स्नेहप्रभा! प्रभा म्हणजे तेज. नुसतं तेज असेल तर त्या तेजोवलयाचा कधी कधी त्राससुद्धा होऊ शकतो. तेजामुळे दाहकता निर्माण होऊ शकते. पण तेजासोबत स्नेह असेल आणि ओलावा असेल तर ते तेज घातक ठरत नाही. स्नेह म्हणजेच तेल. जेव्हा तेजासोबत अशी आर्द्रता असेल तर ते तेज शीतल होतं. कदाचित तेजासोबत असलेल्या शीतलतेमुळे आयुष्यातल्या इतक्या दु:खाच्या आघातांनंतरही अशी व्यक्ती खंबीर राहू शकते आणि समईसारखी मंद तेवत राहू शकते!
नऊ दशकांचा प्रवास केलेली माझी आजी- सौ. स्नेहप्रभा नारायणराव वेलणकर. जिचे तीन भाऊ दुसर्या महायुद्धात युरोप व आफ्रिकेत लढले होते! जिने इंग्रजांपासून अँड्रॉईडपर्यंतचा काळ बघितला! काळामध्ये- जीवनशैलीत असंख्य बदल झाले तरी तिने ते आनंदाने जुळवून घेतले आणि कायम जी समसामायिक- contemporary राहिली! मुलगा, जावई, मुलगी अशा अनेक अकाली आणि वेदनादायी मृत्युमुळे ती खचली नाही. डिमेंशियामुळे आजोबा तिला विसरले होते आणि नंतर त्यांचं निधन झालं, त्यांची साठ वर्षांची सोबत संपली तरी तिचा निर्धार टिकून होता. दुसर्या मुलीचं भीषण आजारपण जिने जवळून बघितलं, तिची वेदना सतत अनुभवली, तरी जी खंबीर राहिली. आणि त्याबरोबर जीवनामध्ये अनेक कटु अनुभव येऊनही जी कायम प्रसन्नचित्त राहिली ती माझी आजी! जीवनाने इतके आघात करूनही जिची मुद्रा सुहास्य राहिली ती आजी! नातीचे सासरे ९२ वर्षांच्या आजीला म्हणाले होते, "तुम्ही खूप फ्रेश दिसता! आज तुम्ही इतक्या सुंदर दिसता तर पूर्वी कशा दिसत असाल!" ती माझी आजी!
हा लेख इथे इंग्रजीत वाचता येईल.
१९३१ मध्ये तिचा जन्म झाला! तिच्या आठवणींमध्ये तो सगळा गतकाळ उलगडायचा. त्या काळात अमरावतीजवळच्या मोर्शीसारख्या छोट्या गावी स्नेहप्रभा जोशीराव म्हणून तिचा जन्म झाला. पाच भाऊ, तीन बहिणी असा मोठा भावंडांचा गोतावळा. आजच्या परिभाषेत सांगायचं तर ती लहानपणापासून टॉम बॉय सारखी होती. मुलांचे खेळ खेळायची. झाडावर चढायची, बॅडमिंटन खेळायची आणि सायकलही चालवायची. मध्यमवर्गीय कुटुंब होतं. काही वर्षं शाळेत शिकली आणि नंतर प्रायव्हेट शिकली. लहानपणापासून संगीताची आवड असल्यामुळे त्या क्षेत्रात पुढे जात राहिली. लग्नाच्या आधी काही काळ नागपूर आकाशवाणीमध्ये कामसुद्धा केलं. युद्धामध्ये लढणार्या भावांची बहीण, त्यामुळे अंगात जिद्द व ऊर्जा खूप होती. त्यानुसार तिने खूप वेगवेगळी कामं त्या काळात केली. कॉलेजमध्ये नंतर इंग्रजीमध्ये पदवी मिळवली. पुढे तर संगीतातही एम.ए. झाली.
१९५० च्या सुमारास तिचं आजोबांसोबत लग्न झालं. तेव्हा आजोबा सिव्हिल इंजिनिअर असल्यामुळे फिरतीवर असायचे. कधी भिलई तर कधी मंचेरियल असं करत १९६० च्या सुमारास आजोबा परभणीला स्थिरावले. तो तसा खूप संघर्षाचा काळ होता. बांधकामाच्या साईटवर ते राहायचे. अनेकदा खूप नवीन भाग असायचा. त्यात आजोबांची सगळ्यांसोबत उठ- बस असायची. आजोबा संघाचं काम करायचे. त्यामुळे घरी अनेक लोक नेहमी राहायचे. प्रचारक राहायचे. आजच्या काळात घरी एक माणूस फक्त जेवायला येणार असेल तरी विचार केला जातो. तेव्हा तर अक्षरश: कित्येक लोक नेहमी घरी राहायचे. शिवाय अनेक विद्यार्थी वार लावून जेवायला यायचे. अशा सगळ्यांचं अगत्याने आजीने केलं. आजच्या सारख्या सुविधा किंवा मदत तेव्हा कोणाची लगेच मिळायची नाही. लोक लांब लांब राहायचे- संपर्क करता येत नव्हता. साधनं नव्हती. पण माया, अगत्य, प्रेम, देण्याची वृत्ती हे मात्र अपरंपार होतं.
आजीच्या आठवणींमधून तिने त्या काळात कशा गोष्टी केल्या हे तर कळायचं. तिने तेव्हा जोडलेली नाती, महिलांसाठीचे उपक्रम, गरीब मुलांसाठीची मदत समजायची. गाणं शिकण्यासाठी तिने परभणीत ग़ुलाम रसूल सरांचा क्लास लावला. १९६०- ७० च्या दशकात परभणीमध्ये ही गोष्टही खूप प्रवाहाविरुद्ध होती. पुढे तिने कधी एकटीने तर कधी मैत्रिणीसोबत चार वर्षांच्या मुलीला घेऊन मुंबई- अलाहाबादला संगीताच्या परीक्षा दिल्या. संगीताची साधना वाढवत नेली. पुढे स्वत:चे संगीताचे क्लासेस सुरू केले. आपल्याला मिळालेलं ज्ञान चार दशकं तिने पुढच्या पिढीला दिलं- सुनांना व नातू- नातींनाही दिलं. मुलीला वेगळ्या वाटेवर जायला प्रोत्साहन दिलं. त्याहीपेक्षा तिच्या व आजोबांच्या संस्कारात वाढलेला माझा काका आजन्म प्रचारक झाला. आजीने स्वत: परभणीमध्ये राष्ट्र सेविका समितीचं काम केलं, इतरांना तयार केलं. त्याच वातावरणात माझ्या बाबांसह सगळ्या कुटुंबावर समाजासाठी काम करण्याचे संस्कार झाले. अगदी नातू- नातींनाही तिचा सहवास मिळाला आणि तिच्याकडून प्रेरणा घेता आली.
तिचं आयुष्य कसं होतं, आजोबा कसे होते हे तर ती सांगायचीच. पण तिच्याकडून तेव्हाचे लोक कसे होते, जीवन कसं होतं हेही उलगडतं. कधी कधी आजोबा परगावी मुक्काम करायचे. निरोप देण्याची काहीच सोय नाही. पत्र पाठवलं तर तेही पाच- सहा दिवसांनी येणार. अशी प्रतिकूलता असली तरी लोक खूप जोडलेले असायचे. एकमेकांना मदत करायचे. आणि गरजा खूप कमी होत्या. जगण्यामध्ये गहराई जास्त होती. शेत- झाडं- पशु ह्यांच्याशी माणसं जोडलेली होते. माणसं एकमेकांना धरून राहायचे. आजीला तर अनेक वेळा कुत्र्यांनी सोबत केली आहे. जन्मल्या जन्मल्या पिलू जाणार्या कुत्रीचं दुखणं आजीने बघितलं आहे, तिला सोबत केलेली आहे. रात्री उशीरा कार्यक्रमावरून परत येताना कुत्री तिला रोडवर "रीसीव्ह" करायला जायची. तेव्हा परभणीत आमच्या घराजवळ काहीच वस्ती नव्हती. पण त्या कुत्रीला बरोबर कळायचं व ती यायची. एका अर्थाने अगदी शांत, संथ गतीचे ते दिवस व तेव्हाचं जीवन. काहीही साधनं- सुविधा नसलेलं. पण तरीही तेव्हाचा आनंद व ते समाधान खूप वेगळं. आज इतक्या साधन- सुविधा असूनही तो आनंद व ते समाधान फार दुर्मिळ दिसतं.
अशी माझी आजी. ४ मे २०२५ ला वयाच्या ९४ वर्षांनंतर तिचं निधन झालं. खरं तर ती सोडून गेली असं वाटतच नाहीय. तिची मंदप्रभा आसपास जाणवतेय. व्यक्ती म्हणून ती आजवर जवळ होती. आता ती व्यक्ती म्हणून नाही तर आकाश म्हणून जवळ असेल. स्नेहप्रभा म्हणून नाही तर स्नेहनभा म्हणून जवळ असेल. फूल म्हणून नाही तर फुलामधून मुक्त झालेला सुगंध म्हणून जवळ असेल.
तिच्या जगण्याचं संचित सदैव प्रेरणा देत राहील. दु:खाचे असंख्य आघात होऊन आणि कष्ट सहन करूनही कधी तिच्या बोलण्यात कटुता आली नाही. उलट ते दिवस किती सुंदर होते, खूप खूप सुखाची वर्षं आम्ही अनुभवली असंच ती म्हणायची. अनेकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. त्यांच्या आठवणी सांगायची. आजचे लोक एका वाईट अनुभवानंतर जीवनाला कंटाळतात किंवा दोष देतात. पण तिच्या बोलण्यात असं कधी जाणवायचं नाही. दु:खाचे प्रसंग होते, आघात होतेच. पण त्याबरोबर प्रसन्नचित्त राहण्याची व स्वत:ला वर्तमानात ठेवण्याची गुरूकिल्लीही तिच्याकडे नक्कीच दिसायची. वयाच्या ९२ व्या वर्षापर्यंत ती हिंडती- फिरती होती. नंतर गुडघ्याचं फ्रॅक्चर झाल्यामुळे तिचं चालणं बंद झालं. पण तरीही तिला जे करणं शक्य होतं ते ती करत राहिली- वाचायची, लिहायची, जगात काय चालू आहे हे समजून घ्यायची. गाणी- प्रवचन ऐकायची. कधी एखादं गाणं गुणगुणताना तिच्या चेहर्यावर विलक्षण आनंद दिसायचा! तिच्या आठवणी ती अगदी ९४ व्या वर्षीही जमेल तशी लिहीत होती. अनेकांना ती स्वत: फोन करायची आणि बोलायची! अगदी इतक्या वृद्धावस्थेमध्येही तिच्या चेहर्यावरचं हसू व प्रसन्नता बघावी अशी होती.
तिच्याकडून शिकण्यासारखं व प्रेरणा घेण्यासारखं खूप आहे. मला वाटतं तिच्या दीर्घायुष्याचं व प्रसन्नचित्त असण्याचं सूत्र वर्तमानात असणं हे आहे. तिने नेहमी मनापेक्षा शरीराचा व्यायाम जास्त केला. तक्रार करणं हा तिचा स्वभाव नव्हता. वयाच्या ९० व्या वर्षी तिला परभणी सोडून पुण्यात यावं लागलं. तिच्या तिथे असंख्य आठवणी होत्या! पुण्यात तिच्या सगळ्या गोष्टी बदलल्या, फ्रॅक्चरनंतर इतरांवर अवलंबून राहणं आलं तरी तिने ते आनंदाने स्वीकारलं. आणि हो, तिने नेत्रदानही केलं. चष्मा तिला कधीच लागला नाही. तिच्या गरजा कमीत कमी होत्या. गायन साधना, इतरांसाठी झिजण्याची वृत्ती ह्यामुळे तिची ऊर्जा क्रिएटीव्ह गोष्टींकडेच जात राहिली. त्यामुळे आयुष्याच्या संध्याकाळी शरीर झिजलं, पाय थकले, पण तिची प्रसन्नचित्त मुद्रा काही बदलली नाही! समईतलं तेल संपून वातही जळाली, तरी तिचं तेज टिकून राहिलं!
-निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 10 मे 2025.
प्रतिक्रिया
10 May 2025 - 9:16 pm | कंजूस
समाधानी आजीचा आदर्श . आवडला लेख.
11 May 2025 - 8:15 am | OBAMA80
सुंदर लेख व अनुभव मांडले आहेत तुम्ही तुमच्या आजीबद्दल. पूर्वीचे लोक खरच मुलखावेगळे होते. फोटोतल्या त्यांच्या चेहर्यावरचं हसू व प्रसन्नता खरच मन प्रसन्न करणारी आहे.
13 May 2025 - 5:04 pm | मार्गी
वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद!