किती ते मेसेज लिहितो अन् मला छळतोस तू
कर जरा कंट्रोल बाबा का उगा जळतोस तू
मित्र मज असले जरी पैशास येथे पासरी
तुज नको कसलीच चिंता तू मला सर्वोपरी
राग का यावा तुला हे गूढ मजला नाकळे
लिस्टातला तो एकजण, नाही कुणी रे आगळे
फक्त कॉफीचे निमंत्रण एक मी स्वीकारले
चार घटका हास्य, गप्पा यामधे वाहावले
ठेवला मी फोन होता मूक सारा वेळ तो
एवढीशी चूक झाली, मजवरी का उखडतो
नाहि जमला घ्यायला रे फोन तव तेथे मला
बिल कुणी भरणार माझे, मित्र जर रागावला?
शंका नको घेऊ जरा तू निखळ मैत्री ही असे
माझिया डीपीवरी तो फक्त 'लाईक' देतसे
एकदा केवळ तयाने टाकला होता बदाम
सोड तो तू विषय त्याला अर्थ नसतो एक छदाम
बिघडले कोठे जरी मम हस्त त्याने चुंबले?
बिघडले कोठे जरी मजला जरा गोंजारले?
देऊ नको तू त्यास इतक्या डझनवारी रे शिव्या
ऐकल्या नसतील कोणी याअधी इतक्या नव्या
.
.
.
.
जाउ दे मज, जाहली ही वेळ नवरा यायची
कंट्रोल नाही ठेवला तर प्रीत ही विसरायची
*******
या कवितेचे काही आशयरूपी पूर्वज:
(कपाळ)मोक्ष!! :-)
https://www.misalpav.com/node/45823
प्रोफाइलवरती बाई..!!
https://www.misalpav.com/node/48416
प्रतिक्रिया
21 Jul 2023 - 9:18 pm | चित्रगुप्त
हा आणखी एक नाविनच 'सोमि' (सोशल मिडिया-) रस.
भरतमुनि झीट येऊन पडतील आता.
यथो हस्त: तथो दृष्टि:, यथो दृष्टि: तथो मन:।
यथो मन: तथो भाव:, यथो भाव: तथो रस:।।
21 Jul 2023 - 10:56 pm | चलत मुसाफिर
तुमची प्रतिक्रिया अनमोल आहे. मनापासून धन्यवाद
22 Jul 2023 - 6:49 am | कर्नलतपस्वी
कर जरा कंट्रोल, लाईन मोठी आहे
प्रा:तकाळची वेळ, सर्वानाच घाई आहे.
छान.
22 Jul 2023 - 2:05 pm | चलत मुसाफिर
धन्यवाद सर
22 Jul 2023 - 2:13 pm | विवेकपटाईत
मस्त कविता. या कॉफी प्रकरणावर कार्यालयातील एक जुना किस्सा आठवला..
22 Jul 2023 - 2:33 pm | चलत मुसाफिर
लिहा की त्याबद्दल. वाचायला आवडेल