ब्लेड रनर – चित्रपटात रंगसंगतीचा प्रभावी वापर
काही दिवसांपूर्वी इंद्रराज पवार यांनी चित्रपटातल्या रंगसंगतीविषयी दोन लेख लिहिले होते. (पहा: ‘चित्रपटातील "तानापिहिनिपाजा"’ आणि ‘अनेक भावनांचे प्रतीक : लाल रंग’) ते वाचताना अमेरिकन चित्रपटांमध्ये खूप प्रभावी पद्धतीनं रंगांचा वापर केला आहे असे चित्रपट आठवण्याचा प्रयत्न केला असता पटकन आठवलेला एक चित्रपट म्हणजे ब्लेड रनर. १९८२ सालची ही विज्ञान-काल्पनिका (सायन्स-फिक्शन) आता एक अभिजात कलाकृती म्हणून मान्यता पावली आहे. वर दिलेल्या विकिपीडियाच्या दुव्यावर चित्रपटाची कथा वाचता येईल म्हणून ती पुन्हा इथे तपशीलात दिलेली नाही; फक्त मुद्द्यांच्या अनुषंगानं लागेल तेवढी माहिती जागोजागी दिली आहे.
चित्रपटातलं वातावरण काल्पनिक भविष्यकाळातलं आहे. माणसांनी बनवलेले हुबेहूब माणसांसारखे यंत्रमानव आणि माणसं यांच्यातला उंदीर-मांजराचा खेळ चित्रपटात आहे. यंत्रमानव माणसापेक्षा हुशार आणि शारिरीकदृष्ट्या सक्षम आहेत, पण त्यांना भावना नसतात. त्यांना परग्रहांवर गुलाम म्हणून वापरलं जात असतं. त्यांपैकी काही मानव म्हणून पृथ्वीवर बेकायदेशीररीत्या वावरत असतात. मानवावर मात करण्याच्या त्यांच्या डावपेचांचा तो एक भाग असतो. मानव म्हणून खपून जाण्यासाठी ते भावनिक प्रतिसादांचं सोंग आणतात. त्यामुळे त्यांचे प्रतिसाद कृत्रिम आणि म्हणून माणसांहून वेगळे असतात. समोरच्या व्यक्तीचे भावनिक प्रतिसाद जोखून ती माणूस आहे की यंत्रमानव आहे, हे ओळखावं लागतं. म्हणजे भावना असणं एवढंच काय ते मानवी असण्याचं लक्षण आहे. पण हळूहळू त्याबाबतही नायकाला (हॅरिसन फोर्ड) शंका वाटू लागते. कदाचित काही यंत्रमानव भावनिक बाबतींतसुद्धा माणसासारखेच, किंवा शुष्क/नीरस/स्वार्थी अशा पुष्कळशा माणसांहून श्रेष्ठही बनत आहेत की काय, असं नायकाला वाटू लागतं. पण यंत्रमानवांना पकडून देणं हे त्याचं काम आहे. त्यामुळे त्याला पडू लागणारे मानवी अस्तित्वविषयक मूलभूत प्रश्न हे पाठलागाच्या तद्दन हॉलीवूड कथानकाचा हळूहळू ताबा घेत आहेत असं जाणवू लागतं.
माणूस असणं म्हणजे नक्की काय? मानवजात ज्या दिशेनं चालली आहे तिला प्रगती म्हणायचं का? अशा प्रश्नांना सामोरा जाणारा नायक (आणि इतर पात्रं) दाखवण्यासाठी प्रकाशयोजना आणि रंगसंगती यांचा प्रभावी वापर केलेला आहे आणि त्याचाच आढावा या लेखात घेतलेला आहे.
चित्रपटातलं वातावरण अतिशय निराशाजनक आहे. त्यातलं लॉस अँजेलिस शहर हे सडलेलं, कुबट, रया गेलेलं, अंधारलेलं आहे. फक्त गरीब माणसं आणि गुन्हेगार रस्त्यांवर वावरतात. श्रीमंत लोक टोलेजंग इमारतींत प्रचंड सुरक्षेखाली रहातात. पोलीस उडत्या यानांतून शहरांत फिरत असतात. निराशेचा काळपट भाव पकडण्यासाठी चित्रपट अंधाऱ्या वातावरणात घडतो. बहुतेक प्रसंग रात्री घडतात.
खाली दिलेल्या व्हिडिओतुकड्यामध्ये शीर्षकांनंतर लगेच येणारी दृश्यं दिसतील. त्यांवरून या वातावरणाचा अंदाज येईल.
http://www.youtube.com/watch?v=AbWNZkoQHuE&feature=player_embedded
या अंधार्या चित्रपटात सूर्य असलाच तर तो मावळतीला आलेला दिसतो. त्यामुळे वातावरण अधिक टोकदार निराशा दर्शवतं. उदा. हे पहा:
ही निराशा मानवजातीच्या भविष्याबद्दल आहे तशी ती तांत्रिक प्रगतीबद्दलसुद्धा आहे. एवढी प्रगती होऊनही गरीबी, हलाखीसारखे प्रश्न सुटलेले नाहीत आणि मनुष्य आनंदी नाही. हे दाखवण्यासाठी अंधाराबरोबर येणारा दुसरा एक घटक म्हणजे प्रखर अनैसर्गिक प्रकाशझोत. रस्त्यावरच्या निऑन साइन्स आणि सर्व अवकाश व्यापणाऱ्या अजस्र जाहिराती यांचा सतत मारा होत असलेले मनुष्य आपलं मानसिक संतुलन हरवून बसलेले असणार, याची जणू ग्वाहीच प्रत्येक चौकटीतून मिळत रहाते. उदा. हे पहा:
यात दिसणारी पिक्सेलाइजड जपानी स्त्री ही एका सतत चालत रहाणाऱ्या जाहिरातीतली आहे. समोरचं विमान एखाद्या मोटारीच्या आकाराचं आहे. त्यावरून त्या जाहिरातीचा प्रचंड आकार लक्षात येईल.
तांत्रिक प्रगतीमुळे बरंचसं जग हे कृत्रिम आहे, अगदी प्राणीसुद्धा. निसर्गाचं कुठेही दर्शन नसणाऱ्या आयुष्यातली ही कृत्रिमता रंगांच्या माध्यमातून अधोरेखित होते. चित्रपटातले रंग हे लक्षात येतील इतके कृत्रिम आहेत.
किंवा चित्रपटातल्या विविध प्रतिमा एकत्र करून बनवलेलं हे कोलाज पहा:
सबंध चित्रपटात अशी रंगसंगती वापरल्यावर जिथं ती वापरली जात नाही असा प्रसंग कोणता ते पाहणं रोचक ठरतं.
नायक आणि एक यंत्रमानव यांच्यात प्रेमसंबंध जुळतात. त्या प्रसंगातली ही प्रतिमा आहे. इथे रंग उबदार मानवी झालेले लक्षात येतील. हीच यंत्रमानव नायकाला आणि आपल्याला पहिल्यांदा कशी दिसते ते पाहिलं, तर हा फरक अजून ठळक होईल.
आता नायकाचा तिढा दाखवण्यासाठी रंगांचा उपयोग कसा केला आहे हे लक्षात येईल. त्याचं आयुष्य आणि त्याचा परिसर हे अतिशय थंड, अंधारलेले, निराशाजनक आहेत. लांब सावल्या, कृत्रिम, चकचकीत रंग असलेल्या या आयुष्यात आनंददायक, जगण्याची उब असणारं काहीही नाही. मग मिळणारा एकमेव सुखाचा क्षण हा त्याला हवाहवासा वाटणं साहजिक आहे. तो क्षण एका यंत्रमानवाकडून मिळतो. पण समाजात छुप्यानं वावरणाऱ्या यंत्रमानवांना ओळखून ठार मारणं यासाठी त्याची ख्याती आहे. मग आपण जे करतोय ते बरोबर की चूक हेच त्याला कळेनासं होतं. हा तिढाच चित्रपटाला त्याच्या टोकदार परिणतीकडे नेतो. ती काय हे सांगून चित्रपट प्रत्यक्ष पाहण्याची मजा घालवत नाही. रंगांचा प्रभावी वापर चित्रपटातला भाव अधोरेखित करण्यासाठी कसा वापरता येतो याची ही एक छोटीशी झलक होती.
चित्रपटातल्या अजून काही प्रतिमा इथे पाहायला मिळतील
http://www.imdb.com/title/tt0083658/mediaindex
http://tyrell-corporation.pp.se/blade-runner-images/
‘फिल्म न्वार’ (काळ्या) शैलीशी नातं सांगणाऱ्या या चित्रपटाचा ‘फ्यूचर न्वार’ किंवा ‘टेक न्वार’ अशी एक नवी शैली घडवण्यात सिंहाचा वाटा होता. नंतर आलेले 'टर्मिनेटर' किंवा 'मायनॉरिटी रिपोर्ट' हे चित्रपट याच मांदियाळीतले म्हणता येतील.
(टीपः मूळ धाग्यात वापरलेली 'नायिकेचं प्रथम दर्शन' ही प्रतिमा दिसत नव्हती म्हणून आता वेगळी प्रतिमा टाकली आहे. स्वसंपादनाची सुविधा दिल्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून व्यवस्थापनाचे आभार!)वर्गीकरण
प्रतिक्रिया
लेखन आवडले.
+१
+१
+३
लेख
+१
छायाचित्रे
चर्चेच्या निमित्ताने फेअर यूझ तत्त्व
लेख आवडला
>>> बाकी अभिजात कलाकृती
आता
????
मेतकुट भात सुंदर नसतो असा
क्या केहने
सचित्र सोदाहरण
काही प्रतिसाद
वर लिहिलेला मॅट्रिक्स बद्दलचा
‘उत्सव’ ह्या चित्रपटाचा
भारतीय चित्रपट आणि रंग
"सत्या" बद्दल १००%
छान लेख
लेखन आवडले..
उत्तम
सहज म्हणुन धागा उघडला तर एक