‘प्रहरांच्या अक्षरनोंदी’ या आपल्या मिपाकर मी-दिपाली उर्फ दीपाली ठाकूर यांच्या पहिल्या-वहिल्या कवितासंग्रहाचं नुकतंच प्रकाशन झालं. दीपाली ठाकूर या विज्ञान शाखेच्या प्राध्यापिका आहेत. दीपाली ठाकूर या आंतरजालावर प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या नावाची चर्चा झाली ती त्यांच्या 'बहावा' या कवितेमुळे. फेसबुक, इन्स्टाग्राम, मराठी संकेतस्थळे, ब्लॉग यावर त्यांची ही कविता झळकली आणि त्यानंतर त्यांची ही कविता कोणीतरी कॉपीपेस्ट वाल्याने 'इंदिरा संत' यांच्या नावाने पुढे ढकलली. जागरुक वाचकांनी त्यावर ती दीपाली ठाकूर यांचीच कविता आहे, हे वारंवार लिहिले. तसं तर त्यांच्या अनेक कविता त्याहूनही अधिक सुंदर आहेत. 'प्रहराच्या अक्षरनोंदी'त एकूण ७५ कविता आहेत. काव्यसंग्रहातील कवितेची सुरुवात 'गणेशस्तवना'ने होते. आजकालच्या नव्या माध्यमांमधील तंत्रही या पानावर दिसते. पानावर कोड स्कॅन केलं की, ते सुंदर स्तवन ऐकताही येते; पण तरीही ज्या कवितेला टाळताच येणार नाही, त्या ‘बहावा’ कवितेच्या ओळी लिहाव्याच लागतात.
नकळत येती ओठांवरती तुला पाहता शब्द वाहवा
सोनवर्खिले झुंबर लेउन दिमाखात हा उभा बहावा
लोलक इवले धम्मक पिवळे दवबिंदूतून बघ लुकलुकती,
हिरवी पर्णे जणू कोंदणे साज पाचूचा तयाचढवती ( वनहरिणी-वृत्त) पृ. क्र. ८
अशा पिवळ्या धमक बहाव्याचं नववधूच भासावी असे सुंदर वर्णन कवितेत आहे. ‘सोनवर्खिले झुंबर’ ‘पीतांबर नेसलेला युगंधर’ ‘कानातील डूल’ ही जी प्रतीकं आहेत, ते कवयित्रीचं शब्दवैभव आहे. 'पृथ्वीच्या विवाहगीतात' 'नभांनी सोडलेले उसासे' 'नभोमंडपी दीपमाळा' असे वर्णन येते. केवळ हीच नव्हे, तर, अग्निशिखा, चाफा, पारिजात, कारवी, गुलमोहोर अशा पाना-फुलांच्या संवादांच्या निसर्गवर्णनाच्या आणि प्रतिभेच्या अविष्काराच्या कवितांमधून केवळ शब्द, ताल, रंगच नव्हे, तर कविता वाचताना गंधही यावा अशा विविध वृत्ताच्या या संगीतमय वृत्तबद्ध कविता गोड आहेत. शांताबाई शेळके, इंदिराबाई संत यांच्या कवितांची आठवण यावी अशाच कविता आहेत. शांताबाईंच्या ‘वर्षा’ काव्यसंग्रहात ‘मी’ कवितेत ‘तुळशीच्या मंजिरीचं’ वर्णन आहे, तसंच दीपाली ठाकूर यांच्या कवितेत ‘कारवीचं’ वर्णन येतं
थेंब मृगाचा शैशवा तिच्या देई संजीवनी
शेलाटा सडसडीत बांधा मुसमुसत्या यौवनी
वेदीवरती सज्ज उभ्या युवती एका मांडवी
संसाराचे चित्र रम्य रेखिती मनी कारवी (वृत्त – समुदितमदना ) पृ.क्र. १२.
अशा वृत्तबद्ध कवितांबरोबर 'आई', 'एक होता कागद', 'मौन', 'सोहळा', ' बारमास' आणि इतरही कविता विशेष सौंदर्याने भरलेल्या आहेत. कवितेतलं नादमाधुर्य, भावमाधुर्य, शब्दांचा नेमकेपणा, कवितेतील सफाईदारपणा, प्रतीकं ही सर्व एका नव्या कवयित्रीची कविता आहे, असे वाचताना वाटत नाही; इतकी ती पारंपरिक वाटते. निसर्गाच्या माध्यमातून स्त्री-पुरुष संवाद, करुणेचा भाव ही या कवितेची वैशिष्ट्ये मानावे लागतील. ही कविता केवळ निसर्गात रमणारी नाही, तर कवितेला सामाजिक भानही आहे, सभोवतालची सामाजिक विषमता, भेदभाव, सामाजिक उतरंडी यानेही कवयित्री व्यथित होताना दिसते. एकता आणि अखंडतेचा अभाव पाहून अस्वस्थ कवयित्री ‘शपथ’ कवितेत म्हणते -
धर्म, पंथ, वंश, जात भेदभाव मालवू
एक सूर, एक ताल, एक राग आळवू
वासना विकार मीपणा समूळ तो गळो
माणसास माणसातलाच देव आकळो
पृ.क्र. ( ७५)
धर्म, पंथ, वंश, जात आणि जन्मस्थानामुळे होणाऱ्या भेदभावामुळे राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्कांचे उल्लंघन होते आणि समाजात हिंसाचार व असमानता वाढते, त्यासाठी एकता आवश्यक आहे, ही भावना त्यातून व्यक्त होताना दिसते. सामाजिक हिंसाचार त्यातही स्त्रीची विटंबना इथे होताना दिसते.
द्रौपदी, तुझी इथे युगेयुगे विटंबना
हात रोखणार मात्र यापुढे, नराधमा
सावळे कुणी जरी, कुणास रुप गोरटे
रक्त आमुच्या नसांनसांत लाल वाहते.
द्रौपदीच्या अपमानानंतरच्या संतापाचे आणि प्रतिज्ञेचे प्रतीक आहे, ज्यात आतापासून अन्याय थांबवण्याची आणि पुरुषांनी पुरुषार्थाने उभे राहण्याची शपथ घेतली आहे. त्याच बरोबर भेदभाव उभे करणाऱ्यांनी हेही लक्षात घेतले पाहिजे की, माणसं रंगाने काळी-गोरी असू शकतील; परंतु सर्वांचे रक्त लाल आहे, देशातील विविध संस्कृती आणि विविध जात धर्माचे लोक एकत्र येतात, तेव्हाच सामाजिक सलोखा वाढतो आणि देशाच्या विकासाला चालना मिळते. हे साध्य करण्यासाठी, समाजातील सर्व घटकांना एकत्र आले पाहिजे, ही एकात्मतेची भावनाही शपथ कवितेतून व्यक्त होते. स्त्रियांचे प्रश्न केवळ कवितेपूरते राहू नये. स्री प्रश्नांनी कवितेला दाद मिळेल. पण, तिच्या बलस्थानांचाही विचार केवळ कवितेत न होता वास्तवातही झाला पाहिजे. 'माझ्या कवितेला थोडाफार मिळेलच भाव, गेलाबाजार बाजाराचं सगळंच गणित लागू होते इथे' असा भावही त्या व्यक्त करतात.
निसर्ग कविता, प्रेम कविता, सामाजिक आशयाच्या कविता, अशा विविध भावभावनांच्या अविष्काराच्या कविता या काव्यसंग्रहात आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे जवळ जवळ चाळीस पेक्षा अधिक कविता या विविध वृत्तबद्ध रचना आहेत, त्या अधिक वाचनीय झाल्या आहेत. मुक्तछंदातील कविताही तितक्याच सुंदर आहेत. दोन्हीही प्रकार कवयित्री लिलया पार पाडते, हे कवयित्रीचं यश आहे. निसर्गातील प्रतिमा, रुपकं, यामुळे कविता आशयघन होते. 'प्रहरांच्या अक्षरनोंदी' करताना अनेक नोंदी राहून गेल्या आहेत, वाचक आपल्या नोंदी काव्यसंग्रह वाचून कधीतरी इथे करतील. पहिल्या-वहिल्या कवितासंग्रहाने खूप अपेक्षा निर्माण केल्या आहेत. पुढील काव्यसंग्रहास शुभेच्छा !
<
प्रहरांच्या अक्षरनोंदी
कवयित्री- दीपाली ठाकूर
प्रकाशक- माई पब्लिकेशन-पुणे
पाने-96 किंमत 210 -/
प्रतिक्रिया
29 Oct 2025 - 9:58 pm | कंजूस
चांगला परिचय.
>> सर्वात महत्वाचं म्हणजे जवळ जवळ चाळीस पेक्षा अधिक कविता या विविध वृत्तबद्ध रचना आहेत, त्या अधिक वाचनीय झाल्या आहेत. मुक्तछंदातील कविताही तितक्याच सुंदर आहेत. >>
- नेमकं.
29 Oct 2025 - 10:08 pm | अभ्या..
अरे वा.
अभिनंदन दिपाली वहिनी. अनोखी भेट.
.
मला तर मराठी ठाकूर म्हणाले की मिपा बल्लव गणपा हाच आठवतो ;)
29 Oct 2025 - 10:20 pm | गवि
उत्तम परिचय.
त्यांच्या कविता नेहमीच लयबद्ध आणि गेयता असलेल्या .. नेहमीच आवडतात.
30 Oct 2025 - 9:25 am | मी-दिपाली
30 Oct 2025 - 9:26 am | मी-दिपाली
धन्यवाद प्रा. डॉ. Dilip Birute सर! आपण माझ्या काव्यसंग्रहाची इतकी आवर्जून आणि आस्थेने दखल घेतलीत त्याबद्दल मनापासून आभार! यामधून आपलीही कवितेविषयी, साहित्याविषयी असणारी बांधिलकी, जाणीव आणि जाण दिसून आली. पुस्तक योग्य हाती गेल्याचं समाधान किती महत्त्वाचं आहे, ते या निमित्ताने समजलं. _/\_
31 Oct 2025 - 10:36 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
परिचय करुन दिलेल्या काव्यसंग्रहाच्या कवींनीही दखल घ्यावी, दाद द्यावी ही गोष्ट लिहित्या-बोलत्या वाचकांसाठी तशी आनंदायी गोष्ट असते. मी-दीपाली आपण दखल घेतली, दाद दिली आभार.
खरं तर, कविता वाचत गेलो, थांबत गेलो वाचत गेलो आणि जे उत्स्फूर्तपणे वाटलं ते लिहूनही टाकलं. खरं, तर अजून खूप काही लिहिता येईल अशा त्या प्रहरांच्या अक्षर नोंदी आहेत. धाग्यातही लिहिले होते की अनेक नोंदी सुटल्या. एक वाचक मित्र म्हणाले सर, थेट शांताबाई शेळके, इंदिरा संत यांची आठवण केली असे म्हणालात तर ते अधिक स्पष्ट करता येईल का ? मग आम्ही बोलत बसलो. निसर्ग पाहुन कोणाच्याही मनामधे प्रेम, आपूलकी निर्माण व्हावी. रंग, गंधात रमून जावे हा माणसाचा तसा नैसर्गिक स्वभाव आहे. माणूस घडतो, व्यक्तीमत्वविकास होतो. पाना-फुलांशी बोलायला जवळ जवळ सर्वांना आवडतं. निसर्गाची ओढ माणसाला जन्मजात असते. निसर्गात कोणास प्रियकर दिसतो, कोणास आई दिसते, कोणास मित्र दिसतो, मैत्रीण दिसते आणि आपला संवाद सुरु होतो. अशाच नोंदी प्रहरांच्या अक्षरनोंदीत दिसतात.
कविता वाचतांना, इंदिराबाईंची आठवण व्हावी त्याचं कारण आसे की, त्यांचंही बालपण खेड्यात गेलं. बालपणापासून त्यांना निसर्गसहवास लाभला. शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षण घेता घेताही त्यांचा निसर्ग संवाद सुरुच होता. आणि ते त्यांचं जीवनच बनून गेले. जुन्या काळी ओव्या आणि निसर्ग, गाणी हा जवळ जवळ जुन्या कुटुंबाचा भागच होता. निसर्गाशी संवास सुरु झालं की ते गाणं होतं. त्यांची एक 'कसे हासू' नावाची कविता आहे.
साधा पाना फुलांना जागवणा-या वा-यांनी सुद्धा कवयित्रीचं मन थरारून जातं. साधी सोपी रचना असते आशय मात्र खोलवर जाणारा असतो. 'मन जाई खोल खोल' असा तो संवाद सुरु असतो. अशा अनेक त्यांच्या कविता आहेत. दीपाली ठाकूर यांचाही निसर्गाशी असाच स्नेह आणि संवाद आहे. त्यांची कविता त्याच वळणांची आहे, दीपाली ठाकूर म्हणतात-
'पाकळ्या मिटून असतात, म्हणजे त्या वाट पाहात असतात' हे कोणाला सुचतं ? निसर्गप्रतिमा हे या कवितेंची वैशिष्ट्ये आहेत. असा तो सारखा निसर्ग संबंध काव्यसंग्रहात दिसून येतो. निसर्गाशी एकरुप झालेली ती कविता. अशा त्या गप्पा रंगल्या. निसर्गातील तरलेतेने आलेला अनुभव व्यक्त करण्याची पद्धती, निसर्गातील घटनांची संवेदनशीलता ही केवळ कवयित्रीपुरते मर्यादित राहात नाही. निसर्गकविता कवीची राहात नाही तर, तो निसर्ग अनुभव वाचक, समीक्षक, यांनाही तितकाच उत्कटतेने येतो हे त्यांच्या कवितांचे वैशिष्ट्ये आहे, श्रीमंती आहे.
मिपाकर, वाचक, प्रतिसाद देणा-या सर्वांचे मनापासून
-दिलीप बिरुटे
2 Nov 2025 - 10:46 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आधुनिक केसरी ने पुस्तक ओळख प्रकाशित केल्याबद्दल आभार...!
-दिलीप बिरुटे