अंधार चांदण्यांचा

आनंदयात्री's picture
आनंदयात्री in जनातलं, मनातलं
30 Apr 2009 - 12:35 am

उत्तररात्रीनंतर किंवा पहाटेच्या आधी पोर्णिमेचा सुरेख गोलाकार चंद्र पश्चिम क्षितिजावर त्याचे अस्तित्व टिकवायला झगडत असावा.
आकाशाच्या छातीवर चित्रविचित्र आकार गोंदणारे गुढ तारकासमुह फिकट पडुन लुप्त होण्याची भिती बाळगुन असावेत, वाराही साफ पडलेला असावा. दिवसाला दिवस जोडणारा दुवा मी असाच उघड्या कोरड्या डोळ्यांनी संपवत आणलेला असावा. अन आता ते चंद्राचे पश्चिम क्षितिजावर बुडणे असह्य होत जावे...

उघड्या डोळ्यांनी सुरु व्हावा एक स्वप्नमयी भास .. कुठल्याश्या गर्द झाडीत बुडालेल्या दोन डोंगरांच्या दरीत असलेली नदी आणी तिच्या किनार्‍यावर कोरलेली लेणी. किनार्‍यावरच एका विविक्षित ठिकाणी जणु एखादी शापित अप्सराच दगडाची झाली असावी की काय इतपत सुंदर वाटणारी मुर्ती असावी. मी भारावल्यासारखा तिच्याकडे ओढला जावा, अधिरतेने तिला चुंबावा, अन फत्थरात यावी जान, मला जाणवेल न जाणवेल इतकी जाणिव होताच ती धुर बनुन वायुंडलात लुप्त व्हावी.

मी तिथेच तिला शोधत रहावा, तिथल्या निर्जिव खडकात धडका देत. भळाभळा रक्ताच्या धारा लागाव्यात, सगळीकडे होउन जावे लालच लाल .. भडक्क. धुवांधार पावसांच्या धारांनी ती दरी भरावी काठोकाठ अन लालेलाल. त्या लाल स्वप्नातुन जाग यावी कोरडी डोळ्यांनी. पुन्हा तोच बुडणारा चंद्र असावा डोळ्यासमोर अन फिकट चांदणे आकाशात पसरलेले..

चराचराला गिळुन टाकणारी खिन्नता जणु सगळ्या आसमंताला व्यापुन असावी. आपण वेड्यासारखी त्या तेजोनिधीची वाट पहावी. फिकट चांदण्यांना विझवुन बुडत्या चंद्राला बुडवुन लख्ख आसमंत प्रकाशमान होण्याची.
क्षणांना युगांची उपमा थिटी पडावी !
अस्वस्थ पणे निराशा घेरुन यावी अन सगळ्याच रात्रींना संपवणारा सुर्य नसतो असे काहीसे पटायला लागावे.

मज हे कसे उमगले
ते दु:स्वप्न नव्हते
मज चांदणे सुखाचे
केव्हा समीप नव्हते

मम भास होत राही
पुन्हा पुन्हा प्रभेचा
मम झुठ स्वप्न दावी
अंधार चांदण्यांचा

वेड्या पिश्या मनाला
आशा तशीच वेडी
उमजेल काय त्याला
हि काळरात्र आहे

कवितामुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

घाटावरचे भट's picture

30 Apr 2009 - 1:02 am | घाटावरचे भट

हम्म्म्म...छान. 'मम भास होत राही' ऐवजी 'मज भास होत राही' हवे काय? :-?

बेसनलाडू's picture

30 Apr 2009 - 1:26 am | बेसनलाडू

आवडले.
(प्रकाशमान)बेसनलाडू

टारझन's picture

30 Apr 2009 - 1:49 am | टारझन

टिपिकल आंदूश शैली !! झकास लेखन !!

आंद्याच्या भावनिक लेखणाचा फॅण) टारानंदायात्री

नंदन's picture

30 Apr 2009 - 8:45 am | नंदन
बिपिन कार्यकर्ते's picture

30 Apr 2009 - 1:52 am | बिपिन कार्यकर्ते

सुंदर!!!!!!!!!

बिपिन कार्यकर्ते

शितल's picture

30 Apr 2009 - 2:09 am | शितल

सहमत. :)
मुक्तक आवडले. :)

अनामिक's picture

30 Apr 2009 - 2:13 am | अनामिक

हेच म्हणतो... मुक्तक आवडले.

-अनामिक

अवलिया's picture

30 Apr 2009 - 7:02 am | अवलिया

हेच बोलतो

--अवलिया

प्राजु's picture

30 Apr 2009 - 7:10 pm | प्राजु

हेच बोलते. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मनीषा's picture

30 Apr 2009 - 7:03 am | मनीषा

मम भास होत राही
पुन्हा पुन्हा प्रभेचा
मम झुठ स्वप्न दावी
अंधार चांदण्यांचा
... सुंदर

विनायक प्रभू's picture

30 Apr 2009 - 7:11 am | विनायक प्रभू

रे आनंदयात्री भौ

सहज's picture

30 Apr 2009 - 7:20 am | सहज

आनंदयात्रींचे भावनिक लेखन आवडते पण हा लेख जरा जास्तच निराशावादी वाटला. :-(

लेखकाची असलेली थोडीफार ओळख या लेखाचा सूर / आस्वाद नीट घेउ देत नाही . जाउ दे पुण्याच्या उकाड्याचे दुष्परिणाम म्हणायचे

दशानन's picture

30 Apr 2009 - 10:34 am | दशानन

हेच म्हणतो,

जसे हा लिहतो तसा नाही आहे असे वाटते :)

ह्यांचे लेखकामध्ये नाव वाचले की मला खात्री असते की हा कुठे तरी मनाला खोलवर हात घालण्याचा प्रयत्न करत आहे ह्यांची ;)

**
पण ह्या वेळी जरा कमी पडलास मित्रा, नाही आवडले लेखन :(

थोडेसं नवीन !

मिंटी's picture

30 Apr 2009 - 10:47 am | मिंटी

ह्यांचे लेखकामध्ये नाव वाचले की मला खात्री असते की हा कुठे तरी मनाला खोलवर हात घालण्याचा प्रयत्न करत आहे ह्यांचा

+१ सहमत :)

आनंदयात्री नेहमीप्रमाणेच सुंदर लिखाण :)

इनोबा म्हणे's picture

30 Apr 2009 - 7:21 am | इनोबा म्हणे

रात्री झोपताना उशीखाली तलवार ठेवत जा. :)

मुक्तसुनीत's picture

30 Apr 2009 - 7:22 am | मुक्तसुनीत

लिखाण काव्यात्म वाटले. परंपरेने जे अनुभव काव्यात टिपण्याचा प्रयत्न केला जातो त्याला गद्यात पकडण्याचा प्रयत्न. सुंदर स्त्रीच्या शिल्पाकृती मूर्तीचे हवेत विरणे , त्या प्रतिमेकरता जीव व्याकूळ होणे हे वाचताना जी एंच्या प्रतीक-कथांचे क्षणैक दर्शन झाल्यासारखे वाटले.
शेवटच्या काव्यपंक्ती माझ्यावर परिणाम करू शकल्या नाहीत. पण एकूण प्रयत्न आवडला.

श्रावण मोडक's picture

30 Apr 2009 - 4:40 pm | श्रावण मोडक

मुक्तशी पूर्ण सहमत.

धनंजय's picture

30 Apr 2009 - 10:52 pm | धनंजय

इंग्रजीत "पोएट्री इन प्रोझ" नावाची रचना काही कवी करतात तशी ही रचना आहे.

चांदणे अंधार पाडते, ही कल्पनाही आवडली. पूर्वी वेगळ्या संदर्भात वाचली होती ("चांदण्यामुळे आकृती स्पष्ट होण्याऐवजी अस्पष्टच होत होत्या" असा काही... स्रोत शोधतो आहे). आनंदयात्रींच्या या भावनिक संदर्भातही ही कल्पना अगदी नाविन्यपूर्ण आणि चपखल आहे.

llपुण्याचे पेशवेll's picture

30 Apr 2009 - 8:50 am | llपुण्याचे पेशवेll

मस्त रे आंद्या. अजून एक कडक लेख.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

शिप्रा's picture

30 Apr 2009 - 10:07 am | शिप्रा

लेख आणि कविता दोन्ही आवडले...सुंदर लिहिले आहे

क्रान्ति's picture

30 Apr 2009 - 10:12 am | क्रान्ति

लेख आणि काव्य दोन्ही अप्रतिम!
=D> क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

स्मिता श्रीपाद's picture

30 Apr 2009 - 10:24 am | स्मिता श्रीपाद

मस्त लिहिले आहे...

-स्मिता

परिकथेतील राजकुमार's picture

30 Apr 2009 - 11:09 am | परिकथेतील राजकुमार

एक वेगळाच लेखन प्रकार आवडला :)

परायात्री
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

जागु's picture

30 Apr 2009 - 11:15 am | जागु

छान.

अभिज्ञ's picture

30 Apr 2009 - 11:21 am | अभिज्ञ

मुक्तक आवडले,
परंतु लेखकाकडून अपेक्षा जरा जास्त होत्या.
प्रतिमांचा वापर थोडासा जास्त झाल्यासारखा वाटतोय.
त्यामुळे कधी कधी सुंदर संकल्पनादेखील समजायला जास्त अवघड वाटु लागते.
तरि देखील इट्स गुड वन.
७/१०.

अभिज्ञ.

--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

स्वाती दिनेश's picture

30 Apr 2009 - 11:35 am | स्वाती दिनेश

आंदोबा,
प्रकटन आवडले.
स्वाती

निखिल देशपांडे's picture

30 Apr 2009 - 12:29 pm | निखिल देशपांडे

वेड्या पिश्या मनाला
आशा तशीच वेडी
उमजेल काय त्याला
हि काळरात्र आहे

आनंदयात्री मस्तच काव्यात्मक लेखन

==निखिल
आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर

मेघना भुस्कुटे's picture

30 Apr 2009 - 1:37 pm | मेघना भुस्कुटे

कविता आवडली. पण आधीचं गद्य नाही आवडलं फारसं. जरा जास्त आलंकारिक वाटलं.

पण तू उच्च लिहू शकतोस त्यामुळे पुलेशु!
(खुद के साथ बातां : रंग्या, हा आंद्यचा बॅड पॅच (प्रभावळकरांच्या भाषेत 'बेड पेच') असावा का. :? )

चतुरंग

काळा डॉन's picture

30 Apr 2009 - 8:42 pm | काळा डॉन

टिपीकल यात्री!

प्रमोद देव's picture

30 Apr 2009 - 10:33 pm | प्रमोद देव

अंदुशेठ कविता आवडली. लेख तितकासा जमला नाही ह्या इतरांच्या मताशी सहमत आहे.
( चला, चाल लावायला कच्चा माल मिळाला. )

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

आनंदयात्री's picture

1 May 2009 - 7:12 pm | आनंदयात्री

सर्वांनी दिलेल्या दादेबद्दल, केलेल्या कौतुकाबद्दल आभारी आहे, ऋणी आहे.

बर्‍याच सुहृदांनी लेख न आवडल्याचे प्रतिसाद्,खरडी तसेच इतर माध्यमातुन कळवले. मला वाटते आपण प्रत्येक जणच आपापल्या वया नुसार आवडी निवडींच्या कचाट्यात सापडलेलो असतो. 'उन्हाळ्यातले सुख' बहुतांश सगळ्यांना आवडला जरी असेल तरी तो माझ्या वयाच्या माझ्याच मित्रांना तितका आवडला असेल असे वाटत नाही. प्रौढ वयात आलेल्या जाणीवेमुळे, साहित्याकडे बघण्याच्या बदलेल्या दृष्टिकोणामुळे,मध्य वयात आयुष्यात होणार्‍या स्थित्यंतरामुळे आवडिनिवडीवर फरक पडु शकतो असे वाटते.