यंदा कर्तव्य आहे? भाग ८

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in जनातलं, मनातलं
9 Mar 2009 - 8:45 pm

यंदा कर्तव्य आहे? पुस्तकाचे
मनोगत
यंदा कर्तव्य आहे? भाग १
यंदा कर्तव्य आहे ? भाग २
यंदा कर्तव्य आहे? भाग ३
यंदा कर्तव्य आहे ? भाग ४
यंदा कर्तव्य आहे? भाग ५
यंदा कर्तव्य आहे? भाग ६
यंदा कर्तव्य आहे? भाग ७

खेडयातील सोयरीक आणि मुहूर्त

'काका येक काम हुतं?
'बोला.`
'सोयरीक जुळवायची होती?`
'काय नांव?`
'इसारले का काका मी बाबू डोंगरा.`
'अरे तुझ नाही तुझया पोराचं.` काका खेकसतात.
'खंडू.`
'अन पोरीचं?`
'इंदी.`
काका हातांच्या बोटांवरील पेरांवर अंगठयाने गणित करत सांगतात.
'नाही जमतं.`
'नाही जमतं? कसं नाही जमंत? अहो मामाचीच प्वार हाये. शिकल्याली बी हाये. आमचा ठोंब्या यव्हाराला लई कच्चा. म्हन्ल प्वार तरी जरा शिकल्याली करावी. श्येतात बी कामाला चांगली आहे. आजकाल येटाळन्यांना बी कुठं मान्स मिळत्यात. आपला घरचा मानुस असल्याला बरा. म्हनून म्हन्लं औन्दा द्यावा उडवून बार. बरं मंग जलमनावावरून नसंन जमत तर मंग चालू नांवावरून पघा. तिला अलका बी म्हन्त्यात. पघा पघा जरा बाडात. काही तरी तोडगा असनंच की.`
काका परत पंचांगात बघतात व जुळत असल्याचे सांगतात. कारण बाबू डोंगऱ्याला तीच पोरगी सून म्हणून करायची आहे हे त्याने ताडलेले असते. राहिला फक्त जुळतय का नाही हे बघण्याचा सोपस्कार. मग कशाला जुळत नाही म्हणून सांगा शेवटी लग्न आपल्यालाच लावून द्यायचं आहे. खेडेगावांत बहुजन समाजात बराचसा वर्ग लग्न जुळवण्यासाठी गावच्या बामनाचा सल्ला घेतात कारण ज्योतिष हे धर्माचं अंग आहे. मग सोयरीक ठरण्याचा कार्यक्रम असा नसतोच. काकांनी मुहूर्त काढून दिला की त्याचा उपयोग पत्रिका छापण्यासाठी काहीतरी दिनांक व वेळ द्यावी लागते म्हणून होतो. प्रत्यक्षात त्या मुहूर्तावर लग्न कधीच लागत नाहीत. प्रत्यक्ष लग्नाची वेळ व मुहूर्त यातील अंतर कितीही तासांचे असू शकते. मुलीच्या मामाने मुलीला घेउन या असे सतरावेळा लाउडस्पीकर वर सांगितल्यावर जमेल तशी ती बोहल्यावर उभी रहाते. मुहूर्त टळून गेल्याचा ना काकांना खेद ना व-हाडी लोकांना. शेवटी व-हाडी मंडळींच्या सोयीनेच लग्न लागते.
विवाह, पत्रिका आणि वास्तव

या विवाहाच्या मार्केट मध्ये शिरलो की आपल्याला निरनिराळे संवाद ऐकायला मिळतात.
''आमच्या वेळी एवढं पत्रिकेचं नव्हतं हो! आमचं लग्न त्या वेळी सुद्धा पत्रिका न बघता झालं. पण आता मुलीच्या लग्नाला बघायला लागतीये! तशी आम्ही बनवून ठेवली होती. काढली माळयावरुन. इतक्या ठिकाणी दाखवली पण अजून जमतच नाही.``
'' अहो एकनाडी मुळे प्राध्यापकाचं स्थळ गेलं. त्यानं स्वत:च पत्रिका बघितल्यावर नाही म्हणून सांगून टाकलं. इलॅस्टिकच्या जमान्यात अजून एकनाड टिकून आहे.``
'' आता पत्रिका जमणाऱ्या या चार मुलींतून सिलेक्शन करायचंय. सगळीच स्थळं तोलामोलाची आहेत. त्यातल्या त्यात कुठंली जरा जास्त जमतीये तेवढं बघा म्हणजे एकदा शिक्कामोर्तब करायला बरं.``
लग्नाच्या मार्केट मध्ये काळाची गरज ओळखून आता वधू -वर सूचक मंडळे इंटरनेटवर आली आहेत. तेथे मॅच मेकिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. ''गुरुजींकडून पत्रिका जुळवणं वगैरे म्हणजे जरा मागासच वाटत बाई. आम्ही आपलं कॉम्प्युटराईजड मॅच मेकींग करुन घेतो.`` असेही सूर ऐकायला मिळतात. ई मॅरेजला ई ज्योतिषी हवाच. पंडित मंडळींनी आता इंटरनेटवर आपली कार्यालय थाटलीत. वेदिक ऎस्ट्रॉलॊजीचं एन्शंट इम्पॉर्टन्स कळायला इंटरनेटवरच यावं लागतं. पिकतं तिथं विकत नाही ना!
आपल्या गप्पांमध्ये सुप्रसिद्ध लेखक डॉ अनिल अवचट एकदा म्हणाले, '' सुनंदाशी लग्न करताना परस्पर घरच्यांनी पत्रिका जुळते का नाही हे बघितले. वडिलांना एका ज्योतिषाने सांगितले कि मुलीची पत्रिका जुळत नाही तुम्ही हे लग्न जुळवू नका, अरिष्ट संभवते. परंतु मी घरच्यांचा विरोध पत्करून मी हे लग्न केले व मला अस वाटत मी तो आयुष्यातला एकमेव महत्वाचा योग्य निर्णय घेतला होता. `
एकदा नानासाहेब गोऱ्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन जाहीरनामा परिषदेत एक किस्सा सांगितला होता. त्यांच्या कॉलेजजीवनात अनेक मित्रांनी प्रबोधनवादी विचारांनी भारावून जावून हुंडा घेणार नाही, पत्रिका बघणार नाही अशा प्रतिज्ञापत्रकांवर सहया केल्या आणि प्रत्यक्षात जेव्हा पाळी आली तेव्हा हुंडाही घेतला आणि पत्रिकाही बघितल्या. ' माझी इच्छा नव्हती रे पण आमची आजी म्हणाली मी थकले आता! माझ्या डोळ्यादेखत हे कार्य अगदी धूमधडाक्यात झाले पाहिजे. मग आमच्या आईच मन मोडवेना. तिला तरी बिचारीला समाधान मिळू दे. ` अशा अनेक भावनिक पातळयांवर हे प्रबोधन बोलत्या सुधारकांसारखे राहते.

फलज्योतिषविचार

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

9 Mar 2009 - 8:54 pm | लिखाळ

वास्तववादी लेख :)

वास्तविक नुसते अरिष्ट संभवते यात 'नक्की काय?' याचा खुलासा केला तर इतर पैलू लक्षात घेऊन संभवणारे अरिष्ट चालेल असे वधु-वर म्हणूही शकतात. कारण अरिष्ट आले नाही तरी फायदा आणि आले तर मनाची तयारी आधीच झालेली, तसेच इतर चांगल्या पैलूंचा फायदाही मिळालेला. (डोळे झाकून पत्रिकेवर विश्वास ठेवणारे आणि पत्रिकेवर पूर्ण रोखठोक अविश्वास असणारे यांच्या मध्ये बहुसंख्य असावेत.)
-- लिखाळ.

प्रकाश घाटपांडे's picture

9 Mar 2009 - 9:15 pm | प्रकाश घाटपांडे

हे अरिष्ट म्हणजे आयुर्वेदातील कूटजारिष्ट विडंगारिष्ट या सारखी अरिष्ट नव्हे.हॅहॅहॅ ज्योतिषांची ती संकेतात्मक भाषा असते. काहीही वाईट घटना झाली की त्याचा बादरायण संबंध लावता येतो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

लिखाळ's picture

9 Mar 2009 - 9:19 pm | लिखाळ

काहीही वाईट घटना झाली की त्याचा बादरायण संबंध लावता येतो.

म्हणजे बादरायणारिष्ट किंवा सवडारिष्ट* म्हणा की :)

*सवडारिष्ट = सवडीनुसार आरिष्ट
-- लिखाळ.