“ काय घेणार ? रम, वोडका, वाईन की या पावसात चिल्ड बिअर ? ” तिने नेहमीच्या उत्साहात विचारलं.
“ कॉफी, ” त्यानेही नेहमीसारखं थंडपणे उत्तर दिलं.
“ खूप बोअर आहेस रे तू. ”
“ आता जे पॅकेज आहे, ते आहे तुझ्यासमोर. Want to go for return or exchange ? ”
“ नको, चालवून घेईन. वैसे भी ' तेरे संग एक सिम्पलसी कॉफी भी किक देती है, तेरे संग'.. ” ती खट्याळ चेहरा करून गात म्हणाली.
“ तुझ्याकडे प्रत्येक सिच्युएशनवर गाणी कशी असतात गं ? मागच्या वेळी कुठला तरी विचित्र खेळ शोधून काढला होता. त्यात कमोड सीटवरचं गाणंही आठवलं होतं तुला. काय तर...' कुछ हुआ क्या? ', ' अभी तो नही... कुछ भी नही ' अशक्य आहेस. ”
“ अरे, तो खरंच घडलेला किस्सा होता, त्या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी. किशोरदा आणि लता दिदींमध्ये. किशोरदांच्या डोक्यात असं यायचं फाजील काहीबाही. बिचाऱ्या लतादीदींची वाट लागली होती हसून हसून. असायला हवं रे असं जिंदादिल ! लेकिन ये दो पल के खुशियों की किमत तुम क्या जानोगे, देव बाबू ! तुम्ही सोमी वर कितीही दाखवा, we are chilling at..., feeling happy... कुठे नं कुठे, पाचर प्रत्येकाची मारलेली असते. लाईफ तो सभी की झंड होती है, पण अस्वस्थता कुठवर शिलगावत बसायचं. Well, here we go... पा पारप्पा पारारा coffee is ready.. ” ट्रेमध्ये कॉफीमग्ज ठेवत ती म्हणाली.
“ ... पण थांब, आधी चिअर्स करू या. ”
मध्येच असं काही तिच्या डोक्यात येणं त्याला नवीन नव्हतं.
“ कॉफी आहे यात, ” तो.
“ ऐक नं, तुला माहितीये, हे असं ग्लासेस एकमेकांवर हलकेच टेकवून ' चिअर्स ' असं का म्हणतात ? ” ती उत्साहाने म्हणाली.
“ ज्या गावाला जायचं नसतं, त्या गावच्या खाणाखुणा मी नाही जाणून घेत.” शक्य तेवढा निषेध जाणवेल, इतका तिटकारा त्याच्या बोलण्यात एकवटला होता.
“ ऐक तरीही. आपल्या डोळ्यांना त्यामधील द्रव्याचा रंग दिसतो. नाकाला त्याचा गंध जाणवतो. हातांना थंडगार स्पर्श सुखावतो. जिभेला तर काय, साक्षात चव कळणार असते. अन्याय होतो पंचेंद्रियांपैकी, बिचाऱ्या एकट्या कानांवर. कोणतंच सुख त्यांच्या वाट्याला येणार नसतं. म्हणून त्यांच्यासाठी हे असं ' चिअर्स ' म्हणायचं. कसलं भारी आहे हे ! मला आवडली ही फिलॉसॉफी. जिच्यामध्ये कुणाला एकटं पाडलं जात नाही, उलट सुखात सामावून घेण्याचा विचार केला जातो, ती फिलॉसॉफी वाईट कशी ? आणि चांगली असेल, तर मग कॉफीसाठीही ती वापरायला काय हरकत आहे ? "
“ कुठून येतात एकेक खुळं तुझ्या डोक्यात, हे मला आजवर न उलगडलेलं कोडं आहे, पण तरीही बात में दम है.. सो चिअर्स फॉर युअर फिलॉसॉफी, ” म्हणत त्याने जसा तिच्या कॉफीच्या मगवर त्याच्या हातातला मग टेकवला, तशी सुखावली ती मनातून.
“ चिअर्स! ”
गरम कॉफीचा छोटासा घोट तिने घेतला, तेवढ्यात त्याचा फोन वाजला.
“ अरे, थांब ... ” तोंडाजवळ नेलेला कॉफीचा मग न उष्टावता तसाच खाली ठेवत असताना तिचे ते शब्द त्याला ऐकू गेले नाहीत. फोनवर बोलत तोवर तो बाल्कनीत गेलासुद्धा. परत आला तोच मुळी वैतागून.
राजकन्येला खुपण्यासाठी सात गाद्यांच्या खाली लपलेला केस पुरेसा असतो, तसं त्याच्या उद्वेगासाठी जरासं खुट्टही खूप असतं, एवढं तिला पुरतं माहीत झालं होतं. फेसाने काठोकाठ भरलेल्या बिअरच्या ग्लासात लगेच आणखी बिअर ओतून चालत नाही. फेस आपल्याआप निवळेपर्यंत थांबावं लागतंच. त्यामुळे लगेच काही न विचारलेलं बरं, असा विचार करून ती गप्प बसली. आज याच विषयावरची फिलॉसॉफी का सुचतेय, याचं तिला हसू आलं. पण उगाच आगीत तेल नको, म्हणून तिने ते महत्प्रयासाने आवरलं. त्याचं मात्र कुठेच लक्ष नव्हतं.
“ जावं लागेल, ” एवढंच बोलून तो तडक निघून गेला.
तिने कॉफी मग्ज तिथून उचलून आत नेऊन ठेवले. त्यातली कॉफी सिंकमध्ये ओतून दिली. त्यानंतर मात्र बराच वेळ ती ट्रेवरच्या दोन कॉफी रिंग्सकडे बघत बसली. प्रसंग घडून जातात, पण कळत नकळत रंग, गंध, आकारांची ही अशी हवीनकोशी इम्प्रेशन्स उमटवून जातात मागे, झाल्या प्रसंगाची साक्ष देत. या विचारासरशी तिने ट्रेवरची कॉफीची वर्तुळं पुसून टाकली. मनातून मात्र ती जाईनात, पुढे कितीतरी दिवस. कितीही चाललो, तरीही पुढे जाण्याचा फक्त भास असतो वर्तुळात. फिरून आपण पुन्हा तिथेच येत असतो.
'चिअर्स' केल्यानंतर एक घोट घेऊन मगच ग्लास खाली ठेवायचा असतो, तरच पाचही इंद्रियांच्या सुखाचा हिशेब पूर्ण होतो. नाहीतर नशिबात नसलेलं सुखाचं दान कुणाच्या तरी पदरात टाकताना कुणाच्या हातातोंडाशी आलेलं सुख हिरावून घेतलं जातं. हक्काच्या सुखाला कुणालाही 'हे असं' पारखं करू नये, हे त्या दिवशी त्याला सांगता सांगता राहून गेलं...ते कायमचं !!!
प्रतिक्रिया
26 Jun 2023 - 8:40 pm | गवि
छान आहे. आवडले.
26 Jun 2023 - 8:50 pm | जेपी
आवडलं.
26 Jun 2023 - 9:07 pm | सर टोबी
माझं साम्य आहे म्हणून कदाचित तुम्हाला न जाणवणारा कंगोरा समजावून सांगावा हा उद्देश.
मला स्वतःला सुखाची अनुभूती हि पूर्णतः निष्कलंक असलेली हवी असते. कुणाची तरी आपल्याकडून वेळ, सानिध्य, किंवा तत्सम काही तरी अपेक्षा असते आणि ती तशीच ठेऊन आपण काही तरी ओरबाडल्यासारखे सुख अनुभवतो हि गोष्ट मला आवडत नाही. ”अशी वृत्ती असेल तर आपण कधी सुखीच होणार नाही” अशी वाक्य ऐकावी लागतात. पण कोळ्याच्या जाळ्यात अडकलेले मासे देखील तेव्हड्यात दुसऱ्या माशांना खातात असा प्रकार डोळ्यासमोर येतो. त्या माशांपेक्षा आपल्या जाणिवा थोड्यातरी प्रगल्भ असाव्यात ना?
27 Jun 2023 - 9:24 am | सुबोध खरे
मला स्वतःला सुखाची अनुभूती हि पूर्णतः निष्कलंक असलेली हवी असते
टोबी सर
माझ्या नात्यातील एका २५ वर्षाच्या मुलीला दुर्धर असा कर्करोग आहे आणि तो सध्या कोणत्याच उपचारांना दाद देत नाही आहे. अशा स्थितीत त्या मुलीने किंवा तिच्या आईवडिलांनी आल्या क्षणाचा आनंद लुटू नये का? त्यांना निष्कलंक अशी सुखाची अनुभूती कशी मिळेल? कोणत्याही क्षणी आईवडिलांच्या मनातून मुलीचा विचार जाणे शक्यच नाही.
आपले म्हणणे आपल्यापुरते ठीक आहे पण त्या माशांपेक्षा आपल्या जाणिवा थोड्यातरी प्रगल्भ असाव्यात ना? हे आपले वाक्य खटकले.
माझ्या कडे येत असलेली एक रुग्ण स्त्री वय वर्षे ५४. तिला स्वतःला कर्करोग आहे तिच्या यजमानांना हि कर्करोग आहे आणि सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तिच्या मुलीला पण तरुण वयात कर्करोग आहे. घरच शापित असावे तशी दुर्दैवी स्थिती आहे.
अशा माणसांनी आपल्या जाणीवा प्रगल्भ कशा करायच्या?
अशी माणसे "आला दिवस साजरा" करत असतात आणि माझ्या मते तेच अतिशय योग्य आहे.
26 Jun 2023 - 9:15 pm | मुक्त विहारि
आणि प्रत्येकाची आपली एक एक कथा असते
26 Jun 2023 - 9:39 pm | तुषार काळभोर
चालत्या गाडीत गप्पा गोष्टी हास्य विनोद चाललेले असताना अचानक मोठ्ठा खड्डा यावा आणि त्या धक्क्याने डोकं जोरात समोरच्या सीटवर आदळावं, असं वाटलं..
27 Jun 2023 - 8:21 am | प्रशांत
आवडले
27 Jun 2023 - 8:37 am | प्रचेतस
सुरेख, आवडलं.
27 Jun 2023 - 8:51 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाह !आवडलं लेखन. मस्त. चिअर्स. आज या विषयामुळे आणि पावसाच्या वातावरणामुळे 'बसावं'वाटू लागल.
-दिलीप बिरुटे
27 Jun 2023 - 3:28 pm | टर्मीनेटर
बडा नेक खयाल है!
चिअर्स 🍻
27 Jun 2023 - 3:35 pm | गवि
कॉफी ना?
27 Jun 2023 - 9:24 am | सुबोध खरे
सुन्दर लेख !!!!
27 Jun 2023 - 10:31 am | Bhakti
खुपचं सुंदर!
आपल्याला सुख देणार्या प्रत्येकाच्या भावनेत समरसता, परिपूर्णता देता यावी..आणि हे घडतच राहायला पाहिजे...
27 Jun 2023 - 10:36 am | इपित्तर इतिहासकार
तरल, आशयघन आणि त्याचवेळी कारुण्याचा थोडासा हलका फ्लेवर शेवटाकडे, फक्कड जमली आहे कॉफी.
पुलेशु.
27 Jun 2023 - 12:48 pm | मी-दिपाली
सर्व वाचकांना धन्यवाद अन् प्रतिसादकांचे आभार. _/\_
27 Jun 2023 - 3:23 pm | टर्मीनेटर
मस्तच लिहिलंय 👍
27 Jun 2023 - 4:19 pm | चांदणे संदीप
सुरेख लिहिलंय!
आभाळात गच्च आहे पण पडेल न् पडेल या अशा वातावरणात एक सुंदरशी शॉर्ट्फिल्म पाहिल्याचा फील आला वाचून.
सं - दी - प
27 Jun 2023 - 7:59 pm | चौथा कोनाडा
व्वा,,,, सुंदर!
जोडी आवडली, दोघांमधली केमिस्ट्री आवडली.
... आणि अर्थात च चियर्स च्या पाठीमागचं तत्वज्ञान पटलं!
झकास... और आन देव !
27 Jun 2023 - 10:27 pm | अथांग आकाश
झकास लिहिलंय!