आपली तुपली स्वप्नं..

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
10 Jul 2023 - 8:57 am

स्वप्नं सगळ्यांनाच पडतात. भली,बुरी. मलाही पडतात. पण कशी? कर्मदशा! मला नेहमी स्वप्नं पडतात ती बस,ट्रेन चुकल्याची,गणित, इंग्रजी ते नापास झाल्याची (हो. अजूनही..), शिक्षकांनी शिक्षा केल्याची, वर्गाबाहेर काढल्याची, छड्या खाल्ल्याची, स्पेलिंग चुकल्याची,दूध उतू गेल्याची,भाजी करपल्याची,ग्यास संपल्याची, अंगावर झुरळ चढल्याची, पायाखाली पाल आल्याची,नळाला पाणी येत नसल्याची,वन्सं आणि सासू सासरे पंधरा दिवस राहायला येत असल्याची,आपण खूप लठ्ठ आणि बेढब झाल्याची, तोंडाचं बोळकं झाल्याची (हे उलट म्हणता येईल, म्हणजे वास्तवातलं स्वप्नात) ,कधी आपण मेल्याची,मेलेली माणसं स्वप्नात येण्याची,कधी एखाद्या स्वप्नाची "अगली कडी"पुढच्या रात्री दिसते.

मला जनरली आनंदाची, हसरी,पास झाल्याची, सुंदर, सडपातळ दिसत असल्याची , मोठ्या बंगल्यात राहात असल्याची,कारंजी उडत असलेल्या उपवनातून फिरल्याची स्वप्नं पडत नाहीत. लोकांना कशी पडतात कोण जाणे.
अगदी तरुण वयात देखील अगदी डार्क गुलाबी जाऊदे पण फेंट गुलाबी स्वप्नंही मला पडली नाहीत. पांढऱ्याशुभ्र घोड्यावर स्वार होऊन कुणीही राजकुमार माझ्या स्वप्नात आला नाही. शुभ्र घोडा तर दूरच,पण पाय मोडलेली गाढवं, हडकुळी कुत्री आणि एक डोळा फुटलेली मांजरं माझ्या स्वप्नात आली. कर्मदशा! कर्मदशा बरं ही!!

देवाचे नामस्मरण झोपण्यापूर्वी करुन पाहिलं तर लांब दाढी, जटा पिंजून एक म्हातारा साधू माझ्या स्वप्नात येऊन कर्मसंन्यासाचा उपदेश करून गेला. चाॅकलेट हिरो आणि कमनीय बांधा असलेल्या हिराॅइनींची गाणी टीव्हीवर बघून झोपी गेले तर तेच हिरो दाढी वाढवून,वेडे होऊन कपडे फाडत रस्त्यावर हिंडताना दिसले. आणि हिराॅईणी हडळ, चेटकीण,रा‌क्षसिणीसारख्या दिसल्या. एखाद्याचं नशीब म्हणायचं.

जोक अपार्ट. पण भारतरत्न डॉ.अब्दुल कलामांचं एक अर्थपूर्ण वाक्य आहे. ते म्हणाले होते की, स्वप्नं ती नाहीत,जी तुम्हांला झोपेत दिसतात. स्वप्नं ती की जी तुमची झोप उडवतात.
अशी झोपू न देणारी, दिवसाढवळ्या पाहिलेली स्वप्ने उमलत्या वयात सर्वजण पाहतात. गायक व्हायचं डाॅक्टर, इंजिनिअर,पायलट व्हायचे, सैन्यात भरती व्हायचे, हिमालयाच्या उत्तुंग शिखरावर चढणारा गिर्यारोहक व्हायचे. क्रिकेटचे मैदान गाजवायचे. त्यांतल्या काहीजणांची स्वप्नं पुरी होतात. मनाची आणि मनगटाची शक्ती एकवटते. निग्रह जिंकतो.
असंच छत्रपती शिवाजी महाराजांनी एक स्वप्न बघून हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. क्रांतीकारकानी, देशभक्तांनी भारतीय स्वातंत्र्याचं स्वप्न सत्यात साकारले. शंकराचार्य, स्वामी विवेकानंद, धार्मिक उन्नतीची स्वप्नं प्रत्यक्षात आणली. स्वप्नं मानवी जीवनाचं अंग आहेत.

शास्त्रीय ज्ञान देखील वाचायला मिळतं. स्वप्नांबद्दल खूप संशोधन झाले आहे. माझा अभ्यास नाही. मी त्यातली तज्ज्ञ नाही.

एका मानसशास्त्रज्ञाचं मत मी पूर्वी वाचलं आहे. तो म्हणतो, दिवसभर आपल्या ज्ञानेंद्रियांवर विविध स्पर्श,चवी,गंध मारा करत असतात. आपला मेंदू त्यानुसार त्यांना प्रतिसाद देत असतो. रात्रीही असे आघात शरीरावर होत असतात. निद्रिस्त मेंदू त्यांचे जे अर्थ लावत असतो ते म्हणजेच स्वप्नं. छातीवर जड पांघरूण, पोटात गॅस, ॲसिडिटी,डास चावणे अशा संवेदनाचा निद्रिस्त मेंदूने लावलेला अर्थ म्हणजे छातीवर दगड ठेवला आहे. आपण खूप उंचावरुन खोल दरीत कोसळतोय. तेच स्वप्न असतं. असं म्हणतात की "मनी वसे ते स्वप्नी दिसे."दिवसभर मनात जे विचार येतात तेच स्वप्नात दिसतं. मनात घोळणारे विचार मेंदू परत परत अर्थबद्ध करत असतो.

काही शास्त्रज्ञांनी असं मत मांडले आहे की , माणूस ज्या भावना मनात दाबून ठेवतो, त्यांचं दमन करतो,ज्या सप्रेस करतो , त्यांची पूर्तता तो स्वप्नात करतो.

वर म्हटली तशी झोपू न देणारी, दिवसाढवळ्या पाहिलेली काही स्वप्ने माझीही आहेत. त्यांतली काही पूर्णही झाली आहेत. माझा दीर्घोद्योग, चिकाटी त्यांच्या पूर्तीसाठी पणाला लागली. श्रमांचं सार्थक झालं. उदाहरणार्थ काही विचारू नका. वो किस्सा फिर कभी!

स्वप्नांची दुनिया (कधी कधी का होईना,) न्यारी, नवलाईची असते. प्रसन्न, सुंदर, आशादायी स्वप्नं जीवनात हवीतच.

"स्वप्नामधील गावा
स्वप्नामधून जावे
स्वप्नातल्या प्रियाला
मनमुक्त गीत गावे
स्वप्नातल्या सुखाचा
स्वप्नीच वेध घ्यावा।।

मांडणीप्रकटनविचार

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

10 Jul 2023 - 9:31 am | चित्रगुप्त

आजी, मस्त लिहीलंय. झोपेत पडणार्‍या स्वप्नात बरेचदा मी अक्षरशः 'पडत'च असतो. खूप उंचावरून पडतच असतो पडतच असतो... शेवटी स्वप्न तुटलं की कळतं ते स्वप्न होतं. हल्ली मला आपण कार चालवतोय, पण आपल्याला पुढे जायचं असून कार खूप जोरात मागे मागे जाते आहे आणि आपला तिच्यावर काही ताबा नाही असं दिसतं. आजच एक परिचित म्हणाले की त्यांना पण अगदी असंच स्वप्न बरेचदा दिसतं म्हणून. पूर्वी बरेचदा पडणारं आणखी एक स्वप्न म्हणजे आपण आतिशय उंचच उंच असलेल्या एकाद्या जुनाट, पडायला आलेल्या भिंतीवर वा तटबंदीवरून चालतोय, किंवा त्यात अडकलेल्या स्थितीत असून खालून जाणारे लोक बघत असूनही कोणीही काही मदत करत नाहीयेत ... वगैरे.
-- बाकी बालपणी आणि तारुण्यात बाळगलेली बहुतांश स्वप्नं पूर्ण झालीत आणि जी झाली नाहीत, ती बालीश, अशक्य कोटीतली होती हे पण हळूहळू उमगत गेल्यामुळे काही खंत उरलेली नाही.

मला आपण कार चालवतोय, पण आपल्याला पुढे जायचं असून कार खूप जोरात मागे मागे जाते आहे आणि आपला तिच्यावर काही ताबा नाही असं दिसतं.

काय सांगता काय? अहो तंतोतंत असंच मलाही पडतं. लिटरली कुठेतरी मागे मागे जात जात अंधारात कुठेतरी आदळण्याची वाट बघत राहणे असा विचित्र प्रकार. मागचे काही दिसत देखील नसते आणि अनावर झोप येतेय असे फिलिंग.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

10 Jul 2023 - 12:11 pm | हणमंतअण्णा शंकर...

हा मला एकदम दाणक्कन आदळल्याचा स्वप्नस्टॉपर पडतो. म्हणजे गाढ झोप लागत असते आणि शरीर मस्त रिलॅक्स होत असते, मन कुठल्यातरी स्वप्नात नुकतेच जात असते इतक्यात अचानक आदळ्याचा रिफ्लेक्स येतो आणि दाणक्कन जाग येते.

या उलट स्वप्नातून माघारी जागृत होत अस्ताना आपण हवेतल्या एकेक पायर्‍या पार करत छान उडतोय असेही स्वप्न पडते. आणि बाकीचे खूप लोक खालून पाहतात.

मला वाटतंय, उत्क्रांतीमध्ये कुठेतरी आपण झाडावरून पडून मरू नये म्हणून अचानक पडल्याचे स्वप्नस्टॉपर डेव्हलप झाले असावे. आपल्या पूर्वज माकडांनी रोज

उंचावरून पडण्याचे स्वप्न तर खूप कॉमन असावे

राजेंद्र मेहेंदळे's picture

10 Jul 2023 - 12:03 pm | राजेंद्र मेहेंदळे

मस्तच लेख, नेहमीप्रमाणे आजी स्टाईल खुसखुशीत.
माझी दोन पेट स्वप्ने म्हणजे
१. मी चाललोय आणि वारा उलट दिशेने ईतका जोरदार आहे की मला जोर लावुन कसेबसे एक एक पाउल पुढे टाकावे लागतेय, आणि जोर जरा कमी पडला तर मागे ढकलला जातोय
२.मी चालता चालता अचानक हातावर (खाली डोके वर पाय) चालायला, किंबहुना वेगाने धावायलाच लागतो आणि नुसते चालण्यापेक्षा ते जास्त सहज सोपे वाटते.

वो किस्सा फिर कभी! येउद्या की तेही किस्से.

सौंदाळा's picture

10 Jul 2023 - 12:19 pm | सौंदाळा

लेख मस्तच.
चांगली स्वप्ने पण पडतात मात्र प्रमाण अत्यंत कमी आहे.
बालाजी तांबेंचे ते 'सकाळ' वर्तमानपत्राबरोबर काहीतरी आरोग्यविषयक साप्ताहिक यायचे. त्यात एकदा आयुर्वेदाप्रमाणे मृत्यु जवळ आल्याची लक्षणे होती त्यातील एकच लक्षात राहिले ते म्हणजे दात हालायचे किंवा दात पडायचे स्वप्न पडले की आपला मृत्यु जवळ आला समजावे. हे साधारण १२-१५ वर्षांपूर्वी वाचले होते आणि तेव्हापासून हटकून हे स्वप्न अधूनमधून पडू लागले. अर्धवट जाग आली की जीभेने दात हलतोय का ते बघायचे आणि पूर्ण जाग आली की तांबेंना शिव्या घालून परत झोपायचे असे कित्येकदा झाले.

आणि तेव्हापासून हटकून हे स्वप्न अधूनमधून पडू लागले. अर्धवट जाग आली की जीभेने दात हलतोय का ते बघायचे आणि पूर्ण जाग आली की तांबेंना शिव्या घालून परत झोपायचे असे कित्येकदा झाले.

😀 😀 😀
'मनी वसे ते स्वप्नी दिसे' हि म्हण अशाच अनुभवांतुन उदयास आली असावी.
बाकी आजींचा लेख नेहमीप्रमाणेच हलका-फुलका आणि खुसखुशीत आहे!

सस्नेह's picture

10 Jul 2023 - 6:17 pm | सस्नेह

छान लिहिलंत , आजी !

सस्नेह's picture

10 Jul 2023 - 6:19 pm | सस्नेह

बाकी कुठलं नाही, पण पायरी चुकल्याचं आणि धाडकन तोंडावर पडल्याचं स्वप्न मला अजूनही पडतं.

प्रचेतस's picture

10 Jul 2023 - 7:42 pm | प्रचेतस

एकदम खुसखुशीत लेख आजी.

आंबट गोड's picture

11 Jul 2023 - 1:03 pm | आंबट गोड

झोप जस्ट लगत असताना एकदम तोल जाऊन पडल्याचे / झटका बसल्या सारखे जाणवते. त्याला स्वप्न नाही म्हणता येणार..
ती कुठली तरी कंडिशन आहे ....!

मुक्त विहारि's picture

11 Jul 2023 - 6:11 pm | मुक्त विहारि

मला नेहमी पडणारे स्वप्न म्हणजे, मिपाकरां बरोबर कट्टा करणे...

अनन्त्_यात्री's picture

11 Jul 2023 - 7:49 pm | अनन्त्_यात्री

निद्रानाश झाल्याचं स्वप्न पडतं