ग्रॅज्युएशन भाग-५

मीनल's picture
मीनल in जनातलं, मनातलं
31 May 2009 - 8:51 am

ग्रॅज्युएशन भाग-१
http://www.misalpav.com/node/7889

ग्रॅज्युएशन भाग-२
http://www.misalpav.com/node/7905

ग्रॅज्युएशन भाग-३
http://www.misalpav.com/node/7939

ग्रॅज्युएशन भाग-४
http://www.misalpav.com/node/7955

ग्रॅज्युएशन भाग-५
अमेरिकेत हायस्कूल ग्रॅज्युएशनचे महत्त्वाचे भाग म्हणजे तरूणाईचा प्रॉम आणि सेरिमनी आणि पार्टी.
माझ्या मुलाच्या -नचिकेतच्या शाळेच्याCOMMENCEMENT CEREMONY नंतर आम्ही ही आमची पार्टी आयोजित केली. आमच्या जवळचच इंडिअन रेस्टोरंट आधीच बूक करून ठेवले. आमच्या आणि नचिकेतच्या मित्र- मैत्रीणींना आमंत्रण दिले.पार्टीचा मूळ हेतू त्यांनी दिलेल्या शुभेच्छा आणि आशिर्वाद याबद्दल त्यांचे आभार मानणे हा होता.
मग जेवणाचा मेनु ही निश्चित केला.केकचीही ऑर्डर दिली.
तरीही अजून बरीच तयारी बाकी होती. म्हणून हळू हळू सुरवात केली.
नचिकेत पोटात असताना माझ्या गरोदरपणी काढलेल्या फोटो पासून सुरवात करून त्याच्या १८व्या वाढदिवसापर्यंतचे काही ठराविक फोटो चार्ट पेपरवर लावून आठवणींना उजाळा द्यायचा प्रयत्न केला.त्यात त्याला मिळालेली बक्षीसे घेतानाचे फोटो, फॅन्सी ड्रेस मधले फोटो,विविध देशांच्या भेटीला गेल्याचे फोटो असे अनेकविध फोटो लावले. पार्टीला येणा-या पाहुण्यांना त्याबद्दल माहिती मिळेल आणि नचिकेतला ही आधीच्या सर्व घटना आठवतील हा उद्देश.
त्याच्या मित्र- मैत्रीणींना देण्यासाठी रिटर्न गिफ्टस आणून ठेवली. आमच्या मित्र मैत्रीणींच्या लहाम मुलांसाठी त्याच्या वयाला साजेसे रिटर्न गिफ्टस आणली.
थँक्यू कार्डस विकत घेऊन त्याच्या आत आभाराचा मजकूर चिकटवला. ते कार्ड ठेवलेल्या पाकिटाला बाहेरूनही सुशिभित करण्यासाठी मी विशेष प्रयत्न केले. छोटा आयताकार कागद कापून त्याच्या गुंडाळी केली. त्याला बारिक दोरा बांधून त्याला सर्टीफिकेट्च रूपड दिल.ते त्या पाकिटावर एका बाजूल चिकटवल. काळ्या जाड्सर कागदावर ग्रॅज्युशन गाऊनचा आकार कापून तो त्या पाकिटाला चिकटवला त्याच्या वरच्या बाजूला त्याच कागदाचीच काळी ग्रॅज्युशन कॅप लावली. त्याला रेशमीं गोंडाही लावला. आता कस ते पाकिट हायस्कूल ग्रॅज्युएशन इव्हेट साठी अगदी ऍप्रोप्रिएट झाल्यासारख वाटल.

ते थँक्यू कार्ड असलेल पाकिट आणि रिटर्न गिफ्ट एका लहानश्या कागदी पिशवीत ठेऊन त्यावर प्रत्येक पाहुण्यांच नाव लिहून त्या प्रत्येकासाठी बॅग्ज तयार केल्या.
पार्टीच्या दिवशी दुपारी मैत्रीणीबरोबर रेस्टॉरंटमधे जाऊन सर्व फोटो लावलेले चार्ट पेपर भिंतीवरच्या हूक्समधे अडकवले. त्यामुळे संध्याकाळी पार्टीच्या रेस्टॉरंटमधे पोचल्यावर तशी काही डेकोरेशन वगैरे तयारी शिल्लक नव्हती. आम्ही सर्वजण मस्त तयार होऊन रेस्टॉरन्ट मधे पोचलो.पार्टीचा हिरो ट्क्सिडो घालून अगदी स्टारसारखा चमकत होता. आम्ही ही छानसे कपडे घालून त्याच्या आजूबाजूला लूकलूकत होतो. पार्टी असलेल्या रेस्टॉरट मधे पोचल्यावर आपले फोटो पाहून नचिकेत आश्वर्य चकितच झाला. त्याच्या लहानपणीचे जुने फोटो भारतातून मागवून आणि आताचे डिजिटल कॅमेरातले ठराविक निवडून ते प्रिंट करून चार्ट पेपरवर डिस्क्रीपशनसहित लावलेल्या फोटोंचे माझे उपद्व्याप नचिकेतला माहितीच नव्हता. कारण तो शाळेत असताना मी ते सर्व काम केले होते. त्याला जरा सुध्दा कल्पना नव्हती. पार्टीला अनुरूप असे डेकोरेशन पाहून स्वारी एकदम खूश झाली.

हळू हळू आमचे पाहुणे जमायला लागले. त्यानाही फोटोची पहाताना मजा आली. त्या मजेत रूचकर ऍपिटायझ्रर्स आणि कोल्ड ड्रिक्स भर घालत होते. जोडीला गप्पा गोष्टी होत्याच. सर्व जण जमल्यावर ग्रॅज्युएशन पार्टीला अनुरूप अस डेकोरेशन असलेला चेरी फिलींगचा चॉकलेट ग्रेज्युएशनचा केक कापला.

आमची छोटी भाषणे झाली. माझ्या सासुबाईंच्या हस्ते इतर १२ वी पास झालेल्या मुलांना विशेष गिफ्ट देऊन त्यांच ही कौतुक केल. नचिकेतला ही सर्वांनी भरभरून आशिर्वाद, शुभेच्छा आणि गिफ्टस दिल्या. जेवण खाण सुरू असताना आम्ही सर्वांना रिटर्न गिफ्ट्स दिल्या. खूपसे फोटो काढले,हास्यविनोद झाले. मजेत वेळ घालवून सर्व जण घरी परतले.
आम्ही ही घरी परत असताना ते फोटोचे चार्ट पेपर घरी आणले. रात्र बरीच झाली होती. सर्व जण झोपायला गेले. मी मात्र ते चार्ट पेपर पहात बराच वेळ लिव्हिंग रूम मधे बसेल होते.
खूप आठवणी जाग्या झाल्या…
नचिकेत लहान होता तेव्हा मी दरवाज्याच्या पाठी मागे लपून रहायची आणि "नचिकेत कू कू क" म्हणायची. त्याने ऐकल तर तो शोधत यायचा आणि नाही ऐकल तर इकडे तिकडे खेळत असायचा. काही वेळाने त्याच्या लक्षात यायच आपली आई दिसत नाही आहे. घाबरा घुबरा होऊन तो शोधत यायचा " आई, तू तुते" अस काप-या आवाजात म्हणत रडकूंडीला यायचा.तेव्हा मजा वाटायची की `तो आपल्याला मिस करतो आहे`. पण आता तीच वेळ माझ्यावर येणार होती.तो युनिव्हर्सिटीतल्या डॉर्म मधे गेल्यावर मला दिसणार नाही. मी हाक मारल्यावर "ओ" मिळणार नाही. तेव्हा कदाचित तो व्हायचा त्यापेक्षा जास्त मी रडकूंडीला येईन आणि मी त्याला मिस करेन.

तो लहान असताना मी त्याला झोपवायला एक गाण म्हणायची ..
नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे
शांत हे आभाळ सारे
शांत तारे, शांत वारे
या झ-याचा सूर आता मंद झाला, मंद झाला रे.

आता वाटतय आता आमच घरही असच शांत शांत असणार आहे. तारे, वारे, आभाळ सारे..... खरच शांत होतील...
त्या गाण्यातल्या सारखा रातराणीच्या फुलांचा गंध येईल, चांदण्याला नीज येईल. पण मी मात्र ट्क्क जागी असेन त्याच्या एका फोनची वाट पहात...
लहानपणापासून तूझ्या घागऱ्यांच्या छंदतालाला आवर, तूझा दंगा मस्ती थांबव अस सारख कानी कपाळी ओरडणारी मी तूझ्या छोट्यात छोट्या अश्या किणकिणीला आसूसली होईन...

आता लिहीताना अजून एक आठवतय….
तो लहान होता तेव्हा मी कामावर जायची. तो विचारायचा " तू कचाला जातेश "
"पैसे आणायला"माझ उत्तर.
" पैचा कचाला?"
" खाऊ आणायला, टॉय आणायला."
मग तो मला मजेत बाय बाय, टाटा करायचा. दुस-या दिवशी पुन्हा तोच प्रश्न "तू कचाला जातेश? "
"पैसे आणायला"माझ पुन्हा तेच उत्तर.
आता मात्र तो म्हणायचा "काल आणले ना? मग आज कचाला पलत जातेश?"
तेव्हा तो ज्या इनोसंटली अस म्हणायचा त्या इनोसंटली मी आज त्याला विचारू शक्त नाही की " आता पर्यंत शिकलास ना?तू कशाला जातोस?"
मी नाही विचारू शकत. कारण त्याला मीच ध्येय्य दिली आहेत. खूप खूप स्वप्न दिली आहेत.
मीच त्याला ठिकठिकाणी हिंडवून जग दाखवलय. त्यावर झेपावणार आकाश दाखवलय. त्याच आकाशात उंच आकाशात भरारी मारायची उदिश्ट्य दिली आहेत.
तेच आकाश आता त्याला खुणावतय आणि तो ही त्या अवाढव्य मैदानात खेळायला उतरायची वाट पाहतो आहे.खूप खूप उत्सुक आहे तो उडायला.
पण माझ्या मनातल सांगू का तूम्हाला????
मला आता त्याच आकाशाच मला भय वाटतय. त्या आकाशाच्या विस्तॄतपणाची भिती दाटली आहेत मनात. काळजीने मन बावरतय.चलबिचल होतय.
वाटतय तो त्या आकाशात भरारी मारताना संभाव्य धोक्याचा इशारा द्यायला मी तिथे नसेन. तो अडखळेल, धडपडेल. "आई ग" म्हणेल. पण तेव्हा ही कदाचित मी त्याच्याबरोबर असणार नाही. आपल साध्य गाठण्यासाठी त्याला आपापल बळ एकवटून पुन्हा उभ रहाव लागेल. आणि पुन्हा त्याच आकाशात झेप घ्यावी लागेल. त्यावेळी माझे आशिर्वाद त्याच्या सोबतीला असतील. पण मी मात्र एकटेपणाला सामोरी जात असेन.माझ्या यजमानांची साथ असेलच तेव्हा. पण या घडीला मात्र घरात लवकरच येणा-या मुलाच्या अनुस्थितीने एकटेपण सतावायला लागल आहे. मुलाच्या जन्माच्या वेळी कापलेल्या नाळेचा त्रास खर तर आताच होतोय. डोळे भरून येताहेत सारखे तरी शून्यात हरवले आहेत…


ग्रॅज्युएशन फक्त माझ्या मुलाचच नाही तर माझ ही झाल आहे.
ग्रॅज्युएशन.... जे ग्रॅज्युअली होत ते.... अल्लडते पासून प्रौढत्वाकडे .... दुकटेपणापासून एकटेपणाकडे.... भरीवपणापासून रितेपणाकडे...
आणि शाळेच्या`त्या` सेरिमनी बरोबर COMMENCEMENT झाली आहे माझ्या ही आयुष्यात....
सुरवात.....नवीन प्रकारच्या आयुष्याची..... जिवनातल्या संक्रमणाची, स्थित्यंतराची...

म्हणूनच या अंतिम भागाच्या शेवटी मी `समाप्त` न लिहिता लिहिते आहे ....
सुरवात..........

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

सहज's picture

31 May 2009 - 9:20 am | सहज

मस्त पार्टी!

नचिकेतला अनेकोत्तम शुभेच्छा!

अवांतर - आता नचिकेतच्या सोळाव्या वाढदिवसाच्या पार्टीचे वर्णन देखील येउ दे!

क्रान्ति's picture

31 May 2009 - 9:22 am | क्रान्ति

खूप खूप आवडली ही सुरुवात! अतिशय हृद्य आणि भावपूर्ण लिहिलंय मीनल! पार्टीच्या वातावरणातून कधी निघालो, आणि अंतरंगात कधी पोहोचलो, कळलंच नाही!
ग्रॅज्युएशन फक्त माझ्या मुलाचच नाही तर माझ ही झाल आहे.
ग्रॅज्युएशन.... जे ग्रॅज्युअली होत ते.... अल्लडते पासून प्रौढत्वाकडे .... दुकटेपणापासून एकटेपणाकडे.... भरीवपणापासून रितेपणाकडे...
आणि शाळेच्या`त्या` सेरिमनी बरोबर COMMENCEMENT झाली आहे माझ्या ही आयुष्यात....
सुरवात.....नवीन प्रकारच्या आयुष्याची..... जिवनातल्या संक्रमणाची, स्थित्यंतराची...

या जाणिवा तर खूप खास! अभिनंदन, शुभेच्छा आणि बरंच काही, शब्दांत सांगता न येणारं!
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा

स्वाती दिनेश's picture

1 Jun 2009 - 11:55 am | स्वाती दिनेश

अतिशय हृद्य आणि भावपूर्ण लिहिलंय मीनल! पार्टीच्या वातावरणातून कधी निघालो, आणि अंतरंगात कधी पोहोचलो, कळलंच नाही!
क्रांतीसारखेच म्हणते,
स्वाती

समिधा's picture

31 May 2009 - 9:31 am | समिधा

मीनलताई खुपच छान लिहील आहेस गं =D>

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

मदनबाण's picture

31 May 2009 - 9:48 am | मदनबाण

व्वा.सर्व भाग आवडले...:)
नचिकेतला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा!!!

मदनबाण.....

रेवती's picture

31 May 2009 - 9:52 am | रेवती

मिनलताई,
इतकी भावपूर्ण लेखमाला लिहून तू आम्हाला वेगळाच अनुभव दिलास.
आताचा भाग वाचताना जीव कासावीस झाला.
माझं काय होइल मुलगा शिकायला बाहेर जाताना.....आणि बरच काय काय वाटून गेलं.
आपल्याला जर आठ दहा मुलं असली तर किती बरं होइल असं वाटलं...... एम्टी नेस्टची भिती वाटायला नको.;)

रेवती

पर्नल नेने मराठे's picture

31 May 2009 - 6:18 pm | पर्नल नेने मराठे

खरे आहे :(
माझं काय होइल मुलगा शिकायला बाहेर जाताना.....आणि बरच काय काय वाटून गेलं.

मला तर अजुन मुलबाळ पण नाहि पन तरिहि जीव कासावीस झाला.
मिनल काकु किति उत्साही आहेत. भारतातुन फोटो मागवुन घेतले.
काकु मस्त वाट्ले अजुन लिहा ना !!!!
चुचु

श्रावण मोडक's picture

31 May 2009 - 10:15 am | श्रावण मोडक

लेखन आवडलं.

लंबूटांग's picture

31 May 2009 - 10:52 am | लंबूटांग

मस्त लेख..

खरच इथे प्रचंड मोठ्या प्रमाणात celebrate करतात प्रत्येक achievement. माझे पण M.S. चे ग्रॅज्युएशन झाले काल.मी भारतामधे असताना ग्रॅज्युएशन attend नव्हते केले आणि त्याचे काही विशेष वाटलेही नव्हते. पण इथे गेल्यावर्षी ग्रॅज्युएशन ceremony पाहिला आणि मग मात्र पुढचे एक वर्ष ह्या दिवसाची आतुरतेने वाट पहात होतो. ह्यावेळी हवामान तितकेसे चांगले नव्हते पण पालक आणि मुलांचा उत्साह मात्र तसाच होता. पाऊस पडत असूनही सगळे जण तेवढ्याच उत्साहाने विनातक्रार बसून होते. पावसामुळे बर्‍याच लोकांनी भाषणे आटोपती घेतली.

University मधे प्रत्येक College (उदा. College of Management, College of Science and Mathematics etc. जशी आपल्याइथे Departments असतात तशी) ला वेगळ्या रंगाचे sage (ओढणी सारखे घ्यायचा एक कापडाचा तुकडा) दिले जातात. बाकी सगळे सारखेच असते. काळा गाऊन आणि कॅप. त्यावर एक रेशमी लांब गोंडा (Tassels) ज्यावर ग्रॅज्युएशनचे वर्षाचा बिल्ला असतो. तो मीनल यांनी सांगितल्या प्रमाणे आधी टोपीच्या उजवीकडे ठेवायचा असतो. PhD केलेल्यांना मात्र वेगळा गाऊन आणि गोल टोपी दिली जाते.

प्रत्येक कॉलेज ठरलेल्या क्रमाने मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी आपापल्या विद्यार्थ्यांना घेऊन जाते. नंतर तिथे मुख्य कार्यक्रमात थोडीशी भाषणबाजी होते आणि मग फक्त PhD मिळालेल्यांना आणि special achievement award winners ना वर बोलावून पदवीदान केले जाते. बाकीच्यांना नुसतेच कॉलेजप्रमाणे ग्रुप मधे उभे करून announce करतात की तुम्हाला डिग्री मिळाली आहे आणि मग प्रत्येक कॉलेजला वेगवेगळ्या ठिकाणी नेले जाते. तिथे मग प्रत्येकाला स्टेजवर बोलावून डिग्री दिली जाते. (खरे म्हणजे नुसतेच होल्डर देतात ज्यात डिग्री ठेवली जाते. खरी डिग्री नंतर पोस्टाने येते. कारण इतक्या हजारो मुलांची नावे order मधे लावणे अशक्य असते. आणि काही जण येतही नाहीत डिग्री घ्यायला.). तुमचे नाव व्यवस्थित घेतले जावे म्हणून प्रत्येकाला आधीच एक कागद दिला जातो ज्यावर phonetic स्पेलिंग लिहायचे असते. सगळ्यांना डिग्री देऊन झाल्यावर मग सांगितले जाते की आत तुम्ही ग्रॅज्युएट झालात आणि आता तो रेशमी गोंडा डावीकडे करा. मग परत सगळ्यांना रांगेत बाहेर सोडले जाते. :)

अवांतर :इथे फोटो पहाता येतील.

मीनल's picture

31 May 2009 - 5:01 pm | मीनल

सर्वांना धन्यवाद. :)
मीनल.

शार्दुल's picture

31 May 2009 - 5:52 pm | शार्दुल

सगळे भाग उत्तम,,,,,,,,,,,,,,,,

चतुरंग's picture

31 May 2009 - 6:38 pm | चतुरंग

ग्रॅज्यूएशन आवडलं. मुलाच्या बरोबरीनं अयुष्यातल्या ह्या टप्प्यावरच्या स्थित्यंतरातून होणारं तुमचं ग्रॅज्यूएशन मनाच्या आत पोचलं. जीव कासावीस कसा होऊ शकतो ह्याची जाणीव तीव्रतेनं झाली.
मी ग्रॅज्यूएट होऊन बाहेर नोकरीला निघालो त्यावेळी माझ्या आईवडिलांना काय वाटलं असेल ह्याचा थोडा अंदाज आला.
आपणंच स्वप्न दाखवतो आणि भरारीची वेळ आल्यावर मात्र मन कातर होतं हा मनुष्यस्वभाव आहे. त्याचा छान मागोवा तुम्ही घेतला आहेत.
आपल्या मुलांना आपली गरज लागेल तेव्हा आपण कुठे असू हा प्रश्न मनाला छळत रहातो पण हे पिढी दरपिढी असे होतच रहाणार हे सत्य स्वीकारले की आर्तता सोसायचं बळ येतं
भरपूर कष्ट घेऊन तुम्ही केलेल्या तयारीचे कौतुक वाटले.
पुढील भरार्‍यांसाठी नचिकेतला आणि त्या समर्थपणे बघण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा!!

(बालवाडीतला)चतुरंग

धनंजय's picture

1 Jun 2009 - 10:07 am | धनंजय

भावपूर्ण आणि प्रामाणिक लेखन आवडले.

तुम्हा सर्वांचे अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा!

प्रमोद देव's picture

1 Jun 2009 - 10:54 am | प्रमोद देव

छानच लिहीलंय. अगदी सविस्तर!
चि. नचिकेतला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

भाग्यश्री's picture

1 Jun 2009 - 8:46 pm | भाग्यश्री

अप्रतिम लिहीलंय! तुम्हा दोघांचा फोटोही एकदम क्युट! :)

www.bhagyashree.co.cc