नयन मोहणारे नैनीताल - भाग ३

वडापाव's picture
वडापाव in जनातलं, मनातलं
15 May 2009 - 10:51 pm

भाग १

भाग २
तिसऱ्या दिवशी मी उठलो, ते जरा उशीराच. तरी मुम्बईत उठतो त्या मानाने तर मी पहाटे उठलो, असंच म्हणायला हवं. आदल्या दिवशी स्लाईड शो जेव्हा दाखवला गेला, तेव्हा 'रोप कोर्स" ह्या प्रकाराबद्दल आम्हाला थोडीशी माहिती देण्यात आली होती. त्याच्या प्रात्यक्षिकांची छायाचित्रे बघून जांभया देणारे आम्ही सूर्यवंशी खडबडून खूर्चीत सरळ होऊन बसलो. छायाचित्रांत बोल्डरिंग, रॅपलिंग, रिवर क्रॉसिंग (सस्पेन्शन ट्रॅव्हर्स), पॅरलल रोप, इ. ची प्रात्यक्षिके बघून आमची गाळण उडाली. प्रत्येकाला (आणि प्रत्येकीला) 'टेन्शन' आलं होतं. खरं तर ती प्रात्यक्षिके खऱ्याखुऱ्या ट्रेकच्या वेळची होती. त्यामुळे त्यांची तीव्रता आम्हाला जास्त वाटत होती. कारण आम्ही तर साध्या ऍडवेन्चर कॅम्पला गेलो होतो. बोल्डरिंग हा प्रकार त्या सर्वांत मला छायाचित्रे बघून जरी सोपा वाटला, तरी आमच्या उंचीएवढे दगड केवळ हाता-पायांचा वापर करून चढायचे, आणि लगेच त्याच्या वरील खडकावर पुन्हा चढायचे, म्हणजे थकवणारा प्रकार होता. त्यामुळे दिवसभरातील टीम-बिल्डींग ऍक्टिविटीझमुळे जरी आम्ही दमून खाटेला पाठ टेकली, तरी त्या 'टेन्शन' मुळे कुणाला झोप म्हणून लागली नाही.


दुसऱ्या दिवशी आमच्याकडून कवायत करून घेतली. मुन्नाभाई एमबीबीएस मधील लाफ्टरथेरपी (सॉरी; लफ्टरथेरापी) चा प्रत्यय मला त्यादिवशी पहिल्यांदा आला. एकसाथ सगळ्यांनी मोठमोठ्याने हसायचे. त्याची सुरुवात कुणीतरी आधी पुढे येऊन करायची. तेव्हा दीपक सरांनी विचारले, ''कौन आयेगा आगे?"" ए.के.राजधानीत मी सहप्रवाशांना अनेक विनोद सांगितले होते. तेव्हा ते सगळे इतके मोठ्याने हसले होते, की रात्री दोन वाजता झोपलेले बाकी सर्वजण दचकून जागे झाले. तसेच दिल्लीत, दिल्लीपासून रामनगर आणि नैनीतालपर्यंत बसमध्ये आणि इतर विश्रांतीच्या वेळी मी माझा एक मित्र अशा दोघांनी मिळून सगळ्यांना हसवत ठेवले होते. तेव्हा अर्थातच पुढे येण्यासाठी सर्वांनी आमची नावे सुचवली. आधी माझ्या ठाण्याच्या नव्या मित्राचं, अपूर्व पात्रेचं नाव सगळ्यांनी सुचवलं. त्याने पुढे जाऊन ''मला नाही जमणार"" असं म्हणून माझं नाव सुचवलं. तेव्हा आम्ही दोघांनी हसायला सुरुवात केली. अर्थात मोठ्याने हसायचं हे काही आम्हांला तेव्हा जमण्यासारखं नव्हतं. कारण जॉगिंग आणि इतर कवायती एवढ्या सकाळच्या थंडीत कराव्या लागल्याने आमच्या छात्यांचे ठोके ताडताड उडत होते आणि नाक सुन्न झालं होतं. श्वास घेऊ नये असंच वाटत होतं. तेव्हा मोठ्याने हसणं अगदी आवाक्याबाहेर होतं. तरी आम्ही कसंबसं हसायला सुरुवात केली. आम्हाला काही हात वर करायला सांगितलं नाही, आणि आम्हीही हात वर केले नाहीत. तेवढ्यात आम्हाला हसण्यातील वराईटी दाखवायला सांगितले. आता नेहमी हसतो, त्याहूनही क्षीण आवाजात आवाज फुटत होता. त्यात हसण्याची वराईटी काय दाखवणार डोंबल! तरीही मी सर्वांत कमी कष्ट करावे लागणाऱ्या (अर्थात, मला कमी कष्ट लागणाऱ्या.)(माझा खरा आवाज खणखणीत पुरुषी आहे.)बायकी आवाजात हसायला लागलो. तो इतका किचाटपणे बाहेर पडला, की हा आवाज मीच काढतोय ना अशी मलाच शंका वाटली. बाकी सर्व जण सुद्धा क्षणभर या विचारानेच गप्प बसले, की मी नेमकं आत्ता काय केलं? मग मी अंगात उसनं अवसान आणून मोठमोठ्याने हसायला लागलो, तेव्हा कुठे बाकीच्यांनाही हसायची वाचा फुटली. खरंखुरं हसून गडाबडा लोळण्याचा प्रसंग माझ्या आयुष्यात बऱ्याचदा आला होता पण कधीही पोट दुखलं नव्हतं, जे इतकं खोटं हसल्याने दुखलं(कुणाला शंका असेल तर आत्ताच क्लिअर करतो, कि त्या दिवशी सकाळीच मी 'फ्रेश' झालो होतो. मात्र पोट हे हसल्यामुळेच दुखत होतं).

मग आमचा नाश्ता कधी एकदा होतो, असं आम्हाला झालं होतं. नाश्त्याच्या आधी आम्हाला सांगण्यात आलं, की नाश्त्याला थोडा वेळ असेपर्यंत काहीजणांनी आपल्या आंघोळी उरकल्या तरी चालतील. बाकीच्यांनी नाश्त्यानंतर आंघोळी करा. मी तिथेच ठरवलं आंघोळ नाश्त्यानंतर करायची, म्हणजे नाश्ता हा गरम असतानाच हातात येईल आणि सर्वांत आधी जर आपली न्याहारी झाली, तर बाथरूमही रिकामं मिळेल. कारण आमच्या डॉर्मिटरीमध्ये आम्ही दहा जण होतो, आणि बाथरूमं तीनच होती. बाथरूममध्ये गीजर नव्हता. नळाचं पाणी थंडगार. हॉटेलची माणसं लाकडं फो़़डून, जाळून बॉयलरमध्ये पाणी तापवायची. बाथरूममधील बादली जो आधी पळवेल, तो त्या बाथरूममध्ये आधी आंघोळ करेल, असा अलिखित कॉमन सेन्सचा कायदा आमच्या खोलीत होता. सेल्फ सर्विस असल्याने बॉयलरपर्यंत जाऊन स्वत: बादलीत भरलेलं पाणी डॉर्मिटरीमधील बाथरूमपर्यंत आणावे लागायचे. त्यामुळे बॉयलर ते डॉर्मिटरीचा दरवाजा हे दहा पावलांचं अंतर बादली पाण्याने भरल्यावर मला दहा किलोमीटरचं वाटणं साहजिक होतं. दोन डॉर्मिटरीज, एक स्पेशल रुम, किचन आणि डायनिंग रूम हे एकाच इमारतीच्या तळमजल्यावर होते. आणि सर्वांचे दरवाजे दिसायला सारखे असल्याने मी नेहमी गोंधळात पडायचो. खरं तर जिथे बॉयलर होता, तिथपासून आमची डॉर्मिटरीच सर्वांत जवळ. तरीही गाढवासारखा मी उगाच खूप पुढे गेलो. माझ्या डॉर्मिटरीला मी कधी मागे टाकलं मला कळलंच नाही. डावीकडे वळून मी एका दरवाज्यापाशी येऊन थांबलो आणि बादली खाली ठेवली. तो दरवाजा स्पेशल फॅमिली रूमचा होता. पण मला तो आमच्या डॉर्मिटरीचा दरवाजा वाटला. तेवढ्यात त्या दरवाज्यातून दोन मुली बाहेर पडल्या. मला विचित्रच वाटलं. आपल्या जेन्ट्‌स डॉर्मिटरीमध्ये मुली कशा? तेवढ्यात त्या ज्या दरवाज्यातून बाहेर पडल्या, त्या उघड्या पडलेल्या दरवाज्याकडे माझं लक्ष गेलं. बघितलं तर आत एकदम पॉश फर्निचर, सोफा, कोच, टिपॉय वगैरे. आणि आमच्या खोलीत तर फक्त खाटाच होत्या. तेव्हा मला लक्षात आलं की आपण खूप पुढे आलो आहोत. मग मी बादली उचलून स्वत:च्या वेंधळेपणावर रागवत माझ्या खोलीच्या मोरीपर्यंत गेलो. तेव्हा माझं बादलीतल्या पाण्याकडे अजिबात लक्ष राहिलं नाही. त्यामुळे अर्धं पाणी खाली सांडत सांडत मी बाथरूमात जाऊन पोचलो. तोवर पाणी गार झालं होतं.

अशीच त्या वेळचीच आठवण आहे. नेमकी त्याच दिवशीची आहे की नाही आठवत नाही, पण आंघोळीच्या वेळचीच आहे. नैनीतालमधील त्या हॉटेलच्या आवारात सकाळी आणि रात्री वातावरण प्रचंड थंड असते. त्यात आंघोळ तर सकाळीच करावी लागते कारण हॉटेलची माणसं पाणी फक्त सकाळच्या वेळीच पाणी तापवतात. माझी आंघोळ चालू होती. तेव्हा आम्हा दहाजणांपैकी एकजण मी आंघोळ करत असलेल्या बाथरूमाचं दार बडवू लागला. मला विचारतो, की आत कोण आहे? मी म्हटलं, ''मी आत आंघोळ करतोय, दार का ठोकतोय्स?"" तर म्हणतो, ''लवकर बाहेर ये मला थंडी वाजतेय इथे उभं राहून."" मी म्हटलं, ''अरे इथे नागडा होऊन थंड पडलेल्या पाण्याने आंघोळ करतोय, आणि तू बाहेर भारंभार कपडे घालून कुडकुडायच्या गोष्टी कसल्या करतोस?"" तर बावळट हसायला लागला.
''आता आंघोळ करताना कपडे तर काढणारच ना माणूस? तसंच आंघोळ कोण करणार?"" असं मी विचारल्यावर म्हणतो, ''मी निदान अंडरवेअर तरी घालतो."" असं म्हणून स्वत:च बाहेर जाऊन सगळ्याना सांगत सुटला की मी पूर्ण नग्नावस्थेत आंघोळ करतो. सगळ्यानी यात विशेष काय विचारल्यावर स्वत: आंघोळ कशी करतो ते त्याने अभिमानाने सांगितले. एकजण म्हणाला, ''आत काय सीसी टीव्ही कॅमेरे लावलेले असतात काय?"" तेव्हापासून त्या गोष्टीवरून सगळेजण त्याला चिडवायला लागले. दुसऱ्या दिवशी माझ्याकडे येऊन गंभीरपणे म्हणाला, ''अरे आज मी तुझ्यासारखीच आंघोळ केली. आता मला चिडवू नका.'' आता मी काय म्हणणार? मी बरं तर म्हटलं, पण त्याने बाकीचे थांबताय्त थोडंच? स्वत:च्याच पायावर त्याने अशाप्रकारे धोंडा आपटून घेतला होता, त्यात मी काय करू शकणार होतो?
आंघोळी झाल्यावर दीपक सरांनी सगळ्याना विचारलं, ""सबने नहा लिया?'' रोज कोणीतरी थंडीच्या भितीमुळे किंवा बादली वेळेत न मिळाल्याने आंघोळ करायचा नाही. तेव्हा तीन-चार हात वर आले. मग सरांनी विचारलं, ''सब फ्रेश होके आये है ना? कोई ऐसा है क्या जो फ्रेश नही हुआ है? देखिए अभी फ्रेश होईये. बाद मे रोप कोर्स करते वक्त 'प्राब्लेम' हो सकती है.'' मग सरांनी काहीजणांकडे बघून फ्रेश झालात ना? असं विचारलं. सगळ्यांनी हसत ह्सत माना डोलावल्या. मग आमच्या फेमस बाथरूमबॉयकडे बघत मोठ्याने विचारले, ''आप फ्रेश हुये क्या?"" त्याने घाबरत घाबरत मान डोलावली. सरांनी त्याला पुन्हा विचारले, तेव्हा तो नही म्हणाला आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे फ्रेश व्हायला गेला. त्याने गाढवाने फ्रेशचा शब्दश: अर्थ घेतला आणि फक्त जाऊन तोंड धुवून आला. इतक्या लवकर तो आल्याने सरांनी विचारलं, ''इतनी जल्दी? अभी तो एक मिनीट भी नही हुआ. सब ठीकसे साफ तो हुआ ना? पानी वगैरा डाला ना?"" असं सरांनी विचारताच जो काही हशा पिकला, त्याने लाफ्टरथेरपीच्या पेक्षासुद्धा जास्त गोंगाट केला.

प्रवासविचारअनुभव

प्रतिक्रिया

अवलिया's picture

16 May 2009 - 6:30 am | अवलिया

वा ! मस्त !!

--अवलिया

सँडी's picture

16 May 2009 - 7:24 am | सँडी

आवडले. :)
फोटो जबरदस्त!

विसोबा खेचर's picture

17 May 2009 - 12:09 am | विसोबा खेचर

+१

फोटो जबरदस्त!

तात्या.