तुमचा खेळ होतो आणि आमचा ... (भाग एक)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture
३_१४ विक्षिप्त अदिती in जनातलं, मनातलं
10 Jul 2009 - 6:42 pm

निलेश, असाच एक सॉफ्टवेअर इंजिनियर, एका प्रथितयश सॉफ्टवेअर कंपनीमधे नुकताच नोकरीला लागला होता. इंजिनीयरींग कॉलेजमधे नेहेमीच पहिल्या तीनात आल्यावर नोकरी मिळवण्यासाठी फार काही कष्ट करावे लागलेच नाहीत. परिक्षेतल्या मार्कांसाठी अभ्यास करता येत असला तरी वर्षातले परीक्षा, सबमिशन असे तीन-चार महिने सोडले तर हा कायम काही ना काही 'प्रोजेक्ट्स' करत रहायचा! आई मात्र "पोरगा का कायम कंप्यूटरला चिकटून बसलेला असतो" या चिंतेत असायची. घरी मित्रमंडळ आलं तरी चर्चा कायम अगम्य भाषेतच! आईला त्यांची भाषा इंग्लिश, मराठी किंवा हिंदी आहे ते समजायचं पण काय बोलायचे ते कधीच तिच्या पचनी पडलं नाही. पण पोरगं कधी वाईट नादाला लागणार नाही याची खात्री होती आणि परीक्षेतल्या मार्कांवरून त्याची पावतीही तिला मिळायची त्यामुळे तिने कधीच फार चौकशी केली नाही. घरात आणि नातेवाईकांमधे शांत असणारा निलेश, त्याचं मित्रमंडळ आला की मात्र पार बदलून जायचा. उत्साहात काहीतरी चर्चा घडत, दोन मित्र, श्रीराम आणि हृषि, कधीमधी रात्री घरी थांबत आणि आईशीही मस्त गप्पा मारत, एकीकडे काहीबाही कामही सुरू असायचं. त्यांच्या कामातलं काही समजत नसलं तरी पोरांसाठी रात्री कॉफी बनवून देताना, त्यांना रात्री दोन वाजताही काही खायला बनवून देताना आईलाही मनापासून समाधान मिळत असे. आणि एका रात्री निलेशने आईला उठवलं, कंप्यूटरवर तिघांनी मिळून पृथ्वीवरचे ऋतू, चंद्र-सूर्याची ग्रहणं, पृथ्वीची परांचन गती समजावून सांगणारं सिम्युलेशन तयार केलं होतं. पोरांचं रात्री उशीरा जागून काय चालायचं हे आता मात्र आईला व्यवस्थित समजलं.

निलेशला ज्या कंपनीत नोकरी लागली तिथेच श्रीरामलाही मिळाली. पण त्याने आणि हृषीने एकत्र धंदा सुरू करायचं ठरवलं, आय.टी.संदर्भातलाच. निलेशच्या घरची आर्थिक परिस्थिती त्याच्या वडिलांच्या पाठून थोडी खराब झाली होती त्यामुळे त्याने एकीकडे नोकरी सुरू करत दुसरीकडे मित्रांना लागेल तशी मदत करायचं ठरवलं. नव्या नोकरीत रूळायला निलेशला अजिबातच वेळ लागला नाही. ज्या लोकांनी लिहिलेली पुस्तकं तो अभ्यासक्रमात वाचत होता तीच माणसं आता त्या कंपनीत त्याचे सिनीयर्स, बॉस म्हणून नोकरीला होती. मनासारखं काम करायला मिळत होतं, चर्चा करायला एकापेक्षा एक हुशार माणसं आजूबाजूला होती, अननुभवी मुलासाठी पगारही चांगला होता, शिवाय शनिवार-रविवार हृषी आणि श्रीरामबरोबरही काम सुरू होतं. हल्ली आई मागे लागल्यामुळे तो रोज सकाळी उठून ऑफिसच्या जिममधेही जात होता.
आणि हो, ऑफिसमधेच निलेशच्याच मागोमाग एक मुलगी जॉइन झाली होती. कुठल्या डिपार्टमेंटला होती, तिचं नाव काय, निलेशला माहित नव्हतं. पण तीसुद्धा रोज सकाळी याच्याच वेळेला जिममधे असायची. तीही एकटीच असायची आणि हा पण, हळूहळू दोघांना एकमेकांची नावंतरी समजली. काही दिवसातच त्याला समजलं की नंदिनी सायकोलॉजिस्ट आहे आणि ट्रेनी म्हणून ती सध्या त्याच्याच कंपनीत लागली आहे. अतिकामाच्या ताणामुळे कर्मचार्‍यांना होणारे मानसिक आजार टाळण्यासाठी चांगल्या कंपन्या सायकोलॉजिस्टनाही कामावर ठेवतात. पण निलेशचा एक प्रॉब्लेमच होता, सख्खी किंवा जवळची बहिण नसल्यामुळे आणि आजपर्यंत कधी मैत्रिणी नसल्यामुळे मुलींशी नक्की काय बोलायचं हे याला माहितच नव्हतं. तो कायमच तिला तिच्या कामाबद्दल, सायकोलॉजीबद्दल प्रश्न विचारत असे आणि ती पण त्याला प्रश्नांची उत्तरं देत असे. तिच्या कामाच्या स्वरुपामुळे तिला याच्याबद्दल माहिती सरळच कळली आणि एवढ्या हुशार आणि सरळ मुलाशी आपल्याला इतक्या सहजच बोलता येत आहे याची तिलाही गंमत वाटत होती. चांगलं आयुष्य यापेक्षा वेगळं असूच शकत नाही यावर त्याचा ठाम विश्वास बसला होता.

पण मंदीचा फेरा कुणासाठीही थांबणार्‍यातला नव्हता. खर्चात कपात निलेशच्या कंपनीतही सुरू झाली होती. प्लास्टीकच्या वापरून फेकून देणाच्या कपांच्या जागी खरे, चिनीमातीचे कप आले होते. ऑफिसमधे कामाचे तास निश्चित केले होतेच, पण त्यापेक्षा जास्त वेळ थांबायला मनाई होती. शिवाय कामाच्या तासांमधे काय काय काम केलं हे दर शुक्रवारी लिहून द्यायला लागत होतं. चांगली गोष्ट एवढीच होती की काम मात्र खूपच रोचक होतं, डोक्याला चालना देणारं होतं. आणि ही नोकरी सोडायची तर पैशांची दुसरी सोयही होत नव्हती. नुकताच बाळसं धरू लागणारा श्रीराम आणि हृषीचा धंदाही जरा खंगल्यागत होत होता. त्या दोघांच्या पोटापाण्याची चिंता नव्हती एवढंच! आता मात्र या त्रिकूटाला पुन्हा आपले कॉलेजचे दिवस आठवू लागले. पुन्हा काहीतरी नवं प्रोजेक्ट मजेखातर करावं, त्यातून पैसे मिळाले तर ठीक नाहीतर अनुभवतरी मिळेल, असं त्यांच्या डोक्यात येऊ लागलं.

निलेशच्या कंपनीत मोबाईल्ससाठी गेम्स बनवत असत. श्रीराम आणि हृषी त्यावरून कायमच त्याची फिरकी घेत, पण या गेम्सच्या क्षेत्रात पैसा चिक्कार आहे आणि तेवढंच आव्हानात्मक काम करता येईल याची त्या तिघांना खात्री होती. कंपनीच्या पॉलिसीजमुळे काय प्रकारच्या गेमवर काम सुरू आहे हे सांगता येत नव्हतं, पण काय प्रकारचा गेम बनवावा हे या तिघांच्या डोक्यात येतही नव्हतं. जोपर्यंत चांगली कल्पना येत नाही आहे तोपर्यंत काही काम सुरू करता येत नव्हतं. पुन्हा एका शनिवारच्या पावसाळी रात्री तिघे जण निलेशच्या घरी बसले होते. गंमतीत एक फेरी मारून आल्यावर तिघेही भिजले. कपडे बदलून आल्यावर मग कॉफीची लहर आली. "काकूला उठवण्याऐवजी आज मीच कॉफी बनवतो", हृषी उठला. थोडं दूध आणि थोडी साखर 'ओटा'तीर्थी पडल्यावर कॉफी कपांमधे आली. गरमगरम कॉफी पोटात गेल्यावर मात्र तिघांनी झोपायचं ठरवलं. टी-पॉयवर तसेच कॉफीचे कप, सारखेचे दाणे, टाकून तिघंही डाराडूर झोपले आणि सकाळी आईने पोहे फोडाणीला टाकल्यावरच हाक मारली. आळोखेपिळोखे देत असताना श्रीरामला कालच्या टीपॉयवर माशा दिसल्या. त्याने हातात 'टाईम्स' घेऊन माशांवर एक हल्ला चढवला. माशी उडून गेली. मग निलेशला 'सकाळ' दिसला, आणि एक टार्गेट माशीही सापडली. इतिहासाची पुनरावृत्ती झाली आणि माशी उडून गेली. हृषी मात्र या कडे टक लावून पहात होता. "ए हृष्या, उठ की आता जागा हो जरा, किती वेळ असा मंदसारखा बघत रहाणार आहेस?"

हृषीने शांतपणे आपलं निरीक्षण सुरूच ठेवलं आणि हळूच म्हणाला, "सध्या सुरूवातीला हाच खेळ कंप्यूटरसाठी लिहिला तर?"

गोष्टीसाठी काही सत्य घटना, काही चित्रपटांच्या कथांचा काही भाग आणि माझी कल्पना यांची मिसळ केली आहे. याउप्पर कोणत्याही प्रकारचं प्रकाशित साहित्य कच्चा माल म्हणून वापरल्याचं लेखिकेच्या आठवणीत नाही.

पुढचा भाग पुढची सी.एल. घेईन तेव्हा!

कथामौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

10 Jul 2009 - 6:46 pm | श्रावण मोडक

सी एल कधी?
या क्रमशःवाल्यांना एकदा ठोकून काढावं लागेल. :)

निखिल देशपांडे's picture

10 Jul 2009 - 6:55 pm | निखिल देशपांडे

पुढची सि एल कधी???
असेच विचारतो
==निखिल

क्रान्ति's picture

11 Jul 2009 - 12:47 pm | क्रान्ति

हाच प्रश्न सीएल कधी?

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
रूह की शायरी

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Jul 2009 - 6:58 pm | बिपिन कार्यकर्ते

सहमत. सुपारी देऊया का? सीएल नाही तर सिकलिव्हची तरी व्यवस्था करू आपण.

बिपिन कार्यकर्ते

श्रावण मोडक's picture

10 Jul 2009 - 7:15 pm | श्रावण मोडक

सुपारी द्याच. सिक लीव्ह तर सिक लीव्ह... :)

नितिन थत्ते's picture

10 Jul 2009 - 7:35 pm | नितिन थत्ते

सुपारी चालेल. पण बोटं आणि डोक्याला इजा व्हायला नाय पायजेल.
:)

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Jul 2009 - 7:38 pm | बिपिन कार्यकर्ते

बोटांची काळजी घेण्यात येईल, डोक्याच्या बाबतीत काही करू शकत नाही.

बिपिन कार्यकर्ते

श्रावण मोडक's picture

10 Jul 2009 - 7:46 pm | श्रावण मोडक

+१
;)

मस्त कलंदर's picture

10 Jul 2009 - 9:23 pm | मस्त कलंदर

बिका,
सुपारी द्यायची तर आधी तुमच्या नावाची द्यायला लागेल... "माती" चा पहिला भाग लिहून एक आठवडा एक दिवस झाला!!!!

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

श्रावण मोडक's picture

11 Jul 2009 - 1:14 am | श्रावण मोडक

मस्त. सहमत. इथे केवळ बेरीज होऊ शकत नाही. वर्गच.

विनायक प्रभू's picture

10 Jul 2009 - 6:47 pm | विनायक प्रभू

मिसळ

विकास's picture

10 Jul 2009 - 7:12 pm | विकास

छान मिसळ :-)

बाकी त्या खेळामुळे पॉप होणार्‍या जाहीराती ज्यात बुशच्या नाकावर ठोसा मारा (आणि बुशचे कार्टून) चुकवत राहते त्याची आठवण झाली.

सहज's picture

10 Jul 2009 - 7:07 pm | सहज

मगच वाचू.

किती भाग आहेत?

तुमचा होतो क्रमशः आणि आमचा...

--------------------------------------
मिपावर क्रमशःमालीका संपादकमंडळाकडून मंजुर झाल्याशिवाय येउ नयेत यावर कौल टाकावा का? पुढचे १० भाग तरी तयार असल्याशिवाय व किमान दोन भाग एका आठवड्याला टाकल्याशिवाय क्रमशःला परवानगी देउ नये ही इच्छा.

ब्रिटिश टिंग्या's picture

10 Jul 2009 - 7:15 pm | ब्रिटिश टिंग्या

आयुक्षात पैल्यांदाच सहजकाकांना सहमत!

तुमचा होतो क्रमशः आणि आमचा...

परिकथेतील राजकुमार's picture

10 Jul 2009 - 7:15 pm | परिकथेतील राजकुमार

भारीच रंगतीये कथा. पुढचे भाग लवकर लवकत येउ द्या.

आणि हो...

आणि हो, ऑफिसमधेच निलेशच्याच मागोमाग एक मुलगी जॉइन झाली होती.

हे वाक्य हृदयाला भिडले.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य

टारझन's picture

10 Jul 2009 - 7:22 pm | टारझन

अरे वा !! मस्तंच की !!

(तुम्ही अ‍ॅक्सेप्ट करा न करा) आपलाच
- अचानक पाठलाग
प्रतिसादांचा लवलेशही नसावा
वाचनांचा स्पर्शही नसावा
असा निबंध मारावा कि वाचनारा मंदच व्हावा......

रेवती's picture

10 Jul 2009 - 7:26 pm | रेवती

छान सुरुवात!
आता पुढचा भाग कधी हे विचारणार नाही.
थोडा वेळ लागतो हे माहीत आहे.;)

रेवती

छोटा डॉन's picture

10 Jul 2009 - 7:31 pm | छोटा डॉन

पहिला सुटसुटीत भाग आवडला, पुढच्याची वाट पहातो आहे.
बाकी खरडावहीत दिलेल्या लिंक्सवर लेख होऊ शकतात हे माझ्या डोक्यात आलेच नव्हते ;)

लवकर टाका.

अवांतर : "सीक लिव्ह घेण्याचे नामी १०१ बहाणे " व्यनीने पाठवत आहे.
इतरांनी मागु नये, अपमान होईल ....

------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

मेघना भुस्कुटे's picture

10 Jul 2009 - 7:32 pm | मेघना भुस्कुटे

मस्त आहे सुरुवात.
माश्या माणसांच्या जगावर राज्य करतात किंवा असं काहीतरी असणारेय का खेळात? की माश्यांच्या सायकोलॉजीचा अभ्यास करायला मदत करणारे त्याची मैत्रीण नीलेशला?
असला कायतरी धक्का बसला, की मगच गोष्ट 'यमूतैंची विज्ञानकथा' होईल. तोवर आपली साधी-सरळ गोष्ट आहे... :)

सूहास's picture

10 Jul 2009 - 7:37 pm | सूहास (not verified)

<<आणि हो, ऑफिसमधेच निलेशच्याच मागोमाग एक मुलगी जॉइन झाली होती >>>
आणि हो..
जय हो...

सुहास

यशोधरा's picture

10 Jul 2009 - 8:05 pm | यशोधरा

कथा...

हा क्रमशः प्रतिसाद आहे! :P

चतुरंग's picture

10 Jul 2009 - 8:30 pm | चतुरंग

(ख्.व. मधला माशांचा खेळ + काहीकाही संदर्भ लागले...मज्जा आहे!)
छान लिहिलं आहेस :)
लवकर लवकर मार पुढच्या माशा!

(माशामार)चतुरंग

Nile's picture

11 Jul 2009 - 2:42 am | Nile

असेच म्हणतो, काही संदर्भ कळले. (अन काही जुळले ;) )

लवकर येउद्या. :)

प्राजु's picture

10 Jul 2009 - 9:36 pm | प्राजु

पुढचा भाग येईपर्यंत माशाच माराव्या लागणार बहुतेक.
लवकर लिही.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अवलिया's picture

10 Jul 2009 - 10:44 pm | अवलिया

~X( क्रमशः

अवांतर - आणि हो, पुढचा भाग लवकर टाका.

--अवलिया

दुनिया चाहे कुछ भी बोले बोले
दुनिया चाहे कुछ भी बोले
हम कुछ नहीं बोलेगा
हम बोलेगा तो ...
हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है

भाग्यश्री's picture

10 Jul 2009 - 10:51 pm | भाग्यश्री

वाह मस्तच सुरवात!
सिक लिव्ह बाबतीत बिकांशी सहमत! काहीतरी व्यवस्था करावी लागेल! :))

http://www.bhagyashree.co.cc/

नंदन's picture

10 Jul 2009 - 11:07 pm | नंदन

सुरूवात झाली आहे. 'लाईफ इमिटेटिंग आर्ट, आर्ट इमिटेटिंग लाईफ' सारखे वाचायला मिळेल असं पहिल्या भागावरून आणि शीर्षकावरून वाटतं आहे. पुढच्या भागांची वाट पाहतो.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

स्वाती२'s picture

10 Jul 2009 - 11:15 pm | स्वाती२

छान सुरुवात झालेय. ती सी. एल. लवकर घ्या.

ऋषिकेश's picture

10 Jul 2009 - 11:25 pm | ऋषिकेश

हा भाग आवडला.. आता माशा मारण्याचा गेम त्यांना किती यश देतो बघायचं
बाकी तुझ्याकडे कीती सीएल शिल्लक आहेत?

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

शाल्मली's picture

11 Jul 2009 - 2:36 am | शाल्मली

ह्म्म!! छान सुरुवात..
त्या खवतल्या माश्या मारण्याच्या खेळाचा इतिहास असा आहे तर ! ;)
आता पुढची सी.एल. लवकर घे हं..

--शाल्मली.

कपिल काळे's picture

11 Jul 2009 - 1:55 pm | कपिल काळे

लवकर घे सी.एल. तोपर्यन्त माशा मारतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Jul 2009 - 10:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुढील भागाच्या प्रतिक्षेत !