✪ अरंगेत्रम- शिष्याची परीक्षा व जगामध्ये प्रवेश करण्यापूर्वीचा 'अंतिम पग'
✪ अनुभवावेत असे शब्दम्, वर्णम्, किर्तनम्, तिल्लाना आणि मंगळम्
✪ सुंदर ते ध्यान आणि ओंकार स्वरूपा!
✪ वर्षानुवर्षाच्या मेहनतीचं- दृढसंकल्पाचं प्रेरणादायी उदाहरण
✪ परभणीच्या वैष्णवीची मोठी स्वप्ने आणि झेप
✪ कडक गुरू- वरी घालतो धपाटा आत आधाराचा हात
✪ नृत्य आणि संगीत- विचार थांबवणारा अनुभव
✪ स्नेहीजन व गुरूजनांचा मेळा
When a disciple is ready, Guru appears. When the disciple is really ready, the Guru disappears! नुकतीच गुरूपूर्णिमा होऊन गेली आहे. गुरू- शिष्यांचं नातं, त्यातले विविध अविष्कार आणि गुरूकुल काय असतं, हे बघण्याचा एक सोहळा आज २८ जुलै रोजी परभणीमध्ये अनुभवता आला. निमित्त होतं गुरू स्वप्ना रत्नाळीकर कुर्डूकर ह्यांच्या रुख्मिणीदेवी कलाक्षेत्राच्या शिष्या कु. वैष्णवी कापरे हिच्या अरंगेत्रम- नृत्य योग सोहळ्याचं. अरंगेत्रम म्हणजे भरतनाट्यामध्ये शिष्य तयार झाला आहे ह्याची अंतिम परीक्षा व त्याचं जगामध्ये पदार्पण व त्यासाठी शिष्याला आशीर्वाद देण्याचा सोहळा. कु. वैष्णवीची माझ्यासाठीची ओळख म्हणजे सहावीला इंग्लिशचे शब्द पाठ करायला सांगून रडवणा-या माझ्या शिक्षिका तनुजा कापरे आणि पी. टी. मुळे मला घाबरवणा-या माझे शिक्षक बाळकृष्ण कापरे ह्यांची ती कन्या! पण ती त्यांची मुलगी असण्याहूनही खूप मोठी आहे हे ह्या कार्यक्रमात हळु हळु उलगडत गेलं. अगदी थोडक्यात सांगायचं तर वैष्णवी एकाच वेळी आर्ट ऑफ लिव्हिंगची साधिका, योग शिक्षिका, आर्किटेक्ट इंजिनिअर, नृत्यांगना आणि इतरही खूप आहे. लहान वयापासून तिने घेतलेला ध्यास, केलेली मेहनत आणि प्रयत्नांमधलं सातत्य जाणवत होतं. माझे सर आणि मॅडम ह्यांनीही तिला किती उत्तेजन दिलं आहे, किती संधी दिली आहे हेही कळत होतं. अनेक वर्ष इतकी मेहनत घेण्याचं, सातत्याने परिश्रम करत राहण्याचं हे उदाहरण आजच्या काळात प्रेरणादायी म्हणावं लागेल.
कार्यक्रम तर बहारदार होताच, पण तिथेच असंख्य गुरूजन भेटले. अगदी लहान वयापासून महाविद्यालयापर्यंतचे शिक्षक भेटले. समस्त गुरूजनांबद्दल कृतज्ञता मनात आली. परभणी हे तसं पूर्वीच्या काळातलं छोटंच गाव. त्यामुळे जुन्या ओळखीचे अनेक जण भेटले. त्या दृष्टीनेही सोहळा अविस्मरणीय वाटला. त्याशिवायही अनेक प्रकारे हा कार्यक्रम वेगळा वाटला. अगदी सूत्रसंचालिकेपासून ते फोटोग्राफरपर्यंत सर्वांचा आवर्जून उल्लेख व सन्मान केला गेला. विशेष म्हणजे फोटोग्राफरसुद्धा स्वत: नृत्य साधिका होत्या! मृदंगम, बासरी, व्हायोलीन व दिग्गज गायकांची साथ, प्रकाश योजना, नेटकं सूत्र संचालन, मोजकी मनोगते ह्यामुळेही सोहळा छान झाला. सूत्रसंचालनामधली एक गोष्ट भावली की, मंचावर अनुभवी बुजुर्ग मंडळी होती, त्यांच्या कार्याचा उल्लेख केल्यानंतर त्यांनाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात होत्या. वैष्णवीच्या वाटचालीत तिला मदत करणारे, संगीत क्षेत्रातले इतरही दिग्गज उपस्थित होते. एका व्यक्तीची मात्र अनुपस्थिती जाणवली. ते म्हणजे चित्रपट क्षेत्रातील एडिटर आणि परभणीकर असलेले सौमित्र धारासूरकर.
वैष्णवीच्या सादरीकरणाबद्दल बोलण्याच्या आधी तिच्या गुरू स्वप्ना रत्नाळीकर- कुर्डूकर ह्यांच्याबद्दल बोलेन. त्याही तशा ओळखीच्याच. माझे गणिताचे आवडते शिक्षक रत्नाळीकर सर ह्यांच्या त्या कन्या व माझ्या दोघा बहिणींच्याही त्याच भरतनाट्यम् गुरू! अगदी त्यांचं रुख्मिणीदेवी कलाक्षेत्र हे आधुनिक गुरूकुल म्हणता येईल असं कार्य करत आहे. त्यांच्या मनोगतामधून वैष्णवीने केलेली मेहनत, एका वेळेस आर्किटेक्चर करू का नृत्य करू असा तिच्यासमोरचा संघर्ष, कडक गुरूसमोर शिष्याची रोज होणारी परीक्षा व धडपड हे उलगडलं. गुरू कच्च्या मडक्यावर बाहेरून घाव घालतो पण आतून मायेचा हातही देतो. त्यांनी वैष्णवीला किती तयार केलं आहे, हे कार्यक्रमातून सतत जाणवत गेलं, उलगडत गेलं. त्यांनी वैष्णवीला सतत इतके प्रयत्न करायला लावले, इतके एफर्टस घ्यायला लावले की, आज तिचं सादरीकरण हे सहज- एफर्टलेस झालं आहे.
अरंगेत्रम किंवा भरतनाट्यम् हा ९५% लोकांसाठी परका प्रांत! त्यामुळे सुरूवातीला समोर नक्की काय सादर होणार आहे हे कळत नव्हतं. पण तयारी, व्यवस्था, आकर्षक रांगोळी व सगळ्यांची मेहनत बघून अंदाज येत होता. मंत्रोच्चारासह झालेल्या पूजेनंतर कार्यक्रमाची सुरूवात झाली! गायन व वादन करणारे साथीदार व वैष्णवीचं एकल भरतनाट्यम् असं स्वरूप. पहिल्या नृत्यापासूनच तिने तिची तयारी दाखवली. आधीच सेट होऊन आलेला फलंदाज! नृत्य आणि तेही इतका वेळ करणं हे प्रचंड थकवणारं आहे. नृत्य हा तसा खूप दमछाक करणारा व्यायाम! पण हे सादरीकरण करताना वैष्णवीच्या चेह-यावर एकदाही थकवा जाणवला नाही. थोडा वेळ उभे राहिले तरी अनेक जण धापा टाकतात. पण तिची प्रसन्न मुद्रा, स्मित हास्य व सूक्ष्म हावभाव, एका लयीतील कृती, नृत्यातील रिदम, फ्लो, नजाकत आणि संतुलन अगदी जाणवत होतं.
खरं तर इतक्या लोकांसमोर आणि इतक्या मोठ्या मंचावर सादर करताना खूप अस्वस्थता मनात येऊ शकते, खूप ताण येऊ शकतो. पण कुठेच वैष्णवीच्या मुद्रेवर तो ताण जाणवत नव्हता. आणि ह्याचं कारण नंतर ती योग साधिका आहे, ध्यान करणारी आहे हे कळालं तेव्हा उलगडलं. स्थिरम् सुखम् आसनम् तसा तिचा प्रत्येक अविष्कार स्थिर, सहज, सुखद आणि कमालीचा संतुलित होता. आणि मुद्रा, अभिव्यक्ती (एक्स्प्रेशन्स), हाव- भाव, पदलालित्य, हातांची- डोळ्यांची भाषा हे सर्व अतिशय संतुलित आणि समतेमध्ये होतं. नंतरच्या अविष्कारांमध्ये वेगवेगळ्या भावना- कधी रुसवा, कधी तक्रार, कधी अधीरता, कधी क्रोध, कधी आक्रमकता हेसुद्धा तिने सहजपणे सादर केले. सुंदर ते ध्यान तर मंत्रमुग्ध करणारं झालं. वर्णम् आणि किर्तनसुद्धा दर्शकांना खिळवून ठेवत होते.
भो शंभो किर्तनामध्ये तर अक्षरश: एकपात्री कथाकथन सादर झालं! एक अख्खी कथा विलक्षण जीवंतपणे सादर केली! पाच बाण मारणारा मदन, शिवाचा क्रोध आणि पार्वतीची आर्तता! कामवासनेला भस्म करणारं शिवाचं तृतीय नेत्र- अर्थात् संकल्प शक्तीच्या बळावर मनावर केलेली मात. हे सगळं करताना वैष्णवीने किती सखोल तयारी केली असेल व तिच्या कडक अक्कांनी तिचं गुरूपण कसं निभावलं असेल हेही कळत गेलं. भरतनाट्यममध्ये असलेल्या संस्कृत व तमिळ पंक्ती, वादन व शैली ह्यांचाही गोडवा जाणवत होता. शब्द कळत नसले, प्रकारांचे तपशील कळत नसले तरी त्यातला भाव आणि गोडवा कळत होता. त्याबरोबर व्हायोलिन आणि ओंकार स्वरूपासारख्या वेगळ्या पद्यासोबतचं मिश्रण (फ्युजन) सुद्धा अप्रतिम झालं.
असा हा सोहळा अनेक तास रंगला. मध्यांतरानंतरसुद्धा भरत नाट्यमशी परिचित नसलेले लोकही मोठ्या प्रमाणात उत्तरार्धासाठी थांबले. हे सादर होत होतं ते इतकं सखोल आणि सूक्ष्म होतं, की सहजपणे मनापर्यंत पोहचत होतं. त्याशिवाय अप्रतिम प्रकाश व्यवस्था, बासरी, मृदंगम, व्हायोलिन वाद्यांची व गायकांची साथ ह्यामुळे मध्ये मध्ये तर श्रोते स्तब्ध होत होते. कधी कधी तर विचार थांबत होते, श्वास रोखला जात होता. अप्रतिम असं तिल्लाना सादर केल्यानंतर वैष्णवीने मंगळम् सादर करून सर्वांच्या मंगलाची प्रार्थना केली. सर्वांच्या आशीर्वादाबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली. असा हा सोहळा अविस्मरणीय ठरला!
अनेक वर्षांच्या सातत्याचं व दृढसंकल्पाचं फळ आता वैष्णवीला मिळतं आहे. भारताबाहेरही ती आता आपली कला सादर करणार आहे. किंबहुना प्राचीन भारतीय भरतनाट्यमचा प्रसार हेच तिने तिचं उद्दिष्ट ठेवलं आहे. तिची तयारी, तिचं दणदणीत शिष्यत्व व तिला लाभलेले अनेक गुरू ह्यांच्यामुळे तिचं उद्दिष्ट ती निश्चितच गाठू शकेल. तिला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. पुनश्च सर्व गुरूजनांना वंदन व त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. हे वाचल्याबद्दल धन्यवाद.
निरंजन वेलणकर, 28 जुलै 2024. 09422108376. हा लेख इंग्रजीमध्येही उपलब्ध आहे. धन्यवाद.
प्रतिक्रिया
29 Jul 2024 - 12:02 pm | Bhakti
लेकी मुळे मीपण भरतनाट्यम जवळून समजून घेतेय,तिच्यामुळे
ही कला, त्यांचे मला सुंदर रसग्रहण करायला मिळत आहे.