फुलपाखरू

मिडास's picture
मिडास in जनातलं, मनातलं
19 Oct 2024 - 12:51 pm

ऐन पावसाळ्यातला माळशेज घाट. बाकीचे मित्र मैत्रिणी इथे तिथे पांगले होते . मस्त हिरव्यागार धुक्यात ती आणि मी दोघे चाललो होतो. एका जलाशयाच्या काठच्या दगडावर जागा बघून आम्ही दोघे बसलो. त्या पाण्यावर पण धुक्याचा हलकासा तवंग पसरला होता. अचानक ते धुकं दाट होऊन आमच्या अवतीभोवती पसरलं . दुरून पावसाचा आवाज ऐकू येत होता. मंजुळ पाय वाजवत तो पाऊस हलकेच जवळ येऊन आम्हाला मिठीत घेतो. त्या गर्द धुक्याच्या मिठीमध्ये मी, ती, तो जलाशय आणि फक्त आमच्या करता पडत असलेला पाऊस. ती माझ्या जवळ होती पण आणि नव्हती सुद्धा. एकमेकांच्या हृदयाची धडधड त्या पावसाच्या आवाजात मिसळून गेली होती. आठवणींच्या कुपीतल्या त्या क्षणाचा गंध अजून दरवळतोय मनात. आज इतक्या वर्षांनी हे लिहिताना सुद्धा काटा फुललाय अंगावर. तो क्षण रुतून बसलाय काळजात.

आमच्या नात्याला नाव काय हे विचारायचा हक्क आम्ही कुणालाच दिला नव्हता आणि त्या नात्याला नाव द्यायची गरज ना कधी मला भासली ना तीला. जेव्हा आमची ओळख झाली त्या वेळेला आम्ही दोघे पण शिक्षण आणि career च्या रेषेवर घुटमळत होतो. IT मध्ये हमाली करत असल्यामुळे नव्या technology बद्दल माहिती करून घेणं हे तेव्हा आवश्यक वाटत होतो. जगाचे टक्के टोणपे खात होतो पण कातडी अजून निबर झाली नव्हती. अश्या अडनिड्या काळा मध्ये आम्ही भेटलो. म्हटलं तर आम्ही सोबतीनेच वयात आलो. स्त्री म्हणून तिच्याबद्दल वाटणारं आकर्षण नाकारण्याचा दुटप्पी पणा तर कधी केला नाही मी पण त्याला जाहीर करण्याचा मूर्खपणा पण नाही केला कधी. तरी हि शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले. ती होतीच... सॉरी आहेच तशी. भारावून टाकणारी. आज इतक्या वर्षांनी एक निर्ढावलेपण येऊन देखील तिच्या समोर सगळेच मुखवटे गळून पडतात माझे. स्त्री -पुरुष नात्यामधले सगळेच ताण तणाव आम्ही भोगले स्वतंत्र पणे. आणि आपला खाजगी कप्पा पण कधीतरीच उघडला आम्ही एकमेकांसमोर. अपुऱ्या नात्यामध्ये कसली भीती ही नसते आणि असुरक्षितता सुद्धा. तरी पण पालथ्या मुठीवर बसलेल्या फुलपाखराला जपावं तसाच जपला आम्ही एकमेकातला बंध.

आज इतक्या सहज मी हे म्हणतोय खरं पण सांगण्यापूरतं नातं कधी नव्हतंच आमच्यात आणि अजूनही नाही. नातं म्हटलं कि manipulate करणं आणि स्वतःहून होणं हे अपरिहार्य असतं.कितीही नाही म्हटलं तरी दिल्या घेतल्याचा हिशोब मांडणं असतं. फक्त नात्यातच नाही पण एकूणच आयुष्यात आलेल्या व्यक्तीच्या उपयुक्ततेला जोखून ओळख वाढवायचा किंवा थांबवायचा व्यवहारिपणा आपल्यात मुरलेला असतोच. पुढे मागे कधीतरी उपयोगी पडेल म्हणून संबंध जोपासून ठेवायचा कोरडा ठाक उपचार मी कधीच फाट्यावर मारला होता. पण फक्त कुणाच्या अस्तित्वाने नितळ आनंद व्हावा अशी व्यक्ती आयुष्यात असणं या सारखा सुरेख अपघात नाही. आमची झालेली ओळख हा निव्वळ अपघातंच होता. पण त्या अपघाताची जखम कधी भरलीच नाही. किंवा त्या जखमेला गोंजरताना होणाऱ्या अतीव सुखाच्या लालसेने मीच ती जखम भरू दिली नाही असं म्हणणं जास्त योग्य ठरेल.

अजूनही आम्ही खच्चून भांडतो. किंबहुना आता आता तर आम्ही एकमेकांशी भांडण्याची अत्यंत फुटकळ कारणं शोधून भांडतो. पण कुठे तरी आम्ही स्वतःलाच जोखून तपासून घेतोय. आहे धागा अजून बराच बळकट आहे बरं का ही जाणीव सुखावणारी आहे हे नाकारण्यात अर्थ नाही हे खरंच. जवळ 10-12 वर्षाच्या सहवासात एकमेकांना जाणून स्पर्श करायचा मोह देखील नं होणं पण जे काही भावताल उजळून टाकणारे क्षण आमच्या आयुष्यात आले त्यातल्या बहुतेक वेळी त्या क्षणांचे एकत्र साक्षीदार होणं याच्या दोन अंगूळ पलीकडे जाऊन उरतोच कि आम्ही एकमेकांसाठी.

खरं तर पूनम (हे अस्सं होतं माझं. फुलपाखरू म्हणून तिची सावली इतकी घट्ट रुतली आहे कि तिचं खरं नाव आठवतंच नाही मला ) परप्रांतीय असल्यामुळे आणि आता तर खरोखरची परप्रांतीय झाल्यामुळे तीला हे सगळं आकळण्याची सूतराम शक्यता नाही. पण तरी देखील माझ्या रस्त्यात तिच्या उमाटलेल्या पाऊल खुणेच्या बदल्यात तिच्या अत्यंत स्नेहाने भरलेल्या नजरेच्या बदल्यात वरील पांढऱ्यावर काळं तिलाच भेट.

मुक्तकप्रकटनअनुभव

प्रतिक्रिया

कंजूस's picture

19 Oct 2024 - 4:15 pm | कंजूस

हं.

प्रसाद गोडबोले's picture

19 Oct 2024 - 10:21 pm | प्रसाद गोडबोले

छान लिहिलं आहे.
सत्य कथा आहे की काल्पनिक माहित नाही, पण आपल्या भावना पोहचल्या.
लिहीत रहा.
शुभेच्छा

श्वेता२४'s picture

20 Oct 2024 - 8:05 pm | श्वेता२४

फक्त कुणाच्या अस्तित्वाने नितळ आनंद व्हावा अशी व्यक्ती आयुष्यात असणं या सारखा सुरेख अपघात नाही.
खूप छान...... तरल आणि ओघवतं लिहीलं आहे....आवडलं