घरटे -१ : सत्यकथेवर आधारित!

चेतन१२३प's picture
चेतन१२३प in जनातलं, मनातलं
22 Dec 2008 - 11:41 pm

डिसेंबरच्या गुलाबी थंडीमध्ये सकाळचे कोवळे ऊन या जठर शरीराने खाण्यात काही औरच मजा! त्यातही लाडक्या सुनेच्या हातचा कडक, तजेलदार चहा आणि वर्तमानपत्र गॅलरीमध्ये अगदी हातामध्ये आणून मिळावे, म्हणजे माझ्यासारख्या भाद्रपदी विचार करणाऱ्या रिटायर्ड माणसाला स्वर्गसुखच म्हणा. किंबहुना त्याहूनही अधिक! तसा माझ्या सौच्या हातचा चहादेखील अगदी कडक असतो बरका! पण, सुनेच्या हातच्या चहाच्या कडकपणामध्ये "आदरणीयं श्वशुरम ।" ही भावना जाणवते तर आमच्या हिच्या हातच्या चहाच्या कडकपणामध्ये "हाताचा" कडकपणाच अधिक वाटतो. बँकेमध्ये कॅशिअर पदावरून रिटायर झाल्यानंतर आता जेव्हा मी मागे वळून बघतो, तेव्हा वाटते कष्ट केली अमाप पण आयुष्य "कॅश" केले.

संसार थाटणे सोपे आहे पण, चालवणे अति कठिण! बोहोल्यावर चढल्यानंत ऐकलेला "सावधान" शब्द कळण्यासाठी आयुष्याची साठी उलटावी लागली. मोठी मुलगी अगदी तिच्या वडिलांवर गेली. नाक- डोळे, रंग आणि बुद्धीसुद्धा. म्हणूनच फर्स्ट क्लासमध्ये स्टॅटिस्टिक्स मध्ये एम. एस. सी. झाली. नशीब मात्र अंजलीने आईचे घेतले त्यामुळेच की काय, हेवा वाटण्यासारखा जोडीदार मिळाला. ते जर माझेच घेतले असते तर जोडीदार निश्चितच "केतू" असता "बीना डोक्याचा! आणि सुदृढ शरीराचा". छोटा मुलगा संपूर्णतः आईवर. प्रत्येक गोष्टीमध्ये 'श्रेय' घेण्याची सवयसुद्धा. म्हणूनच सर्वजण त्याला "श्रेयस" म्हणतात. अंजलीच्यावेळी ही आमच्याच घरी होती. पण, श्रेयसच्या वेळी त्या लोकांनी हट्ट धरला. परत, सासरीच जन्म झाला तर म्हणे मुलगीच होईल. म्हणून ती माहेरी गेली.

अंजलीने जशी आईकडून एक (तिच्याजवळ असलेली एकमेव ) चांगली गोष्ट घेतली, तसेच श्रेयसने माझ्याकडून 'प्रयत्नांती परमेश्वर' हा गुण घेतला. त्या प्रयत्नांमुळेच तो व्यवस्थित इंजिनिअर झाला. चांगल्या पगाराची नोकरी मिळवली आणि आमच्या चपला झिजू नये म्हणून सूनही स्वतःच घेऊन आला. तीदेखील पठ्ठ्याने अशी शोधली की वाटते अंजलीच एका पावलाने मलेशियाला गेली आणि दुसऱ्या पावलांनी परत आली.

गॅलरीमध्ये बसून समोरच्या ढिगाऱ्याकडे बघण्यात बराच वेळ निघून जात होता. एके काळी त्या ठिकाणी चाळ असायची. त्या चाळीमुळे संपूर्ण सायनरला एक वेगळीच शोभा आली होती. चारही बाजूंनी टुमदार बंगले होते फक्त मधोमध सायनरची चाळ. आणि चाळीसमोरचा गुलमोहोराचा वृक्ष. मानवी मन किती विचित्र आहे? बोलक्या व्यक्ती कधी कधी त्याला नकोस्या होतात तर अबोल वृक्षसुद्धा कधी कधी हवा हवासा वाटतो. माझ्या मनाचे देखिल तसेच. इतक्या दिवसांमध्ये त्या वृक्षाशी एक भावनांचा ऋणानुबंध तयार झाला होता. पथिकांना सावली देणारा, पक्ष्यांना घर आणि पराग देणारा तो मला फार प्रिय होता. नुकताच, त्याच्या कडे नवीन मिस्टर अँड मिसेस चिमणे राहायला आले होते. कदाचित, त्यांच्याकडे लवकरच पाळणा हालणार होता. म्हणूनच की काय काडी काडी जोडून त्यांनी टुमदार बंगला बांधला होता, तो देखिल माझ्या घरासमोरच्या फांदीवरच. मिस्टर चिमणे आमच्या घराकडे रोज बघायचे आणि मला जणू सांगायचे की त्यांचे घर माझ्या घरापेक्षा कितीतरी पटीने मोठे आहे म्हणून. पण, त्यांना हे ठाऊक नव्हते की माणूस नावाच्या देहरोग्याला श्री कृष्णाने सांगितलेल्या पवित्र "गीतेतला" बाकी काही अर्थ त्यांना कळला नसेल मात्र एक गोष्ट त्यांना निश्चितच कळली होती -

"नव्हते हे आधी कधी, नसणार हे पुढे कधी..........
......... मी मारिले आधीच ह्यांना निमित्त हो केवळ सव्यसाची. "

माझ्या डोळ्यादेखत त्या झाडाचे तुकडे झाले. त्याच्या मरणयातना बघून माझे हृदय छिन्न विच्छिन्नं झाले. यातच भर म्हणून की काय त्या चिमणीचे घरटे जमिनीवर कोसळले आणि क्षणार्द्धात आतल्या नाजुक पिलाला वरून उंच झेप मारून दुसऱ्या पक्ष्याने उचलून घेतले. ती चिमणी बराच वेळ तिथे घिरट्या घालत होती. ओरडत होती. विलाप करत होती. तिच्या पिलाला सर्वत्र शोधत होती. जणू तिचा श्वास तिच्यापासून कोणीतरी ओढून घेतला असवा. मधून मधून ती त्या झाड तोडणाऱ्यावर हल्ला करू पाहत होती. पण, काळाची झडप तर अजून बाकीच होती. चिडलेल्या त्या माणसाने एक मोठा लाकडाचा तुकडा घेतला आणि निशाणा लावून तिच्याकडे भिरकावला. "फट्ट असा आवाज झाला. मी डोळे मिटून घेतले. थोड्या वेळाने डोळे उघडून बघतो तर खाली जमिनीवर रक्ताने माखलेली त्या छोट्याश्या नाजुक सुंदर नुकताच भक्ष बनलेल्या पिलाची आई शेवटच्या घटका मोजत होती. कदचित त्यावेळीही तिच्या डोळ्यापुढे मृत्युच्या भीतिपेक्षा पिलाची छबी असावी, नवऱ्याविशयी कळजी असावी.

तिला शेवटले पाणी पाजण्यासाठी मी उठणार एवढ्यातच समोरून एक मांजराचे पिलू जीभ चाटत चिमणीकडे चाल करत येऊ लागले. पुढे काय होणार आहे हे बघण्याच्या मनः स्थितीत मी नव्हतो. माझ्यात ती हिम्मतच उरली नव्हती. माझ्या काळजाचे आधीच पाणी झाले होते. मी उठून घरामध्ये जाणार एवढ्यात मागून आवाज आला. मी वळून बघितले. मिस्टर चिमणे आले होते. ते आपले घर आणि बायका मुलांना शोधत होते. खाली बघतो तर मांजरीच्या पिलाने रक्ताचा थेंब सुद्धा पुराव्यादाखल सोडला नव्हता. कदाचित, चिमणरावांना सर्व लक्षात आले होते. थोडा वेळ आक्रोश न करता ते माझ्या गॅलरीतून आत येऊन जवळच्या तारावर बसले. "पुरुषांना रडण्याचा अधिकार नाही" हा अलिखित कठोर नियम कदाचित त्यालाही लागू असावा. काही क्षण तो तसाच विषण्ण मनः स्थितीत बसून होता. त्याने एकदा माझ्याकडे बघितले. माझी नजर आपसूकच अपराध्यासारखी खाली गेली. कारण, मी त्याच्यासाठी काहीही करू शकलो नव्हतो.

करणार तरी काय? ती समोरची जमीन एका बिल्डरला विकल्या गेली होती. तेथे आता अपार्टमेंट बनणार होते. मी घरात आलो अचानक मन भूतकाळाकडे आकर्षिल्या गेलं. वेळेच्या रथाची चाके उलटी फिरू लागली........
क्रमशः

साहित्यिकसमाजविचारलेख

प्रतिक्रिया

प्राजु's picture

22 Dec 2008 - 11:43 pm | प्राजु

पुन्हा लिहिलेत का?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शेखर's picture

23 Dec 2008 - 10:44 am | शेखर

ही कथा मिपावर वाचल्यासारखी वाटती आहे.
-शेखर

चेतन१२३प's picture

23 Dec 2008 - 10:31 pm | चेतन१२३प

मी ही सत्यकथा आधी मनोगत वर प्रकाषित केली होती.

llपुण्याचे पेशवेll's picture

22 Dec 2008 - 11:49 pm | llपुण्याचे पेशवेll

>>डिसेंबरच्या गुलाबी थंडीमध्ये सकाळचे कोवळे ऊन या जठर शरीराने खाण्यात काही औरच मजा!
येथे जरठ म्हणायचे आहे का?
असो. पुलेशु.

पुण्याचे पेशवे
Since 1984

चेतन१२३प's picture

23 Dec 2008 - 12:09 am | चेतन१२३प

मी जन्मलो तेथे "ठिसुळ" या शब्दाला जरड किंवा जठर म्हटल्या जाते

पक्या's picture

23 Dec 2008 - 10:16 am | पक्या

छान वाटतीये कथा..पुढील भाग वाचण्यास उत्सुक.

अमोल केळकर's picture

23 Dec 2008 - 10:29 am | अमोल केळकर

असेच म्हणतो
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

दिपक's picture

23 Dec 2008 - 10:50 am | दिपक

आवडली :)

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

(चिमणीप्रेमी)दिपक