भीमाशंकर हे भीमा नदीचे उगमस्थान आहे.अशा नदीच्या उगम स्थानी सतत पाण्याची खळखळ वातावरणात नादमयता ठेवत असते.सह्याद्रीच्या निसर्ग कुशीत भीमाशंकर ट्रेक हा खरं तर पावसाळ्यात करायला पाहिजे.यंदा पावसाळाही चांगला चार महिने होता पण मला तेव्हा जमलच नाही.तरीही जवळपासचा त्यातही सोपा "भोभी" जंगल ट्रेक काल करायचा ठरवला.नाव भोभी :) होय आंतरजालावर हे नाव सापडले.भोरगिरी-भीमाशंकर(भोभी).
खरोखर रस्ते इतके छान झाले आहेत, रहदारी कमी त्यामुळे २.३० तासात भोरगिरी या सुंदर गावात पोहोचलो.या पूर्ण प्रवासात माझी नजर रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या कॉसमॉसच्या भगव्या-पिवळ्या फुलांनी वेधले,सर्वत्र हेच पसरले होते.आता बरीचशी फुले ओळखता येत असल्याने त्यातले या इनवेझिक फुलांचा फोटोच काढायला नको वाटतं.सुंदर असतात पण निसर्गाला फायदेशीर नसतात,फोफावलेले सौंदर्य!
जसे वाडा गावापासून भोरगिरीला येत होतो तेव्हा भीमा नदीचे पात्र अखेर पर्यंत साथ देत होती. तर जवळपास प्रत्येक शेतात भात कापणी,मळणी,उफणणीची लगबग दिसत होती.सोनेरी पिवळसर पिकं सोन्याचा घास आपल्या ताटात देणार होते.अनेक ठिकाणी पाखरं गाण्यांसाठी सैरावैरा घिरट्या घालत होती.माकडं, रानडुक्कर यांच्यापासून संरक्षणासाठी पिकांभोवती रंगबेरंगी साड्यांचे कुंपण घातले होते.
भोरगिरी गावात पोहचल्यावर वाटाड्या शोधला.ही वाट सोपी आणि मळलेली वाट पण पहिल्यांदा जात होतो तेव्हा वाटाड्या पाहिजेच.आम्हांला भीमाशंकर महादेवाचेही दर्शन घ्यायचं होतं तेव्हा भोरगिरी किल्ला पाहण्यात वेळ दवडला नाही.तरीही भोरगिरी किल्ला,तसेच गावतलं झंज राजाने जे नगर,पुणे, नाशिक येथील विविध नदीच्या उगमस्थानी सात शिवमंदिर बांधले त्यातीलच हे काटेश्वर महादेवाश मंदिर आहे.दर्शन नक्की घ्यायला हवे.
तर भोरगिरी पासून सुरू केलेला प्रवासाच्या सुरूवातीलाच थोडी डोंगर चढाई आहे.अरे बापरे,लगेच दम लागला.खुप दिवसांनी डोंगर चढत होते.पण अर्धा तास चालल्यानंतर पठार आले.चारी बाजूंनी हिरवे डोंगर ,इतक्या उंचीवरही चरणाऱ्या गाई छान दृश्य होते.
रस्त्याने एक ओढा लागला .त्यात अजूनही पाणी वाहत होते.अतिशय थंडगार स्वच्छ पाणी प्यायला मिळाले.
आता परत थाट झाडी असलेलं जंगल चढून परत वर आलो आतापर्यंत पाच किलोमीटर अंतर २ तासात पार झालं होते.पुढेच नदीचा खळखळाट ऐकू येऊ लागला.तिथून एका बाजूला उतरून गुप्त भीमाशंकर दिसते.भीमाशंकर इथे जी नदी उगम पावते ती एक दीड किलोमीटर परत गुप्त होऊन या ठिकाणी पुन्हा धो धो प्रवाहित होते.इथे एक पिंडही आहे जिच्यावर सतत वरून धबधब्यासारखे पाणी कोसळत असते.खुप वेळाने आता इथं माणसं दिसली.वर चढून आता परत भीमाशंकर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याने चालू लागलो.आता मात्र दुतर्फा दगडांची रांग टाकून पक्की पायवाट केली होती.शेकरूचा नुसता आवाज येत होता पण दिसत काही नव्हता.कारवीसारखीच फुलं असणाऱ्या वनस्पती सगळीकडे होत्या.
गुप्त भीमाशंकर
पुढची जंगल पायवाट
दोन किलोमीटर दाट जंगलातून गारवा झेलत मंदिराजवळ आलो.
पण आजूबाजूला प्लास्टिकच्या बाटल्यांचा खच पाहून वाईट वाटत होतं.
दर्शन घ्यायचेच असल्याने रांगेत उभे राहिलो.दोन तासांनंतर भोलेनाथाचे दर्शन मिळाले.भीमाशंकर इथेही चिमाजी आप्पा यांनी वसईतून जिंकून आणलेली पंचधातूची?ती क्रॉस असलेली पाच मण वजनाची घंटा आहे (या पूर्वी अशा घंटा मी सिद्धेश्वर पारनेर आणि मेणवली वाई इथे पाहिल्या होत्या.)
नंतर डिंभे धरण पहायला गेलो.आंबेगावातील घोड नदीवर हे विस्तीर्ण धरण आहे.पलीकडचा नदीचा जलाशय/साठा दूरवर पसरलेला पाहतांना खुपच सुखद वाटत होता.येतांना एके
ठिकाणी इंद्रायणी तांदूळ घेतला,जो मागच्या वर्षीचाच होता.नवीन तांदूळ अजून मळणी प्रक्रियेत आहे.
या ट्रेक नंतर पावसाळ्यात पुन्हा भीमाशंकर जंगलात येण्याचे पक्के केले.
-भक्ती
प्रतिक्रिया
12 Nov 2024 - 8:39 am | कंजूस
एक महिन्यात वाटा वाळलेल्या दिसताहेत.
भीमाशंकरला गर्दी शनिवार रविवारी असते बहुतेक. भोरगिरीला गाडी ठेवल्याने परत तिकडेच आलात का ट्रेक करत? जुन्नरच्या मोठा बाजार रविवारी असतो. पुढच्या वेळेस तिकडून या. पूर्वी डाळी स्वस्त मिळत असतं.
12 Nov 2024 - 10:37 am | Bhakti
हो सर्व वाटा,ओढे कोरडे होते.एक दोन ठिकाणीच पाणी होते.
नाही गाडी भीमाशंकरला बोलावली.मग तिकडून डिंभेला गेलो.खुप उशीर झाला होता आणि नारायणगावला मावशीकडे जायचं होतं म्हणून ओझर , जुन्नर केलं नाही.
इंद्रायणी ६५ / किलो ठीक मिळाला का ? का महाग मिळाला?
13 Nov 2024 - 9:06 am | प्रचेतस
५० ते ५५ रुपयात मिळायला हवा.
डिंभ्यातून वरती गेलं तर तासा भरात आहुपेसारख्या नितांत सुंदर ठिकाणी जाता येतं.
13 Nov 2024 - 10:41 am | Bhakti
अच्छा आहुपे डिंभे वरती आहे तर,बराच मोठा असणार घाट!
12 Nov 2024 - 11:42 am | कर्नलतपस्वी
खेड,राजगुरुनगर येथे रहात असल्यामुळे दर शिवरात्रीला भोभी ट्रेक जरूर व्हायचा. त्यावेळेस या पेक्षा घनदाट जंगल होते. वाड्याला, अर्थात जुने वाडा येथे संघाच्या दिवाळी शिबीरासाठी जायचो. पुढे दुष्काळ पडला व मॅट्रिक पास असल्याने कळमोडी येथे मिस्त्री म्हणून काही दिवस राज्य शासना करता सेवा दिली. तेव्हां पाझर तलावाचे काम होते पुढे त्याचे कळमोडी धरणात रूपांतर झाले. आता हा जल साठा बर्याच लोकांसाठी जीवनदायी ठरत आहे. एका मोठ्या धरणाच्या पायाभरणीचे श्रेय चित्रगुप्ताने माझ्या खात्यावर नक्कीच नोंदवले असेल. स्वर्गात जागा पक्की केली असावी.
या भागात बरेच वर्षात गेलो नाही.
पुढे ३१ ऑक्टोबर १९८५ ला मंचर,घोडेगाव मार्गे डिंभे धरणाच्या परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तात्पुरत्या नोकरांच्या वसाहतीत गेलो होतो. धरणाचा पायाभरणी व इतर बांधकाम चालू होते. आमचे काका तीथे हिशोबनवीस होते. तारीख पक्की लक्षात कारण इंदिरा गांधी यांचा खून झाला व क्रिकेट मॅच बंद पडली होती.
आपल्या भटकंतीने जुन्या आठवणींचे मोहळ फुटले.
लेख छान आहे पण घाई घाईत त्रोटक लिहील्या सारखा वाटतो.फोटो छान आहेत.आमच्या लहानपणी म्हणजे १९६५-६६ मधे पायवाटा होत्या. डेहणे गावापर्यंत लालपरी व नंतर आकरा नंबरची एक्स्प्रेस.
12 Nov 2024 - 12:04 pm | Bhakti
खुप छान आठवणी आहेत.
मला अजूनही डिंभे धरणाच्या बांधकामाच्या आठवणी सांगणारे मंचरमधले लोकं भेटतात.
12 Nov 2024 - 2:34 pm | चौथा कोनाडा
व्वा.. सुंदर भटकंती....
फोटो छानच... वर्णन मात्र आणखी विस्तृत चालले असते ..
हा परिसर निसर्गरम्य..सुंदर आहे.. ट्रेकिंग ला बेस्ट, फॅमिली ट्रेकिंगला ही उत्तम
मे-जून महिन्याच्या आसपास इथं करवंद फुलते.. काळी मैना करवंदाची मोठी मेजवानी मिळते.. काय टपोरी असतात फळं..
12 Nov 2024 - 3:33 pm | टर्मीनेटर
छान भटकंती 👍
'पुढची जंगल पायवाट' वाला फोटो पाहुन तुंगारेश्वरची आठवण आली...
'
12 Nov 2024 - 7:15 pm | नठ्यारा
भक्तीताई,
पदभ्रमण ( ट्रेक ) आटोपशीर दिसतंय. आमच्यासारख्या कोकणातनं चढून येणाऱ्यांच्या नशिबी हे सुख वा दु:ख नाही. :-)
ते साड्यांचं कुंपण घालून रानडुकरं, माकडं वगैरे पासून पिकांचं रक्षण कसं होत असेल याविषयी उत्सुकता आहे.
शेवटी, तुम्ही खरोखरीच ताई आहात हे पाहून आनंद झाला. मी तुम्हांस स्त्रीनामधरी पुरुष समजून चाललो होतो.
आपला नम्र,
-नाठाळ नठ्या
12 Nov 2024 - 8:27 pm | Bhakti
ते मलापण समजलं नाही,पण घरचे सांगत होते, त्यासाठीच हे कुंपण असेल.
हो ,अनेकदा माझ्या थेट बोलण्यामुळे नवरा म्हणतो तू चुकून मुलगी झाली आहेस ;)
आणि अहो, मी ताई आहे हे केव्हाच सिद्ध झालंय.
12 Nov 2024 - 8:28 pm | Bhakti
चौको आणि टर्मिनेटर धन्यवाद!
13 Nov 2024 - 9:05 am | प्रचेतस
छोटेखानी वृत्तांत आवडला. भीमाशंकर जंगलांचं वैशिष्ट्य म्हणजे प्रचंड मोठमोठे उंच वृक्ष, शेकरूंना घरटी करण्यास आदर्श असे.
गुप्त भीमशंकर वाट सुंदर आहे, मात्र मंदिराच्या मागच्या बाजूला खूप कचरा आहे.