानक सात वाजता घेतलीत” – आमच्यातल्या काहींनी (मीही होते त्यात, खोटं कशाला बोला) तक्रारवजा समर्थन करण्याचा प्रयत्न केला. “दहशतवादी तुमची अपॉइन्टमेंट घेऊन हल्ला करतील याची कुणाला खात्री आहे?” रशीदने आक्रमक शांतपणे विचारलं. आम्ही गप्प बसलो. “हा संगणकावरचा खेळ नाही, हे इथलं वास्तव आहे. हे सगळं तुमचा जीव वाचवण्यासाठी आहे. सगळे नियम पाळले गेलेच पाहिजेत, चोवीस तास. त्याबाबत कुणाची तक्रार असेल तर एकच पर्याय आहे. पहिल्या फ्लाईटने आपल्या घरी जाणं!” रशीद पोटतिडीकीने बोलत होता त्याचा आम्हा सगळ्यांवर अपेक्षित परिणाम झाला. सूचनांची उजळणी करून आमची ड्रिल संपली. गंभीर होऊन आम्ही त्या परिस्थितीत जगण्यास सज्ज झालो. ती मॉक ड्रिल ही एक चुणूक होती भविष्याची. क्रमशः

Book traversal links for भीतीच्या भिंती: ८. मॉक ड्रिल

  • ‹ भीतीच्या भिंती: ७. कोपरा
  • Up
  • भीतीच्या भिंती: ९. हल्ला ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
देशांतर
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
30598 वाचन

💬 प्रतिसाद (40)

प्रतिक्रिया

काय आयुष्य असेल तिथल्या

एस
Mon, 06/15/2015 - 12:52 नवीन
काय आयुष्य असेल तिथल्या सामान्य जनतेचं! या लेखमालिकेबद्दल शतशः आभार!
  • Log in or register to post comments

बहुप्रतीक्षित धागा !

खेडूत
Mon, 06/15/2015 - 13:01 नवीन
बहुप्रतीक्षित धागा ! भयंकर प्रकार आहे एकूण! नेहेमीप्रमाणेच आवडला . (टेकडीवरची घरे पाहून पुण्यात वारजे माळवाडीच्या टेकड्या आठवतात!)
  • Log in or register to post comments

नेहमीप्रमाणेच उत्तम भाग....

मुक्त विहारि
Mon, 06/15/2015 - 13:13 नवीन
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

क्षणाक्षणाला किती दहशतीच्या

मधुरा देशपांडे
Mon, 06/15/2015 - 13:19 नवीन
क्षणाक्षणाला किती दहशतीच्या वातावरणात जगतात तिथले लोक. वाचनीय लेख.
  • Log in or register to post comments

मोठे भाग द्या अजून... :)

टवाळ कार्टा
Mon, 06/15/2015 - 13:40 नवीन
मोठे भाग द्या अजून... :) इतक्या मोठ्या प्रतिक्षेनंतर फार थोडेसेच वाचल्यासारखे वाटते
  • Log in or register to post comments

अतिशय वेगळा अनुभव... पुढच्या

संदीप डांगे
Mon, 06/15/2015 - 13:51 नवीन
अतिशय वेगळा अनुभव... पुढच्या भागाच्या तीव्र प्रतिक्षेत..
  • Log in or register to post comments

भितीच्या भिंती जवळ

अजया
Mon, 06/15/2015 - 13:54 नवीन
भितीच्या भिंती जवळ आल्यासारख्या वाटल्या या भागात.पुभाप्र.
  • Log in or register to post comments

रोचक!

अनुप ढेरे
Mon, 06/15/2015 - 13:55 नवीन
रोचक!
  • Log in or register to post comments

गुडनेस!!!

यशोधरा
Mon, 06/15/2015 - 14:12 नवीन
गुडनेस!!!
  • Log in or register to post comments

बापरे

अमृत
Mon, 06/15/2015 - 14:49 नवीन
रोमांच उठलेत वाचताना.
  • Log in or register to post comments

नेहमीप्रमाणेच एका वेगळ्या

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 06/15/2015 - 15:04 नवीन
नेहमीप्रमाणेच एका वेगळ्या दुनियेची/जीवनशैलीच्या एका पदराची अतिवास स्टाईलने ओळख ! “दहशतवादी तुमची अपॉइन्टमेंट घेऊन हल्ला करतील याची कुणाला खात्री आहे?” रशीदने आक्रमक शांतपणे विचारलं. आम्ही गप्प बसलो. “हा संगणकावरचा खेळ नाही, हे इथलं वास्तव आहे. हे सगळं तुमचा जीव वाचवण्यासाठी आहे. सगळे नियम पाळले गेलेच पाहिजेत, चोवीस तास. त्याबाबत कुणाची तक्रार असेल तर एकच पर्याय आहे. पहिल्या फ्लाईटने आपल्या घरी जाणं!” हे अटळ सत्य असतानाही काही काळाने गाफिल/निष्काळजी होणारे अनेक लोक असतात याचं आश्चर्य वाटणं बंद झालं आहे ! :(
  • Log in or register to post comments

पुभाप्र

सूड
Mon, 06/15/2015 - 15:12 नवीन
पुभाप्र
  • Log in or register to post comments

भीतीच्या भिंती

कपिलमुनी
Mon, 06/15/2015 - 17:40 नवीन
तुमच्या लेखात भिती अगदी मुर्तिमंत जाणवते. अपहरण झाला तर ? अशा विचारांनीच काटा येतो . आणि तुम्ही अशा प्रदेशामध्ये काम केलात . तुमच्या धाडसाला _/\_
  • Log in or register to post comments

अंगावर कट आणणारा लेख .

सांगलीचा भडंग
Mon, 06/15/2015 - 18:26 नवीन
अंगावर कट आणणारा लेख .या सारख्या प्रदेशमध्ये राहणाऱ्या आणि काम करणाऱ्या सगळ्यांना सलाम
  • Log in or register to post comments

च्यायला :(

बॅटमॅन
Mon, 06/15/2015 - 19:04 नवीन
च्यायला :(
  • Log in or register to post comments

अंगावर काटा उभा राहीला

मित्रहो
Mon, 06/15/2015 - 19:05 नवीन
विशेषतः ते अपहरणाचे संभाषण वाचताना. थट्टा म्हणून ते संभाषण असले तरी.
“दहशतवादी तुमची अपॉइन्टमेंट घेऊन हल्ला करतील याची कुणाला खात्री आहे?” रशीदने आक्रमक शांतपणे विचारलं. आम्ही गप्प बसलो. “हा संगणकावरचा खेळ नाही, हे इथलं वास्तव आहे. हे सगळं तुमचा जीव वाचवण्यासाठी आहे. सगळे नियम पाळले गेलेच पाहिजेत, चोवीस तास."
कुठेतरी वाचलेली व्यक्तीस्वातंत्र्य विरुद्ध सुरक्षा चाचणी या विषयावरची चर्चा आठवली. आपण राहतो तो भाग तसा सुरक्षित असते, तिथे रोजचे बॉम्बस्फोट वगेरे होत नाही म्हणून आपण अशा चर्चा करीत असतो पण काबूल सारख्या ठिकाणी असल्या गोष्टी कोणाच्या डोक्यात सुद्धा येणार नाही.
  • Log in or register to post comments

सुंदर लेख

बोका-ए-आझम
Mon, 06/15/2015 - 21:11 नवीन
ब्रिटिश साम्राज्यावर सूर्यही न मावळण्याच्या दिवसांत त्यांना आव्हान देणाऱ्या आणि ब्रिटिशांनीही धैर्याबद्दल कौतुक केलेल्या गाझींच्या देशात सध्या भीतीचं साम्राज्य असावं हा फारच मोठा विरोधाभास आहे. लेख अप्रतिम. वाचून आपल्या स्वातंत्र्याची किंमत कळली.
  • Log in or register to post comments

जबरदस्त! पुभाप्र!

आदूबाळ
Mon, 06/15/2015 - 21:30 नवीन
जबरदस्त! पुभाप्र!
  • Log in or register to post comments

नेहमी प्रमाणे

सुधीर
Mon, 06/15/2015 - 22:09 नवीन
नेहमी प्रमाणे वेगळ्या जगाची, वेगळ्या आयुष्याची ओळख होतेय!
  • Log in or register to post comments

दंडवत

श्रीरंग_जोशी
Tue, 06/16/2015 - 00:12 नवीन
या अनुभवकथनासाठी दंडवत. सर्व चित्र डोळ्यांपुढे उभं राहिलं. फोटोंसाठी विशेष आभार.
  • Log in or register to post comments

बापरे!

रुपी
Tue, 06/16/2015 - 00:21 नवीन
वाचून अंगावर काटाच आला! तुम्ही ते दिवस कसे काढले असतील आणि तिथले लोक रोजचं आयुष्य कसं जगत असतील!
  • Log in or register to post comments

आता पर्यंतचे सगळे लेख एकत्रच

अनन्त अवधुत
Tue, 06/16/2015 - 03:59 नवीन
आता पर्यंतचे सगळे लेख एकत्रच वाचायला मिळाल्याने छान वाटले. एकदम वेगळे अनुभव वाचायची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. तुमचे आणि सहकाऱ्यांचे गाडीतले अपहरणाचे संभाषण अनपेक्षितपणे भीतीदायक आहे, कदाचित त्याच त्याच वातावरणात राहून असली चर्चा थट्टेकडे वळत असेल. पुढील लेखाच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments

खूपच वेगळे आणि भितीदायक अनुभव

प्रचेतस
Tue, 06/16/2015 - 10:24 नवीन
खूपच वेगळे आणि भितीदायक अनुभव.
  • Log in or register to post comments

थरारक....

ज्ञानोबाचे पैजार
Tue, 06/16/2015 - 10:59 नवीन
भितीच्या भिंती चा नवा भाग बोर्डावर दिसला की लगेच त्यावर उडी मारतो. ते दिवस तुम्ही कसे काढले असतील? पुभाप्र. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

खिळवणारे

नाखु
Tue, 06/16/2015 - 11:03 नवीन
खिळवणारे आणी खुळावणारे लिखाण पंखा नाखु
  • Log in or register to post comments

जबरदस्त अनुभव कथन !

मदनबाण
Tue, 06/16/2015 - 11:40 नवीन
जबरदस्त अनुभव कथन ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- में गोरी चिट्टी छमिया... ;)
  • Log in or register to post comments

भयानक!!!

उमेश येवले
Tue, 06/16/2015 - 12:04 नवीन
इथे घरात बसून वाचताना धडधड होते तर प्रत्यक्षात तिथे कसे दिवस काढले असतील. छानच लेख आहेत पण दोन भागा मध्ये उगीचच खूप अंतर वाटते.
  • Log in or register to post comments

थरारक वाचतोय

निनाद मुक्काम …
Tue, 06/16/2015 - 13:59 नवीन
थरारक वाचतोय
  • Log in or register to post comments

काय एक एक भयंकर अनुभव घेतलेत

इशा१२३
Tue, 06/16/2015 - 15:18 नवीन
काय एक एक भयंकर अनुभव घेतलेत अतिवास.बापरे!वाचुनहि अंगावर काटा येतोय.कसे रहात असतील तिथले लोक.
  • Log in or register to post comments

थरारक!

जुइ
Tue, 06/16/2015 - 19:50 नवीन
थरारक लेख! तेथील रोजचे जनजीवन कसे असेल याची प्रचिती आली.
  • Log in or register to post comments

आतिवास, ह्या अनुभवांचे पुस्तक

यशोधरा
Tue, 06/16/2015 - 20:25 नवीन
आतिवास, ह्या अनुभवांचे पुस्तक प्रकाशित करायचे मनावर घ्या.
  • Log in or register to post comments

मानसिक तणाव काय असतो, हे

विवेकपटाईत
Tue, 06/16/2015 - 20:51 नवीन
मानसिक तणाव काय असतो, हे वाचताना जाणीव झाली. मी असा ताण सहन करू शकेल मला नाही वाटत.
  • Log in or register to post comments

जोरदार

चाणक्य
Wed, 06/17/2015 - 10:59 नवीन
सगळे भाग आत्ता वाचले. नेहमीप्रमाणेच कसदार लेखन. हे अनुभव ईथे आमच्यासमोर मांडताय याबद्दल आभारी आहोत.
  • Log in or register to post comments

एकीकडे युरोप/अमेरिका प्रवास

उदय के'सागर
Wed, 06/17/2015 - 16:03 नवीन
एकीकडे युरोप/अमेरिका प्रवास वर्णनं वाचताना हेवा वाटतो तोच दुसरी कडे ही लेखमाला वाचली की गोंधळायलाच होतं, म्हणजे आपण (भारत/भारतीयांनी) स्वतःला सुखी, नशीबवान, संपन्न मानायचं का? अप्रतिम लेखमाला. पुढच्या भागांची आतुरतेने वाट पहातोय.
  • Log in or register to post comments

थरारक...

खटपट्या
Wed, 06/17/2015 - 16:25 नवीन
थरारक... काही फोटो दीसतायत, काही दीसत नाहीत...
  • Log in or register to post comments

:-(

आतिवास
Wed, 06/17/2015 - 23:17 नवीन
असं का होतंय ते मला माहिती नाही. सर्व फोटोंचे युआरएल माझ्या ब्लॉगवरून दिले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

पुभाप्र...

कौशिकी०२५
Wed, 06/17/2015 - 16:46 नवीन
पुभाप्र... नि:शब्द करणारा झालाय हाही भाग.
  • Log in or register to post comments

बापरे!

के.पी.
Wed, 06/17/2015 - 19:23 नवीन
बापरे! केवढं भयावह. पुभाप्र :)
  • Log in or register to post comments

थरारक

सुमीत भातखंडे
Tue, 10/27/2015 - 11:29 नवीन
अनुभव. हाही भाग आवडला.
  • Log in or register to post comments

:(

मनिम्याऊ
Sun, 09/05/2021 - 12:07 नवीन
:(
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा