व्याकरण , बुध्दी , चैतन्य ||ॐ||

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
4 Apr 2025 - 11:48 am

सिध्दांत : व्याकरण हा बुध्दीच्या असण्याचा पुरावा आहे, आणि बुध्दी हा चैतन्य असण्याचा पुरावा आहे.

उप सिध्दांत १ - व्याकरण हा बुध्दीच्या असण्याचा पुरावा आहे,
उप सिध्दांत २ - बुध्दी हा चैतन्य असण्याचा पुरावा आहे.

उप सिध्दांत १ - व्याकरण हा बुध्दीच्या असण्याचा पुरावा आहे,
व्याकरण नाही रे , भाषा , भाषा हा बुध्दीच्या असण्याचा पुरावा आहे.
हां इट्स इंटरेस्टिंग , Language is a structured system of communication that consists of grammar and vocabulary.
अर्थात भाषा हा अक्षरे , शब्द , वाक्ये, एकुणच शब्द सञ्चय आणि त्याला अर्थ जोडणारे व्याकरणाचे नियम ह्यांचा समुच्चय आहे .

आणि ह्यातही शब्द सञ्चय म्हणजे केवळ अक्षरांचे समुह आणि अक्षरे हे दुसरे तिसरे काही नसुन नुसती चिन्हे आहेत, त्या चिन्हांपासुन बनलेल्या - वाक्यांना अर्थ देणारे , वाक्यातील शब्दांना अर्थ देणारे , शब्दातील अक्षररुपी त्या चिंन्हांना अर्थ देणारे जे काही आहे ते हे सर्वसमुच्चयात्मक व्याकरण.

आणि नुसतेच शब्द अर्थात वैखरी ह्या अर्थाने नव्हे तर , त्यात सारेच आले. मध्यमा , पश्यंती आणि परा देखील. व्याकरण म्हणजे फक्त शब्दांना अर्थ जोडत आहे इतकेच नव्हे तर एकुणच सर्व जाणीवांना अर्थ जोडत आहे ते व्याकरण !

उदाहरणार्थ : शब्दात व्यक्त करता येणार नाही, केवळ अनुभवता येईल , जसे की चंदनाचे अत्तर चा सुगंध, तो शब्दात लिहिता येणार नाही पण नाकाने अनुभवता येईल, त्यालाही "हे चंदन" असा अर्थ जोडते ते व्याकरण, ती वाणी, ती मध्यमा .

झाडाची पाने ज्याच्या योगे सुर्यप्रकाशाची दिशा "आपोआप" शोधतात, जणु काही त्यांना "दिसत " असते की सुर्य कोठे आहे, डोळे नसुनही असे हे जे झाडांचे जे पाहणे आहे , ते व्याकरण , ती वाणी , ती केवल विशुध्द पश्यंती ,

आणि त्याच्याही आधी "मी काहीतरी पहात आहे , पाहणारा असा मी आहे" ही जाणीव, ह्या जाणीवेला अर्थ जोडणारे व्याकरण, ही वाणी जी की परा .

असे हे व्याकरण जे की "सत्य" आहे ,
जे वाणी आणि अर्थाचे मीलन आहे
शिव शक्ती समावेशन आहे !

ह्या सर्वां शब्दांना, सर्व जाणीवांना अर्थ देणारे असे व्याकरण .
असे व्याकरण असणे हाच बुध्दीचा पुरावा ! बुध्दी म्हणजे इंटेलिजन्स ह्या अर्थाने !

shivatandav

उप सिध्दांत २ - बुध्दी हा चैतन्य असण्याचा पुरावा आहे.
ही जी बुध्दी आहे , अ ट्रु इंटेलिजन्स , हाच पुरावा आहे जिंवंत असण्याचा ! चैतन्य असण्याचा ! चित्, सत्, आनंद असण्याचा !

panini
शिवाच्या नुसत्या डमरुचे आवाज ऐकुन पाणिनीने त्यांचे व्याकरणाचे नियम अर्थ असे मॅपिंग केले. एक विशिष्ठ फ्रिक्वेन्सी : एक विशिष्ठ अर्थ असे मॅपिंग केले !

आत्ता देखील हे लेखन वाचत असताना स्क्रीनवर उमटलेल्या ह्या चिन्हरुपी अक्षरांना, ह्या वाणीला, माझी बुध्दी अर्थ जोडत आहे. पटत असो कि नसो त्याच्याशी घेणे देणे नाही , आपल्याला "कळतं" आहे हे निश्चित !

हाच पुरावा आहे चैतन्य असण्याचा !

सत् आहे , असत् नाही.
चिद् आहे , अचिद् नाही.
आनंद आहे, आनंदाचा अभाव, दु:ख नाही.

सच्चिदानंद आहे , ~(सच्चिदानंद) नाही.

पण ह्याच्याही पुढे जाऊन -

एवं सच्चिदानंदु । आत्मा हा ऐसा शब्दु ।
अनव्यावृत्ति सिद्धु । वाचक नव्हे ॥

सत् चिद् आणि आनंद हे शब्द केवळ असत् , अचिद् , दु:ख ह्यांचा अभाव ह्याचे निर्देशक आहेत , "मुळ अवस्थे"चे वाचक नव्हेत .

अशी कल्पना करा की सत् चिद् आणि आनंद हे तीन पुरोहित आहेत .
ते दृष्य आणि द्रष्ट्याचा लग्नाला आलेले आहेत,
शब्द आणि अर्थाचा लग्नाला आलेले आहेत ,
शक्ती आणि शिवाच्या लग्नाला आलेले आहेत , लग्न ह्याचाच अर्थ जोडले जाणे , अशा लग्नाला आलेले आहेत ,
शक्ती आणि शिवाच्या मध्ये अंतरपाठ धरुन उभे आहेत : आणि आता मंगलाष्टका म्हणत आहेत -

आली लग्न घडी समीप नवरा घेऊनि यावा घरा।
गृह्योक्त मधुपर्क पुजन करा अन्त: पटातें धरा।
दृष्टादृष्ट वधुवरा न करिता , दोघे करावी उभी।
वाजंत्री बहु गलबला न करणे, कुर्यात सदा मंगलम।
शुभ मंगल सावधान।।

kalyansundar shiv

अंतरपाठ पडला ,
शक्ती आणि शिवाची दृष्टादृष्ट झाली ,
दृष्य आणि द्रष्टा भेद विराला ,
अर्थ शब्दात विरुन गेले ,
लग्न लागलं ,
अक्षता पडल्या ,
दोघे एक झाले , रादर , ते दोघे, दोन , असे होते हा आपला आभास विरुन गेला .
तैसें रुसता दृष्टी । द्रष्टा दृश्य भेटी ।
येती तेथें मिठी । दोहींची पडे ॥

आता हे तिन्ही पुरोहित, आता त्यांची काय गरज !! आता हे तिघेही पुरोहित - सत् , चिद् आणि आनंद निघुन गेले, विरुन गेले !

व्याकरण हा बुध्दीच्या असण्याचा पुरावा आहे, आणि बुध्दी हा चैतन्य असण्याचा पुरावा आहे.
आणि हे ज्याच्या लक्षात आलं , ते चैतन्य हा, दुसरा तिसरा कोणी नसुन , तो तूच आहेस !

तत्वमसि !

आता काय बोलायचं ?

तैसा सच्चिदानंदा चोखटा । दाऊनि द्रष्ट्या द्रष्टा ।
तिन्हीं पदें लागतीं वाटा । मौनाचिया ॥

:|

आपणया आपणपें । निरूपण काय ओपे ? ।
मा उगेपणे हरपे । ऐसे आहे ? ॥

आता बस मीच मी आहे .
पण असे निरुपण करणारा तरी कोण ? आणि निरुपण करणार तरी कोणाला ? निरुपण करण्याची गरजच काय ?
आणि समजा नाही केलं निरुपण , उगेपणे अर्थात मौनाने राहिले तर "मी आहे" ही जाणीव हरपणार , लोप पावणार आहे काय !!

आता बस आपला आपण उपभोग घेत बस.

म्हणोनि ज्ञानदेवो म्हणे । अनुभवामृतें येणें ।
सणु भोगिजे सणें विश्वाचेनि ॥

||ॐ||

धर्मअनुभव

प्रतिक्रिया

आंद्रे वडापाव's picture

4 Apr 2025 - 11:55 am | आंद्रे वडापाव

राम _/\_

काळजी घेत रहा ..
कळावे लोभ असावा ...

प्रसाद गोडबोले's picture

4 Apr 2025 - 12:36 pm | प्रसाद गोडबोले

श्रेयअव्हेर : लेखात उद्धृत केलेले वेरूळ लेण्यांमधील फोटो श्री. सागर बोरकर तथा वल्ली सर तथा प्रचेतसः अर्थात जो बुद्धीला चेतावतो तो, ह्यांच्या सौजन्याने !

अर्धवटराव's picture

5 Apr 2025 - 2:32 am | अर्धवटराव

व्याकरण, पाणिनीची भुमीका, अध्यात्म ..इत्यादींचा एकत्रीत नाट्यमय अविष्कार..
फारच सुंदर _/\_

कसं जमतं तुम्हाला हे सगळं...