गीतारहस्यचिंतन ४ -आधिभौतिकसुखवाद

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
1 Apr 2025 - 11:39 am

#गीतारहस्य४
#आधिभौतिकसुखवाद

दुःखादुद्विजते सर्वः सर्वस्य सुखमीप्सितम् । मभा. शां. १३९.६१
दुःखाचा सर्वांसच कंटाळा असतो आणि सुख सर्वांसच हवे असते.

कोणत्याही कर्माचे केवळ बाह्य फल पाहून नीतीचा व अनीतीचा निर्णय करणाऱ्या पक्षास टिळकांनी 'आधिभौतिक सुखवाद' हे नाव दिले आहे. बाह्य फलाहून नीतीमत्तेचा निर्णय होत असतांना ही सोपी पद्‌धत सोडून त्यासाठी आत्मानात्मविचारांत शिरायची गरजच नाही, हे आधिभौतिक सुखवाद्यांचे म्हणणे. त्यामुळे त्यांच्यासाठी अध्यात्म तर अतिशय निरर्थक गोष्ट आहे. तरीही, कर्मयोगशास्त्राचे पंथ जरी निरनिराळे असले तरी 'जगाचे कल्याण 'हे बाह्य साध्य जोपर्यंत सुटले नाही तोपर्यंत नीतीशास्त्राच्या उपपादनाचा एखाद्याचा मार्ग भिन्न असला म्हणून तेवढ्यासाठी त्याचा उपहास करणे योग्य नाही.

#आधिभौतिकवाद्यांचे वर्ग-

१. #निव्वळस्वार्थीसुखवाद्यांचा -
परलोक । परोपकार सर्व झूठ असून अध्यात्मिक धर्मशास्त्र लुच्च्या लोकांनी आपले पोट भरण्यासाठी लिहिलेली आहेत, या जगांत खरा काय तो स्वार्थ, आणि तो ज्या कृत्याने साधेल किंवा ज्याने आपल्या स्वःताच्या आधिभौतिक सुखाची अभिवृ‌द्धी होईल तेच न्याय्य, प्रशस्त किंवा श्रेयस्कर मानले पाहिजे, असे या पंथाचे म्हणणे आहे. उदा चार्वाक मत.

मी जिवंत आहे तोपर्यंत आज हे तर उद्या ते, याप्रमाणे सर्व काही माझ्या स्वाधीन करून घेऊन माझ्या सर्व कामवासना मी तृप्त करीन. मी तप केले / मी कोणाला दान दिले, तरी माझी महती वाढावी म्हणून करणार, माझी सत्ता अबाधित आहे, याचे प्रदर्शन करण्यासाठी करणार.

ईश्वरोऽहमहं भोगी सि‌द्धो बलवान सुखी [गी. १६:१४]
या जगाचा 'मी' हा एकच केंद्र आहे, मी' हेच काय ते सर्व नीतीशास्त्राचे रहस्य होय, बाकी सर्वझूट आहे 'ईश्वर मी आहे मीच उपयोग घेणारा आणि मीच काय तो सि‌द्ध, बलवान, सुखी इ. प्रकारे आसुरी संपत्तीचे गीतेत १६ व्या अध्यायात वर्णन अशाच मनुष्यांचे आहे. ही आधिभौतिक वाद्यांची कनिष्ठ पायरी आहे.

पण अशा स्वार्थसाधु आणि निव्वळ आप्पलपोटेपणाच्या राक्षसी उपदेशाची अर्जुनाने वाट न बघता आधीच श्रीकृष्णास सांगून टाकिले आहे की,

एतान्न हन्तुमिच्छामि ध्नतोअपि मधुसूदन ।
अपि त्रैलोक्यराजस्य हेतोः किं नू महीकृते ।।

"पृथ्वीचेच काय, त्रैलोक्याचे राज्य (मोठी विषयसुखे) जरी त्या युद्‌धाने मला स्वतःला मिळवायची असली तरी त्यासाठी देखील कौरवांना मी मारुं इच्छित नाही. त्यांनी माझा गळा कापला तरी चालेल : (गी १.३५)

२.नीतीच्या आधिभौतिक उपपत्तीस सुरुवात - #दूरदर्शीस्वार्थी
दुसऱ्या आधिभौतिक सुखवाद्यांचे असे म्हणणे आहे की, स्वतःचे सुख किंवा स्वार्थ जरी साध्य असला तरी लोकांना आपल्याप्रमाणेच सवलत दिल्याखेरीज सुख मिळवणे शक्य नसल्यामुळे स्वसुखासाठीच दूरदर्शीपणाने इतर लोकांच्या सुखाकडेहि आपणांस पाहिले पाहिजे.

नीतीच्या आधिभौतिक उपपत्तीस ही सुरुवात म्हटली पाहिजे. समाजसुधारणेस नीतीची बंधने नको असे चार्वाकप्रमाणे न म्हणता, उलट ती सर्वांनीच का पाळली पाहिजे असा या वर्गातीच लोकांचे म्हणणे आहे-

स्वतःला दु:ख झाले म्हणजे आपण रडतो आणि दुसऱ्याला झाले तर दया का ? आपलिही कदाचित अशी अवस्था होईल ही 'भीती.'
आपल्यावर प्रसंग आल्यास लोकांनी आपल्यास मदत करावी याच अंतस्थ बुद्‌धीने कोणी झाला तरी दुसऱ्यास मदत करितो किंवा दान देतो आणि आपल्यावर लोकांनी माया करावी म्हणून आपण त्यांच्यावर माया करतो. आपल्याला लोकांनी चांगले म्हणावे हा स्वार्थमूलक हेतू तरी त्यांच्या पोटात असतो.

परोपकार आणि परार्थ हे शब्द निव्वळ भ्रांतिमूलक आहेत, खरा तो स्वार्थ, स्वतःची सुखप्राप्ति किंवा दुःख निवारण.

३.परार्थाचाही गौरव - उभयवादी किंवा #शहाणेस्वार्थ

स्वार्थ आणि परार्थ या दोन्ही तत्वांवर सारखी दृष्टी ठेवून शास्त्राची रचना करणे प्राप्त आहे, स्वार्थ बुद्‌धीप्रमाणेच परार्थ बु‌द्धीही नैसर्गिक मानल्यामुळे नीतीचा विचार करतांना स्वाथप्रमाणेच परार्थहि आपले कर्तव्य आहे, असे या पंथातील लोक मानतात.

पण या पक्षातील लोक परार्थाचे श्रेष्ठत्व कबूल न करिता दरवेळी आपल्या बु‌द्धीप्रमाणे स्वार्थ श्रेष्ठ का परार्थ श्रेष्ठ याचा विचार करण्यास सांगतात - Common Sense Morality

परार्थ स्वार्थाचाच दूरदर्शपणा न मानिता स्वार्थ आणि परार्थ असे दोन्ही तागडीत घालून त्यांच्या तारतम्याने आम्ही आपला स्वार्थ मोठ्या चातुर्याने ठरवितो .असे समजून या पंथातील लोक आपल्या मार्गास उदात्त' किंवा शहाणा स्वार्थ (पण काही झाले तरी स्वार्थच) असे नाव देऊन त्याची महती गातात.

४.#सात्विकआधिभौतिक - "एकाच मनुष्याच्या सुखाकडे न पाहता सर्व मनुष्यजातीच्या आधिभौतिक सुखदुःखाचे तारतम्य पाहूनच नैतिक कार्याकार्याचा निर्णय केला पाहिजे.
आधिभौतिकवाद्यांचे हे मत अध्यात्मिकवाद्यांनी फार प्राचीन काळी शोधून काढले आहे,

तुकोबा- "जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती । देह कष्टवितो उपकारे"

कर्मयोगयुक्त ज्ञानी पुरुषाचे लक्षण 'सर्वभूतहिते रताः' 'म्हणजे सर्व भूतांचे कल्याण करण्यात ते गढलेले असतात. (गी. ५.२५)
आधिभौतिकवादी यास पुष्कळांचे पुष्कळ सुख' म्हणतात. पण पुष्कळांचे ? म्हणजे किती आणि पुष्कळ ? म्हणजे किती?

लाखो दुर्जनांना सुख होईल यापेक्षा एकाच का होईना, पण सज्जनाला ज्यामुळे संतोष होईल तेच खरें सत्कृत्य होय.

तसेच पुष्कळांचे पुष्कळ सूख अनधिकारी लोकांच्या हाती पडल्यास त्याचा दुष्परिणामच भोगावे लागतील.

दुसरे म्हणजे सर्वभूतहित करणाऱ्यांची बुद्धि, वासना किंवा हेतू कसा आहे, हेंहि त्याबरोबरच अवश्य पहावे.

उदा रस्त्याचे काम भष्ट्राचार करून दिले /मिळवले असता, पुष्कळांना रस्त्याचा वापर । उपयोग होईल पण यासाठी भष्ट्राचाराचे समर्थन नक्कीच होणार नाही.

हित /दान करतांना सात्विक (निष्काम बुद्‌धीने), राजस ( कीर्ती/फलासाठी), कुपात्री झाल्यास तामस समजले आहे.(गी १७.२०, २१), आणि हेच की कर्म बाहय दृश्य कर्मफलावरून न समजता बुद्‌धीच्या शुद्‌धीच्या वरुन समजते जे सर्वोत्कृष्ट आहे ,आधिभौतिकवाद्यांनी अजूनही मान्य केले नाही.

सर्व सजीवांचे स्वार्थी प्रमाणेच परार्थ (स्वतःच्या संततीच्या पोषणासाठी किडे मुंग्याही झटतात, बलिदान दजतात) हे तत्त्व नैसर्गिक, उपजत आहेच.

#माणुसकी
पण त्याचबरोबर केवळ मनुष्यात न्यायबुद्धि, दया, शहाणपण, दूरदृष्टि, तर्क, शौर्य, धृति, क्षमा, इंद्रियनिग्रह इ. दुसऱ्या अनेक सात्विक सद्‌गुणांचिही वाढ झालेली आहे, या सात्विक गुणांच्या सम्मुचयास 'माणुसकी' नाव देता येईल.

ही माणुसकी ज्या कर्माने वाढेल तेच सत्कृत्य । नीतीधर्म, व्यापक दृष्टी एकदा पत्करली की 'पुष्कळांचे पुष्कळ सुख 'हा सदर दृष्टीचा एक स्वल्प भाग न होता सर्व कृत्यांचा धर्माधर्मर्तचा विचार होईल, माणुसकीही पाहिली जाईल, यासच पाश्चात्यांनी 'आत्मा' संज्ञा दिली आहे.

#आत्म्याचेसुख
हे सर्व झाले बाह्य/ ऐहिक सुखाचे !मग पण बु‌द्धीस शांती, सुख मिळते ती तत्वज्ञानाच्या गहन विवेचनामुळेच कारण ते नित्य आहे? तर सुखदुःख अनित्य आहेत. म्हणूनच अर्जुन विचारतो, "माझ्या आत्म्याचे म्हणजे माझे श्रेय कशात आहे ते मला सांगा." (गी. २.७.३.२)

न जातु कामान्न भयान्न लभादधर्मं त्यजेज्जीवितस्य हेतोः|
धर्मो नित्यः सुखदुःखे त्वनित्ये जीवो नित्यः हेतुरस्य || (मभा.-स्व-५.६०)
-संदर्भ - श्रीमद्भगवद्गीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्र
लेखक -बाळ गंगाधर टिळक

वाङ्मयमाहितीसंदर्भ

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

2 Apr 2025 - 6:32 pm | प्रसाद गोडबोले

उत्तम

आधिभौतिक सुखावाद हा बहुतांश चार्वाकाच्या इहवाद जवळ जाणारा आहे. सर्वसामान्य लोकांसाठी हाच उत्तम माग आहे जगण्याचा !
बाकी उर्वरित अध्यात्म वगैरे हे मोजक्या लोकांसाठी च आहे / असावे हे उत्तम.

Bhakti's picture

2 Apr 2025 - 7:13 pm | Bhakti

होय.

बाकी उर्वरित अध्यात्म वगैरे हे मोजक्या लोकांसाठी च आहे / असावे हे उत्तम.

धन्यवाद .