नराधम

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
1 Jul 2023 - 8:50 pm

नराधम

आज माझ्याकडे सोनोग्राफी साठी एक रुग्ण बाई आल्या होत्या. वय वर्षे ४२.

त्यांची फाईल पहिली तर त्यात बऱ्याच गोष्टी तर्कास न पटणाऱ्या होत्या. त्यांना एक वर्षांपूर्वी गर्भाशयाच्या कर्करोगाची सुरुवात झालेली होती. पण आजतागायत गर्भाशय काढून टाकलेला नव्हता. प्रथितयश अशा स्त्रीरोग तज्ज्ञांनी गर्भाशय काढून टाकणे आवश्यक आहे असे एक वर्षांपूर्वी स्पष्ट लिहून दिलेले होते. अगोदर झालेल्या सोनोग्राफी प्रमाणे या बाईंच्या गर्भाशयात निदान सात आठ तरी फायब्रॉइड्स होते आणि गर्भाशयाच्या मधल्या भागास अडेनोमायोसिस म्हणूनआजार झालेला होता. तीन महिन्यापूर्वी पेट सिटी (PET CT) झालेला होता. त्यावेळेस हा कर्करोग गर्भाशयाच्या बाहेर पडलेला नव्हता.

या महाशयांनी कोणी एक डॉक्टर गाठला होता ज्याने हॉर्मोन थेरपी चालू केली होती ज्यामुळे त्या बाईंना गेले सहा महिने पाळी आली नव्हती.

मी त्यांची सोनोग्राफी करताना मी त्यांच्या यजमानांना विचारले अजून तुम्ही शल्यक्रिया का केलेली नाही? त्यावर त्यांनी मला सांगितले कि आम्ही तीन चार वेळेस वंध्यत्वासाठी आय व्ही एफ चे उपचार केले परंतु त्यात यश आले नाही म्हणून आम्ही या डॉक्टरांकडे जाऊन शल्यक्रियेच्या ऐवजी हॉर्मोन थेरपी चालू केली.

सोनोग्राफीमध्ये गर्भाशयाचे आतील आवरण बरेच वाढलेले दिसत होते याचा सरळ अर्थ असा होता कि हा कर्करोग त्या हॉर्मोन थेरपीला जुमानत नव्हता

मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले कि या हॉर्मोन थेरपीला कोणताही शास्त्राधार नाही. याने केवळ पाळी येणे बंद होईल गर्भाशयाचे आतले आवरण वाढणार नाही म्हणून कर्करोग थांबेल असा कोणताही शास्त्रीय पुरावा नाही.

मुळात आपल्या पत्नीच्या गर्भाशयात असलेल्या फायब्रॉइड्स आणि ऍडेनोमायोसीसमुळे त्यांना गर्भधारणा होण्याची शक्यता फारच कमी ( फारतर ५%) आहे. त्यातून तुम्ही हॉर्मोन थेरपी घेत आहेत त्याने स्त्रीबीज निर्मिती होत नाही मग गर्भधारणा कशी होणार? त्यातून अगदी गर्भधारणा झालीच तरी गर्भाशयाचा कर्करोग गरोदरपणाच्या हॉर्मोन्स मुळे वेगाने वाढून गर्भपात होण्याची शक्यता खूप जास्त आहे. आणि या काळात हा कर्करोग गर्भाशयाच्या बाहेर पाडण्याचीशक्यत कितीतरी जास्त आहे.

असे असताना तुम्ही तुम्ही केवळ आपल्याला मूल हवे त्यांच्या जीवाशी खेळता आहात. "शल्यक्रिया करू नका" असे सांगणारा डॉक्टर शोधणे बंद करा आणि कोणत्याही अनुभवी स्त्रीरोगतज्ञाचा ताबडतोब सल्ला घ्या किंवा टाटा रुग्णालयात जाऊन दाखवा. नऊ वर्षे कर्करोग केंद्रात काम केल्याने मला थोडाफार अनुभव आहे यामुळेच मी तुम्हाला हा सल्ला देतो आहे. तुमच्या दृष्टीने सर्वात चांगला मार्ग म्हणजे अनुभवी स्त्रीरोगतज्ञाचा ताबडतोब सल्ला घ्या आणि ताबडतोब शल्यक्रिया करून घ्या आणि नंतर सरोगसी मार्गाने (तुमचा गर्भ दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात वाढवायचा उपाय) वंध्यत्वावर उपचार करा.

मी त्यांना स्वच्छ शब्दात सांगितले कि आपल्या पत्नीला गर्भधारणा होण्याची शक्यता फारशी नाही हे सांगताना मला अजिबात आनंद होत नाहीये. परंतु कुणी तरी हे वाईट काम करणे आवश्यक आहे आणि लष्करात गोल गोल बोलण्याचे आम्हाला शिकवलेले नाही. यामुळे जे आहे ते तोंडावर स्पष्ट सांगणे आवश्यक आहे. अशा बोलण्याने दोन चार रुग्ण गेले तरी मला फरक पडत नाही.

एवढ्यात या महाशयांना एक फोन आला म्हणून ते बाहेर गेले त्या वेळेत त्या बाईंनी सांगितले कि हा माणूस माझा शत्रू आहे. मला शल्यक्रिया करू देत नाहीये. जितक्या डॉक्टरांकडे गेलो तितक्यांनी मला ताबडतोब शल्यक्रिया करा असा सल्ला दिला आहे.

एवढ्यात ते यजमान परत आले. त्यावर त्या बाई गप्प झाल्या.

मी त्यांना हाच सल्ला परत एकदा कळकळीने दिला. त्यांना तो फारसा पटलेला दिसला नाही. पुढे काय होईल माहिती नाही.

अर्थात मी याच्यापेक्षा अधिक काहीही करू शकत नव्हतो. डॉक्टर्स डे च्या दिवशी माझी अगतिकता मला प्रकर्षाने जाणवत होती.

या बाई कोणत्या कारणाने या माणसाचे ऐकत होत्या आणि आपला जीव धोक्यात टाकत होत्या हे समजत नव्हते. त्यांची काहीतरी अगतिकता असावी असेच मला वाटते.

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

13 Jul 2023 - 10:08 pm | प्रसाद गोडबोले

कायदा कागदोपत्री छान असतो पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती फार वेगळी असते.

हे वाक्य फार आवडले :D

पण त्या तक्रारीचा पाठपुरावा आकारण्यास ती महिला येणार नसेल तर या सर्व खटाटोपीतून केवळ मनःस्ताप सोडला तर काहीही निष्पन्न होणार नाही.

होय हा भाग आहेच. अन् असं बहुतेक घरगुती अत्याचाराच्या केसेस मधे दिसतं देखील. यात त्या पीडीत महिलेचं प्रबोधन महत्त्वाचं तितकंच तिच्या घरच्यांचंही.
माझ्या माहिती प्रमाणे अशा महिलांसाठीच राष्ट्रीय महिला आयोग आहे, ज्यांना काय करावं ह्याचा निर्णय घेता येत नाही. ते हे प्रबोधनाचं कामही करतात. अर्थात् या केसेस त्यांच्या समोर आल्यानंतर. पण हा भाग मान्य आहे की प्रक्रीया फार वेळखाऊ आणि किचकट असणार. त्यात पुन्हा त्या महिलेचं कुटुंब बहुदा तिला अ‍ॅक्सेप्ट करत नाही, त्यामुळंही महिला पुढे यायला धजावत नाहीत. पण अगदीच जीवाशी खेळ चालला आहे असं दिसल्यामुळे विचारावंसं वाटलं. असो.

अवांतरः
कर्करोगाचं मूळ कारण कधी समजू शकतं का? म्हणजे शरीरात अमुक बिघाड झाल्यामुळं अमुक यंत्रणा काम करेनाशी झाली आणि या सर्वाचा परिणाम म्हणजे अमुक कर्करोग.. अशी काहीशी कारण मिमांसा करणं शक्य आहे काय? अन् तसं शक्य असल्यास आणि त्या मूळ कारणावर उपचार केल्यास कर्करोग बरा होण्याचे चान्सेस वाढू शकतील काय? मी वैद्यकीय क्षेत्रातला नाही अन् याबद्दल काही माहितीही मला नाही. केवळ जिज्ञासा म्हणून असा विचार आला. त्यामुळं चुभुद्याघ्या.

याबद्दल कुणी काही सांगू शकेल काय? की हा विचारच चुकीचा आहे?

सुबोध खरे's picture

14 Jul 2023 - 7:45 pm | सुबोध खरे

शरीरात जितक्या तर्हेचे अवयव आहेत आणि त्यातील जितक्या तर्हेच्या पेशी आहेत त्या सर्व तर्हेच्या पेशींचा कर्करोग होऊ शकतो.

म्हणजेच निदान २०० च्या वर तर्हेचे कर्करोग आहेत.

त्यामुळे इतक्या वैविध्य असलेल्या रोगाला एकाच धाग्यात गुंफणे अशक्य आहे.

https://www.cancerresearchuk.org/what-is-cancer/how-cancer-starts/types-...

धन्यवाद. लेख बराचसा वाचला अन् आणिक जिज्ञासा उत्पन्न झाली. म्हणून आणखीही बऱ्याच साईट्स बघून झाल्यात. अर्थात् ही केवळ वरवरची माहिती आहे आणि डॉक्टरांनाच काय ती कारणमिमांसा करणं खरोखर शक्य आहे हा भाग मान्य.

कर्करोगाचं मूळ कारण जीन्स मधील झालेले अनैसर्गिक बदल हे सांगीतलेलं सापडलं आणि हे अनैसर्गिक बदल अनेक कारणांमुळे होऊ शकतात असंही गूगलल्यावर दिसलं.
त्याच्या पलिकडे आणखी खोलात जाऊन मूळ शोधण्यावर आणि त्याबरहुकुम उपचार शोधण्याचं काम चाललंच असणार, त्यामुळे एका धाग्यात हे बसणं अशक्यच आहे हेही मान्य.

एक सांगायला हवं. "कोणत्याही पेशंटच्या आंतरिक बिघाडाचं मूळ कारण कळू शकेल काय?" असा प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे या पुस्तकांतील काही टेस्टीमोनीज -
लिंक

त्या अनुषंगानं कर्करोगासंदर्भातून माझा प्रश्न इथं मांडला होता.
आपल्या धाग्यामुळं अन् प्रतिसादामुळं बरीच माहिती मिळाली त्याबद्दल अनेकानेक आभार.