मागच्या शनिवारी चित्रपट पाहिला . साधारणतः चित्रपट पाहिल्याच्या २-३ दिवसात मी परीक्षण टाकतो ( टंकायची इच्छा असली तर ) पण यावेळेस एक आठवडा गेला. असो . ( वर्ल्ड कप हरल्याचा धक्का आणखी काय)
श्यामची आई नावात वजन असले तरी मापात नाही. ह्या एका वाक्यात परीक्षण संपवू शकलो असतो पण वादंग टाळण्यासाठी पुढील ओळी खरडतोय.
संपूर्ण चित्रपट कृष्ण धवल रंगात आहे परंतु पहिल्या कृष्ण धवल चित्रपटाची सर नाही."श्यामची आई " हे पुस्तक संस्कारक्षम वयात वाचावयास दिले जाते आणि प्रेक्षक वर्ग सुद्धा त्याच याच अपेक्षेने चित्रपट पाहावयास जाणार असतील तर हाती निराशा लागेल. ओम भुतकर ची भूमिका मध्यवर्ती असावी असे चित्रपटाच्या पोस्टरवरून जरी वाटत असले तरी त्याची चित्रपटातील भूमिका हि त्याच्या नावाइतकीच लहान आहे. चित्रपट हा एखाद्या कला चित्रपटाच्या पठडीत मोडावा अश्या प्रकारचे दिग्दर्शन व संपादन आहे . स्थळ दर्शन उत्तम. कथा मांडणी धरसोड पद्धतीची वाटते. एखादा स्वेटर विणायला घेतला कि तो पूर्ण न करता टोपरे व मोजे विणायला घेणे हे उदाहरण कथा मांडणीस चपखल बसते. "श्यामची आई" यापेक्षा "श्यामचे बाबा" हे नाव चित्रपटास अधिक योग्य ठरले असते, कारण चित्रपटात सर्वात जास्त लांबीची भूमिका हि संदीप पाठक यांची आहे. श्यामची आई गौरी देशपांडे ने साकारली आहे , तिने भूमिकेस न्याय दिला आहे. श्यामची आजी मोठी कलाकार असली तरी त्यांना जास्त वाव नाही. भाऊबंदकी नि एका वाक्यचे शेरे या जोरावर कथा पुढे नेण्याचा जोर दिसतो. आशयघनतेपेक्षा (चित्रपटासाठी घंटा अपेक्षा ) शेरेबाजीचा ओव्हरडोस आहे. छायाचित्रण चांगले आहे , शेवटचा सीन समुद्रातील टॉप अँगल शॉट मस्त आहे
फ्लॅश फॉरवर्ड नि फ्लॅशबॅक यामध्ये एकसंधता नाही . चित्रपट अतिशय संथ आहे. संथ व मंद चित्रपट आहे हे आपल्यासारख्या अजाण चित्रपट प्रेक्षकास ओळखायचे असेल , तर पुढील क्लुप्ती वापरा - चित्रपट पाहतांना मोबाईल वर पिंग आले नि ते प्रत्येकवेळी पाहण्याचा मोह झाला तर समजून जा चित्रपट रटाळ आहे. मी किती वेळा पाहिला हे लिहिण्याचा मोह टाळतोय पण तुम्ही चित्रपट पाहून किती वेळा पहिला हे कंमेंटमध्ये जरूर लिहा
ता.क . - मी हा चित्रपट दक्षिण मुंबईतील एका फार जुन्या प्रसिद्ध ( आता मल्टिप्लेक्स ) चित्रपट गृहात पाहिला , ( जेमतेम प्रेक्षक होते ). या रविवारी चित्रपट उतरला असल्यास आश्चर्य वाटणार नाही
प्रतिक्रिया
26 Nov 2023 - 1:32 pm | अमरेंद्र बाहुबली
अश्या “मरेल/थकलेल्या” कथांवर पैसा कसे लावतात लोक देव जाणे. इतर सिने इंडस्ट्री घोडदौड करत असताना. आपण मागेमागे का जातोय??
- अशामळू बाहुबली (फाॅरेन रिटर्न)
26 Nov 2023 - 5:42 pm | कंजूस
शामची आई कथा/कादंबरी अजाणतेपणी वाचणे चूक आहे.
पेंडसे यांची कथा 'गारंबीचा बापू' ज्यासाठी होती त्याच कारणासाठी 'शामची आई' आहे. म्हणजे त्यावेळच्या एका समाजाची बखर. अर्थात ही पुस्तके मोठेपणी वाचावीत.
28 Nov 2023 - 8:18 am | कर्नलतपस्वी
कधी लहानपणी शामची आई हे पुस्तक वाचून घळाघळा रडलो होतो.
कुठलीही मुळ कलाकृती पुनर्निर्माण करण्यात पुनर्निर्मिती करणारा तोकडा पडला तर मुळ कलाकृतीचे मुल्य कमी होते व ती जशीच्या तशी वाचक,प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही. हा दोष पुनर्निर्माण करणाऱ्यांचा आहे मुळ कलाकृतीचा नाही.
कलाकृती ,साहीत्य ही समाजाची बखर आहे या मताशी कंजूस भौं बरोबर सहमत आहे व त्यामुळेच ती बघताना आजच्या परिप्रेक्षातून बघणे वाचणे चुकीचे ठरेल.
अर्थात कुणाला काय आवडावे हे व्यक्तिसापेक्ष आहे.
लहानपणी शाईची आई या पुस्तकाचे पारायण केल्यामुळे चित्रपट बघणार नाही आणी तसाही हा चित्रपट लहान मुलांसाठी आहे तो लहान होऊनच बघावा.
28 Nov 2023 - 8:22 am | कर्नलतपस्वी
आई ऐवजी शामची आई वाचावे.
माझ्या माहितीनुसार या कथानकावर एक प्रहसन पण लिहीले आहे. बबन कडू आणी विशाखा सुभेदार यांनी उत्तम अभिनय केला आहे
27 Nov 2023 - 8:34 pm | Bhakti
हा हा! प्रामाणिक लिहिले आहे.
माझं मन म्हणत होतं..उठ जा लेकीबरोबर हा सिनेमा बघ!तर माझा मेंदू म्हणत होतं..काय गरज नाही थिअटरात जायची ..बोर होशील उगाच! मग मन म्हणालं-कशी आई आहेस,काय संस्कार वगैरे देणार की नाही पुढच्या पिढीला...मेंदू म्हणाला आम्ही ओटीटीवर पाहू नंतर नाहीतर जूना सिनेमा पाहू परत!
मी मेंदूचं ऐकलं :)
27 Nov 2023 - 10:51 pm | रंगीला रतन
अश्या “मरेल/थकलेल्या” कथांवर पैसा कसे लावतात लोक देव जाणे.
अश्या “मरेल/थकलेल्या” कथांवरचे पिक्चर बघाला लोकं जातात जसे?
27 Nov 2023 - 10:52 pm | रंगीला रतन
जसे नाही कसे????