नमस्कार. भारतीय मुलींच्या टीमबरोबर त्यांचं कौतुक करणार्यांचंही अभिनंदन! एक खूप वेगळी क्रांती घडते आहे. मुलींच्या खेळाबद्दल आणि एकूणच खेळाच्या जगताबद्दलसुद्धा. परवा मुलींचा सन्मान करणार्या मिताली राजला बघून तिला आउट करणारी नांदेडची मुलगी मात्र सारखी आठवते! मिताली राज १९९९ ते २०२२ ही २३ वर्षे भारतासाठी खेळत होती. सर्वांत कमी एकदिवसीय सामन्यांमध्ये एक हजार रन्स करणारा भारतीय खेळाडू हा विक्रम तिच्याच नावावर आहे. २००८ मध्ये ती कॅप्टन असताना अनेक ठिकाणी नवीन खेळाडू शोधायला जायची. तेव्हा ती नांदेडला आली होती. आणि ज्युनियर क्रिकेट खेळणार्या एका १६ वर्षांच्या मुलीने तिला आउट केलं होतं! अगदी क्लीन बोल्ड केलं होतं. मितालीने त्या मुलीचं खूप कौतुक केलं व तिला मार्गदर्शन केलं.

(हा लेख इथे इंग्रजीत वाचता येईल. ब्लॉगवर माझे ध्यान, आकाश दर्शन, फिटनेस इ. विषयांवरचे लेख उपलब्ध)
हे सगळं मला त्या मुलीने स्वत: सांगितलं. ती माझी अतिशय जवळची मैत्रीण आहे. तिचं नावही अगदी मितालीसारखंच! हे तिने मला २०२० मध्ये सांगितलं जेव्हा ती करीअर का खेळ ह्या द्विधा मनस्थितीत होती. अगदी एमएस धोनी चित्रपटात दाखवलीय ती स्थिती. क्रिकेटमध्ये ती खूप जास्त प्रभावी होती- बॅटींग आणि बॉलिंग दोन्ही. इतकी जास्त की लहानपणापासूनच ती मोठ्या मुलांमध्येच खेळायची. तिचे शॉटस खूप लांब जायचे. मितालीशी भेट झाल्यावर पुढे तिने कॉलेजमध्ये अनेक स्पर्धा गाजवल्या. काही ज्युनियर स्पर्धांमध्ये चमकली. राज्य पातळीवरही ज्युनियर लेव्हलला ती खेळली. पण....
... हा मोठा पण तिच्यापुढेही आला. एक वेगळ्या वाटेचं करीअर करायचं का खेळायचं हा प्रश्न समोर आला. तिचे घरचेही एका मर्यादेच्या पुढे खेळाच्या विरुद्ध होते. आणि तिचं खेळाइतकंच आवडणार्या कामाच्या क्षेत्रावर प्रेम होतं. आणि प्रेशर्स. ती तर प्रत्येकावर असतातच. त्यामुळे तिच्या कुटुंबावरही प्रेशर होतं. त्यातून तिने खेळ सोडून एक जास्त खात्रीचं व सुरक्षित करीअर निवडावं असा सूर होता. अखेर तिने खेळ सोडला, करीअरचं कार्यक्षेत्र निवडलं आणि भारत एका उत्तम खेळाडूला मुकला!
तिने पुढे जिद्दीने अवघड स्पर्धा परीक्षा दिल्या. सातत्याने अनेक वर्षं सोळा- अठरा तास अभ्यास केला. कमालीची एकाग्रता ठेवली आणि प्रचंड मेहनत कनेक वर्षं करत राहिली. आणि आज ती उच्चस्तरीय सरकारी अधिकारी होऊन समाजासाठी काम करत आहे. खेळ मागे राहिला तरी तिची दुसरी पॅशन तिने करून दाखवली आहे. क्रिकेटच्या मैदानात नाही पण आपल्या कार्यक्षेत्रात ती उत्तम बॅटींग करते आहे आणि चाकोरीच्या बाहेर एका वेगळ्या वाटेवर आपली खेळी उभी करते आहे!
जेव्हा एखादी गोष्ट खूप मनाच्या आतून येत असते, तेव्हा ती त्या व्यक्तीची नसतेच. ती असते विराट विश्वाची. त्यामुळे अशा विचारांना खूप मोठी शक्ती असते. आणि ते विचार मॅनिफेस्ट होतातच. कोणतीही साधनं- शक्यता नसतानाही आनंदीबाईला डॉक्टर व्हावसं वाटलं आणि साता समुद्रापलीकडून तिला मदत मिळाली. अशा अनेक अशक्यप्राय कहाण्या आणि उदाहरणं आपल्या समोर आहेत.
हे लिहीण्याचं प्रयोजन हेच की, प्रतिभा किंवा गुणवत्ता कोणाची एकट्याची नसते. अशी प्रतिभा व गुणवत्ता अनेकांकडे असते. तशी संधी त्यांना देणं आणि पुढे जाण्यामध्ये मदत करणं मात्र गरजेचं असतं. आणि ज्यांच्याकडे प्रचंड गुणवत्ता आहे, प्रचंड मेहनतीची तयारी आहे ते कधी अपयशी होऊच शकत नाहीत. एका क्षेत्रात संधी मिळाली नाही तर ते दुसरीकडे नाव कमावतातच आणि योगदान देतातच. फक्त सुरूवातीच्या टप्प्यामध्ये योग्य पारख असलेला मार्गदर्शक मिळाला, पुढचे काही वाटाडे मिळाले तर त्यांचा प्रवास सोपा होतो आणि त्यांच्यामुळे समाज आणि देशाचा गौरवही वाढतो!
वाचल्याबद्दल धन्यवाद. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 4 नोव्हेंबर 2025.