शीत गोडाऊन..

प्राजु's picture
प्राजु in जनातलं, मनातलं
14 Apr 2009 - 11:37 pm

काय!!!! समजलं नाही ना, नक्की काय नाव आहे लेखाचं??
सांगते.
मित्रहो,
बर्‍याच वर्षांपूर्वी, म्हणजे साधारण ३० एक वर्षापूर्वी, दूध नासण्याचे प्रकार फार होत होते. मग गृहीणी, बाया-बापड्या, नोकरदार स्त्रीया दूधाचं विरझण लावायच्या आणि मग नंतर त्याचं ताक, लोणी शेवटी तूप. घरात माणसंही भरपूर होती.. आणि डायटींगची ओझी नसल्याने "अरे घे रे भरपूर तूप" असं सर्वसाधारण प्रकृतीच्या माणसाला आग्रहाने सांगितलं जायचं. केवळ दूधाचंच नव्हे.. तर भाज्या, फळे, आमटी.. तोंडीलावणी. या सगळ्याचीच सांगता कामवालीला देऊन, नाहीतर थलीपीठात बेमालूम पणे घालून नवा पदार्थ बनवण्यात व्हायची. .. ताक जास्त असेल तर परसातल्या कढिलिंबाला मिळायचं. एकूण काय.. तर घरातला पदार्थ खराब होऊ नये.. आणि झालाच तर बागेला खत.. अशी एकूण परिस्थिती होती. सगळीच खुश होती. घरातली माणसं, बागेतली झाडं, कामवाल्या ...

पण अचानक माणसाच्या भुक्कड डोक्यातून एक कल्पना बाहेर आली आणि बघता बघता रेफ्रिजरेटर नावाचा बर्फाळ प्रकार घरात आला. तो आला काय... आणि सगळीकडे हाहा:कार उडाला. मोठमोठ्या जाहीराती... व्होल्टास काय, बिपिएल काय.. ऑल्विन काय!! बघता बघता सगळीकडे फ्रिज फ्रीज फ्रीज!!! मग त्यात नवे नवे मॉडेल्स.. मोठ्ठा.. लहान.. डबल डोर... सिंगल डोर! त्यातही मग.. दूध ठेवण्यासाठी वेगळी जागा, बर्फासाठी ३-४ ट्रे.. अंड्यांसाठी वेगळी जागा.. भाजीसाठी त्यात सुद्धा फळ भाज्यांसाठी वेगळा कप्पा स्लायडिंगवाला, बाकी भाज्यांसाठी वेगळा कप्पा... एकूण काय कप्पेच कप्पे! शीत जगातील क्रांती(मिपाकर क्रांती नव्हे)! बायकांचे खास करून नोकरदार स्त्रियांची उत्तम सोय झाली. तो त्यांचा सखा सोबती बनला. आदल्या दिवशी कणिक मळून ठेवणे. भाजी चिरून ठेवणे. चटण्या करून ठेवणे. रवा, मैदा अशा प्रकारात नेमक्या आळ्या-किडे होतात .. तेव्हा या कोरड्या पदार्थांचीही फ्रीज मध्ये वर्णी लागली. इतकेच नव्हे.. तर ज्यांच्या घरी रोजच्या रोज जेवणात दही लागते त्या ४-५ दिवसांचे दही लावू लागल्या. दूध नासण्याचं प्रमाण कमी झालं. आईस्क्रिम्स घरी करता येऊ लागली. त्यात चायना ग्रास, जेलिज यासारख्या पदार्थांना मागणी येऊ लागली. उन्हाळ्यांत वापरण्या आधी माठाला पोटमाळ्यावरून काढून, धुऊन .. एक दिवस उन दाखवण्याचा त्रास कमी झाला. बर्फाचं आकर्षण खूप होतं तेव्हा. लिंबू सरबतात, कोकमच्या सरबतात, अलगद उसळणारा तो बर्फाचा चौकोन पिण्या आधीच मनाला उल्हासीत करू लागला. तर अशा या फ्रिजने केव्हा घरं आणि मनं काबीज केली हे त्याला स्वतःलाही समजलं नसावं. आणि बघता बघता तो घरातलाच एक होऊन गेला. घरात एखादं माणूस कमी असलं तरी चालेल.. पण फ्रीज नाही!!!!!!!! छे!! काहीतरीच!!!

आमच्या घरी फ्रीज आला तो मी ५ वर्षाची असताना. .. आणि आला तो पिस्ता रंगाचा व्होल्टास चा. त्यावेळी खरंच त्याचं इतकं आकर्षण होतं..मी थाटात सगळ्या मैत्रीणींना जाऊन सांगून आले होते. दूध, दही, फळं.. बर्‍याच गोष्टी मग त्यात विसावू लागल्या. हळूहळू त्यातली नवलाई संपली. कोपर्‍याकोपर्‍यावर दिसणार्‍या टेलिफोन बूथ प्रमाणे घरोघरी फ्रीज दिसू लागले. टिव्ही वर जाहीराती बघून नवा फ्रीज घेण्यासाठी आधीचे फ्रीज विकले जाऊ लागले. आणि यातूनच कामवाल्यांच्या, वॉचमन , माळी.. अशा लोकांच्या घरातूनही फ्रीज दिसू लागले. त्यातलं नाविन्य कमी होऊन, तो फ्रीज अन्न साठवण्याचं साधन कधी बनला समजलंही नाही. पूर्वी धान्याच्या कणग्या असयाच्या तसं आता शिजवलेल्या अन्नाच्या शीत कणग्या झाल्या. भारतात इतक्या प्रकारचे फ्रीज पाहून झाल्यावर जेव्हा अमेरिकेतली शीत अलमारी/तिजोरी पाहिली तेव्हा तोंडात बोटं.. आपलं ...बर्फ घालायचा बाकी होता फक्त! काय तो दांडगा फ्रीज!!

मित्रहो, फ्रीज अमेरिकेतला असो.. की भारतातला.. त्याचा भारतीय पद्धतीचा वापर मात्र गृहीणिंनी अगदी पुरेपूर केला. दूध, दही, वाडग्यात काढलेली भाजी, आमटी, सरबते...
फ्रीज जितका मोठा, तितकी जास्त जागा, तितके जास्त कप्पे आणि मग तितके जास्त वाडगे. घरातली माणसांची संख्या जशी कमी झाली.. त्रिकोणी-चौकोनी कुटुंबाच्या आवडी षटकोनी, सप्तकोनी झाल्या. त्यातच भारतीय असे निगुतीने करण्याचे पदार्थ चितळें सारख्या गोड लोकांनी फ्रीज करून देण्यास सुरूवात केली. मग काय, त्या फ्रीज च्या कप्प्यांमध्ये श्रीखंड आम्रखंड, बासुंदी, रस मलाई, गुलाब जाम यांची भरच पडत गेली. "मी घरी ना नेहमी आम्रखंडाचा डबा ठेवतेच, अचानक आलं कोणी तर गोड काय करायचं असा प्रश्न पडत नाही.." अस्सं अगदी अभिमानने सांगता येऊ लागलं. (बोंबलायला, पुण्यासारख्या गावांत अचानक येण्याचे असे प्रकार किती??, त्यातून जेवायला येण्याच्या शक्यता किती आणि.. आलेल्याला जेवूनच जा चा आग्रह असा तो किती!!!). पण तरीही अभिमान तो अभिमान! ठरवून कोणी आलंच जेवायला तर, "आदले दिवशीच मी गुलाब जाम करून ठेवले होते.. नाहीतर फार हेक्टीक होतं गं" असंही सांगता येऊ लागलं. त्यातच जर, फ्रीज जर महागडा आणि अगदी नविन मॉडेल असेल तर त्यातल्या एका कप्प्यात जेली, पुडिंग.. असं काहीसं करून "डेसर्ट मी घरीच केलंय" असा भावही मारता येऊ लागला. मग जेवायला आलेल्या जोड्या मधली 'ती'.. "अय्या हो... कसं केलंस गं?" असं म्हणायचा आवकाश की, "तुमच्या फ्रीज मध्ये ****** सोय आहे का? " नाहीये... ओह! मग नाही होणार.. त्यासाठी **** ही सोय असावी लागते" असं म्हणत आपला फ्रीज किती कॉस्टली आहे हे ही नमूद करता येऊ लागलं. या फ्रीज चा महिमा तरी कित्ती वर्णावा! काय काय नसतं हो त्यात?? ४-५ दिवसांच्या थोड्या थोड्या राहिलेल्या भाज्या, २-३ प्रकारच्या आमट्या, उकडलेले बटाटे, टॉमॅटो, भाजी, दूध, दही, ताक, (कधी कधी पिवळं पडलेलं) लोणी. कस जाऊ नये म्हणून ठेवलेली पिठं, लिंबाच्या फोडी, चिरलेली कोथिंबीर, मळून ठेवलेली कणिक, (कधी कधी काळी पडलेली) कणिक, उसळी... लेवाड्या पडलेल्या मिरच्या, सुकलेलं आलं... नोकरदार स्त्रीयांसाठी फ्रीज म्हणजे खर्‍या अर्थाने अन्न साठवण्याचं गोदाम असतं. सोमवार ते शुक्रवार वाडग्यांमध्ये भर पडणार आणि विकेंडला म्हणजे शनिवार्-रवीवारी त्या वाडग्यांमधून काही खाण्या लायक असेल तर ठीक नाहीतर सरळ कचरा पेटी दाखवणे. शिळोपा साजरा करणं म्हणजे उरलेल्या अन्नातून थोडंफार वापरणे आणि उरलेलं कामवालीला देणे.. ! तसंही आजकाल शनिवार रवीवार घरात अन्न शिजवणे हा गुन्हाच समजला जातो. त्यामुळे शुक्रवारीच त्या शिळ्याची विल्हेवाट लावणं महत्वाचं असतं. एकूण काय तर फ्रीज हा शीत गोडाऊन असतो असं म्हंटलं तर वावगं ठरू नये.

सगळ्यांत महत्वाचं असतं ते फ्रीज स्वच्छ करणे. कित्येक वेळेला, आमटी भाजी फ्रीज मधून काढताना सांडते, लवंडते.. एखादा थेंब सांडतो.. फ्रीज ज्या दिवसी काढला जातो... त्यावेळी त्याचे प्रत्येक कप्पे स्वच्छ करणे म्हणजे काढून स्वच्छ करणे हे तान्ह्या मुलाला आंघोळ घालण्यासारखे असते. कोमट पाण्याने धुऊन घेणे.. एक्स्पायर झालेले मसाले टाकून देणे, पालेभाज्यांच्या काड्या, पाने सुकून चिकटून बसलेली असतात ती काढून टाकणे, सांडलेले थेंब साबणाच्या पाण्याने पुसून घेणे. फ्रीजचं दार लख्ख करणे.. की मग व्वा!! आपल्याच कामावर खुश! नेमकं हे काम शुक्रवारी करायचं म्हणजे (हुश्श दमले बाई!!म्हणत) रात्रिचे जेवण बाहेर करण्याची नांदी आधीच घरच्यांना देता येते. पुढचे २ आठवडे फ्रीज ला काहीही डाग पडू न देता काम सुरू असतं. काही जास्त उरू नये, फ्रीज मध्ये गर्दी होऊ नये, आमटी -भाजी सांडू नये याची पुरेपूर काळजी घेतली जाते आणि त्यानंतर मात्र पुन्हा फ्रीज नक्षीदार होऊ लागतो. सजू लागतो.

दोस्तांनो, अमेरिकेत फ्रोजन प्रकार खूप जास्ती आहे. भारतीय दुकानातून फ्रोजन पराठे, रेडी टू इट भाज्या, डोसे, कटलेट्स.. असे कित्येक भारतीय प्रकार गोठवलेल्या रूपात मिळतात. इथल्या फ्रीजचे फ्रीजरही मोठ्ठाले असतात. कोणाही भारतीय कुटुंबात गेलात तर फ्रीजर मध्ये असे पराठे, भाज्या नक्की दिसतील. भारतीय पदार्थच नव्हे, पण फ्रेंच फाईस, चिकन नगेट्स, फिश स्टिक्स, आणखी बरेच पदार्थ या फ्रीजर मध्ये असतात. कित्येक अमेरिकन घरातून केवळ फ्रोजन अन्न माय्क्रोव्हव करून खाणे हीच पद्धत असते. (म्हणूनच फ्रीज इथे ढम्माले असावेत) इथे ही पद्धत असल्यामुळेही असेल पण भारतातून आई-वडील येतात त्यावेळी, एकेकट्या राहणार्‍या आपल्या मुलासाठी ती आई जाताना किमान पुढे आठदिवस तरी त्याला घरचे अन्न मिळावे या मायेने, ती वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या करून हवाबंद डब्यात घालून फ्रोजन करून ठेवून देते. बायको-मुले भारत वारीला निघाली की, एकट्या राहणार्‍या त्या नवर्‍यासाठी तीही असंच काहीबाही करून फ्रीज करून ठेवते... नाही म्हंटलं तरी, प्रेम्-माया य गोष्टी सुद्धा फ्रीजमध्ये साठवल्या जातात आपोआप. हो ना?

- प्राजु

साहित्यिकजीवनमानप्रकटनविचारलेखविरंगुळा

प्रतिक्रिया

संदीप चित्रे's picture

15 Apr 2009 - 1:33 am | संदीप चित्रे

लेख चांगला आहेच आणि >> (बोंबलायला, पुण्यासारख्या गावांत अचानक येण्याचे असे प्रकार किती??, त्यातून जेवायला येण्याच्या शक्यता किती आणि.. आलेल्याला जेवूनच जा चा आग्रह असा तो किती!!!) >> या वाक्यातून पुणेकरांना गार करायचं ठरवलेलं दिसतंय :)

रेवती's picture

15 Apr 2009 - 5:01 am | रेवती

आता पुण्यात गेल्यावर प्राजुकडे जाताना अचानक जाणार नाही, गेलेच तर तिने जेवूनच जा असा केलेला आग्रह हा खोटा आहे असं समजून न जेवता परत येइन.
लेख आवडला. अगदी गार गार करून गेला.;)

रेवती

चतुरंग's picture

15 Apr 2009 - 6:58 pm | चतुरंग

कधी भूतकाळात मन गेलं समजलं नाही! पहिल्यांदा फ्रिज घरी आला तेव्हा बर्फाच्या ट्रे मधे पाणी ओतल्यावर दर पाच मिनिटांनी ट्रेत बोटं घालू बर्फ झाला का बघितल्याने बर्फ व्हायला लागलेला मोडायचा आणि अशा रीतीने कित्येकतास बर्फाविना तळमळलेलो आठवले! :T

(बोंबलायला, पुण्यासारख्या गावांत अचानक येण्याचे असे प्रकार किती??, त्यातून जेवायला येण्याच्या शक्यता किती आणि.. आलेल्याला जेवूनच जा चा आग्रह असा तो किती!!!)
हे वाक्य वाचलं आणि माझा बर्फाचा खडा झाला! ;)
(खुद के साथ बातां : रंग्या, परवाच्या कट्याला तू नीट जेवायला वाढलेलं दिसत नाहीयेस! ह्म्म्म्.. नीट लक्ष देत जा इथून पुढे! :? ) )

चतुरंग

समिधा's picture

15 Apr 2009 - 2:28 am | समिधा

काय सही लिहीलायस गं लेख.प्रत्येकाकडे थोड्याफार प्रमाणात फ्रिज चा असाच उपयोग होत असतो.

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

चित्रा's picture

15 Apr 2009 - 2:53 am | चित्रा

ताक जास्त असेल तर परसातल्या कढिलिंबाला मिळायचं. एकूण काय.. तर घरातला पदार्थ खराब होऊ नये.. आणि झालाच तर बागेला खत.. अशी एकूण परिस्थिती होती. सगळीच खुश होती. घरातली माणसं, बागेतली झाडं, कामवाल्या ...

सगळा लेखच खूप आवडला.

मीनल's picture

15 Apr 2009 - 3:37 am | मीनल

माझ्या मैत्रीणीच्या सासूबाई काहीही फ्रिज मधे ठेवतात. उद: बाटल्याची झाकण,खिळे, नळाला लावायचा वाय्सर. त्यांना म्हणे त्या वस्तू लगेच सापडतात तिथून.
माझी मैत्रीण म्हणते त्यांनी शित कपाटाला कपाट केरून टाकलय.
कारण त्या भाज्या ,दूध बाहेर ठवतात. =))

मीनल.

चकली's picture

15 Apr 2009 - 4:14 am | चकली

सासूबाई भलत्याच विनोदी दिसताहेत :)

चकली
http://chakali.blogspot.com

बेसनलाडू's picture

15 Apr 2009 - 5:08 am | बेसनलाडू

माझ्या एका मैत्रिणीचा नवरा घरचा वायरलेस् राउटर् जास्त तापला नि आंतरजाल जोडणीसंबंधित त्रास देऊ लागला की आंतरजालापासून डिस्कनेक्ट् करून शीतकपाटात ठेवतो. काही वेळाने बाहेर काढून, पुनर्जोडणीनंतर सगळे काही नीट पूर्ववत् चालू होत असल्याचा त्याचा अनुभव आहे. हे मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले असून हा मनुष्य स्वतः एक टेलिकॉम् अभियंता आहे :)
(अनुभवी)बेसनलाडू
लेख वाचला. आवडला. आणखी असे गमतीशीर अनुभव येऊ द्यात.
(गमतीशीर)बेसनलाडू

चतुरंग's picture

15 Apr 2009 - 6:42 pm | चतुरंग

त्या राऊटरचे पॉवर सप्लाय डिझाईन नीट केलेले नसल्याने किंवा तो ज्या ठिकाणी ठेवला जातोय त्या ठिकाणी पुरेशी हवा नीट न खेळल्याने, त्यात निर्माण होणारी उष्णता बाहेर पडत नसावी; त्यामुळे तो गरम होऊन नीट काम देत नसणार. फ्रिजमधे ठेवून थंड झाल्यावर त्याचे काम पूर्ववत होत असावे.

(अवांतर - माझ्या मित्राचे वडील हे जुन्या बाजारातून विविध इलेक्ट्रॉनिक/इलेक्ट्रिकल वस्तू आणतात. त्यांचा तो छंद आहे. त्यांच्या घरात जुने फ्रिज हे इलेक्ट्रॉनिक काँपोनंट्स ठेवायला वापरतात. फ्रिज उघडला की रेझिस्टर्स, कपॅसिटर्स, ट्रांझिस्टर्स,वेगवेगळे आय सीज ह्यांनी भरलेले बॉक्सेस दिसतात! पाहून एकदम मस्त वाटतं! :) )

चतुरंग

चकली's picture

15 Apr 2009 - 4:16 am | चकली

>>या फ्रीज चा महिमा तरी कित्ती वर्णावा! काय काय नसतं हो त्यात?? ४-५ दिवसांच्या थोड्या थोड्या राहिलेल्या भाज्या, २-३ प्रकारच्या आमट्या....

हे वाचून मला फ्रीज लावायची आठवण झाली :(

चकली
http://chakali.blogspot.com

स्मिता श्रीपाद's picture

15 Apr 2009 - 10:59 am | स्मिता श्रीपाद

या फ्रीज चा महिमा तरी कित्ती वर्णावा! काय काय नसतं हो त्यात?? ४-५ दिवसांच्या थोड्या थोड्या राहिलेल्या भाज्या, २-३ प्रकारच्या आमट्या....

माझा पण फ्रीज ओसंडुन वाहातोय :-(
तु हळुच माझ्या घरचा फ्रीज पाहुन गेलिस की काय? :-)

प्राजु,रोजच्या वापरातल्या एखाद्या वस्तुवर इतका सुंदर लेख लिहिता येउ शकतो ?
मस्तच लिहिलयस....

-स्मिता

नंदन's picture

15 Apr 2009 - 4:24 am | नंदन

लेख आवडला. साधाच विषय, पण त्याबद्दल छान खुलवून लिहिले आहे. इथल्या रेफ्रिजरेटर्सवर डकवलेली चित्रे, कामाच्या/वस्तुंच्या याद्या पाहिल्या की नोटिसबोर्डसारखाही फ्रीजचा वापर करता येतो याची खात्री पटते.

मोबाईलसारखा फ्रीजही कधीकाळी स्टेटस सिंबॉल होता हे आता कुणाला खरं वाटणार नाही. पण त्यावरून 'श्रीमंत दामोदरपंत' मध्ये विजय चव्हाणची पाहुण्याला पाणी विचारताना घरी फ्रीज आहे, हे सांगण्याची धडपड आठवली :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

रेवती's picture

15 Apr 2009 - 5:12 am | रेवती

सहमत.
फ्रिज आतल्या बाजूने काय कोणीही वापरेल; आम्ही बाहेरच्या बाजूनेही तो पुरेपूर वापरतो.
सत्राशेसाठ मॅग्नेट्स आणि याद्या, फोटो यांनी बाहेरही सजावट (?) असते (म्हणजे आमच्याकडेही आहे, नावं ठेवत नाहीये कुणाला.;))

रेवती

प्राजु's picture

15 Apr 2009 - 6:05 am | प्राजु

याद्या, मॅग्नेट्स, फोटोज, शाळेची दरमहिन्याची वेळापत्रकं... सोव्हेनिअर्स.. जसे लिबर्टी स्टॅच्यू, नायगारा, अक्वेरियम.. कित्ती काय काय अंगावर मिरवतो तो फ्रिज!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शितल's picture

15 Apr 2009 - 6:50 am | शितल

प्राजु,
फ्रिजचा महिमा वर्णावा किती ह्या उक्तीची प्रचिती आली.
मस्त लिहिले आहेस. :)

दशानन's picture

15 Apr 2009 - 7:57 am | दशानन

मस्त लिहले आहे.

आंबोळी's picture

19 Apr 2009 - 8:44 pm | आंबोळी

छान लिहिलय...

प्रो.आंबोळी

विनायक प्रभू's picture

15 Apr 2009 - 6:55 am | विनायक प्रभू

थंड

क्रान्ति's picture

15 Apr 2009 - 7:05 am | क्रान्ति

मस्त लेख! ठंडा कर दिया! B)
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

मदनबाण's picture

15 Apr 2009 - 7:49 am | मदनबाण

व्होल्टास काय, बिपिएल काय.. ऑल्विन काय!!
केल्विनेटर भूल गये क्या ? :)
हम्म...सध्या तापमान लयं वाढलय !!! त्यामुळे फ्रिजचा वापर जास्तच आहे.

अतिअवांतर :--
"अय्या हो... कसं केलंस गं?" ह्याच पद्धतीने फिरंगी स्त्रिया काय म्हणत असतील?

(गारेगार)
मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

मेघना भुस्कुटे's picture

15 Apr 2009 - 10:22 am | मेघना भुस्कुटे

खरंय ब्वॉ!
फ्रीज नसता तर मी काय केलं असतं? रात्री बेरात्री वाचताना भूक लागल्यावर फ्रीजच माझा अन्नदाता असतो. उरलेला उपमा, उकडून ठेवलेले बटाटे, थोडी शिळी भाजी, काहीच नाही तर पाव आणि लोणी, किंवा दूध-पाव...
प्राजूतै, आता मॅगीवरपण लिही ना. त्या पदार्थाचं तितकं देणं लागतो आपण!

परिकथेतील राजकुमार's picture

15 Apr 2009 - 10:34 am | परिकथेतील राजकुमार

ठंडा किया रे !
अशा वाळवंटी वातावरणात एकदम गारेगार लेख. फ्रीज महिमा आवडला.
हेहेहे आमच्याकडे अजुन फ्रीज घेतलेला नाहिये.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

स्वाती दिनेश's picture

15 Apr 2009 - 11:41 am | स्वाती दिनेश

मस्त ग प्राजु, लेख फार आवडला (आणि पटला,:))
स्वाती

अवलिया's picture

15 Apr 2009 - 11:45 am | अवलिया

गारेगार

--अवलिया

चंद्रशेखर महामुनी's picture

15 Apr 2009 - 11:48 am | चंद्रशेखर महामुनी

माझ्या मुलाला तो शाळेतुन आला कि.. पहिल्यांदा फ्रिज उघडुन त्यात काय आहे.. हे पहाण्याची नामी सवय आहे.
सगळ्यां प्रमाणे मि ही म्हणतो....
ठंडा कर दिया....

पाषाणभेद's picture

15 Apr 2009 - 12:07 pm | पाषाणभेद

सही लेख.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

मैत्र's picture

15 Apr 2009 - 2:36 pm | मैत्र

(की हाच सर्वात थंडगार?) ... ईट्स द कुलेस्ट वन ! :)

अमोल केळकर's picture

15 Apr 2009 - 2:37 pm | अमोल केळकर

लेखाबरोबरच लेखाचे शिर्षक ही आवडले

अमोल
--------------------------------------------------
छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे पहा

घाटावरचे भट's picture

15 Apr 2009 - 3:19 pm | घाटावरचे भट

मस्तच!!

स्वाती राजेश's picture

15 Apr 2009 - 5:57 pm | स्वाती राजेश

लेख मस्तच जमला आहे...गारेगार..... फ्रिजचे इतर उपयोग पण कळाले.... :)
आणखी एक उपयोग, वर्षाचे प्लॅनर चिकटवण्यासाठी.....जवळच असल्यामुळे त्यावर वाढदिवसांच्या तारखा, सुट्ट्यांच्या तारखा चटकन दिसतात...

प्राजु's picture

15 Apr 2009 - 6:38 pm | प्राजु

सर्वांचे मनापासून आभार. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

देवदत्त's picture

15 Apr 2009 - 6:54 pm | देवदत्त

मस्त एकदम. फ्रीजचे सर्व उपयोग आले ह्या लेखात :) आणि लिखाणही छान.

ह्यावरून आठवले. काही वर्षांपूर्वी एल. जी. ने Door Cooling तंत्रज्ञान आणून मग ते पेटंटही केले होते. त्यामुळे कोणाला ते तंत्रज्ञान थेट वापरता येणार नव्हते. मग गोदरेज ने दरवाजा त्यांच्याकरीता सोडून दिला व बाकीच्या पाचही बाजू वापरून Penta Cool (पेंटाकूल) तंत्रज्ञानाचा फ्रीज आणला. गोदरेजने त्याचे पेटंट केले की नाही नक्की माहित नाही. पण एक छान स्पर्धा पहावयास मिळाली :)

विसोबा खेचर's picture

16 Apr 2009 - 12:02 am | विसोबा खेचर

मस्तच लेख..:)

नाही म्हंटलं तरी, प्रेम्-माया य गोष्टी सुद्धा फ्रीजमध्ये साठवल्या जातात आपोआप. हो ना?

हा मुद्दा बाकी खराच! :)

असो, शीतकपाटांना पर्याय नाही..!

तात्या.

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Apr 2009 - 12:29 am | बिपिन कार्यकर्ते

एकदम ठंडा ठंडा कूल कूल लेख. खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

माझ्या लहानपणी आमच्या आख्ख्या बिल्डिंगमधे फक्त दोनच फ्रिज. पण एवढं मोकळं वातावरण की आम्ही नेहमी त्यांच्या कडून बर्फ - गार पाणी वगैरे आणायचो. ना आम्हाला त्यात लाज वाटायची ना त्यांना त्यात काही गैर वाटायचे. उन्हाळ्याचा सुट्टीत दिवसभर उंडारताना तर त्यांच्याचकडे कायम पाणी प्यायला जायचो. काकूपण अगदी न कंटाळता पाणी आणि एखादा लाडू हातावर ठेवायच्या. फ्रीजची अजून एक मजा म्हणजे बर्फ. त्यावेळी गोदरेजच्या फ्रीजमधे बर्फाचे ट्रे मोठ्या आकाराचे ऍल्युमिनियमचे असत. त्यातले ४-५ खडे आम्ही घ्यायचो. ते एका मोठ्या नॅपकिनमधे घालायचे. आणि मग त्याची पोटली करून ती बदड बदड बदडायची. मग आतल्या बर्फाचा चुरा व्हायचा. मग ते खडे एक एक करून जीभेवर ठेवायचे आणि खायचे. त्यानंतर तो थंडगार नॅपकिन मग छानपैकी तोंडावर दाबून धरायचा. कस्सलं गारेगार व्हायचं.... निव्वळ सुख.

बिपिन कार्यकर्ते

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Apr 2009 - 8:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेख वाचला आणि विचारात पडलो की, फ्रीज ही गोष्ट समजण्यापूर्वी ..फ्रीजमधे पाण्याचा बर्फ होतो हेच खूप आश्चर्याचे वाटले होते. खेड्यातून वाढलेलो असल्यामुळे सुखवस्तू कुटुंबातील सुविधांचा तसा अभावच होता. कोणा मित्राकडे ज्याच्याकडे फ्रीज असेल तर गार-गार पाणी पिण्यात काय आनंद वाटायचा !

लेखातील फ्रीजमधील गोष्टी वाचल्यावर जाणवले किती डिफ्रंस असतो नै वेगवेगळ्या समाजातल्या वेगवेगळ्या गटात. आता घरातला फ्रीजही इतक्या सवयीचा झाला आहे की त्याचेही अपृप वाटत नाही आपल्याला !

असो,

>>प्रेम्-माया य गोष्टी सुद्धा फ्रीजमध्ये साठवल्या जातात आपोआप. हो ना?

खरंय ! फक्त प्रेम-माया गोठून जाऊ नये म्हणजे झालं :)

-दिलीप बिरुटे
(खेडवळ)

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Apr 2009 - 11:32 am | ज्ञानोबाचे पैजार

हाच लेख इ सकाळ वर पण आहे. बहुतेक कालच्या (१७-०४-०९) च्या सकाळ मधे त्याचा मथळा "शीत कणग्या" असा आहे इतकाच फरक
________________________
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
बोला पंढरीनाथ महाराजकी जय

प्राजु's picture

18 Apr 2009 - 8:26 pm | प्राजु

पैलतीरच्या संपादकांनी पूर्व संम्मतीने त्याचं शिर्षक बददलं आहे.
धन्यवाद प्रतिक्रियेसाठी.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शक्तिमान's picture

18 Apr 2009 - 2:15 pm | शक्तिमान

>>आणि आला तो पिस्ता रंगाचा व्होल्टास चा.
आमच्याकडेही सेम टू सेम हाच फ्रिज आहे!

बाकी लेख खुसखुशीत झाला आहे..

मनीषा's picture

18 Apr 2009 - 5:43 pm | मनीषा

घरी फ्रिज नाही ही कल्पना सुद्धा नकोशी वाटते ..
लेख छानच जमला आहे ... आवडला !

पद्मश्री चित्रे's picture

18 Apr 2009 - 5:46 pm | पद्मश्री चित्रे

एक्दम झक्कास लिहिल आहेस..

सुधीर कांदळकर's picture

19 Apr 2009 - 8:31 pm | सुधीर कांदळकर

झकास.

सुधीर कांदळकर.