पुस्तकांमधील माझा सर्वात आवडता प्रकार (genre) म्हणजे प्रेमकथा.. कॉलेजमध्ये असताना मनाला रिझवणाऱ्या, भुरळ घालणाऱ्या, एक वेगळी अनुभूती देणाऱ्या अनेक प्रेमकथा मी वाचल्या आहेत. त्या काळात मला प्रेमकथा वाचनाची एक प्रकारची नाशाच चढली होती असं म्हणायला हरकत नाही.. सुशिंची दुनियादारी, खांडेकरांची अमृतवेल, ययाती, हिरवा चाफा, मिलिंद बोकिलांची शाळा, चेतन भगत यांची टू स्टेटस्, वपुंचे पार्टनर ई., अजूनही आहेत. पण गेल्या एक-दोन वर्षांत निव्वळ प्रेमावर आधारित एकाही कादंबरीचे वाचन झालेले नाहीये, असा विचार जेव्हा माझ्या मनात डोकावला तेव्हा प्रवासाने व कामाने शिणलेल्या माझ्या मनाने एखादी सुखदायी व मोहात पाडणारी प्रेमकथा वाचायचे वेध घेतले. मग त्या दिशेने माझी शोधाशोध सुरू झाली. आंतरजालावर बरेच व्हिडिओ, लेख यांचा पाठलाग केल्यानंतर शेवटी मिपावर पुस्तकांच्या संदर्भातील एक धागा वाचत असताना 'जाई' बद्दल माहिती मिळाली. टेलिग्रामवर पीडीएफ स्वरूपात ती उपलब्ध पण झाली.. अनायासे ऑफिसला तीन दिवसांची सुट्टी होती तेव्हा सलगपणे मी ती वाचून काढली..
खरतर 'जाई' बद्दल नक्की काय व किती सांगायचे असा प्रश्न मला पडला आहे. मनाचा ठाव घेणाऱ्या सुशिंच्या या कलाकृतीचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे, त्यासाठी माझ्याजवळील शब्दसंग्रह कमी पडतोय की काय अशी एक भीती दाटून येतीये. (तुम्हाला ही अतिशयोक्ती वाटेल पण जेव्हा तुम्ही ही कादंबरी वाचून तिचा नेमका आशय समजून घ्याल तेव्हा तुम्हाला मी जे सांगतोय त्याची प्रचिती येईल.)
सुहास शिरवळकर लिखित जाई ही एक उत्कट प्रेमकथा आहे. साधारण, त्याच त्या, साचेबद्ध प्रेमकथांपेक्षा ती वेगळी आहे. शाळा, कॉलेजमध्ये शिकणाऱ्या समवयीन मुलगा-मुलगी किंवा तरुण-तरुणीची ही प्रेमकहाणी नाहीये. या कथेचा नायक असलेला शेखर एक प्रतितयश वकील-लेखक आहे. ही कहाणी त्याचं स्वगत आहे, जे त्याने आजवर कुणालाही सांगितलेलं नाहीये. कादंबरीच्या सुरवातीला तो म्हणतो,
"प्रामाणिकपणे सांगायचं तर हे मी तुम्हालाही सांगत नाहीये, हे आहे स्वगत. जे फक्त माझ्याकरता आहे. तुम्हाला हे कळावं अशी माझी इच्छा असती तर मी सरळ कादंबरीच लिहिली असती, पण ही एकच गोष्ट अशी आहे, जी माझ्यापुरती आहे. मरेपर्यंत ती माझ्यापुरतीच असणार आहे. तिचं भांडवल करून मला पैसा, प्रसिद्धी नको आहे. कोणी त्यावर पैसा मिळवावा, अशी माझी इच्छाही नाहीये."
या कादंबरीच्या कथानकाबद्दल भाग २ मध्ये सविस्तर सांगणार आहेच पण तत्पूर्वी मला माझे काही विचार मांडायचे आहेत, ते कळण्यासाठी कादंबरीची बेसिक theme तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे. ही कहाणी शेखर अग्निहोत्री व त्याच्यापेक्षा वयाने थोड्या मोठ्या असलेल्या त्याच्या जाई वाहिनी भोवती गुंफली गेलेली आहे. त्यांच्यातील मैत्री व प्रेमावर ही कादंबरी आधारलेली आहे.
ही कादंबरी वाचत असताना स्त्री-पुरुष आकर्षण व त्यांच्यातील मैत्री, प्रेम याविषयी नाना प्रकारचे प्रश्न आपल्या मनात येतात..— जेव्हा एक स्त्री व पुरुष एकमेकांच्या जवळ येतात तेव्हा ज्याप्रकारे ते इतरांना दाखवून देत असतात तशी त्या दोघांमध्ये खरच निखळ मैत्री असते का? की स्वतःची व इतरांची समजूत घालण्यासाठी नात्याला दिलेले ते नाव असते? वयाने लहान असणाऱ्या शेखरच्या मनात स्वतःच्या वाहिनीबद्दल म्हणजेच जाईबद्दल विशिष्ट भावना निर्माण होणे व पुढे जाऊन जाई सुद्धा शेखर मध्ये गुंतली जाणे हे चूक की बरोबर? यासारखे प्रश्न पडतात, जे स्वाभाविक आहेत..
मला विचाराल तर त्या भावना योग्य की अयोग्य हे ठरवण्याआधी एक गोष्ट विसरून चालणार नाही ती म्हणजे बहुतांश वेळा या अश्या भावना नैसर्गिक असतात. माणूस हा एक प्राणी आहे आणि प्राण्यांमध्ये नर आणि मादी असते. त्यामुळे त्या प्राणी असण्याच्या ज्या संवेदना आहेत त्या माणसांमध्ये सुद्धा आहेत.(आपण हे कितीही नाकारण्याचा प्रयत्न केला तरी ते नाकारता येणार नाही कारण तो एक fact आहे.) या संवेदना व भावनांच्या जाळ्यात जेव्हा मानवी मन अडकते तेव्हा ते बरोबर वा चूक यातील फरक समजण्याच्या पलीकडे गेलेले असते. त्यामुळे आपल्या मनात हे जे प्रश्न येतात त्यांचे चूक किंवा बरोबर असे एका शब्दात उत्तर देणे कठीण आहे. ते मिळवण्यासाठी आपल्याला मानवी मनाचे मानसशास्त्र समजून घ्यावे लागेल. शेखरला जाईबद्दल वाटणारे आकर्षण ही एक मानवी प्रवृत्ती आहे, ती आपल्या basic प्राणी असण्याच्या प्रवृत्ती मधून निर्माण झालेली आहे.. त्यामुळे त्या भावना चूक किंवा बरोबर ठरवण्याचा अधिकार आपल्याला नाहीये. इथे एक गैरसमज होण्याची शक्यता आहे तो म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्यात निखळ मैत्री कधीच नसते हे माझे म्हणणे आहे असे तुम्हाला वाटू शकते.. पण नाही, माझे असे मुळीच म्हणणे नाहीये.. तुम्ही म्हणत आहात तशी निखळ मैत्री असू शकते, असते देखील. जोपर्यंत मनामध्ये येणाऱ्या त्या विशिष्ट भावनांचे कृतीमध्ये रूपांतर होत नाही तोपर्यंत ती निखळ मैत्रीच असते. पण मी वरती जे मुद्दे मांडले आहेत तेही खरे आहेत, तो एक fact आहे. त्यामुळे आधी सांगितल्याप्रमाणे तो नाकारून चालणार नाही, तो नाकारणे म्हणजे स्वतःची फसवणूक केल्यासारखे होईल. पुस्तक वाचत असताना या प्रकारच्या विचारांचे योग्य ते व्यवस्थापन तुम्हाला करावे लागेल नाहीतर ही कादंबरी तुम्हाला रटाळ वाटू शकते.
या कादंबरीचे कथानक व इतर aspects बद्दल जाणून घेणासाठी भाग २ नक्की वाचा, दुसऱ्या भागाची लिंक तुम्हाला टिप्पणी बॉक्स मध्ये भेटेल.
प्रतिक्रिया
10 Apr 2024 - 10:03 pm | नगरी
सुशी आणि वपू सोडून काहीही बोला.चालेल.
11 Apr 2024 - 2:10 pm | प्रकाश घाटपांडे
आवडले
12 Apr 2024 - 9:23 pm | सुजित जाधव
धन्यवाद.!!
11 Apr 2024 - 2:56 pm | अहिरावण
सुशी, वपु, पुल सोडून इतर वाचन करत जा !
11 Apr 2024 - 3:46 pm | प्रचेतस
सुशिंचा डायहार्ड फॅन. त्यांच्या जवळपास सर्वच कादंबऱ्या वाचून झाल्यात. जबरदस्त ताकदीचा लेखक.
13 Apr 2024 - 6:11 pm | सुजित जाधव
भाग २ चा दुवा: https://www.misalpav.com/node/52070