घरटे -२ : सत्यकथेवर आधारित!!

चेतन१२३प's picture
चेतन१२३प in जनातलं, मनातलं
23 Dec 2008 - 10:43 pm

त्यावेळी मी नुकताच सायनरला राहायला आलो होतो. अंजली अजून पाळण्यात होती. नवीन बांधकामाचे व्रण अजून शिल्लक होते.
दिवाळीमध्ये रंगकाम केल्यामुळे येणाऱ्या एका वेगळ्याच सुगंधाची अनुभुती तेथे येत होती. नवीन वस्ती, नवीन लोक असल्यामुळे आमची अवस्था गोंधळल्यागत होती.
अंजलीच्या आईच्या मदतीने लवकरच सर्वत्र ओळख झाली. जवळपास राहणारे जवळपास लोक मध्यमवर्गीय असल्याने माझ्या खिशाला हिच्या मागण्यांची प्रेमळ "उब" मिळणार नाही या उद्देशाने मी मनोमन खूश होतो. कारण, इतरांजवळ आहे पण आमच्याजवळ नाही अशी एखादीच उंची वस्तू ती शेजारी बघू शकत होती. सायनरमध्ये मी आनंदी होतो. पण, एकाच वेळी एकाच गोष्टीमुळे पति-पत्नी आनंदी
झाले तर भांडण होणार नाही. भांडल्याशिवाय नवरा बायकोची जोडी...

संसारबैलगाडीच्या , आयुष्याच्या कठिण, संकटरुपी काटे सर्वत्र असणाऱ्या, दुःखरूपी खड्डे ठिकठिकाणी खोलवर पडलेल्या रस्त्यावर, इच्छेचा चाबूक मनाच्या हाथी देऊन, आशेची साखळी पायात बांधून, स्वप्नांची बाशिंगे बांधून, समांतर न जाता, वाकड्या-तिकड्याच जाण्यातच धन्यता मानणाऱ्या, असमान (एककृश आणि दुसरा जाड ) भासणाऱ्या, असमान वजन बुद्धिरुपी खांद्यावर धारणा करणाऱ्या बैलाच्या जोडीप्रमाणे कशी बरे शोभेल?????

अचानक, आमच्या सौला सायनरचा कंटाळा आला. कारण काय तर, म्हणे, घरासमोरची सायनरची चाळ. वास्तविक पाहता, सायनरच्या चाळीचा आमच्याशी तीळमात्रही संबंध नव्हता. ती रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला होती. तेथील लोकांचे येणे जाणे देखील वेगळ्याच रस्त्याने व्हायचे. "पैशात खेळणारा" म्हणून चाळीजवळ राहू नये असे थोडेच आहे. बँकेत कॅशिअर म्हणून "पैशात खेळणारा" असे माझी सौ मला प्रेमपूर्वक आणि हेतुदर्शक टोमणा मारायची. तो नाही समजला असे दाखवले तर "साधे एका तोळ्याचे दागिने करत नाहीत" असा स्पष्ट उद्देश्शोल्लेख व्हायचा. सायनरसारखी जागा भूकंप येइस्तोवर सोडायची नाही ही माझी "भीष्मप्रतिज्ञा" आधीच झाली होती. ही प्रतिज्ञा करताना, बोहोल्यावर चढताना घेतलेल्या 'इथून पुढे आयुष्याचा प्रत्येक निर्णय दोघेही मिळूनच घेऊ' ह्या शपथीचा शपथिने स आठवण विसर मला पडला होता.

काही दिवसानंतर आमच्या शेजारी एक नवीन कुटुंब राहायला आले. त्यांचे येणे माझ्यासाठी हर्षदायक ठरले. कारण, तेंव्हापासून माझ्या सौची रेडिओपेक्षा माझ्याशी जवळीक वाढली. हे नव्हे हे'च' घर माझे आहे हे मला पटवून देण्यात येऊ लागले. मला या घरामध्ये मान आहे स्थान आहे हे नवीन ज्ञान मला मिळू लागले. इतकेच नव्हे भाज्यादेखील मसालेदार होऊ लागल्या. माझी बायको सुगरण आहे हे मला लग्नानंतर
तीन वर्षांनी कळले. हे सगळे घडले "स्पर्धेमुळे". आपला नवरा अगदीच भोळा किंवा शुद्ध शब्दात सांगायचे तर मूर्ख आहे असे मानणाऱ्या बहुतांश भारतीय स्त्रियांना सोडून उरलेल्या बायकांमध्ये गणना न होणाऱ्या माझ्या बायकोची अवस्था बघण्यासारखी झाली होती. तिच्या नुकत्याच जमलेल्या मैत्रिणीला तिच्या नवऱ्याकडून तिला आलेल्या 'विचित्र' अनुभवामुळे, शेजारच्या मिसेस गोंडसे दिसायलाच नव्हे तर बोलायलादेखील "अतीव सुंदरम् ।", गोंडस आहे, असे मला वाटते, असा स्वतःच समज माझ्या सौ ने माझ्याविषयी करून घेतला.
आता आपला नवरा आपल्या मुठीत तर सोडा बाहुपाशात तरी राहतो की नाही याची माझ्याच घरी नाही तर प्रत्येकच घरी असलेल्या सौला भीती वाटू लागली. मला वेगवेगळ्या प्रकाराने अप्रत्यक्षरित्या "पर'धनम्' न पश्य।" हे पटवून देण्यात आले. काही दिवसानंतर मात्र प्रकरण आपसूकच निवळले.

गोंडसे नावाच्या वेलीवर एकच छोटेशे, गोड फुल उगवले होते- 'नचिकेत'. त्यावेळी नचिकेत चार-पाच वर्षांचा असावा. एक-दोन महिने आणि बारा-चौदा दिवस मागेपुढे. उपनिषदांनी श्रेष्ठ मानलेला, साक्षात यमदेवाला प्रश्न विचारून निरुत्तर करणारा बुद्धिवान नचिकेतही असाच असला पाहिजे अशी माझी बायको मला एकदा अगदी ठाम म्हणाली. एकदा सुट्टीच्या दिवशी क्रिकेटची मॅच आणि हिचा गाण्यांचा कार्यक्रम एकाच वेळी वेगवेगळ्या स्टेशनवर येत होता. मी क्रिकेट सोडण्यास तयार नव्हतो आणि ती गाणी. मी सरळ रेडिओ हातात घेउन कानाला लावून बसलो. एवढ्यात तेथे छोट नचिकेत आला. त्याला छोटा समजून मी मोठी चुक केली. त्याने रेडिओपासून प्रश्न विचारण्यास सुरुवात केली तो सॅटेलाइटपर्यंत. शेवटी मी कंटाळून निरुत्तर झालो. आपले अज्ञान लपविण्यासाठी मी सरळ घरातून बाहेर पडलो.

"पती परमेश्वरम् भवति।" या उक्तिन्वये भारतीय स्त्रियांना पतिमध्ये कुठला "देव" दिसतो याचा मला त्यादिवशी साक्षात्कार झाला. तरिही त्यातला मला उद्देशिलेला "यम" हा "काळ" नसून भगवान पतंजली उल्लेखित योगदर्शनामध्ये नमुद केलेल्या अठरा योगांपैकी एक -राजयोग, त्यातील आठपैकी अगदी पहिलिच पायरी "यम" हा आहे असे मी स्वतःला समजाविले. कारण, हिच्याबरोबर संसार करताना,
यमामध्ये अपेक्षित असणाऱ्या सत्य(खर्चाच्या बाबतीत कुठलीही गोष्ट लपवून न ठेवणे), अहिंसा, अस्त्येय, अपरिग्रह(संपुर्ण पगार पहिल्याच दिवशी तिला देणे म्हणजे अपरिग्रह) या चारही गोष्टिंमध्ये मी सिद्धपुरुष झालो होतो. ब्रम्हचर्य तेवढेच सुटले. तेदेखिल तिच्यामुळेच म्हणून त्यास माफी. त्यामुळे ती मला "यमाचा देव" संबोधत असावी.

नचिकेत लहानपणापासुनच हुशार. स्वभावाने शांत आणि विचारी. निश्चितच मिस्टर गोंडसेंनी खुप पुण्य केले असेल म्हणुनच इतकी लाघवी बायको आणि मनोहर मुलगा मिळाला होता. केवळ अभ्यासच नव्हे तर चित्रकलेतही तो मास्टर होता. वयात आल्यानंतर त्याला गाड्यांचा फारच नाद लागला. प्रत्येक गाडीविषयी माहिती मिळवणे, ती चालवून बघणे हा त्याचा छंद होउन बसला. वयाबरोबर त्याची बुद्धिदेखिल वाढतच गेली. तो शरीराने धष्ठपुष्ठ आणि बुद्धिने सुदृढ बनला. छान ऑटोमोबाईल कंपनीमध्ये मोठ्या पदावर लवकरच रुजू झाला. त्याचा गाड्यांचा छंद वाढतच गेला. तो आता गाड्यांच्या बाबतीत 'एक्सपर्ट' म्हणून जवळपासच्या लोकंमध्ये परिचित होता. एक गाडी घे तीला काही दिवस वापरून सेल करून नंतर दूसरी गाडी घे हा त्याचा उपक्रम चालू होता. पाच वर्षांचा नचिकेत आता पंचविशी ओलांडून चुकला होता. माझी मुलेदेखिल चंद्रकलेप्रमाणे वाढतच होती, प्रगती करत होती.

लवकरच नचिकेतचे हात दोनाचे चार झाले. आणि त्यानंतर मुलगा. सर्व लोकांमध्ये नचिकेत चांगला, सुस्वभावी आणि सुसंस्कृत मुलगा
म्हणून नावाजला होता. त्यामुळे त्याच्या भल्यासाठिच सर्व प्रार्थना करत. मला तर तो विशेष चांगला ओळखायचा. त्याचे लहानपण, त्याच्या घरापेक्षा माझ्याघरीच जास्त गेले होते.

पुत्ररत्न प्राप्त झाल्यानंतर काही महिन्यात त्याने सरळ मर्सिडिज घेउन सर्वांना सुखद धक्काच दिला. कदचित पुढचे त्याचे टारगेट बी. एम. डब्ल्यु. होते. तसा तो मला अप्रत्यक्षरित्या बोलला होता. नवीन गाडी घेउन लगेच देवदर्शनाला जाण्याचा मनसुबा बनला. आणि चांगलासा मुहुर्त बघून नचिकेत त्याची भार्या, मुलगा, आई आणि वडिल असा सर्व परिवार दर्शनासाठी निघाला. सर्व चिंता विसरून ते लोक प्रवास करत होते........(क्रमशः)

साहित्यिकसमाजविचारलेख

प्रतिक्रिया

सुक्या's picture

24 Dec 2008 - 1:20 am | सुक्या

हे वाचल्यासारखे वाटते आहे कुठेतरी.

सुक्या (बोंबील)