तुंग- तिकोनाजवळच्या अंजनवेलमधील आकाश दर्शनाचा सोहळा!

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
6 Nov 2024 - 9:06 pm

आकाशातला प्रकाशाचा उत्सव!

✪ अखेर धुमकेतूने दर्शन दिलं!
✪ अंधार्‍या आकाशात तार्‍यांची उधळण
✪ गुरू ग्रहावर उपग्रहामुळे पडलेल्या सावलीचा थरार
✪ आकाशात तार्‍यांचा व जमिनीवर दवाचा पाऊस
✪ मोरगिरी किल्ला व घुसळखांब परिसरात भ्रमंती
✪ हजारो वर्षांपूर्वीच्या जगात नेणार्‍या बेडसा लेण्या!
✪ Anjanvel- the week-end spent well!

नमस्कार. नुकताच आकाशातल्या प्रकाशाच्या उत्सवाचा अनुभव घेता आला. पवना धरणाच्या परिसरात व तुंग- तिकोना किल्ल्यांमध्ये असलेल्या अंजनवेल कृषि पर्यटनच्या सुंदर ठिकाणी आकाश दर्शनाचा आनंद घेता आला व इतरांसोबत शेअरही करता आला. त्या अनुभवाचं हे वर्णन. अनेक रात्री ढगांनी व्यत्यय आणल्यानंतर आकाश दर्शनासाठी अखेर २५ ऑक्टोबरला मी व माझा मित्र गिरीश मांधळे अंजनवेलला पोहचलो. तिकोना किल्ल्याचा परिसर! सगळीकडे विराट पण तरीही आल्हाददायक निसर्ग! आकाश दर्शन चांगलं होणार, ह्याची खात्री देणारं नितळ निळं आकाश! पोहचलो तेव्हा अंधार पडायला सुरूवात झाली आहे. पश्चिमेला शुक्र तळपायला सुरूवात झाली आहे. लगबगीने टेलिस्कोप सेट करून धुमकेतूसाठी तयार झालो! हळु हळु खूप अंधुक तारे दिसायला लागले. जसा गडद अंधार झाला तसे अनेक तारे चमकायला लागले! आणि दिसला, धुमकेतू C/2023 A3 (Tsuchinshan-ATLAS) अगदी लवकर अपेक्षित जागी सापडला! ८ इंची मोठा टेलिस्कोप, ४.५ इंची टेलिस्कोप व १५ X ७० बायनॅक्युलरनेही छान दिसतोय. थोड्या वेळाने डोळे सरावले तशी त्याची शेपटीसुद्धा स्पष्ट दिसते आहे. नुसत्या डोळ्यांनी मात्र दिसत नाहीय.

(माझ्या इतर लेखांसह हा लेख इंग्रजीत इथे उपलब्ध )

रात्री आमच्या मित्रालाही धुमकेतू दाखवला. धुमकेतूचा फोटोही गिरीशने मोठ्या टेलिस्कोपने घेतला. मोठ्या टेलिस्कोपमधून त्याचे फीचर्स अजून स्पष्ट दिसत आहेत. जवळाचे अंधुक तारेही दिसत आहेत! वा! पुण्यापासून ५० किलोमीटर अंतरावर असलेलं हे अंजनवेल फार्म हाऊस! २०२३ मध्ये आलेला धुमकेतू C/2022 E3 (ZTF) सुद्धा मला अंजनवेललाच दिसला होता. मात्रा मित्र राहुल जगतापचं हे फार्म हाऊस. अगदी रमणीय अशी जागा. इथल्या आकाशाकडे बघूनच पुढचे दोन दिवस व रात्री उत्तम जाणार आहेत, ह्याची खात्री मिळते आहे! दिवाळीच्या आधीचा शुक्रवार असल्यामुळे इथे तशी शांतता आहे. प्रशस्त हिरवागार परिसर! पण "गार" किती ते खरं पहाटे कळालं! रात्रीच्या जेवणानंतर परत एकदा आकाश निरीक्षण केलं. ह्यावेळी शनी, गुरू, युरेनस, कृत्तिका, मृग नक्षत्र, रोहिणी नक्षत्र, सारथी तारकासमूहातले तारकागुच्छ, देवयानी आकाशगंगा असे इतरही ऑब्जेक्टस बघितले. मोठ्या टेलिस्कोपने दिसणारी शनीची विलक्षण कडी व त्याचे उपग्रह! हा अनुभव इतरांनाही पुढच्या दोन रात्री येणार आहे! रात्री उशीरापर्यंत आकाश दर्शन करून काही तासांसाठी आडवे झालो.

पहाटेचं आकाश बघण्यासाठी साडेचारला उठलो. पूर्वेला सिंह रास वर आलेली दिसतेय! वेगवेगळे तारकागुच्छ, जोडतारे, तारकासमूह बघितल्यावर चंद्र बघितला. टेलिस्कोपने दिसणारे चंद्रावरचे खड्डे! अहा हा! पहाटे गुरूच्या उपग्रहांच्याही जागा बदललेल्या जाणवल्या! ७५ कोटी अंतरावरची ही हालचाल! मोठ्या दुर्बिणीतून गुरू व शनी बघणं ही खरंच पर्वणी आहे. पहाटे व्याध्याच्या दक्षिणेलाही भरपूर तार्‍यांचा पाऊस दिसतोय. आणि अर्थातच कडक थंडी आणि चिखल होईल इतकं पडलेलं दव! टेलिस्कोप व बायनॅक्युलरच्या आयपीसवरही सारखं दव येतंय! पण काय मस्त वातावरण आहे! हळु हळु तांबडं फुटत गेलं! दुर्बिणी आत ठेवून अंजनवेलच्या प्रशस्त परिसरात फेरफटका मारला. सकाळी थोडा आराम झाल्यावर तुंगी रस्ता, मोरगिरी घुसळखांब- विसाखर परिसरामध्ये गाडीने फिरलो! आता पाळी आहे पृथ्वीवरच्या रमणीय दृश्यांची! घनदाट जंगल, हिरवागार निसर्ग आणि बघावं तिकडे डोंगर! तैल बैला व कोराईगडाचा परिसर इथून जवळच. स्तब्ध व अवाक् करणारा निसर्ग! अँबी व्हॅलीचा जलाशय! ही भ्रमंतीही खूप सुंदर झाली! आता ओढ मुख्य कार्यक्रमाची आहे.

धुमकेतू व आकाश दर्शन कार्यक्रम

मी व माझा मित्र गिरीश मांधळे- आम्ही दोघांनी २६ व २७ ऑक्टोबरच्या संध्याकाळी अंजनवेलमध्ये खगोलप्रेमींसाठी हा कार्यक्रम घेतला. पहिलं सत्र साधारण ७ ते ८.३० आहे. त्यामध्ये मुख्यत: धुमकेतूचं निरीक्षण, खगोलाबद्दल काही बाबींवर चर्चा व इतर काही ऑब्जेक्टस असं स्वरूप आहे. त्यानंतर रात्री जे थांबतील, त्यांना रात्रीच्या जेवणानंतर परत एकदा आकाश दर्शनाचा आनंद घेता येईल. २६ च्या संध्याकाळीही आकाश उत्तम आहे. त्यामुळे परत एकदा धुमकेतू बघण्याचा आनंद घेता तर आलाच, पण इतरांसोबत शेअरही करता आला. फक्त फोटो मात्र घेता आले नाहीत. अगदी डीएसएलआर सोबत ठेवूनही फोटो मात्र राहून गेला. पण आकाश दर्शनाचा भाग चांगला झाला. आकाश अगदी अंधारं असल्यामुळे धनु रास व मावळणारी मंदाकिनी आकाशगंगाही पुसटशी दिसतेय! अंजनवेलमधील मंडळी, इतर लोक आणि खास ह्या कार्यक्रमासाठी आलेले लोक अशा सगळ्यांनी आनंद घेतला. त्यामध्ये विशेष उल्लेख वरद चांदूरकर ह्या आठवीतील विद्यार्थ्याचा करावा लागेल. त्याने त्याचा छोटा टेलिस्कोपही आणला आहे! त्यामधून त्याने शनी व इतर ऑब्जेक्टस बघितले! विशेष म्हणजे त्याने आकाशगंगेचा व धुमकेतूचाही फोटो छान घेतला. आवड अनेकांना असते, पण विषयाची खोली व समज त्याच्याकडे बघून जाणवते आहे. त्याला तारकासमूह, आकाशातलं स्थान, निरीक्षणाच्या पद्धती असं चांगलं ज्ञान आहे. अशा मंडळींसोबत आकाश दर्शन सत्राचा अनुभव नेहमी छान येतो!

धुमकेतूबरोबर शनी, अँड्रोमिडा गॅलक्सी, बायनॅक्युलरने आपल्या आकाश गंगेच्या पट्ट्यातले काही तारकागुच्छ, अभिजीत तार्‍याच्या जवळ इप्सिलॉन लायरा जोडतारा, अल्बिरो जोडतारा असे इतर ऑब्जेक्टही बघितले. गिरीशने पॉईंटरच्या मदतीने दिसणार्‍या ठळक तारकासमूहांची माहितीही करून दिली. आकाशात इतके जास्त- अगदी शेकडो- तारे बघून लहानांबरोबर मोठेही हरखून गेले आहेत. शनीचं मंत्रमुग्ध करणारं दृश्य परत परत सगळ्यांना बघावसं वाटतंय!

गुरू ग्रहावर उपग्रहामुळे पडलेली सावली!

भोजनानंतरच्या (अंजनवेलमधलं भोजन- नाश्ता अप्रतिम हे सांगायला नको) रात्रीच्या सत्रामध्ये अजून एक दुर्मिळ दृश्य बघता आलं! मोठ्या दुर्बिणीतून गुरूचे चार उपग्रह, त्याच्यावरचा विषुवृत्तीय पट्टा दिसतोच. चांगल्या प्रोसेस केलेल्या फोटोमध्ये त्याच्या तो तांबडा डागही दिसतो. पण प्रत्यक्ष बघताना ह्यावेळी गुरूवर चक्क एका उपग्रहाची सावली पडलेली दिसली! एक काळा ठिपका गुरूच्या पृष्ठभागावर दिसला! आणि थोड्या वेळामध्ये तो सरकून नाहीसासुद्धा झाला! एक प्रकारचं गुरूच्या त्या छोट्या भागामध्ये झालेलं हे सूर्यग्रहण! हा विलक्षण अनुभव इथे घेता आला!


.

.

.

.

.

रात्र पडत गेली तशी हळु हळु थंडी पडत गेली! गुरू, शनी, कृत्तिका तारकागुच्छ, रोहिणी नक्षत्र, मृगातला तेजोमेघ, अँड्रोमिडा गॅलक्सी, सारथीमधले तारकागुच्छ असे इतर ऑब्जेक्टस बघता आले. असं सलग दोन रात्री आकाश दर्शन झालं. पहाटे उठून पहाटेचे ऑब्जेक्टस बघितले! पहाटेच्या दवाचा चिखल बघून काही जणांना वाटतंय की, पाऊस पडला की काय! अर्थात् रात्री तार्‍यांचा व पहाटे दवाचा पाऊस पडलाच आहे! सकाळी सूर्य वर आल्यानंतर दुर्बिणीवर सौर फिल्टर वापरून सूर्यावरच्या डागांचंही निरीक्षण करता आलं! दर ११ वर्षांनी सूर्यावरचे डाग वाढतात. असे अनेक डाग छान दिसत आहेत! तेजोमय अशा सूर्यावरही डाग आहेत! हे डाग म्हणजे वस्तुत: किंचित कमी प्रकाशित ज्वाळा. इतर ज्वाळांच्या तुलनेत त्या काळ्या भासतात. पण हे डागही चंद्रावरच्या खड्ड्यांइतकेच सुंदर दिसतात. आणि आणखी जास्त झूम करून बघताना तर सूर्य हा एक नारिंगी ग्रहच दिसतो, त्याची जणू जमीन दिसते, डागांसह जणू विवरही दिसतात! हासुद्धा एक वेगळा अनुभव ह्यावेळी घेता आला.

दोन हजार वर्षं जुन्या बेडसा लेण्या!

सकाळी थोडा आराम झाल्यावर परत फेरफटका मारला. ह्या सत्रासाठी आलेल्या गिरीशच्या आई- बाबांना सोडण्यासाठी गाडीने कामशेतपर्यंत गेलो. वाटेमध्ये बेडसा लेण्या हे विलक्षण आश्चर्य बघता आलं! ट्रेक म्हणून अगदी छोटी पायर्‍यांची वाट. वेरुळच्या कैलास मंदिराप्रमाणे एका मोठ्या खडकामध्ये कोरून बनवलेल्या ह्या लेण्या! दोन हजारहून अधिक वर्षं जुन्या! काय तो काळ असेल, केवढी मोठी त्या काळातली लोकं असतील! इतक्या मोठ्या निर्मितीसाठी केवढी दानत असेल, केवढी वैज्ञानिक व अभियांत्रिकी तयारी असेल! चैत्यगृह आणि स्तूप! ह्या विहारामधल्या छोट्या कक्षांमध्ये किती लोकांनी ध्यान केलं असेल! गुहेच्या वर जाण्यासाठी खडकात कोरलेल्या खाचा! खरोखर आपल्या पुढच्या शंभर- दोनशे पिढ्यांचा विचार करणारे किती मोठ्या मनाचे लोक असतील हे! खूपच विलक्षण! बेडसा गावामध्ये चालू असलेली डीजे पार्टी आजचा वर्तमान दर्शवतेय तर ह्या गहन लेण्या वैभवशाली गतकाळ दर्शवत आहेत! लेण्यांच्या द्वारामधून लोहगडासह दूरवरचा टप्पा नजरेत येतोय! खरंच, किती सुंदर योग आला इथे येण्याचा! पण जाऊन आराम करायचा असल्यामुळे फार निवांत थांबता आलं नाही.

विराट दर्शन घडवणारं आकाश

दुसर्‍या संध्याकाळी आकाश चांगलं आहे. धुमकेतू व इतर ऑब्जेक्टस बघता आले. आकाशात थोडे विरळ ढग आहेत, त्यामुळे धुमकेतू किंचित अंधुक दिसला. अँड्रोमिडा गॅलक्सीही थोडी पुसट दिसली. पण २२ लाख प्रकाश वर्षं अंतरावरची ही आपली शेजारची आकाशगंगा! आपण किती क्षुल्लक आहोत ही जाणीव करून देणारी! आपण किती क्षुल्लक आहोत ही जाणीवही करून देते व आपण किती विराट आहोत, हेही सांगते! कारण आपल्या चिमुकल्या १२ मिलीमीटरच्या डोळ्यांनीसुद्धा अजून चांगल्या आकाशात आपण ही २२ लाख प्रकाशवर्षं अंतरावरची आकाशगंगा बघू शकतो! ह्याहून मोठं आश्चर्य काय असेल!


.

.

.

.

.

.

.

Anjanvel- the weekend spent well!

असा हा सोहळा दोन रात्री रंगला! तेजाचा उत्सव! त्याबरोबर सूर्यावरचे डाग व गुरूवरच्या सावलीच्या रूपाने सावलीचाही खेळ बघता आला! त्याबरोबर अंजनवेलमध्ये नितांत रमणीय परिसराचाही तितकाच आनंद घेता आला. इथे फिरायला खूप छान परिसर आहे. झरा, रांजण खळगे, ट्रेल वॉकसाठी पायवाट, आसपास तिकोना- तुंग किल्यासारखे ट्रेक, आजिवली देवराईची वाट, व्याघ्रेश्वर मंदिर असा मोठा पंचपक्वान्नाचा मेनू आहे! अंजनवेल फार्म हाऊसच्या आतला परिसरसुद्धा खूप देखणा आहे. झर्‍याचा आनंद घेत व निसर्गामध्ये रममाण होण्यासाठी ठेवलेल्या खुर्च्या, विविध झाडांद्वारे केलं जाणारं निसर्ग संवर्धन असं खूप काही इथे आहे! त्यासोबत अगदी घरगुती अगत्य, स्वादिष्ट जेवण असं खूप काही आहे. इथला जमिनीवरचा व आकाशातला निसर्ग असा विलक्षण आहे.

तर हा सोहळा तीन दिवस व तीन रात्री अनुभवता आला. बेडसा लेणीच्या रूपाने आणखी वेगळा अनुभवही घेता आला. मित्रासोबत सत्र घेण्यासह भरपूर फिरताही आलं! तिथले फोटोज वर दिलेल्या लिंकवर बघता येतील. वर दिलेल्या ब्लॉगवर माझे इतर लेखही वाचता येतील.

(वाचल्याबद्दल धन्यवाद! जवळच्यांसोबत लेख शेअर करू शकता. माझ्या ब्लॉगवर माझे आकाश दर्शनाचे अनुभव वाचता येतील. त्यासह तिथे ट्रेकिंग, सायकलिंग, रनिंग, ध्यान इ. बद्दलचे माझे लेख वाचता येतील. तुम्हांला अशा उपक्रमांचे अपडेटस हवे असतील तर संपर्क करू शकता. निरंजन वेलणकर ०९४२२१०८३७६. लेख लिहील्याचा दिनांक ६ नोव्हेंबर २०२४.)

प्रवासभूगोललेखअनुभव