मातीचेच पाय

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
28 Apr 2009 - 7:56 pm

श्रद्धा, भक्ती, आत्मीयता, विश्वासाचा अर्थ काय?
जिथे माथा टेकवावा, तिथे मातीचेच पाय!

मंदिराची शोभा न्यारी, मूर्ती मात्र भंगलेली
वैभवाची ऐट हंड्या-झुंबरात टांगलेली
देवाच्याच दारी होई देवाचाच निरुपाय

मांगल्याची, पावित्र्याची चंद्रभागा का आटली?
सुकला स्तब्ध अश्वत्थ, इंद्रायणीही गोठली
पापभार सांभाळून झिजले देवाचे पाय

कशी, किती जोजवावी माया ममतेची नाती?
त्याग राहिला गहाण लालची स्वार्थाच्या हाती
कधी देव, कधी दैव, सारे थकले उपाय!

कविताप्रकटनविचार

प्रतिक्रिया

मराठमोळा's picture

28 Apr 2009 - 8:01 pm | मराठमोळा

वास्तववादी कविता.
आजकाल देवाचाही बिझिनेस केलाय लोकांनी...

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

प्राजु's picture

28 Apr 2009 - 8:02 pm | प्राजु

मांगल्याची, पावित्र्याची चंद्रभागा का आटली?
स्तब्ध झाला अश्वत्थही, इंद्रायणीही गोठली
पापभार सांभाळून झिजले देवाचे पाय

सुरेख!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चन्द्रशेखर गोखले's picture

28 Apr 2009 - 8:12 pm | चन्द्रशेखर गोखले

खूप सुंदर .. वास्तवाचं नेमक्या शब्दात वर्णन केल आहे. आपलं शब्द सामर्थ अफाट आहे यात शंकाच नाही.

आपल्या कवितांचा फॅन (चंद्रशेखर गोखले )

निशिगंध's picture

28 Apr 2009 - 10:15 pm | निशिगंध

खुपच छान आहे....
खुप आवडली

_______ निशिगंध

बेसनलाडू's picture

28 Apr 2009 - 10:21 pm | बेसनलाडू

आवडली.
देवाचा निरुपाय आणि झिजले देवाचे पाय या ओळी फार आवडल्या.
तिरुपती, सिद्धीविनायक इ. 'श्रीमंत' देवालये आठवली :)
(देवभोळा)बेसनलाडू

उमेश कोठीकर's picture

28 Apr 2009 - 11:59 pm | उमेश कोठीकर

कमालीची सुंदर कविता. शब्दसामर्थ्य, लालित्य, रचना सगळेच कमालीचे.

धनंजय's picture

29 Apr 2009 - 12:59 am | धनंजय

आठवली. उत्तम कल्पना आणि शब्दांकन. ध्रुवपदाचे यमक प्रत्येक कडव्यात जोडणे, ही तुमची खासियत आहे.

एक शंका : "अश्वत्थ स्तब्ध झाला" या प्रतिमेचा त्या कडव्यात काय संदर्भ लावायचा? (चंद्रभागा, इंद्रायणी या वाहाण्यात त्यांचे सौंदर्य आणि मांगल्य आहे. त्या आटल्या गोठल्या जीव कसानुसा होतो. पण अश्वत्थ/पिंपळ पुष्कळदा स्तब्ध असूनही शांत-मंगल भासतो, इतकेच काय, रात्री सळसळला तर भीतिदायक वाटतो. त्यामुळे "मांगल्य संपले" विचारचक्रात या स्तब्ध अश्वत्थाचा मला संदर्भ लागत नाही.)

**उगीच मल्लिनाथी - शेवटचे कडवे फारच "कविता समजली नाही त्याला समजावून देणारे" वाटले. "झिजले देवाचे पाय" या शब्दांनी कवितेचा विषण्ण शेवट होऊ दिला असता तरी ही कविता (माझ्यासाठी) खूपच प्रभावी ठरली असती. शेवटची "कधी देव, कधी दैव" ही नवी आणि उत्तम कल्पना आहे, पण ती येण्यासाठी "गहाण त्याग", "लालची स्वार्थ" वगैरे बाळबोध स्पष्टीकरणे देणे टाळले असते, तर बरे झाले असते. ध्रुवपदाचाच असा कल्पक उपयोग शेवटचे कडवे म्हणून केलेला तुम्हाला चालेल काय -
श्रद्धा, भक्ती, आत्मीयता, विश्वासाचा अर्थ काय?
कधी देव, कधी दैव, सारे थकले उपाय!
जिथे माथा टेकवावा, तिथे मातीचेच पाय!**

कविता आवडली

मंदिराची शोभा न्यारी, मूर्ती मात्र भंगलेली
वैभवाची ऐट हंड्या-झुंबरात टांगलेली
देवाच्याच दारी होई देवाचाच निरुपाय ....सुंदर !

शितल's picture

29 Apr 2009 - 7:53 am | शितल

सहमत. :)

क्रान्ति's picture

30 Apr 2009 - 9:50 am | क्रान्ति

प्रतिसादाबद्दल सग्ळ्या मित्रमंडळीचे धन्यवाद. मिपामुळे खूप काही नवीन शिकायला मिळते. मी या कवितेत धनंजयजी यांच्या सुचवण्यावरून छोटासा बदल [ अश्वत्थाच्या संदर्भात] केला आहे. असे मोलाचे मार्गदर्शन मिळाले की खूप हुरूप येतो. पुनश्च धन्यवाद.
:) क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

यन्ना _रास्कला's picture

30 Apr 2009 - 9:54 am | यन्ना _रास्कला

मांगल्याची, पावित्र्याची चंद्रभागा का आटली?

कलियूग हाये असच होनार.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

जागु's picture

30 Apr 2009 - 11:12 am | जागु

जिथे माथा टेकवावा, तिथे मातीचेच पाय!

खुप छान.