नमस्ते चायना !! - (२)

अनिल हटेला's picture
अनिल हटेला in जनातलं, मनातलं
15 Apr 2009 - 7:02 pm

नमस्ते चायना !! -(१)

आणी घोडं गंगेत न्हालं.
एकदाची फ्लाईट डिक्लेयर झाली.आम्ही आसन ग्रहण केलं.दीड तासाने चायनाच्या गाँझौ नामक शहरात आमच आगमण झालं.

भारत आणी चीन मध्ये अडीच तासाचा वेळेचा फरक आहे.म्हणजे सुर्य अडीच तास आधी चीनमध्ये उगवतो.त्या हिशोबाने माझ्या घड्याळात ८.०० झालेले.विमान एअरपोर्टा पासुन दुरवर उभे केलेले.एक बस येउन थांबली,सारे प्रवासी त्या बस मध्ये आले.बसायला जास्त जागा नव्हतीच.पाचच मिनिटात सुसाट वेगाने एअरपोर्टात आणुन सोडले.आता परत एकदा इमीग्रेशन!!!आजुबाजुची लोक आमच्याकडे उगाच बघत होती.एकही प्रश्न न विचारता पासपोर्टावर चॉप मारला गेला.सामानाच्या बॅगा कुठे येतात ते शोधलं.निघणारच इतक्यात पोलीसाने हटकलं.म्हणे पून्हा स्कॅन मशीनमध्ये टाका तुमच्या बॅगा.
अडला हरी !!!

दरवाज्यापाशीच एक भारतीय उभा होता.आल्या-आल्या हात मिळवत "मिस्टर अनिल?" असं विचारलं.
आयला आपण कधी मिस्टर झालो हा विचार करत मी हो म्हणालो.जीतु ने देखील हात मिळवत स्वतःची ओळख करुन दिली.आम्हालाच रीसीव्ह करायला आलेला तो.
बाहेर आलो.INFORMATION असं लिहीलेल्या काउंटरवर जाउन त्याने शेनझेन ला जाण्यासाठी बस आहे का वगैरे चौकशी करत होता.आम्ही उगाच इकडे तीकडे बघत होतो.एअरपोर्टाच्या बाहेर टॅक्सीच्या ४ रांगा लागलेल्या.एका मिनीटाच्या वर एक टॅक्सी तीथे थांबत नव्हती.आम्ही सुद्धा एका टॅक्सीत बसलो.रीसीव्ह करायला आलेला (अमित त्याच नाव) चायनीज मध्ये झाला ना सुरु!! आम्ही त्या दोघाचा संवाद कानात साठवायचा प्रयत्न करत होतो.पण एक शब्द समजेल तर शपथ !!

जाण्यासाठी रेल्वे (मेट्रो) उपलब्ध नव्हती.शेवटची एकच बस ती रात्री ११.३० ला होती.आता कोण कुठले वगैरे साधक बाधक चर्चा होउ लागली.सारेच अमराठी असल्याने हिंदीशिवाय अर्थातच पर्याय नव्हता ,नाहीये
( सध्या माझ्या कलीगला मी मराठी शिकवतोये,आणी काही शब्द तो शिकलाये सुद्धा ;-) )
"आप तो बहुत अच्छी चायनीज बात कर लेते हो,यार !"-इती मी.
"आरे नही! अभी एक साल हुआ है,बस काम चल जाता है! कल ऑफीस मे पहुचके देखना असलमे हमारे सीनीयर्स ,बॉस क्या चायनीज बात करते है !"

बस स्टेशनावर पोचलो.अजुन तासभर वेळ होता.भूक तर लागलेली.
"कुछ खाओगे.चायनीज रेस्टॉरेंट्स रात भर खुले मिलेंगे !"-अमित.

इतक्यात चायनीज खायची हिंमत नव्हती आम्हा दोघातही.नको म्हटलं.तो बिस्कीट्स आणी कोल्ड्ड्रींक्स घेउन आला.कोकच्या बाटलीवर फक्त आकडेच हींग्लीष मध्ये होते.बाटलीला (कोकच्या) सार्‍या बाजुने पाह्यलं पण काहीही समजलं नाही.बिस्कीटा बद्दल तर काय सांगावे महाराजा.पालक घालून बनवलेली बिस्कीटं होती ती (हे सुद्धा नंतर समजलं) गोड ना धोड.नेमकी चव समजायला देखील मार्ग नव्हता.झक मारत चार तुकडे पोटात घातले.थोड्या वेळात बस साठी लोकं यायला सुरुवात झाली.आणी पहील्यांदा चायनीज लोकाना निरखुन पाहु लागलो.
अगदीच सडपातळ अंगकाठी(मराठीत स्लीम हो!).
गोरा रंग.थोडीशी चपटी नाकं.आणी इवलेशे डोळे. केसावर काय म्हणुन अत्याचार करतात कुणास ठाउक!पुरूष लोक एकतर खुप बारीक (मिलीट्री कट) किंवा फारच मोठे.स्त्रीयांची केश रचना म्हणजे संशोधनाचा विषय होइल! ( आणी ह्याला फॅशन असं म्हणतात) कपडे म्हणाल तर साधारणपणे जीन्स टी-शर्ट आणी जॅकेट(मुलगा-मुलगी दोघानाही).स्त्री आणी पुऋष असं ओळखण बर्‍याचदा अवघड जातं.
त्यांची नूडल्स खाण्याची स्टाईल बघुन आपल्याला बाप जन्मात असं खाणं जमणार नाही ह्याची खात्री पटली.अगदीच नवल आणी कुतुहल भरल्या नजरेने सर्वाना बघत होतो.
अमित गालात हसत आमची गंमत बघत होता.अनाउन्समेंट झाली.आम्ही बशीत जाउन बसलो.एक चीनी मुलगी आली.आणी सर्व प्रवाशाना संकट समयी काय करायचं वगैरे प्रात्याक्षीक सांगुन गेली.आम्हाला एक अक्षरही समजलं नाही,पण रात्री ११.३० ला सुद्धा ही ऑनड्युटी आहे,ह्याचं नवल वाटलं.

साधारण दोन तासानी शेनझेन मध्ये पोचलो तीथुन पंधरा मिनिटाच्या अंतरावरच कंपनीचा फ्लॅट होता.गेलो आणी सरळ ताणुन दिली.

खरी सत्त्व परीक्षा तर आता चालू झालेली.
तयार वगैरे होउन ऑफीसात जायला निघालो.२३ व्या माळ्यावरुन लिफ्ट मधुन खाली येताना सहज विचारलं की जर वीज (ईलेक्ट्रीसीटी) नसेल तर तेवीस माळे पायी चढणे-उतरणे म्हणजे शिक्षाच आहे नाही? अमित हसुन म्हणाला की ,वर्ष झालंये इथे एकदाही लाइट गेलेली नाही!

शेनझेन हे चायनातलं चौथ्या क्रमांकाचं शहर आहे(चु भु द्या घ्या)आपल्याकडे जशी स्टेट्स(राज्य) ही संकल्पना आहे तसे इकडे प्रोव्हीयन्स(प्रांत्)रचना आहे.गॉनदाँग प्रांतातले (द.चायना) प्रगत असे शहर आहे.हाँगकाँगचे प्रवेशद्वार म्हटलं तरी चालेल.त्यामुळेच बर्‍यापैकी इथली लोक हींग्लीष बोलू शकतात.स्वच्छ,सुंदर आणी थोडसं महागड असं शेनझेन.जरा जास्तच फास्ट आहे.वेगाच्या बाबतीत मुंबईशी नातं सांगणारं.

सिटी बस साठी स्टॉपवर आलो.आजुबाहुला सारे चीने होते.कुणी वर्तमानपत्रात बीजी,कुणी फोनवर! बस आली,दरवाजा उघडला,आत मध्ये प्रवेशलो.फक्त ड्रायव्हर!! कंडक्टर नावाचा प्राणी सिटी बस मध्ये नव्हता(नसतो).स्वतःच बसकार्ड मशीनवर लावायचं.किंवा कमाल तीकीटाची रक्कम (१ किंवा २ डॉलर) ड्रायव्हरशेजारच्या डब्यात टाकायचे.आतमध्ये प्रवेशताच सगळी मंडळी आपाद मस्तक न्याहाळू लागली.अमित सरावलेला असल्याने त्याने दुर्लक्ष केलं,आम्ही दोघं मात्र अंग चोरुन उभे.समोर टीव्ही स्क्रीनवर बातम्या चालू होत्या(अर्थात चायनीजमध्ये).प्रत्येक येणार्‍या स्टॉपची माहिती देण्यात येत होती.बस सुद्धा एकदम कट टू कट!

ईच्छीत स्टॉप आला अमितच्या मागे आम्ही दोघे बावरल्यासारखे चालत होतो.३०-३५ माळ्याची एक-एक बिल्डींग!! काय बघु आणी किती बघु,असं होत होतं!आमचं ऑफीस २१ व्या माळ्यावर होतं.आलिशान सहा लिफ्टस.पहिल्यांदाच असं काही बघत होतो.ऑफीसात प्रवेश केला.खरच ऑफीस म्हणावं तर ह्याला.मोठ्ठं,ऐसपैस अजुन तीघे भारतीय आणी चार चीनी अशी स्टाफ रचना होती.बॉसच्या केबीन मध्ये प्रवेशलो.थ्री पीस मध्ये बांधल्यासारखा वाटत होता बॉस.

'चायनात काम करायचये तर चायनीज शिकावी लागेल वगैरे माहिती त्याने दिली.पासपोर्ट हीच एकमेव तुमची ओळख आहे आणी पासपोर्टाला व्यवस्थीत जपा,काळजी घ्या वगैरे मौखीक ऐकवले.सध्या तुमचा व्हीजा अपग्रेड करायला आणी बाकी फॉर्मॅलीटीज व्हायला १० दिवस जातील तोपर्यंत काय काम करायचये,कशा पद्धतीने करायचये,ते शिकुन घ्या.घरचा पत्ता,ऑफीसचा पत्ता (चायनीज मध्ये),सर्व कलीग आणी बॉसचे नंबर सुद्धा लिहुन ठेवा' वगैरे सांगीतले.बॉसचं प्रवचन संपल्यानंतर बाहेर आलो
सार्‍याशी ओळखी करुन घेतल्या.चायनीज कलीग कडून चायनीज मध्ये घरचा पत्ता,ऑफीसचा पत्ता लिहुन घेतला.नंतर जेनी (हींगलीष नाव्)बरोबर जाउन पोलीसस्टेशनात तंची (रजीस्ट्रेशन) करवुन घेतलं.ऑफीसमध्येच शोरूम बनवलेली.वेगवेगळे मॉडेल्,प्रॉडक्ट आणी त्याबद्दलची माहिती सीनीयर्स कडून घेत बसलो.
नी हाव- नमस्ते( हाय हॅलो ह्या अर्थी),
शी शी नी- धन्यवाद (थँक यु ) ईथुन ते एक- ई ,दोन- अर,तीन-सान्,चार-स अशा पद्धतीने चायनीज शिकण्याचं शिवधनुष्य पेलण्यासाठी सज्ज होउ लागलो ( अजुनही शिकतोच आहे).

साधारण महिनाभर शेनझेन मध्ये होतो.एक फॉरीनर म्हणुन प्रत्येक ठिकाणी थोडीशी स्पेशलच ट्रीटमेंट मिळाली.इतकच काय पोलिस स्टेशनापासुन ते साध्या रेस्टॉरंट पर्यंत सगळेश खास पाहुण्या सारखी सरबराई करायचे.कलीग सोबत असल्याने काळजी नसायचीच.येता-जाता हजारो-लाखो प्रश्न विचारुन अक्षरशः हैराण करुन सोडलेलं सर्वाना.रस्त्यांची ,एरीयाची नावं लक्ष्यात ठेवण म्हणजे तर फार मोठी शिक्षा.अशातच एखाद्या फॅक्टरीत जायचं म्हटलं तर थोडीशी धड -धड वाढायची.

एखाद्या लहान मुलाला आई किंवा बाबाचा भर बाजारात हात सुटेल म्हणुन जी भीती असते तीतकीच भीती मला सुद्धा असायची.कारण एक तर तसा पुण्यात कितीही वाघ असलो तरी इकडे आल्या पासुन मी बुजलो होतो.का कुणस ठाउक पण ह्या वातावरणात मिसळता येइन की नाही मला शंका यायला लागलेली.इतकच काय आधीच आपला प्युअर कलर ,आणी आपण इतरापेक्षा वेगळे आहोत्,कुठे तरी काहीतरी आपल्यात कमी आहे ,अशी एक न्युनगंडाची भावना डोके वर काढु लागलेली.नाही म्हणता जीतु समदु:खी होता.पण त्यालाही यीवु ऑफीसमध्ये शिफ्ट करायचं ठरलं.(पूर्व चायना.चेच्यांग प्रांत)

पुण्यात असताना फक्त उपासाच्या दिवशी किंवा काहीतरी अडचण असली तरच देवा समोर हात जोडले जायचे ,पन इकडे आल्या पासुन सकाळी देवपूजा झाल्या शिवाय घरातुन बाहेर पाय निघत नाही.

शेनझेन मध्येच पहील्यांदा चायनीज चाखायची संधी आली.
चायनीज ह्या शब्दानेच विचीत्र खाद्य अशी संकल्पना माझीही होती.पण हळूहळू खायची सवय झाल्यावर आणी जस-जसा लोकाशी संवाद वाढला तस तसा मला ह्यातला फोलपणा जाणवु लागाला.
कोणे एके काळी अतीशय प्रतीकुल वातावरणामुळे भाज्या-फळे ई.चे उत्पादन कमी व्हायचे,आणी त्यातच लोकसंख्या अफाट.अशातच गरीब देश.त्यावेळी भाज्या फळे यापेक्षा मांस,समुद्र आणी गोड्या पाण्यात उपलब्ध जलचरावर गुजराण करणे क्रमप्राप्त ठरलेले.कालांतराने फरक पडत गेला.पण आजही जनमाणसाच्या मनात चीने अगदी काहीही खाउ शकतात असा पक्का समज आहे.स्वतः मी बर्‍याचशा उपहारगॄहा मध्ये खेकडे ,झींगे,कासव,साप इ. आणी कधी आयुष्यात न पाहीलेले जलचर पाहीलेत.(ते सुद्धा अगदी जिवंत्)आता इतके सजवुन ठेवलेत तर काय शो पीस तर अर्थातच नसणार.धुर आहे तीथे आग असायची शक्यता जास्तच.बर्‍याचदा मी चीन्याना 'हे खातात कसं?' असं विचारल्यावर आंबट झालेला चेहेरा सुद्धा पाह्यलाये.त्यावर 'सारेच नाही खात,काही विशिष्ट लोकच हे खाउ शकतात असं गुळगुळीत उत्तर दिलये.

तैवान मध्ये एक मित्र कंपनीच्या कामा साठी गेलेला.त्याने अगदी स्वतःच्या डोळ्या देखत एक खास प्रजातीचा साप मारताना आणी त्याचं रक्त पीताना तैवानीज ला पाह्यलये.तो साप अर्थातच विषारी नव्हता,शिवाय तसं केल्याने पूर्ण सीजन थंडी वाजत नाही असा त्या लोकाचा दावा आहे.त्या विशिष्ट प्रजातीच्या सापाची किंमतही महागडी असल्याचं त्याच्या कडुनच कळालं.

तर महीनाभरच वास्तव्यास असलेल्या ह्या शहराच्या स्वच्छतेवर, सौंदर्यावर्,तीथल्या हाय-फाय लाईफ स्टाईल ने भल्या-भल्याना वेड लावलं.माझे तीथले सीनीयर्स आणी कलीग्स तर चायनात राहीन तर शेनझेन मध्ये नाहीतर ,बॅक टू इंडीया,इतपत ठार वेडे झालेले.पण अशा ह्या शहराच्या झगमगाटाने मी नेहेमीच दुरावलेला होतो.मला कधीच हे शहर आपलंसं वाटलं नाही.
इकडे बीजींग ऑलींपीकची जोरात तयारी चाललेली. चायनाने त्यांची वीजा पॉलीसी फारच स्ट्रीक केली.१० दिवसात होणारं माझं काम आज -उद्या करत -करत अखेरीस झालंच नाही.सरते शेवटी मला हाँगकॉंगला हेड-ऑफीस मध्ये ट्रान्सफर करण्याचा प्लॅन झाला.पण कस्टम मध्येच मला अडवलं.अडीच तास अट्टल गुन्हेगाराला जसं एखाद्या रूम मध्ये बसवुन कसून चौकशी केली जाते,तशीच माझी उलटतपासणी झाली.अगदी जेनुईन रीजन, ऑफीशीयल कागदपत्रे असताना देखील मला ईंट्री नाय देणार असं सांगण्यात आलं.
"मे आय नो सर्,व्हाय यु नॉट गीव्हींग मी ईंट्री ?" असं विचारताच पिसाळून जनावरा सारखा वस्सकन ओरडलेला तो कस्टम अधिकारी मी आजन्म विसरणार नाही.तेव्हा एक गोष्ट शिकलो दुनिया इकडची तीकडे झाली तरी चालेल पोलीस्,कस्टम ह्या लोका सोबत हुज्जत घालायची नाही.

दुसर्‍या दिवशी माझा वीजा संपत होता अशा वेळी बॉसने शेवटचा आणी रामबाण उपाय योजला.मला मकाउ ला पाठवण्याचा!! दुसरा एक सीनीयर हा सुद्धा जीतु (मूळ नाव भोजराज! ;-))आणी मी शेनझेन पोर्टावरुन मकाउ ला जाणार्‍या मीनी बोटीत बसलो.डोक्याची तर अक्षरशः मंडई झालेली.शेनझेन ते मकाउ साधारण पाउन तास लागतो.

मकाउ...
चायनाचाच एक हिस्सा.हाँगकाँग जसं ब्रीटीशानी भरभराटीला आणलं ,तसंच मकाउ वर पोर्तुगीजांचं राज्य होतं.आत्ताही मकाउ स्वतंत्रच ठेवलये.(रीमोट चायनाच्या हाती,बाकी सारा प्रपंच आधीसारखाच स्वतंत्र) चायनीज आणी पोर्तुगीज भाषा बोलल्या जातात.हे सुद्धा फ्री पोर्ट.कसीनो,बार ईत्यादीने सुसज्ज असलेलं.जुगाराचा आणी पीण्या खाण्याचं मोठया धेंड्याचं हक्कचं ठीकाण.रात्र भर ह्या शहराला झोप येत नाही.रात्रीची वेळ मकाउचं पहीलं दर्शन म्हणजे बोटीतुनच जीतुच्या कॅमेर्‍यात टीपलेले झगमगाटीत रुपडं.
आलो....

ईमीग्रेशन मध्ये मौजमजा करायला चाललोये असं सांगीतले.तीथल्या तीथेच महीन्या भराची मकाउ व्हीजा मिळाली.हॉटेल बूक केली.आणी निघालो मकाउ दर्शनाला.सोबत एकदम ईस्पीकचा एक्का असल्याने जास्त काळजी नव्हतीच.१४ माळ्याचा कसीनो पाहुन आधी भंबेरी उडाली.आत जावं की जाउ नये.कलीगने सांगीतलं की इकडं सगळं ऑफीशीयल आहे,इच्छा नसेल तर परत चलू.पण म्हटलं पून्हा आयुष्यात असा मौका थोडीच मिळणार आहे.गेलो.

जुगाराचे विविध प्रकार.भली मोठी टेबल्स,आणी प्रत्येक टेबलावर चालणारा सट्टा.हातात मद्याचे चषक घेउन गँबलींग करणारी लोकं. सारं फक्त सीनेमातच पाह्यलेलं.आज प्रत्य्क्षात पाहात होतो.
एकेका फ्लोरवर भटकून आलो.एका ठीकाणी समोर स्टेज बनवलेला आणी थोड्याच वेळात मंद संगीताच्या तालावर नाचणार्‍या मदनीका पाहुन आपण नेमकं कुठे आलो आहोत्,आणी हे सारं काय चाललये समजेनासं झालं.पाच दिवस होतो पण परत तीकडे पावले वळाली नाहीत.तीथेच एका सिंगापूरच्या रेस्टॉरेंट वाल्याशी मैत्री झाली.मुळात मुस्लीम असणारा मालक पण पदार्थ भारताशी जवळीक सांगणारे.एका अफ्रीकन सायबर कॅफेवाल्याशी ओळख आणी नंतर दोस्ती.तीथेच अजुनही अफ्रीकन मित्र झाले.दिवसभर टवाळक्या करणे,गप्पा मारणे ह्यात पाच दिवस भुर्रकन उडून गेले...

मकाउ मधुनच चायना व्हीजा ऍप्लाय केला.ऑलींपीक्स मुळे मोजुन सात दिवसाचा मिळाला.'मूळ देशात जाउन तीथुनच सारे अर्ज करा म्हणजे सोपं होइन, असं सांगण्यात आलं..

इकडे माझ्या बॉसने माझी फुल सेटींग करुन ठेवलेली.
शेनझेन मध्ये परतताच मला बिमानाचं तीकीट देण्यात आलं.माझी रवानगी आता दुसर्‍या शहरात होणार होती.

ते शहर जीथं मी अशा रीतीने जगलो की वाटलं की ह्यालाच जीवन ऐसे नाव !!

क्रमशः

समाजजीवनमानतंत्रराहणीअनुभव

प्रतिक्रिया

स्वाती दिनेश's picture

15 Apr 2009 - 7:14 pm | स्वाती दिनेश

हा भागही आवडला, छान लिहित आहेस,
क्रमशः ला फार वेळ लावू नकोस.
स्वाती

मराठमोळा's picture

15 Apr 2009 - 7:25 pm | मराठमोळा

हा पण भाग मस्त झालाय अनिलभौ,
थोडे फोटो दाखवा ना..

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

सूर्य's picture

15 Apr 2009 - 7:25 pm | सूर्य

अनिलजी, हा भाग सुद्धा आवडला. पुढील भाग लवकर येउद्यात.

(अवांतर : फोटो असते तर अजुन मजा आली असती. कसिनोचे फोटो वगैरे आहेत का ;) )

-सूर्य.

शितल's picture

15 Apr 2009 - 7:36 pm | शितल

सुंदर..
हा भाग ही मस्त जमला आहे. :)

प्राजु's picture

15 Apr 2009 - 8:04 pm | प्राजु

अतिशय रोचक अनुभव आहेत. खूपच छान.
लवकर लिही पुढचे भाग.
क्रमशः ज्या लोकांचं मनापासून आवडतं.. त्यात तुझ्या नावाची आज भर पडली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

भाग्यश्री's picture

15 Apr 2009 - 9:52 pm | भाग्यश्री

सहमत!!
मला ना युएस सोडुन दुसर्‍या विषयावर लिहीणार्‍या लोकांचे वाचायला फार आवडते!
किती वेगळं काय काय कळतं.. तुझी ही मालिका, टारझनची आफ्रीका, स्वातीताईचे जपान!
लिहीत रहा! फोटोही टाक..

संदीप चित्रे's picture

16 Apr 2009 - 10:54 pm | संदीप चित्रे

हे विनय देसाईचं पुस्तक लिहिलंय्.
वाचून वेडीच होशील अशा देशांबद्दल लिहिलंय.

भाग्यश्री's picture

17 Apr 2009 - 10:39 pm | भाग्यश्री

परदेसाई माहीतीय रे.. :)
देसाई त्यांच्या रंगीबेरंगी पानावर लिहायचे तेव्हापासून वाचतेय! पुढे मागे विकत घेणारे..

www.bhagyashree.co.cc

रेवती's picture

15 Apr 2009 - 8:15 pm | रेवती

लेखनशैली छानच आहे.
आता पुढचा भाग लवकर लिही बाबा!

रेवती

मदनबाण's picture

15 Apr 2009 - 9:24 pm | मदनबाण

स्वतः मी बर्‍याचशा उपहारगॄहा मध्ये खेकडे ,झींगे,कासव,साप इ. आणी कधी आयुष्यात न पाहीलेले जलचर पाहीलेत.(ते सुद्धा अगदी जिवंत्)आता इतके सजवुन ठेवलेत तर काय शो पीस तर अर्थातच नसणार.
हा.हा.हा माझ्या मित्रान मला असाच एक किस्सा सांगितला होता त्यात उपहार गृहात डीश म्हणुन जिवंत माकड सजवले होते म्हणे...तेव्हा खात्री पटली नव्हती पण आता हे वाचुन पटली !!!

अन्या लिव बाबा लवकर लवकर पुढचे भाग...लयं येळ लावतोस बघं

(情人男孩)
मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

अवलिया's picture

15 Apr 2009 - 9:32 pm | अवलिया

मस्त रे अनिल :)
तेवढा फोटोंचा जुगाड जमव बाबा :)

--अवलिया

परिकथेतील राजकुमार's picture

16 Apr 2009 - 11:14 am | परिकथेतील राजकुमार

असेच म्हणतो अनिलभौ !
लिखाणाची शैली अप्रतिमच. पहिल्या भागचा 'फ्लो' व्यवस्थीत मेंटेन केला आहे.
पु भा प्र

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

मीनल's picture

16 Apr 2009 - 5:33 am | मीनल

फोटो टाक तिथले.
चीन म्हणजे काय हे तिथे न जाऊनही कळेल सर्वांना.
म्हणावे ते आश्चर्य. हो की नाही अनिल?

चीन मधे मिळणा-या लहान मुलांच्या पँट्चा पण टाक. म्हणजे तशी पँट घातलेल्या बाळाचा.
वाचकहो, अगदी खासच असते हं. =))
मी सांगू नाही शकत. पाहिलीच पाहिजे.

मीनल.

अनिल हटेला's picture

16 Apr 2009 - 6:13 am | अनिल हटेला

>>>क्रमशः ला फार वेळ लावू नकोस.
--> सध्या काम सुद्धा चालू आहे ,वेळ मिळेल तसा टंकतोच आहे...:-)

>>>क्रमशः ज्या लोकांचं मनापासून आवडतं.. त्यात तुझ्या नावाची आज भर पडली.
>>>लेखनशैली छानच आहे.
>>>लिहीत रहा!
>>>मस्त रे,मस्त जमला आहे.आवडला

--> चार-पाच तास बर्‍याचदा व्यत्यय येउन देखील्,अगदी वैताग आलेला असताना टंकण्याचे श्रम घेतलेले.आता वाटतय सत्कारणी लागलेत.मनापासुन धन्यवाद.... :-)

>>>तेव्हा खात्री पटली नव्हती पण आता हे वाचुन पटली !!!
-->अजुनही अशा काही गोष्टी आहेत ( खाण्या-पीण्याच्या )की सांगेल ते नवल अशी गंमत होइल.. ;-)

>>>फोटो,फोटो फोटो........
-->आता झोल करावाच लागणार ..... ;-)

>>>चीन मधे मिळणा-या लहान मुलांच्या पँट्चा पण टाक. म्हणजे तशी पँट घातलेल्या बाळाचा.
वाचकहो, अगदी खासच असते हं.
मी सांगू नाही शकत. पाहिलीच पाहिजे.
-->> मीनलताई नेमका तोच विचार मनात होता,आणी तुम्ही बोलून देखील दाखवलात..:-D =))

(भारतीय बैल चायनात)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

घाशीराम कोतवाल १.२'s picture

29 May 2009 - 1:40 pm | घाशीराम कोतवाल १.२

चार-पाच तास बर्‍याचदा व्यत्यय येउन देखील्,अगदी वैताग आलेला असताना टंकण्याचे श्रम घेतलेले.आता वाटतय सत्कारणी लागलेत.मनापासुन धन्यवाद....

अन्या भाय टंकल्याबद्दल धन्यवाद
आणि हो फोटो टाक बाबा मग जरा मजा येते
आणि एक माझि पन सेटिंग लावतो का चायनाला
बघ बाबा ;) ;)

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

वर्षा's picture

16 Apr 2009 - 8:28 pm | वर्षा

सुंदर! एकेक गोष्टी डीटेलमध्ये छान लिहिल्यात. परदेशात कितीतरी छोट्यामोठ्या गोष्टी मन टिपकागदासारखं शोषून घेतं. त्या सर्व न विसरता सुसंगतीत मांडणं सगळ्यांनाच जमत नाही. डोळ्यासमोर चित्र उभं करणं कठीण असतं.
पुढचा भाग प्लीज लवकर टाका.
चीनबद्दल लिहिलेलं दुर्मिळच!

संदीप चित्रे's picture

16 Apr 2009 - 10:56 pm | संदीप चित्रे

पुढचं लवकर टाक...

सुधीर कांदळकर's picture

17 Apr 2009 - 5:47 pm | सुधीर कांदळकर

छानच आहे.

सुधीर कांदळकर.

सूहास's picture

17 Apr 2009 - 6:18 pm | सूहास (not verified)

सुहास
मतदान करा रे ,परत पाच वरिष चान्स नाय भेटायचा..

अनामिक's picture

17 Apr 2009 - 10:30 pm | अनामिक

सह्ही झालाय हा भागपण.... पुढचा भाग लवकर येऊ देत...

-अनामिक