दिव्याची अवस.

दत्ता काळे's picture
दत्ता काळे in जनातलं, मनातलं
22 Jul 2009 - 7:37 pm

कालचा दिवस दिव्याचा अवसेचा. दिव्याच्या अवसेच्या दिवशी मला प्रकर्षाने आठवण होते ती आई करत असलेल्या कणकेच्या उकडलेल्या दिव्यांची आणि चाळीत शेजारी रहाणार्‍या नलिनीकाकूंची.

लहानपणी गावी चातुर्मासाचे दिवस जाणीवपूर्वक आणि श्रध्देने जपले जायचे. नंतर येणारा श्रावणमहिना आधीच दिव्याच्या अवसेतून हूरहूर लावत असे. दिव्याच्या अवसेला आई आम्हा सर्व भावंडांच्या संख्येइतके कणकेचे गोड, उकडलेले दिवे करत असे, आणि मग त्यात साजुक तूप आणि कापसाची वात घालून सर्व दिवे पेटवून त्याची आरती करून देवाला नैवेद्य दाखवित असे. त्या दिवशी खरोखरचे पितळी दिवे, समया, निरांजनी, तांब्याचे दिपदानातले दिवे, लामणदिवे, कापूरवाती लावायच्या आरत्या अश्या सर्वांची पूजा होई. आम्हा भावंडांना देवाच्या पाया पडायला लावून दिव्याच्या कहाणीचे सार सांगत असे. कहाणीतल्या राणीने खोटे वागून उंदरावर आळ घेतल्यामुळे, उंदरांनी राणीला कसा धडा शिकवला हे अगदी मन लावून सांगत असे. कुणी ऐको न ऐको. रात्री जेवणाबरोबर आई प्रत्येकाला कणकेचा दिवा प्रसाद म्हणून खायलाच लावी. आम्हाला दिवसभर हे घरातलं वातावरण अगदी पवित्र वाटत राही.

संध्याकाळी देवासमोर अतिशय मनोभावे " माझी सगळी मुले कायम सुखात ठेव " हे आवर्जून पुटपुटे. आम्हाला तिच्या ह्या देवासमोर केलेल्या मागणीची फार मजा वाटे. आम्ही तिला विचारायचो "खरंच देव तू म्हणते तसं करील कां ग ? " ती विश्वासाने म्हणे "तो नक्की चांगले करेल". मग आम्हाला गजानन महाराजांच्या पोथीतील ओवी म्हणून दाखवी -

| | श्रध्दावंत ज्याचा भाव, त्यासी पावेल स्वामीराव, उपास्यापदी भाव, उपासके ठेवावा ||

आई ज्या विश्वासाने "तो नक्की चांगले करेल " म्हणत असे, तेवढ्याच विश्वासाने आणि श्रध्देने नलिनीकाकूसुध्दा देवाला प्रार्थना करून म्हणत असे कि, देवा माझ्या मुकुंदाला, तो जिथे असेल तिथे त्याला सुखात ठेव, काही कमी पडू देऊ नकोस.

नलिनीकाकूंचा मुकुंदानं वडलांच्या कडक आणि रागीट स्वभावाला कंटाळून, रागानं एक दिवशी ,भांडण करून घर सोडलं. ते परत कधीही न येण्याचा निश्चय करूनच. मुकुंदासाठी त्या दर सोमवारी पुत्ररक्षणार्थ असलेला शिवलिलामृताचा अकरावा अध्याय न चुकता वाचंत, संपत शनिवारी मुंज झालेला मुलगा जेवायला घालंत. उपास-तापास, व्रत वैकल्ये सर्व काही करंत. दिव्याच्या अवसेला दरवर्षी नलिनीकाकू मुकुंदाच्या नावाने कणकेचा दिवा करंत आणि तुळशीपुढे वृंदावनात ठेवून घरात जाता जाता आईला म्हणंत " मला विश्वास आहे, मुकुंदा जिवंत आहे आणि तो नक्की सुखात आहे". पण मुकुंदाच्या आठवणीमुळे त्यांच्या आणि माझ्या आईच्या डोळ्यातही पाणी येई . मुकुंदा जिवंत आहे कि नाही ? ह्या शंकेची पाल त्यांच्या मनात कायम चुकचुकंत असावी, कारण "मला विश्वास आहे, मुकुंदा जिवंत आहे " ह्या त्यांच्या शब्दातली थरथर सारं काही सांगून जात असे.

ह्या गोष्टीला आता ३५ वर्षे झाली. आम्ही १५ वर्षापूर्वीच गाव सोडून डोंबिवलीला मोठ्या भावाकडे, त्यानंतर नोकरी / कामधंद्याच्या निमित्ताने पुण्यात स्थायीक झालो. गांव सोडल्यापासून आमचा गावाशी संपर्कच राहीला नाही. मुकुंदा घरी आला कि नाही ? हे माहीत नाही. हळूहळू कालपरत्वे आम्हीही विसरंत गेलो. पण ..

दिव्याच्या अवसेच्या दिवशी मला नलिनीकाकू आणि मुकुंदा ह्यांची प्रकर्षाने आठवण होते.

संस्कृतीधर्मविचार

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

22 Jul 2009 - 7:58 pm | यशोधरा

सुरेख लिहिलय...
ज्याचा जैसा भाव | तया तैसा अनुभव...

चतुरंग's picture

22 Jul 2009 - 8:46 pm | चतुरंग

फारच हृद्य आठवण लिहिली आहेत दत्ता!

(पाणावलेला)चतुरंग

श्रावण मोडक's picture

22 Jul 2009 - 8:53 pm | श्रावण मोडक

दुपारीच कणकेचा दिवा खाल्ला. आत्ता कळलं का ते...
मुकुंदाच्या गोष्टीनं मात्र हलवून टाकलं. त्याचा एक वैयक्तिक संदर्भही आहे अर्थात. काहीसा असाच. पण हा 'मुकुंदा' परतला आहे.

दशानन's picture

22 Jul 2009 - 10:17 pm | दशानन

मी ही असाच कधी तरी घरातून पळुन गेला.. १२ वर्ष.. !
माझ्या आईने देखील हे सर्व काही केले, देव, उपास. व्रत..... !
आज वाईट वाटतं.. एका अविचारी निर्णयाचे व त्या निर्णयाला उत्तर देण्यासाठी मला १२ वर्ष लागली ह्याचे.. !

*
त्याचा एक वैयक्तिक संदर्भही आहे अर्थात. काहीसा असाच. पण हा 'मुकुंदा' परतला आहे.

काका, संदर्भ लागला नाही :(

+++++++++++++++++++++++++++++

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Jul 2009 - 9:24 pm | बिपिन कार्यकर्ते

...

बिपिन कार्यकर्ते

llपुण्याचे पेशवेll's picture

22 Jul 2009 - 9:25 pm | llपुण्याचे पेशवेll

खूप छान लेख. आमच्या घरी आई पुरणाचे दिवे करून ओवाळते. व नंतर तो वातीमुळे थोडा जळलेला आणि बराचसा खरपूस झालेला पुरणाचा दिवा खायला फारच मजा येते. आमच्या शेदारी एक काकू होत्या त्याना वाड्यातले नाव 'विनयच्या आई' . त्यांच्याकडे बाजरीचे दिवे करत. ते दिवे नंतर दूध आणि गूळ याबरोबर खायचे. ते पण फार छान लागतात.
दत्ताशेठचा लेखही अप्रतिमच.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Jul 2009 - 9:35 pm | बिपिन कार्यकर्ते

थोडा जळलेला आणि बराचसा खरपूस झालेला पुरणाचा दिवा खायला फारच मजा येते

पुरे रे... आधीच दत्ताभाऊंनी अंमळ त्रास दिलाय.

बिपिन कार्यकर्ते

रेवती's picture

22 Jul 2009 - 10:26 pm | रेवती

मस्त लेख!
आम्हीही कणकेचे दिवे तूप घालून खायचो त्याची आठवण झाली.
आता श्रावण सुरू झाल्यासारखाच आहे. श्रावणी शुक्रवारीही पुरणाच्या दिव्यांनी आई आपल्या मुलांना ओवाळते. मीही एका श्रावणी शुक्रवारी सवाष्ण जेवायला बोलावते. त्यात जातपात, धर्म असं काही पाळत नाही. स्वभावानं चांगली, लेकुरवाळी असली म्हणजे झालं.
(तुमच्या लेखामुळे आठवण झाली......एखाद्या सवाष्ण बाईशी बोलून तारीख ठरवून घेते) हैद्राबादला असताना माझा मुलगा तान्हा होता त्यावेळी बर्‍याच सवाष्णी आजूबाजूच्या व नातेवाईक बोलावल्या होत्या. समोर राहणार्‍या आज्जींच्या सुनेला बोलावले तर विधवा आज्जी म्हणाल्या मीही येते........आमच्याकडे तर अश्या जेवणाला जरूर जातात व बाळाला आशिर्वाद देवून येतात. त्याही आल्या होत्या.

रेवती

अवलिया's picture

22 Jul 2009 - 11:03 pm | अवलिया

सुरेख !

--अवलिया

शाल्मली's picture

23 Jul 2009 - 12:00 am | शाल्मली

छान लेख!
आईच्या हातच्या कणकेच्या दिव्यांची आठवण झाली.
कणकेचे दिवे आणि ते भरुन त्यात रवाळ साजूक तूप.. आहाहा..

--शाल्मली.

सहज's picture

23 Jul 2009 - 8:14 am | सहज

अनेक आठवणी जागवल्यात दत्ताभाऊ.

धन्यवाद.

स्वाती दिनेश's picture

23 Jul 2009 - 11:37 am | स्वाती दिनेश

अनेक आठवणी जागवल्यात दत्ताभाऊ.
धन्यवाद.
असेच म्हणते,
स्वाती

विसोबा खेचर's picture

23 Jul 2009 - 8:18 am | विसोबा खेचर

मन सुखावणारा लेख..!

दत्ता, जियो..

तात्या.

छोटा डॉन's picture

23 Jul 2009 - 8:58 am | छोटा डॉन

वरील सर्वांशी सहमत आहे.
जुन्या आणि हळव्या आठवणी जागवणारा फारच सुरेख लेख ...

दत्ताशेठ, जियो ...!!!

------
छोटा डॉन
आम्ही आमच्या आंतरजालीय दुश्मनांना काही वेळा क्षमाही करतो, मात्र त्यांचे नाव आणि आयपी अ‍ॅड्रेस कधीही विसरत नाही .. ;)

लक्ष्मणसुत's picture

23 Jul 2009 - 5:44 pm | लक्ष्मणसुत

काल दिव्यांची पूजा करायला माझी पत्नी विसरली. माक्ष्याही लक्षात आले नाही. फार वाईट वाटले. पण तुझा लेख वाचून जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
लक्ष्मणसुत उवाच्

लक्ष्मणसुत's picture

23 Jul 2009 - 6:12 pm | लक्ष्मणसुत

धन्यवाद, प्रशुजी. फक्त फोटोच्या ऐवजी 'प्रकाशचित्र' हा शब्द योग्य आहे.
लक्ष्मणसुत उवाच्

क्रान्ति's picture

23 Jul 2009 - 9:22 pm | क्रान्ति

सुंदर लेख आणि प्रकाशचित्र.
दिव्याची अवस आली, की सणांची रांगच लागायची ती थेट दिवाळीपर्यंत. नागपंचमी, श्रावणी सोमवार, मंगळागौरी, जिवतीचे शुक्रवार, सत्यनारायण, जन्माष्टमी, श्रावणाची यादी अधुरीच! खास पुरणाचा महिना असायचा हा. मस्त आठवणी जागवल्या या लेखानं.

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
रूह की शायरी