एका बेसावध क्षणी

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
12 May 2009 - 8:33 pm

एका बेसावध क्षणी वचनात गुंतून मी
तुझ्या संगतीने आले विश्व माझे त्यागून मी

तुझ्या सोबतीचा किती गर्व, अभिमान होता
महाराज्ञी होते जशी, जग सारे जिंकून मी

चार भिंती, छत, दारे यांना घरपण दिले
चांदण्याचे कवडसे अंगणात शिंपून मी

चित्र अर्धेच ठेवून माझे कुंचले टाकले
रंग माझे विसरले तुझ्या रंगी रंगून मी

नाही घेतला मी ठाव, नाही मोजली मी खोली
तुझ्या अस्तित्वात असे दिले मला झोकून मी

तुझी प्रगती, विकास, तुझा चढता आलेख
तुझ्या कोडकौतुकात नित्य गेले गुंगून मी

तुझ्या यशाचे मंदीर, शिखराचा तूच धनी
नामदेवाची पायरी तशी दारी थांबून मी

माझे आयुष्य परीघ, तूच एक केंद्रबिन्दू
तुझ्याभोवती फिरले मला हुलकावून मी

एका बेसावध क्षणी तुला कळणार नाही
कसे झाले, काय झाले, कधी गेले संपून मी!

कविताप्रकटनविचार

प्रतिक्रिया

मराठमोळा's picture

12 May 2009 - 8:40 pm | मराठमोळा

पतिव्रता, पतीसाठी आयुष्य वाहिलेल्या, पतीमधेच सुख शोधणार्‍या स्त्रीची कहाणी/कविता आवडली. :)

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

पाषाणभेद's picture

13 May 2009 - 12:33 pm | पाषाणभेद

ही कविता द्वैअर्थी पण होवू शकते. म्रुत्युबाबत विचार करा.

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

प्राजु's picture

12 May 2009 - 8:55 pm | प्राजु

समर्पण म्हणजे हेच..!
सुरेख कविता.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सँडी's picture

12 May 2009 - 9:11 pm | सँडी

हेच म्हणतो.

-संदीप.
काय'द्याच बोला.

समिधा's picture

12 May 2009 - 11:26 pm | समिधा

हेच म्हणणे.
छान कविता

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

परिकथेतील राजकुमार's picture

13 May 2009 - 1:30 pm | परिकथेतील राजकुमार

अगदी हेच म्हणतो.
एका समर्पीत स्त्रीचे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले.

चित्र अर्धेच ठेवून माझे कुंचले टाकले
रंग माझे विसरले तुझ्या रंगी रंगून मी
अप्रतिमच शब्दरचना.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

जयवी's picture

12 May 2009 - 11:22 pm | जयवी

समर्पण.... !! फार सुरेख !!

चन्द्रशेखर गोखले's picture

13 May 2009 - 6:28 am | चन्द्रशेखर गोखले

सुंदर काव्य ! व्यक्तिगत आशा ,आकांक्षा भावभावनांची होळी करुन स्त्री
पतीशी समरस होते स्वतः संपून जाते हे सत्य आहे ...!

माझे आयुष्य परीघ, तूच एक केंद्रबिन्दू
तुझ्याभोवती फिरले मला हुलकावून मी

एका बेसावध क्षणी तुला कळणार नाही
कसे झाले, काय झाले, कधी गेले संपून मी!
या ओळी विशेष आवडल्या

सायली पानसे's picture

13 May 2009 - 9:35 am | सायली पानसे

ओळ न ओळ आवडली.. जबरदस्त!

वा! अप्रतिम म्हणजे अगदीच अप्रतिम कविता
एकेक शेर सुंदर
त्यातहि

चित्र अर्धेच ठेवून माझे कुंचले टाकले
रंग माझे विसरले तुझ्या रंगी रंगून मी

आणि

एका बेसावध क्षणी तुला कळणार नाही
कसे झाले, काय झाले, कधी गेले संपून मी!

ह्या ओळी प्रचंड आवडल्या

अजून येऊ दे

ऋषिकेश
------------------
प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)

विसोबा खेचर's picture

13 May 2009 - 10:51 am | विसोबा खेचर

क्लास..!

आपला,
(फ्यॅन) तात्या.

जागु's picture

13 May 2009 - 10:55 am | जागु

अतिशय सुंदर. कविता खुप भावली.

दत्ता काळे's picture

13 May 2009 - 1:11 pm | दत्ता काळे

कविता आवडली.

क्रान्तिजी ,
नेहमीप्रमाणेच छान कविता आहे ही तुमची...
खरे आहे , स्त्रीची कहाणी नेमक्या शब्दांत मांडली आहे तुम्ही

खास करुन ह्या ओळी जास्त भावल्या

एका बेसावध क्षणी वचनात गुंतून मी
तुझ्या संगतीने आले विश्व माझे त्यागून मी

तुझी प्रगती, विकास, तुझा चढता आलेख
तुझ्या कोडकौतुकात नित्य गेले गुंगून मी

एका बेसावध क्षणी तुला कळणार नाही
कसे झाले, काय झाले, कधी गेले संपून मी!

अशाच अजून भावपूर्ण कविता येऊ देत.

सागर

सहज's picture

13 May 2009 - 1:39 pm | सहज

कविता आवडली पण कवयित्रीचे नाव क्रान्ति आहे ना? :-)

उमेश__'s picture

13 May 2009 - 2:29 pm | उमेश__

एका बेसावध क्षणी तुला कळणार नाही
कसे झाले, काय झाले, कधी गेले संपून मी!

शब्दच नाहि प्रतिक्रियेसाठि,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
अप्रतिम.............

उदय सप्रे's picture

13 May 2009 - 3:41 pm | उदय सप्रे

क्रान्तिताई,
ही कविता फक्त एका समर्पण करणार्‍या स्त्री ची नसून तिच्या त्यागाकडे पध्दतशीरपणे आणि अतिशय सोईस्करपणे काणाडोळा करणार्‍या आपमतलबी पुरुष जातीला शेवटच्या कडव्यात शाल्जोडीतील दिलीली उत्तम कविता आहे !
मान गये आप को !

लिखाळ's picture

13 May 2009 - 6:20 pm | लिखाळ

स्वतःला हुलकावणी देण्याची कल्पना आवडली.
कविता छान आहे.
-- लिखाळ.