नुकत्याच पार पडलेल्या जागतिक हस्ताक्षर दिनाच्या निमित्ताने ...
तुम्ही स्वतःच्या हस्ताक्षरात लिखाण करता का? पेन, पेन्सिल वापरून कागदावर लिहिता का? एखादे पत्र लिहून पाठवता का? खरीखुरी रोजनिशी लिहिता का?
आजकालच्या डिजिटल युगात ह्या प्रश्नांची उत्तरे बहुतांश 'नाही' अशीच असतील. पेन वापरून कागदावर लिहिण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. फार तर थोडे scribbling करत असाल. एव्हढेच नव्हे तर बऱ्याच ठिकाणी स्वाक्षरीची देखील गरज उरलेली नाही. PIN आणि OTP किंवा कॉन्टॅक्टलेस पद्धत वापरून सर्वत्र व्यवहार होत असताना धनादेशांवर स्वाक्षरी करण्याची वेळ फारशी येत नसेल. पूर्वी शाळेत हस्ताक्षर चांगले होण्यासाठी गिरवून आणि घोटवून घेत असत. त्याकरिता खास तक्ते होते, कित्ता वही आणि अक्षरांचे खाचे पाडलेली सुलेखन पाटी देखील मिळत असे. Fine motor skills development साठी बोटात पेन्सिल धरून लिहिणे, चित्र काढणे, कात्रीने कागद कापणे, कपड्यांच्या घड्या घालणे, शर्टची बटणे लावणे, बुटाची लेस बांधणे ह्या क्रियांपैकी कागदावर लिहिण्याच्या क्रियेचा पहिला आणि मोठा वाटा असतो. लिहिण्यासाठी अंगठा आणि पहिल्या बोटामध्ये पेन्सिल / पेन धरून त्याला मधल्या बोटाने आधार दिला कि लिहिण्यासाठी लागणाऱ्या पेन्सिल ग्रीपची सिद्धता होते. बोटांमधील स्नायू, हाताचे स्नायू, डोळे आणि मेंदू ह्यांच्या समन्वयातून हा Fine motor skills चा विकास होत असतो. सुंदर आणि सुवाच्य हस्ताक्षराला प्रोत्साहन देण्यासाठी शाळेत पूर्वी लिखाण स्पर्धा होत असत. "चांगले हस्ताक्षर म्हणजे निर्मळ मनाचा आरसा असतो" असे आणि अनेक वेगवेगळे सुविचार सुवाच्य अक्षरात शाळेतील फळ्यावर लिहीत. कित्येकदा एखाद्या चुकीबद्दल किंवा व्रात्यपणा केल्याबद्दल पुस्तकातील पाने लिहून काढण्याची शिक्षा होत असे. हि शिक्षा अर्थातच blessing in disguise म्हणायला हवी कारण हस्ताक्षर सुधारण्याच्याबरोबरीने Fine motor skill development ला देखील मदत होत असे. सध्याच्या डिजिटल जमान्यात अशा स्पर्धा आणि शिक्षा कालबाह्य झाल्या असतील.
हे सगळं आता आठवायचे कारण म्हणजे नुकतेच झालेले अमेरिकेतील सत्तांतर! जुन्या, सत्तेवरून पायउतार होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष्याने नवीन, सत्ता पादाक्रांत करणाऱ्या अध्यक्षासाठी हस्तलिखित पत्र टेबलावर ठेवून जाण्याची तेथे प्रथा आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये शपथविधी दिवसाचा हा एक खास प्रघात आहे. ह्यातील गमतीचा भाग असा कि ट्रम्प तात्यांनी चार वर्षांपूर्वी बायडेन आजोबांना लिहिलेल्या पत्राला बायडेन यांनी आता उत्तर दिले असेल. सामान्यतः ह्या हस्तलिखित पत्रांमध्ये मध्ये निवडणुकीच्या यशापयशाच्या पार्श्वभूमीवर थोडाफार सल्ला, थोडेसे विनोद, आणि सत्तांतर विरोधी पक्षाला होत असेल तर मानभावीपणाचे प्रतिबिंब असते.
तर, मला सांगा, तुम्ही शेवटचं पत्र (e -मेल नाही) कधी लिहिलं होतं ? बराच काळ झाला असेल, नाही का? आपण आज डिजिटल जगात वावरतो. स्क्रीनचे वेगवेगळे प्रकार आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत. एखाद्या मित्राची आठवण येत असेल तर काय करता? त्याला SMS पाठवता. ऑफिसमधील कामाबाबत अपडेट द्यायचं आहे? सहकाऱ्यांना e -मेल किंवा टेक्स्ट पाठवता. किराणा सामानाची यादी करायची आहे? नोट्स अॅपवर टाईप करता किंवा अलेक्सा, सिरी, गुगलला सांगता, बरोबर? आज आपण असेच जगतो आहोत. आपल्या फोन, डिजिटल डीव्हायसेस् आणि संगणकांनी आपली लिखाणाची पद्धत बदलून टाकली आहे, किंबहुना त्यामुळेच पेनाने कागदावर लिहिण्याची खरंच गरज आहे का? हा प्रश्न उभा राहिला आहे. लिहिलेले वाचून दाखवणारे आणि बोललेले स्क्रिन वर टाईप करणारे सॉफ्टवेअर्स आणि अॅप्स आता उपलब्ध आहेत, त्यामुळे कळफलक बडवण्याची देखील आवश्यकता उरलेली नाही. तुम्ही केवळ विचार करा आणि त्या विचारातील अक्षरे स्क्रीनवर उमटतील असे तंत्रज्ञान भविष्यात येऊ घातले आहे.
हस्तलिखित लिखाण कमी होत आहे आणि दुर्दैवाने त्याचे महत्व देखील कमी होत आहे. धुळपाटीवर अक्षरे गिरवण्यापासून झालेली सुरवात पुढे पाटी-पेन्सिल, दौत-टाक, बोरू, शाईचे फाऊंटन पेन, बॉल-पॉईंट पेन, फेल्ट टीप पेन, स्टायलस् पेन इत्यादी पर्यंत येऊन पोहोचली आहे. कार्यालयीन कामकाजात टंकलेखन यंत्र वापरणे सुरु झाल्यावर हस्तलिखित लिखाणापासून दूर जाणे सुरु झाले आणि आता तर सर्वत्र संगणकाचा, भ्रमणध्वनीचा कळफलक वापरून लिखाण केले जात आहे, हा काळाचा महिमा म्हणावा लागेल. काही सुलेखनकारांनी हाताने लिहिण्याची कला (Calligraphy) अजूनही जोपासली आहे हे खरे परंतु नवनवीन आणि वेगवेगळे अक्षर "फॉन्टस्" उपलब्ध होत असलेल्या सद्य काळात सुलेखनाला देखील ग्रहण लागायची दाट शक्यता आहे.
प्रगत देशांमध्ये हस्तलिखित लिखाण शाळांमधून हळूहळू गायब होत आहे. शिक्षकांच्या दृष्टिकोनातून त्याला आता फारसे महत्व उरलेले नाही. हाताने लिहिण्याचा सराव नसल्याने एक तृतीयांश विद्यार्थ्यांना स्पष्ट आणि वाचनक्षम लिखाण करता येत नाही. अमेरिकेत आता विद्यार्थ्यांना कर्सिव्ह लिहिण्याची आवश्यकता उरलेली नाही. युरोप मधील देशांतील शाळांमधून कर्सिव्ह काढून टाकले आहे. भारतातील अनेक राज्यांमध्येही कर्सिव्ह हटवले जाते आहे. त्यामुळे लवकरच मुलं कर्सिव्हला एक प्राचीन, परकीय भाषा समजतील अशी दाट शक्यता आहे. मराठीचे कर्सिव्ह “मोडी” लिपी हटवून तर दशके उलटली आहेत. मराठी माणसाला मोडी लिहिता वाचता येत नाही. परंतु हस्तलेखन हा केवळ शाळेतील विद्यार्थ्यांचाच प्रश्न आहे असे नाही तर तो प्रौढांना देखील लागू आहे. एक त्रितीयांश प्रौढ हाताने काहीही लिहीत नाहीत तर तीन पैकी दोनजणांना दुसऱ्यांचं हस्तलिखित वाचण्यात अडचण येते.
हस्तलिखित लिखाणाच्या ऱ्हासामुळे होणारे दुष्परिणाम केवळ वैयक्तिक पातळीवर आहेत असे नाही तर त्याचे सामाजिक, शैक्षणिक आणि मानसिक परिणाम देखील आहेत. वैज्ञानिकांनी ह्या skill atrophy बद्दल धोक्याचा इशारा दिला आहे. त्यांनी लिखाणाबाबत एक अभ्यास केला. त्यांनी मुलांना हस्तलिखित पद्धतीने लिहून आणि कीबोर्डवर टाईप करून अशा दोन प्रकारे अक्षरं शिकवली. नंतर या मुलांना एमआरआय स्कॅनिंग करून तपासले. जी मुलं हस्तलिखित पद्धतीने शिकली त्यांचा लिखाणाच्या प्रक्रियेमध्ये जास्त सहभाग होता. डोळे, बोटे आणि हात ह्यांच्या हालचालींचा समन्वय असल्याने मेंदू जास्त सक्रिय होता, माहिती सखोल साठवली गेली आणि मेंदू मध्ये प्रखर दृश्यमानता दिसून आली. याउलट टायपिंग करून शिकलेल्या मुलांमध्ये मेंदूच्या सक्रियतेचा स्तर तुलनेने खूपच कमी होता. हा मुळात लिखाणाच्या क्रियेमध्ये active participation किंवा passive participation असण्याचा फरक आहे. हस्तलिखित लिखाणामुळे शिकण्याची क्षमता सुधारते, स्मरणशक्ती, सर्जनशीलता, स्व-अभिव्यक्ती वाढते, ज्ञान-वृद्धी होते, भाषा-प्रभुत्वात वाढ होऊन संज्ञानात्मक कौशल्यांमध्ये (cognitive skills) वाढ होते, संवादातील वैयक्तिक आणि भावनिक संबंध वाढतात असे अनेक फायदे दिसून आले आहेत.
हस्ताक्षराचे विश्लेषण करून लिहिणाऱ्याच्या व्यक्तिमत्त्वाचे गुणधर्म निश्चित करण्याचे ग्राफोलॉजी (Graphology) नावाचे एक शास्त्र आहे. परंतु त्याला वैज्ञानिक मान्यता नाही. ग्राफोलॉजीच्या पद्धतींना आणि काढलेल्या निष्कर्षांना विज्ञान मान्यता देत नाही त्यामुळे ते एक छद्म विज्ञान मानले जाते. ग्राफोलॉजीचे अभ्यासक लिखाणाच्या वळणदार, सुवाच्य, छोटे, मोठे, किरटे, स्वच्छ, टापटीप, दुर्बोध, वाचण्यास कठीण (कुत्र्याचे पाय मांजरीला), गिचमिड अशा वेगवेगळ्या प्रकारावरून लेखकाची स्वभाव वैशिष्ट्ये कळतात असा दावा करतात. डॉक्टरांनी दुर्बोध अक्षरात लिहिलेले औषधाचे प्रिस्क्रिप्शन फक्त केमिस्टलाच वाचता येते असा एक प्रवाद आहे. तसे असेल तर ग्राफोलॉजी प्रमाणे सर्व डॉक्टरांना एकाच तराजूत तोलावे लागेल !
हस्तलिखित लिखाण न करणे म्हणजे केवळ वैयक्तिक कौशल्याचा ऱ्हास नव्हे तर आपले व्यक्तिमत्व, आपल्या माणूसपणाचा काही भाग हरवण्यासारखे आहे. हस्तलिखित पत्रातून आपल्याला आपले विचार, भावना जास्त सक्षमपणे व्यक्त करता येतात. कित्येक पत्रे “मर्मबंधातली ठेव” असल्यासारखी जपून ठेवली जातात. इतिहास काळात लिहिलेली पत्रे इतिहासकारांना इतिहासात डोकावण्यास मदत करतात. पत्राच्या संदर्भात चित्रपटांमध्ये अनेक गाणी लिहिली गेली आहेत. SMS आणि सोशल मीडिया नव्हते त्याकाळी कित्येक प्रेमी युगुलांना संपर्कासाठी "प्रेमपत्राचा" आधार असायचा.
हस्तलिखित लिखाण हरवणे, कमी होणे हे सद्य काळात अपरिहार्य आहे. "दिसामाजी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावे" असे समर्थ रामदासांनी म्हटल्याप्रमाणे दर दिवशी काही ओळी हाताने कागदावर लिहिण्याचा संकल्प करू यात.
हाताने लिहिण्याची कला लोप पावत आहे ह्या बद्दलचा हा लेख मी हस्ताक्षरात न लिहिता बोटाक्षरात, थम्बाक्षरात किंवा कळफलकाक्षरात (कीबोर्डाक्षरात) लिहिला आहे, हा मोठा विरोधाभास आहे, नाही का?
टीप : शीर्षकातील पन् श्रेय -
Collins Dictionary
Submitted By: Unknown - 14/02/2021
Status: This word is being monitored for evidence of usage.
प्रतिक्रिया
27 Jan 2025 - 8:33 am | १.५ शहाणा
दर वर्षी १ जानेवारी पासून रोज दहा ओळी शुद्ध१लेखन करावयाचे असा संकल्प १ दिवसा साठी होतो
27 Jan 2025 - 8:59 am | कर्नलतपस्वी
काळाच्या पडद्याआड चालले आहेत. जसे,
टिपकागद,बोरू,दौत,टाक,निब, पुस्ती,कित्ता,,शाई,पाटी,फळा , आणी बरेच काही.
छान लेख खुप सार्या आठवणी जागवून गेला. पाटी वर प्रथम श्री लिहून आयुष्य सुरू झाले ते आता व्हाईस कमांड वर येवून पोहचले आहे.
कधीकाळी निळ्या तांबड्या शाईने बरबटलेले हात आता भ्रमणध्वनीवर टंकाळत असताना दुखतात,बोटं, कडा कडा मोडावी लागतात. फ्रोजन शोल्डर सारखे नवीन शब्द कानावर पडतात.
असो ,लिहीत बसलो तर एकावर एक फ्रि सारखे लेखावर लेख पडेल.
छान, आवडले.
27 Jan 2025 - 9:15 am | गवि
हे अगदीच सत्य आहे की लिहीणे हळुहळू मागे पडत आहे. माझ्या बाबतीत खुद्द सांगायचे तर सलग काही हाताने लिहायची वेळ आलीच तर एकसारखे अक्षर काढून एक ओळ देखील लिहीणे अत्यंत कठीण जाते कारण पंधरा वीस वर्षात पेन पेन्सिलीने काही लिहायची वेळ आलेलीच नाही. नोट्स सुद्धा आवश्यक झाल्यास टाईप करूनच ठेवल्या जातात. सर्व लिखाण मेंदूतून थेट कीबोर्डद्वारेच बाहेर पडते. आपण शाळा कॉलेजात, परीक्षेत, अभ्यास करताना वगैरे वेळी जे रिमे भरभरून लिखाण करत होतो ते आठवले की आता एक ओळ देखील लिहीताना बोटे वाकडी होतात ते पाहून अपंगत्वाचा भास होतो. हे धक्कादायक आहेच. पण स्वीकारले आहे. टायपिंग करणे हे कौशल्य मात्र नव्याने डेव्हलप झाले आहे आणि काही कोर्स वगैरे न करता आपोआप वेगवान सफाईदार टायपिंग करता येते याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. मला वाटते आयुधे बदलत आहेत. लिहीतो हे महत्वाचे. लिहिता मेंदू तोच आहे.
मग ते लेखन पेनाने असो अथवा बटणांनी.
27 Jan 2025 - 10:10 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेख उत्तम. हस्ताक्षर दिनाच्या सर्व मिपाकरांना शुभेच्छा. मला मात्र वही, कागद, पेन यांचा नाद सुरुवातीपासून आहे. हस्ताक्षरही चांगलं आहे. आता वयपरत्वे जरा घोळ व्हायला लागले आहे पण अधुन-मधून लिहिते असतो. सुंदर हस्ताक्षर आवडतं.
>>> तुम्ही स्वतःच्या हस्ताक्षरात लिखाण करता का?
होय.
>>>पेन, पेन्सिल वापरून कागदावर लिहिता का?
होय.
>>>> एखादे पत्र लिहून पाठवता का ?
आता पत्राचे दिवस कुठें राहिले राव. पूर्वी नातेवाईकांना पत्र लिहिली आहेत, त्यांचीही यायची. तरुणपणात मैत्रीणीला लै म्हणजे लै पत्र लिहिली आहेत. पत्रांचा चांगला प्रवास होता. इकडून तिकडे, तिकडून इकडे. भरपूर सांभाळुनही ठेवली होती. पण घर संसारात हळुहळु कोणीतरी हितचिंतकांनी नष्ट केली असावीत असा दाट संशय आहे, आमचंही अक्षर बरं आणि त्यांचं तर, मोत्यासारखं सुंदर. चांगले दिवस होते साले ते. कोणी काढला यार हा पत्राचा विषय. माणूस हळवा होतो ना. ः(
खरीखुरी रोजनिशी लिहिता का ?
काही महत्वाच्या नोंदी, काही मन की बात, आवडलेल्या पुस्तकातल्या ओळी. कधी डायरीवर नाव, गाव, स्वाक्ष-या, आपलं बरं चाललेलं असतं. लेखनाच्या बाबतीत.
-दिलीप बिरुटे
27 Jan 2025 - 11:33 am | Bhakti
"दिसामाजी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावे" असे समर्थ रामदासांनी म्हटल्याप्रमाणे दर दिवशी काही ओळी हाताने कागदावर लिहिण्याचा संकल्प करू यात.
होय मी कायम पेनाने कागदावर लिहिते.खरतर मला त्याशिवाय करमतच नाही.टाईप करायचा उलट खुप कंटाळा येतो.मी नोट्स पण आधी लिहून काढणे.गुगल लेन्सने लिहून काढलेला मजकूर आपोआप टाईप करून मिळतो हे माझ्यासाठी वरदान ठरले आहे.कारण टाईप करताना भावना क्षणिक भडक वरवर वाटतं राहतात(वैयक्तिक मत).पण मी जेव्हा डायरीत खूप विषयांवर लिहिते तेव्हा खरे समाधान मिळते.
रच्यकाने माझा अक्षर खुप सुंदर आहे.यासाठी शाळेत असतांना माझ्या पालकांनी मला स्वतंत्र हस्ताक्षराचा वर्ग लावला होता.अजूनही मला ते सर्व आठवते.खरोखर आयुष्यातली एक सुखद कला मी मनापासून शिकले.माझ्या लेकीला पण असा हस्ताक्षर वर्ग लावणार आहे.
27 Jan 2025 - 5:34 pm | स्वधर्म
मराठी हस्ताक्षर जर युनिकोडमध्ये टाईप करून मिळत असेल, तर मोठेच काम होईल.
27 Jan 2025 - 5:38 pm | Bhakti
हो.
27 Jan 2025 - 9:44 pm | स्वधर्म
नवीन माहिती दिल्याबद्दल. करून पाहिले. ८०% तरी मजकूर येतोय. 'अक्षर' सुधारलं तर आणखी जास्त फायदा होईल असे वाटते.
27 Jan 2025 - 12:48 pm | चंद्रसूर्यकुमार
लेख आवडला पण पटला नाही.
असे फरक सगळ्याच क्षेत्रांमध्ये झाले आहेत. उदाहरणार्थ पूर्वी सगळीकडे पायी जायचे, मग घोडे- घोडागाडी, बैलगाडी असे करत करत गाड्या/ट्रेन/ विमाने इत्यादी. पूर्वीच्या काळी बैलगाडीने मुंबईहून पुण्याला जायला एखादा दिवस लागत असावा. तो प्रवास आता कितीतरी अधिक वेगवान झाला आहे ते चांगले की बैलगाडीच्या प्रवासात जी मजा होती ती एक्सप्रेसवेवरून जाताना नाही असे म्हणत उसासे टाकायचे? पूर्वीच्या काळी घोडा किंवा बैलाबरोबर कसे एक जवळचे नाते तयार व्हायचे ते आता शक्य नाही म्हणून उसासे टाकायचे का?
हा काळाचाच महिमा आहे. जे लोक काळाबरोबर पुढे जात नाहीत त्यांचे नुकसान होते हे अनेकविध क्षेत्रांमध्ये अनेकविध वेळा बघायला मिळाले असावे.
खरं सांगायचं तर मला विज्ञानाची आवड नाही. विज्ञान महत्वाचे आहे हे नक्कीच मान्य आहे पण मला स्वतःला विज्ञानाची आवड नाही आणि त्यात गतीही नाही. त्यामुळे असा प्रयोग केला गेला असेल तर त्याला आव्हान वगैरे देत नाहीये. पण एक गोष्ट समजत नाही. लिहिताना डोळे, बोट आणि हात यांच्या हालचालींचा समन्वय असतो हे अगदी १००% मान्य. पण तसा समन्वय टाईप करताना नसतो हे मात्र पटले नाही. QUERTY हा जगन्मान्य कीबोर्ड वापरून एखादा शब्द टाईप करायचा असेल तर आता आपल्याला ते कीबोर्डकडे न बघताही बर्यापैकी अचूकपणे टाईप करता येते. पूर्वी आपण काय लिहित आहोत ते कागदावर दिसायचे त्याप्रमाणे आपण काही बोटांनी टाईप करत आहोत ते आता स्क्रीनवर दिसत असते. मग डोळे, बोटे आणि हात यांच्या हालचालींचा समन्वय कसा नाही म्हणता येईल?
फार पूर्वी म्हणजे अगदी वेदकाळात प्राचीन भारतात सगळे काही मुखोद्गत करायची परंपरा होती. अशा गोष्टी मुखोद्गत केल्या की मग मेंदू अधिक तरतरीत होईल, बुद्धी अधिक तल्लख होईल हे अगदी १००% मान्य. पण अशा किती गोष्टी एक माणूस मुखोद्गत करू शकेल? ज्या गोष्टी अगदी थोड्या लोकांना माहित असतील ते लोक गेल्यानंतर ते ज्ञान नाहिसे व्हायला नको म्हणून त्यांच्या हयातीतच ते ज्ञान पुढच्या पिढीकडे हस्तांतरीत करायची प्रक्रीया सुरू करायला लागत असेल. कागद आणि मुद्रणकलेचा शोध लागल्यावर ते कष्ट वाचले आणि परत त्याच त्याच गोष्टी करत राहायची गरजही संपली. आता मुद्रणकलेचा आणि कागदाचा शोध लागल्याने पूर्वी कशी बुद्धी तल्लख होती असे उसासे टाकायचे की नव्या नव्या गोष्टी शिकायच्या/ समजावून घ्यायच्या मागे लागायचे? माझा दावा आहे की मुद्रणकलेचा शोध लागला नसता तर मनुष्यजमातीला आता ज्या गोष्टी माहिती आहेत त्याच्या फारच थोड्या, एखाद्या वेळेस एखाद टक्काच गोष्टी माहित असत्या. कारण सगळ्यांचा वेळ आणि उर्जा त्याच त्याच गोष्टी पाठ करण्यात गेली असती. समोर त्या क्षेत्रातील माहिती असलेला कोणी नसेल तर मला ती गोष्ट कळणे अशक्य. एक उदाहरण द्यायचे झाले तर मला समजा अर्थतज्ञ मिल्टन फ्रीडमन यांचे विचार माहिती करून घ्यायचे असतील तर मी स्वतः त्यांच्यासमोर पाहिजे किंवा त्यांचे विचार कळलेला कोणी माणूस माझ्यासमोर पाहिजे. आणि कानगोष्टींमध्ये होते त्याप्रमाणे एकाने दुसर्याला मिल्टन फ्रीडमन नक्की काय म्हणाले हे सांगताना स्वतः फ्रीडमन काय म्हणाले हे बाजूला राहून जेव्हा ते ९९९ वा माणूस १००० व्या माणसाला सांगेल तेव्हा त्या विचारांचे रूपांतर फ्रीडमनच्या विचारांमधून कार्ल मार्क्सच्या विचारात झालेले असेल हा धोका पण आहेच की. तेव्हा पाठांतर करून बुद्धी तल्लख ठेवण्यापेक्षा पुस्तके हातात असणे हे कधीही चांगले नाही का? भले नाही बुद्धी तितकी तल्लख राहिली तरी चालेल पण पाहिजे त्या विषयांवरील माहिती माझ्या हाताशी हवी. नुसती बुद्धी तल्लख ठेवायची पण पाहिजे त्या विषयावरील मटेरिअल समोर नसेल तर उपयोग काय त्या तल्लख बुद्धीचा? आता हेच म्हणणे पुढे इंटरनेट आणि सगळे काही टाईप करायच्या बाबतीत पुढे नेता येईल. जुन्या पुस्तकाची जगात अगदी एक प्रत शिल्लक राहिलेली असेल तरी ते डिजिटाईझ करता येऊन त्याचा वापर जगभरातून कुठूनही करता येईल. हे सगळे करताना सुंदर हस्ताक्षर वगैरे गोष्टी गमावल्या का? नक्कीच. जशा पूर्वी पाठांतर करून बुद्धी तल्लख असायची तो भाग गमावला त्याप्रमाणेच. त्याचा विषाद करायचा का? वाटत नाही. आता आपण हस्ताक्षर ते टायपिंग या 'ट्रान्झिशन' काळात आहोत म्हणून आपल्याला त्या गोष्टींचे दु:ख कदाचित होईल. पण पुढील पिढ्या त्याच वातावरणात जन्मतील आणि लहानाच्या मोठ्या होतील त्यांना त्याचे काहीही वाटणे कठीण आहे. पाचशे वर्षांपूर्वी माझे खापर खापर खापर खापर पणजोबा कसले तल्लख होते- कशी चार पुस्तके त्यांनी तोंडपाठ केली होती तसे मला आता येत नाही याचा विषाद २०२५ मध्ये किती जणांना होतो/होत असेल? त्याप्रमाणेच आणखी काही वर्षांनी माझ्या वडिलांचे/आजोबांचे हस्ताक्षर किती सुंदर होते तसे माझे नाही याचा विषाद वाटणेच बंद होईल.
पाठांतर करायचे असेच कोणते कोणते फायदे होते असे पाठांतर- ते मुद्रण या ट्रान्झिशन काळात काही लोक म्हणत असतीलच.
का? पटले नाही.
हे पण पटले नाही. शेवटी आपल्याला काय लिहायचे आहे हे मेंदू ठरवितो. तुम्ही ते कागदावर जेल पेन वापरून लिहा की दौत आणि पेन वापरून कागदावर किंवा झाडाच्या पानावर लिहा की टाईप करून लिहा त्याने काय फरक पडणार आहे? शेवटी कागद/झाडाचे पान किंवा टाईप करणे हे साधन आहे साध्य नाही.
सहमत पण आताच्या काळात अशा इतर गोष्टी मर्मबंधातील ठेव असल्यासारख्या जपून ठेवल्या जात नाहीत का? जाऊ शकत नाहीत का? माझ्या आईचे साधारण १४ महिन्यांपूर्वी निधन झाले. मी अजूनही मधूनमधून तिने पाठविलेले व्हॉट्सअॅप वरील टाईप केलेले मेसेज वाचतो, व्हॉईस मेसेज ऐकतो. त्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी मर्मबंधातील ठेव नाहीत का?
आताचा वर्तमान हा उद्याचा इतिहास असतो. भविष्यात आताच्या काळात लिहिलेली पत्रे नसतील पण ई-मेल असतील किंवा केलेली भाषणे आणि ती युट्यूब किंवा अन्यत्र कुठे अपलोड केली असतील तर ती पण इतिहासात डोकावायला मदत करणार नाहीत का? जॉन केनेडींनी आणि रॉनाल्ड रेगननी अध्यक्षपदाची शपथ घेताना केलेली भाषणे किंवा स्टिव्ह जॉब्सने स्टॅनफर्डमधील दीक्षांत समारंभात केलेले भाषण मी आतापर्यंत शंभरेक वेळा नक्कीच ऐकले असेल. मी काही इतिहास संशोधक वगैरे नक्कीच नाही. मी एक सामान्य माणूस आहे. पण ज्यांना असे संशोधन करायचे आहे त्यांना पूर्वीच्या काळच्या पत्राप्रमाणेच आताच्या काळात ई-मेल किंवा भाषणे इतिहासात डोकावायला का मदत करणार नाहीत?
आता तसा आधार व्हिडिओ कॉलचा असतो.
अरेच्चा. मग जे अपरिहार्य आहे ते मान्य करून पुढे जाणे श्रेयस्कर नाही का?
या दोन्ही गोष्टी करत असतो पण कागदावर नाही तर ऑनलाईन. रामदासांनीही दररोज काहीतरी लिहा आणि वाचा असे म्हटले होते. कागदावरच लिहा ऑनलाईन लिहू नका असे कुठे म्हटले होते? :) :)
व्हॉट्सअॅपवर असेच विरोधाभास अनेकदा फिरत असतात. पत्रे लिहायची कला लोप पावली म्हणून उसासे टाकणारे फॉरवर्ड येतात कुठे? तर व्हॉट्सअॅपवर :)
27 Jan 2025 - 11:29 pm | अमरेंद्र बाहुबली
संपूर्ण प्रतिसाद आवडला.
तेव्हा पाठांतर करून बुद्धी तल्लख ठेवण्यापेक्षा पुस्तके हातात असणे हे कधीही चांगले नाही का?
ह्यावरून आठवले. मुहम्मद पैगंबरांच्या निर्वाणनंतरा ९० वर्षांनी कुराण लिखाणबद्ध केले गेले. कुराण लिखाणबद्ध करायची गरज का पडली तर कुराण पाठ असलेले अनेक लोक युद्धात मारले जायचे, एकदा तर कुराण पाठ असलेले ४०० लोक एकाच युद्धात मेले. मग कुराण लिहून ठेवण्याचा निर्णय झाला.बाकी मी डेन्मार्कला गेलो होतो, तेव्हा मला चित्रगुप्त काकानी तिथे रोजनीशी लिही असा बहुमुल्य सल्ला दिला होता! त्या प्रमाणे मी लिहिले. ते आता १ वर्षानेही वाचले की पुन्हा मी तिथे फिरून येतो. :)
त्या नंतर मी भारतात आल्यावर रोजनीशी लिहायचे ठरवले जी रोज लिहू लागलो. पण लिहायला रोज अर्धा तास लागायचा नि हात प्रचंड दुखू लागायचा. त्यामुळे थांबवले!
28 Jan 2025 - 4:54 pm | वामन देशमुख
"You stole the words right out of my mouth"
27 Jan 2025 - 5:29 pm | स्वधर्म
लेख आवडला. हाताने लिहिलेले जास्त थेटपणे उतरते असे वाटते. ते अधिक आनंददायकही आहे, याबरोबर सहमत. इंग्रजी टायपिंग तरी सोप वाटतं, मराठी अवघड.
आपण लिहिलेल्या खालील माहितीचा संदर्भ मिळू शकेल का?
वैज्ञानिकांनी ह्या skill atrophy बद्दल धोक्याचा इशारा दिला आहे. त्यांनी लिखाणाबाबत एक अभ्यास केला. त्यांनी मुलांना हस्तलिखित पद्धतीने लिहून आणि कीबोर्डवर टाईप करून अशा दोन प्रकारे अक्षरं शिकवली. नंतर या मुलांना एमआरआय स्कॅनिंग करून तपासले. जी मुलं हस्तलिखित पद्धतीने शिकली त्यांचा लिखाणाच्या प्रक्रियेमध्ये जास्त सहभाग होता. डोळे, बोटे आणि हात ह्यांच्या हालचालींचा समन्वय असल्याने मेंदू जास्त सक्रिय होता, माहिती सखोल साठवली गेली आणि मेंदू मध्ये प्रखर दृश्यमानता दिसून आली. याउलट टायपिंग करून शिकलेल्या मुलांमध्ये मेंदूच्या सक्रियतेचा स्तर तुलनेने खूपच कमी होता.
27 Jan 2025 - 9:13 pm | कानडाऊ योगेशु
लहानपणी मला हाताने लिहिताना त्रास व्हायचा. शाळेतल्या बेंचवर बसुन कधीही नीट लिहिता आले नाही. नेहेमी मांडीवरच पॅड घेऊन लिहायचो.काही वेळाने हात आखडायचा आणि वेगाने लिहीता यायचे नाही. मराठी विषयाचा पूर्ण पेपर सोडवणे नेहेमी आव्हानात्मक व्हायचे. पुढे कॉम्प्युटर आल्यानंतर व त्यावर लिहिण्याची सवय झाल्यानंतर ह्या समस्येतुन सुटका झाली.
27 Jan 2025 - 11:33 pm | अमरेंद्र बाहुबली
बाकी हस्तलिखिताचा मला एक फायदा झाला होता. इंजि. चे माझे ३ पेपर बाकी होते. अभ्यास करायची इच्छा नव्हती. पाठांतर लक्षात राहत नव्हते. मग मी प्रत्येक विषयाचे ६ प्रश्न घेतले. (त्यातले ४ प्रश्न जरी लिहिले तरी विषय पास) नी १०० पानांच्या वहीत भरभर त्या सहा प्रश्नांचे उत्तर लिहीत सुटलो! पूर्ण १०० पाने अस करून भरली. दुसऱ्या दिवशी पेपरला मी तेच प्रश्न आले होते निदान ६ पैकी ४ तरी यायचे. मी काय लिहितोय हे मला कळत नव्हते पण हात भरभर चालत होता! असे करून तिन्ही विषय काढले! ;)
28 Jan 2025 - 4:18 pm | स्वधर्म
एक किस्सा म्हणून ठीक, पण अशा प्रकारे पास होता येणे ही आपली शिक्षणव्यवस्था किती रसातळाला गेली आहे, हेच दाखवतो. नवल नाही की आपली लक्षावधी मुले भारत सोडून परदेशात का शिकायला जातात, याचे कारणही हेच आहे.
28 Jan 2025 - 4:51 pm | वामन देशमुख
स्मरणरंजण आवडले.
कालानुरूप असे स्थित्यंतर होणे, होत राहणे स्वाभाविक आहे. काहीजणांना विषाद वाटणे हेही स्वाभाविक आहे. तथापि अशी स्थित्यंतरे ही अपरिहार्य आहेत. जे त्याशी जुळवून घेऊ शकत नाहीत ते मागे पडतात. त्याशी जुळवून घेणारे टिकून राहतात. त्यात प्राविण्य मिळवणारे प्रगती करतात. स्थित्यंतर हे संकट की संधी हे ज्याचे त्याने ठरवायचे.
GitHub वर दररोज कोट्यवधी ओळींचा कोड ढकलला जातो. तो कीबोर्ड वर टंकूनच लिहिलेला असतो. वही-पेनचा तिथे काहीही संबंध नसतो. तो कोड लिहिणारे लोक बुद्धीमंत नसतात का? आणि त्या तुलनेत वही-पेन घेऊन असे किती जण असे किती लिखाण दररोज करत असतील?
---
"कथा, कादंबऱ्या, ललित, गद्य, माहितीपर इत्यादी लिखाण करणे" आणि "सॉफ्टवेअर लिहिणे" यांपैकी कोणत्या कामाला अधिक बुद्धी लागते या मोहोळावर मी दगड मारणार नाही!
;-)
28 Jan 2025 - 7:46 pm | गवि
आता मात्र AI ने कोड लिहून देणे आणि आपण फक्त बारीकसारीक बदल करणे असे हळुहळू रूढ होत चालले आहे. तोंडाने बोलून टेक्स्ट बनणे हेही बरेच प्रगत होत चालले आहे. मुळात हाताने, आवाजाने किंवा प्रॉम्प्ट देऊन कसे का असेना, मुळात मनुष्याने काहीतरी लेखी नोंदवणे याची गरजच कमी होत जाऊ शकते.
त्यावेळी मात्र स्नायू, फाईन मोटर स्किल्स वगैरे चर्चा पुन्हा होतील.
29 Jan 2025 - 2:11 pm | धर्मराजमुटके
तुम्ही पाच सॉफ्टवेअर लिहिणार्या आणि प्रसिद्ध असणार्या व्यक्तींची नावे सांगा बर पटापट. इथल्या किमान ५-१० व्यक्तींना तरी त्यांची नावे माहित असली पाहिजे एवढीच पुर्वअट आहे.