व्याकरण , बुध्दी , चैतन्य ||ॐ||

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
4 Apr 2025 - 11:48 am

सिध्दांत : व्याकरण हा बुध्दीच्या असण्याचा पुरावा आहे, आणि बुध्दी हा चैतन्य असण्याचा पुरावा आहे.

उप सिध्दांत १ - व्याकरण हा बुध्दीच्या असण्याचा पुरावा आहे,
उप सिध्दांत २ - बुध्दी हा चैतन्य असण्याचा पुरावा आहे.

उप सिध्दांत १ - व्याकरण हा बुध्दीच्या असण्याचा पुरावा आहे,
व्याकरण नाही रे , भाषा , भाषा हा बुध्दीच्या असण्याचा पुरावा आहे.
हां इट्स इंटरेस्टिंग , Language is a structured system of communication that consists of grammar and vocabulary.
अर्थात भाषा हा अक्षरे , शब्द , वाक्ये, एकुणच शब्द सञ्चय आणि त्याला अर्थ जोडणारे व्याकरणाचे नियम ह्यांचा समुच्चय आहे .

आणि ह्यातही शब्द सञ्चय म्हणजे केवळ अक्षरांचे समुह आणि अक्षरे हे दुसरे तिसरे काही नसुन नुसती चिन्हे आहेत, त्या चिन्हांपासुन बनलेल्या - वाक्यांना अर्थ देणारे , वाक्यातील शब्दांना अर्थ देणारे , शब्दातील अक्षररुपी त्या चिंन्हांना अर्थ देणारे जे काही आहे ते हे सर्वसमुच्चयात्मक व्याकरण.

आणि नुसतेच शब्द अर्थात वैखरी ह्या अर्थाने नव्हे तर , त्यात सारेच आले. मध्यमा , पश्यंती आणि परा देखील. व्याकरण म्हणजे फक्त शब्दांना अर्थ जोडत आहे इतकेच नव्हे तर एकुणच सर्व जाणीवांना अर्थ जोडत आहे ते व्याकरण !

उदाहरणार्थ : शब्दात व्यक्त करता येणार नाही, केवळ अनुभवता येईल , जसे की चंदनाचे अत्तर चा सुगंध, तो शब्दात लिहिता येणार नाही पण नाकाने अनुभवता येईल, त्यालाही "हे चंदन" असा अर्थ जोडते ते व्याकरण, ती वाणी, ती मध्यमा .

झाडाची पाने ज्याच्या योगे सुर्यप्रकाशाची दिशा "आपोआप" शोधतात, जणु काही त्यांना "दिसत " असते की सुर्य कोठे आहे, डोळे नसुनही असे हे जे झाडांचे जे पाहणे आहे , ते व्याकरण , ती वाणी , ती केवल विशुध्द पश्यंती ,

आणि त्याच्याही आधी "मी काहीतरी पहात आहे , पाहणारा असा मी आहे" ही जाणीव, ह्या जाणीवेला अर्थ जोडणारे व्याकरण, ही वाणी जी की परा .

असे हे व्याकरण जे की "सत्य" आहे ,
जे वाणी आणि अर्थाचे मीलन आहे
शिव शक्ती समावेशन आहे !

ह्या सर्वां शब्दांना, सर्व जाणीवांना अर्थ देणारे असे व्याकरण .
असे व्याकरण असणे हाच बुध्दीचा पुरावा ! बुध्दी म्हणजे इंटेलिजन्स ह्या अर्थाने !

shivatandav

उप सिध्दांत २ - बुध्दी हा चैतन्य असण्याचा पुरावा आहे.
ही जी बुध्दी आहे , अ ट्रु इंटेलिजन्स , हाच पुरावा आहे जिंवंत असण्याचा ! चैतन्य असण्याचा ! चित्, सत्, आनंद असण्याचा !

panini
शिवाच्या नुसत्या डमरुचे आवाज ऐकुन पाणिनीने त्यांचे व्याकरणाचे नियम अर्थ असे मॅपिंग केले. एक विशिष्ठ फ्रिक्वेन्सी : एक विशिष्ठ अर्थ असे मॅपिंग केले !

आत्ता देखील हे लेखन वाचत असताना स्क्रीनवर उमटलेल्या ह्या चिन्हरुपी अक्षरांना, ह्या वाणीला, माझी बुध्दी अर्थ जोडत आहे. पटत असो कि नसो त्याच्याशी घेणे देणे नाही , आपल्याला "कळतं" आहे हे निश्चित !

हाच पुरावा आहे चैतन्य असण्याचा !

सत् आहे , असत् नाही.
चिद् आहे , अचिद् नाही.
आनंद आहे, आनंदाचा अभाव, दु:ख नाही.

सच्चिदानंद आहे , ~(सच्चिदानंद) नाही.

पण ह्याच्याही पुढे जाऊन -

एवं सच्चिदानंदु । आत्मा हा ऐसा शब्दु ।
अनव्यावृत्ति सिद्धु । वाचक नव्हे ॥

सत् चिद् आणि आनंद हे शब्द केवळ असत् , अचिद् , दु:ख ह्यांचा अभाव ह्याचे निर्देशक आहेत , "मुळ अवस्थे"चे वाचक नव्हेत .

अशी कल्पना करा की सत् चिद् आणि आनंद हे तीन पुरोहित आहेत .
ते दृष्य आणि द्रष्ट्याचा लग्नाला आलेले आहेत,
शब्द आणि अर्थाचा लग्नाला आलेले आहेत ,
शक्ती आणि शिवाच्या लग्नाला आलेले आहेत , लग्न ह्याचाच अर्थ जोडले जाणे , अशा लग्नाला आलेले आहेत ,
शक्ती आणि शिवाच्या मध्ये अंतरपाठ धरुन उभे आहेत : आणि आता मंगलाष्टका म्हणत आहेत -

आली लग्न घडी समीप नवरा घेऊनि यावा घरा।
गृह्योक्त मधुपर्क पुजन करा अन्त: पटातें धरा।
दृष्टादृष्ट वधुवरा न करिता , दोघे करावी उभी।
वाजंत्री बहु गलबला न करणे, कुर्यात सदा मंगलम।
शुभ मंगल सावधान।।

kalyansundar shiv

अंतरपाठ पडला ,
शक्ती आणि शिवाची दृष्टादृष्ट झाली ,
दृष्य आणि द्रष्टा भेद विराला ,
अर्थ शब्दात विरुन गेले ,
लग्न लागलं ,
अक्षता पडल्या ,
दोघे एक झाले , रादर , ते दोघे, दोन , असे होते हा आपला आभास विरुन गेला .
तैसें रुसता दृष्टी । द्रष्टा दृश्य भेटी ।
येती तेथें मिठी । दोहींची पडे ॥

आता हे तिन्ही पुरोहित, आता त्यांची काय गरज !! आता हे तिघेही पुरोहित - सत् , चिद् आणि आनंद निघुन गेले, विरुन गेले !

व्याकरण हा बुध्दीच्या असण्याचा पुरावा आहे, आणि बुध्दी हा चैतन्य असण्याचा पुरावा आहे.
आणि हे ज्याच्या लक्षात आलं , ते चैतन्य हा, दुसरा तिसरा कोणी नसुन , तो तूच आहेस !

तत्वमसि !

आता काय बोलायचं ?

तैसा सच्चिदानंदा चोखटा । दाऊनि द्रष्ट्या द्रष्टा ।
तिन्हीं पदें लागतीं वाटा । मौनाचिया ॥

:|

आपणया आपणपें । निरूपण काय ओपे ? ।
मा उगेपणे हरपे । ऐसे आहे ? ॥

आता बस मीच मी आहे .
पण असे निरुपण करणारा तरी कोण ? आणि निरुपण करणार तरी कोणाला ? निरुपण करण्याची गरजच काय ?
आणि समजा नाही केलं निरुपण , उगेपणे अर्थात मौनाने राहिले तर "मी आहे" ही जाणीव हरपणार , लोप पावणार आहे काय !!

आता बस आपला आपण उपभोग घेत बस.

म्हणोनि ज्ञानदेवो म्हणे । अनुभवामृतें येणें ।
सणु भोगिजे सणें विश्वाचेनि ॥

||ॐ||

धर्मअनुभव

प्रतिक्रिया

आंद्रे वडापाव's picture

4 Apr 2025 - 11:55 am | आंद्रे वडापाव

राम _/\_

काळजी घेत रहा ..
कळावे लोभ असावा ...

प्रसाद गोडबोले's picture

4 Apr 2025 - 12:36 pm | प्रसाद गोडबोले

श्रेयअव्हेर : लेखात उद्धृत केलेले वेरूळ लेण्यांमधील फोटो श्री. सागर बोरकर तथा वल्ली सर तथा प्रचेतसः अर्थात जो बुद्धीला चेतावतो तो, ह्यांच्या सौजन्याने !

अर्धवटराव's picture

5 Apr 2025 - 2:32 am | अर्धवटराव

व्याकरण, पाणिनीची भुमीका, अध्यात्म ..इत्यादींचा एकत्रीत नाट्यमय अविष्कार..
फारच सुंदर _/\_

कसं जमतं तुम्हाला हे सगळं...

युयुत्सु's picture

5 Apr 2025 - 12:01 pm | युयुत्सु

उप सिध्दांत २ - बुध्दी हा चैतन्य असण्याचा पुरावा आहे.

सपशेल चूक!

बुध्दी हा मेंदूची पुरेशी वाढ झालेली असण्याचा पुरावा आहे!

युयुत्सु's picture

5 Apr 2025 - 4:10 pm | युयुत्सु

दुरुस्ती

बुध्दी हा मेंदूची आवश्यक आणि पुरेशी वाढ झालेली असण्याचा पुरावा आहे!

सुबोध खरे's picture

5 Apr 2025 - 12:15 pm | सुबोध खरे

बुध्दी हा मेंदूची पुरेशी वाढ झालेली असण्याचा पुरावा आहे!

गोऱ्या काकीचा मतिमंद पुत्र याच्या मेंदूची पूर्ण वाढ झालेली नाही असं म्हणायचं आहे का आपल्याला?

मेंदूची पूर्ण वाढ झालेले परंतु मतिमंद अशी असंख्य मोठी मुले आपल्याला आजूबाजूला दिसतात.

स्किझोफ्रेनिया या आजाराच्या रुग्णांच्या मेंदूची वाढ पूर्ण झालेली असते परंतु त्यांच्या डोळ्यात पाहिले असता चैतन्य पूर्ण नष्ट झालेले दिसते

Bhakti's picture

5 Apr 2025 - 12:28 pm | Bhakti

सुंदर!

काही अर्थ लागला नाही ब्वा.

ह्याचा अर्थ लेख अर्थहीन आहे असे नव्हे. तर लेख जरा जास्तच स्वान्त सुखाय झाला असावा असा अंदाज आहे. लहान मुले खेळता खेळता एकदम कसे म्हणतात की "हि एलसा किती वात्रट आहे बघा, हया बबडूला ती खेळूच देत नाहीये". लहान मुले सुद्धा आपापल्या स्वान्त सुखात विसरून जातात की इतर लोकांना आपली डिट्टेलवार श्टोरी माहित नाहीये. :)