माझे माहेर पंढरी - स्वैर चिंतन ३

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
5 Jul 2025 - 9:36 pm

हे एक स्वान्त: सुखाय* स्वैर चिंतन आहे आणि वेग वेगळ्या दिशांनी भरकटणार आहे.

सकाळी जरा उशिराच जाग आली. कार्डिओचे काही व्यायाम प्रकार जमत नसल्याने घराच्या खिडक्या बंद करून, यूट्यूबवरची गाणी लावून मी स्लो मोशन नृत्य अधूनमधून करून बघतो. पंढरीच्या वारीच्या निमित्ताने आज घरी मंडळींनी अभंग लावलेले. त्यावर जरासा ताल धरला. या तालावर उडी मारणे मला जमत नाही, याकडे आमच्या मंडळींनी लक्ष वेधले. तसे, एका कामवाल्या आजीबाईंच्या अभंगाच्या तालावरील 'विठ्ठल रखुमाई, ज्ञानबा तुकाराम' म्हणत उत्साहाने मारलेल्या त्यांच्या उड्यांच्या आठवणींनी मला १९८० च्या दशकात गावाकडे नेले.

कधी काळी सफाईच्या बाबतीत वतने किंवा तत्सम पद्धत असे. दलित समाज सजग झाल्यावर, त्यांनी या बाबतीतली वतने सोडूनही त्यांना काही दशके तरी झाली असावीत. पण, आमच्या वाड्याच्या सफाईचे वतन असलेल्या विमलाबाई आजींसाठी तो त्यांचा अधिकार होता किंवा त्यांची ती गरजही होती. (नावे बदललेली आहेत). स्वतःच्या समाजातील नव्या पिढ्यांची नाराजी स्वीकारूनही त्यांनी त्यांचे काम चालू ठेवले. माझ्या आत्यांच्या आठवणीत त्या विमलाबाईंच्या घरी जाऊन खेळत, यावरून अस्पृश्यता तांत्रिकदृष्ट्या मागे पडलेली असावी.

त्यांच्या चेहऱ्यावरील सुरकुत्यांच्या जाळ्यांशिवाय त्यांचे वय कळण्याचा मार्ग नव्हता. नऊवारी लुगडे नेसलेल्या, गोऱ्यापान, निळ्या डोळ्यांच्या विमलाबाईंच्या हातात झाडु मारण्याचा फडा, डोईवर टोपले आणि त्यात शिळे अन्न घेऊन जाण्यासाठी मडकी असत. शिळ्या अन्नाला सुटलेल्या वासामुळे त्यांच्या डोईवर टोपले असताना त्यांच्या आसपास पोहोचणे माझ्यासाठी तरी कठीण प्रसंग असे. "ननगे मालक" म्हणून त्यांनी मारलेली हाक अजूनही आठवते.

बालपणातच गुरुजनांकडून गुरु नानकांच्या तसेच माझ्याच पूर्वजांच्या दानशूरतेबद्दल ऐकून विमलाबाईंना अन्न द्यावेसे वाटे, पण शिळे देण्याची माझ्या मनाची कधीच तयारी नसल्यामुळे ते काम मी स्वतः कधीच केले नाही. ताजे दिले तरी त्या ते शिळ्यातच मिक्स करणार हे इतरांनी लक्षात आणून देऊनही तसे करणे माझ्या मनाला कधी झेपले नाही. काही वर्षांतच घरी फ्रीज आला तसे, किमान आपल्या घरातून दिलेल्या अन्नाचा दर्जा बरा राहील याचा आनंद झाला. आपण पंढरीकडे परत येऊया. मी लहानपणी माझ्या आईसोबत पाहिलेला एकमेव चित्रपट म्हणजे भक्त पुंडलिकाचा. बालपणीचा नॉन-कन्फर्मिस्ट, नास्तिक ते नंतर अज्ञेय असा प्रवास करूनही, आईवडिलांची सेवा करणाऱ्या देवतांची चरित्रे माझ्यासाठी आदर्शच राहिली. तर मग त्यांच्या इतर समाजाने धार्मिक दिशा बदलूनही विमलाबाईंच्या श्रद्धा बळकट राहिल्या असतील, तर नवल नसावे.

बालपणीच विठ्ठल पुंडलिक मला आणखी वेगळ्याही अनुषंगाने भेटले ते साने गुरुजींच्या पंढरपुरातील उपोषण काळात प्र. के. अत्रेंच्या कोपरा-सभांतून दिलेल्या भाषणांच्या पुस्तकातून. प्र. के. अत्रेंचे मी वाचलेले ते पहिले पुस्तक माडीच्या पायऱ्यांवर बसून डोळ्यातून अश्रू ओघळत मी वाचले होते. त्यानंतर प्र. के. अत्र्यांचे कर्णोपकर्णी पडणारे विनोद मी केवळ खोटी स्मितरेषा चेहऱ्यावर आणून दुर्लक्षिले. कदाचित अत्र्यांच्या इतर प्रतिभेवर मी अन्याय करत असेन, पण मी माझ्या वाचनात आलेल्या त्या पुस्तकाच्या प्रभावातून बाहेर पडू शकत नव्हतो. अगदी विकिपीडिया कार्यशाळेच्या निमित्ताने रयतच्या पंढरपुरातील महाविद्यालयातील भेटीतही ते प्र. के. अत्रेंचे त्या भाषणांचे पुस्तक भेटू शकेल का याची चौकशी केली. पंढरपूर म्हटले की चि. वि. जोशींच्या पहिल्या महायुद्धकाळावर आधारित कादंबरीतील विधवांच्या पंढरपूर मंदिर प्रवेशाच्या आंदोलनाचे वर्णनही आठवणीत होते, त्याचीही मी माझ्या एक-दोन पंढरपुरास झालेल्या भेटीतून चौकशी केली. पण इतर महाराष्ट्राप्रमाणे या दोन्ही गोष्टी पंढरपूरकरांच्याच नाही, तर मराठी ज्ञानवंतांच्या विस्मृतीत जमा झाल्या असाव्यात. माझ्या गळ्यातील टायच्या भरवशावर विठ्ठलमूर्ती समोर मला विशेष आदराची वागणूक देऊनही मी पंढरपुरातील बडव्यांच्या वागणुकीने खूपसा प्रभावित होऊ शकलो नव्हतो. वंशपरंपरेने चालणारा बडवेपणा बाजूला केला गेला, ते एका अर्थाने चांगले झाले, याबद्दल तत्कालीन धाग्याच्या प्रतिसादातून मी पूर्वी लिहिल्याचे स्मरण आहे.

१९२० च्या दशकापासूनच माझ्या घरची मूळ राजकीय परंपरा काँग्रेसची. सामाजिक आणि आर्थिक विरोधाभासांच्या संदर्भाने महाविद्यालयीन जीवनातील पहिल्या पण आता हरवलेल्या माझ्या पहिल्या कवितेतील व्यक्तिचित्रांमध्ये विमलाबाई आणि एक माजी अर्थमंत्री होते. माझ्या नेहरावायण मालिकेत विमलाबाईंबद्दलची एक आठवण लिहिणे अद्याप बाकी आहे. भारतीय समाजातील जातीयतेतील उर्वरित अनिष्टता, भेदाभेद दूर होण्याच्या दृष्टीने काही व्यक्तिपूजा आणि शब्दपूजांबद्दलच्या संवेदना जपूनही अधिक मनमोकळी चर्चा होणे गरजेचे असावे. काही कमी बोलल्या जाणाऱ्या विषयांकडे लक्ष वेधावे वाटते. पांडुरंगाच्या आशीर्वादाने त्याबद्दल लिहिण्याचा योग यावा. माझे माहेर पंढरी.

---
* लेख सदरातील हे लेख लेखन खरे म्हणजे स्वतःसाठीच अधिक आहे, कुठे काही न पटल्यास माफ करा पण ह्या लेखनावर इतरांची ओपीनीयन्स मागवत नाही आहे. त्यामुळे जज करणार्‍या प्रतिसादांना टाळल्यास त्यापासून वाचवल्यास आणि खासकरून धागा हायजॅक करणार्‍या विशेषत: अनुषंगिक नसलेल्या आणि आधीच होऊन गेलेल्या चर्चा, शुद्धलेखन चर्चा टाळल्यास अंमळ आभारी असेन.

संस्कृतीव्यक्तिचित्रविचारअनुभव

प्रतिक्रिया

कंजूस's picture

6 Jul 2025 - 6:56 am | कंजूस

आठवणी छान.
आमच्याकडे वडील, आजोबांपासून काही परंपरा नव्हती. कोल्हापुरातल्या अंबाबाईच्या महालक्ष्मीला वर्षात कुणी जात असे. पण नवरात्रात नाही. मी भटकंतीदरम्यान इतर राज्यांतील काही मंदिरे पाहिल्यावर विचार आला की आपण महाराष्ट्रातले गाजलेले दैवत अजून पाहिलेच नाही. मग तिकडे जाण्याअगोदर काही पुस्तके वाचली. ऐतिहासीक माहिती वाचली आणि ती वीट आणि डोक्यावरचा टोप पाहायचा होता. पहिला प्रयत्न वाया गेला . फक्त मुखदर्शन झाले दुरून पण गरुड खांब 'भेटला'. दुसरा एक प्रयत्न केला तेव्हा नामदेव पायरी, वीट पाहता आली, स्पर्ष करता आला. टोप(गुराखी घालतात ती कापडी टोपी ) दिसला नाही. त्यावर मुकुट असतो. पहाटे पुजा दाखवतात त्यात दिसला. हल्ली आपण थेट देवळाकडे जातो तसे पूर्वी नव्हते. मुख्य पंढरपूर गाव चंद्रभागेच्या अलिकडे आणि देऊळ पलिकडे आहे. नावेतून जावे लागायचे. आणि मूळ मूर्ती गावात / माढ्यात आहे ती शोधायची आहे. रखमाबाईही तिकडेच आहे.