रिमोट..

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
12 Jun 2023 - 9:24 am

आधुनिक जगाचा कळीचा शब्द म्हणजे रिमोट. तो अनंत,अगाध, सर्वसमावेशक शब्द आहे. तो सर्व जग व्यापून दशांगुळे उरलेला शब्द आहे. घरीदारी रिमोट हवाच. लहान मुलांच्या खेळण्यात रिमोट हवा. तिथपासून ते प्रत्यक्षातले यान उडविण्यासाठीही रिमोट हवा.

मोठमोठे नेते अनेक प्रकल्पांचं उद्घाटन प्रत्यक्ष तिथं न जाता रिमोटनं करतात. अगदी ग्रामपंचायती ते अख्ख्या देशाचा रिमोट कुणाच्या तरी हातात असतो. (महिला सरपंचबाईंचा रिमोट त्यांच्या नवऱ्याच्या हातात असतो.) आघाडी म्हणू नका,दल म्हणू नका, युति, गठबंधन, ब्रिगेड,सेना, काही म्हणू नका. प्रत्येकाला एक रिमोट असतो आणि तो भलत्याच कुणा माणसाच्या हातात असतो. काहीवेळा तर आख्खा देशच्या देश एखाद्या बलाढ्य देशाच्या रिमोट वर चालत असतो.

घाबरु नका मी आंतरराष्ट्रीय पातळीवर नाही तर अगदी घरगुती पातळीवर बोलणार आहे. माझ्या घरातल्या बिघडलेल्या रिमोटबद्दल!

मी अज्ञ बालिका(सत्तर वर्षांच्या घोडीला बालिका कोण म्हणेल?पण परमेश्वराच्या पुढे मी बालिकाच!). रिटायर्ड सर्वसामान्य गृहिणी. सोफिस्टिकेटेड भाषेत होममेकर. मलाही आमच्या टाटा स्कायच्या रिमोटनं एकदा सतावलं. मला जुना इत्तेफाक सिनेमा पाहायचा होता. मला खरं तर नंदा आणि राजेश खन्ना दोघंही आवडत नाहीत. पण त्यातलं रहस्य मस्त होतं. (ते रहस्य माहीत असूनही) अनावर झालेल्या झोपेवर नियंत्रण ठेवून मी सिनेमा पाहायचा असं ठरवलं होतं. "या वयात पडावं जरा दुपारचं! विश्रांती घ्यावी." ही माझी आवडती उक्ती गुंडाळून ठेवून मी सिनेमा पाहायला बसले होते.

दोन रिमोट होते. एक टीव्हीचा, तो वापरून फक्त टीव्ही सुरु केला. पण टाटा स्काय चा रिमोट चालेचना. यापूर्वी दोन वेळा नवीन रिमोट आणून झाले आहेत. पण ते थोड्याच काळात असहकार पुकारतात. प्रोग्राम गाईड बटण दाबून देखील गाईड उर्फ चॅनेल लिस्ट स्क्रीनवर येईना. वर खाली बाणाचे चिन्ह असलेल्या बटणाने चॅनल बदलेनात. थोडक्यात ऑन ऑफ वगळता उपयोगाचे कोणतेच बटण चालेना. बटणावर दात ओठ आवळून जोर दिला, रिमोटची दिशा, कोन बदलून बघितले. शेवटी उठून रिमोट त्या बॉक्सला जवळ जवळ टेकवून बटणे दाबली, तरी चॅनल बदलेनात. मी थेट आकडे वापरून चॅनल नंबर टाइप करून पाहिला. ती बटणे चालू होती पण सगळे नंबर नव्हेत. अधले मधले. त्यातही मला हवा तो चॅनल सोडून रिमोटच्या मनात येतील तसे एक एक्स्ट्रा, एक कमी असे वेडेवाकडे आकडे स्क्रीन वर उमटू लागले. त्या नंबरचा चॅनल उपलब्ध नाही असे मेसेज येऊ लागले. री स्टार्ट केल्याने मंगळयानाची सिस्टीम देखील पुन्हा सुरळीत होते असे चित्रपटात पाहिल्यामुळे टाटा स्काय बॉक्सला एक थप्पड मारून पॉवर ऑन ऑफ केली. पण तरी गाईडचं बटण दाबलं जाईना. त्यामुळे फक्त दर्शनी चॅनलवर नापतोल वरच्या कर्कश्श आवाजातल्या जाहीरातीच फक्त ऐकू येऊ लागल्या. त्याचा आवाज कमी होईना. अडीच वाजले. राजेश खन्ना नं नंदाच्या घराच्या खिडकीतून आत उडी मारली असेल का? कमालीच्या उत्सुकतेने माझा जीव उडत होता. दुपारच्या वेळात सगळे शेजारी झोपलेले. ते वैतागले असणार.
मग मी रिमोटलाच "धक्का मार" मेथडने चालू करायचं ठरवलं. मी रिमोटला हातानं जोरदार थप्पड मारली. पण नो यूज.मार खायला सरावलेल्या कोडग्या कार्ट्यागत रिमोट ढिम्मच!

मग लक्षात आलं की अरे रिमोट मधले सेल संपले असतील. सेल बदलूया. इतकं सोपं उत्तर आधीच का नाही सुचलं?(उगीच "हे"मला"....." म्हणायचे नाहीत.) मग सगळ्या घरभर सेल शोधले. नेहमीच्या ठरलेल्या (!!) जागेवरही ते नव्हते. मग मी अंजनाबाईंना सेल आणायला पिटाळलं. त्यांनी बारीक सेल आण इतके ऐकून डबल ए आणि ट्रिपल ए मधे घोळ करत रिमोटमधे न बसणारे सेल आणले. अर्थात चूक माझी होती. मी त्यांना नीट समजावून सांगितले नव्हते. मग लक्षात आलं,अरे रिमोट कशाला! टाटा स्काय बॉक्स lवरच काही बटणं असतील का? पूर्वी टीव्हीला असायची तशी? रिमोट आल्यापासून टीव्हीलाही बटणे असू शकतात हे विसरूनच गेलो आहोत सगळे. तशी सापडली तर ती बटणं ऑपरेट करून चॅनल बदलू या ना ! एव्हाना राजेश खन्नानं टबमधलं प्रेत बघितलं असेल!माझा जीव त्या प्रेतासाठी तळमळला. पण कुठेही ऑन ऑफ शिवाय बटण दिसेना.

मग माझ्या नातवाला बंटीला बोलावलं. त्याला बाई सगळं सगळं येतं. इतका हुशार आहे! काॅंम्प्युटरमधलं तर इतकं कळतं!(शुभं करोति मात्र म्हणत नाही.सूनबाई शिकवत नाही.जाऊ दे. तो विषय आता काढत नाही.) तर नातवाला रिमोट दाखवला. त्यानं लगेच सायकलवर टांग मारली. दुकानात गेला. बरोबर साईजचे सेल आणले. रिमोटमधे टाकले. रिमोट चालू झाला. मी शेवटी तो इत्तेफाक सिनेमा लावला. बघते तर काय राजेश खन्ना नंदाच्या प्रेतासमोर उभा राहून शेवटची वाक्यं बोलत होता,"मैं इसी घरमें आया ये एक इत्तेफाक है! मैंने वो लाश देखी ये एक इत्तेफाक है!

..आजीका रिमोट खराब हुआ ये भी एक इत्तेफाक है!"

राजेश खन्ना चक्क माझं नाव घेत होता? माझा माझ्या कानावर विश्वास बसेना. मी तंद्रीत असतानाच नातवाची हाक कानावर आली.," काही तरी खायला दे ना! भूक लागली आहे."

मी हसत हसत उठले. माझं आणि त्याचं कितीही वय झालं तरी मी त्याला खाऊ देणारच. माझा रिमोट माझ्या नातवाच्या हातात आहे ना!

समाजजीवनमानप्रकटनविचार

प्रतिक्रिया

अहिरावण's picture

12 Jun 2023 - 1:10 pm | अहिरावण

साठच्या दशकात मराठी मासिके आपल्या सर्वाधिक खपाच्या काळात असतांना बहुतांशी लेख/कथा/वर्णने एकसुरी आणि कंटाळवाणी असत, त्याच पठडीतले लेखन.

हलका फुलका लेख आवडला. छोटेखानी अनुभव वर्णन.

बाकी रीमोटचे म्हणाल तर टीव्ही किंवा सेट टॉप बॉक्सचाच नव्हे तर टीव्ही आणि एसीचाही रिमोट, एकदा का ओरिजिनल खराब झाला (आणि तो होतोच) तर तो कोणत्यातरी कामचलाऊ जुगाड टाइप दुकानातून डूप्लिकेटच आणावा लागतो. कंपनीचा मिळणे अत्यंत अवघड. मुळात वर्ष दोन वर्षात मॉडेल्स ऑब्सोलीट झालेली असतात. आणि हा डूप्लिकेट रिमोट देखील महिन्याभरात रंग दाखवू लागतो. मुळात विकत घेतानाच त्यात अनेक फीचर्स नसतात. उरलेली यथावकाश बंद होत जातात. शेवटी एखाद्या जुन्या मोबाईलमधे रिमोट कंट्रोल ॲप इंस्टॉल करून ऑन आणि ऑफ इतके तरी त्याच्यातून करणे हा उपाय उरतो.

योगी९००'s picture

12 Jun 2023 - 4:18 pm | योगी९००

फार छान अनुभवकथन व मजेशीर पण..

हल्ली प्रत्येक गोष्ट रिमोटवर चालते व प्रत्येकासाठी सेल लागतात. म्हणून मी नवीन कुठलीही गोष्ट wifi वर चालणारी असेल तरच घेतो. त्यामुळे थोडे पैसे जास्त लागतात पण रिमोट हरवला, सेल संपला वगैरे त्रासापासून मुक्ती मिळते. मोबाईलवरून सहज गोष्टी वापरता येतात.

माझ्या घरच्या जवळ पास प्रत्येक रिमोटच्या बॅटरीचे कव्हर निघून येते व नंतर बसत नाही. असे का होते ते कळत नाही.

प्रत्येक रिमोटच्या बॅटरीचे कव्हर निघून येते व नंतर बसत नाही. असे का होते ते कळत नाही.

अगदी अगदी.. हहपुवा ..

वामन देशमुख's picture

12 Jun 2023 - 3:24 pm | वामन देशमुख

रिमोट कथन आवडलं, आजी.

सर टोबी's picture

12 Jun 2023 - 3:51 pm | सर टोबी

तेवढं राजेश खन्नाच्या जोडीनं नंदा पण आवडत नाही या वाक्यानं मन थोडसं खट्टू झालं. उतना तो चलता है।

अतिशय सामान्य आणि गृहीत धरून ठेवलेल्या वस्तूला घेऊन एक वाचनीय आणि रिलेटेबल लेख लिहिणे आणि वाचणे मला नेहमीच आवडते.

कृष्णाजी केशव दामले अर्थात केशवसुत (१८६६-१९०५) यांच्या सुमारे सव्वाशे वर्ष जुन्या, 'रांगोळी घालतांना पाहून' या कवितेतील खालील ओळी:

साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे, नित्याच्या अवलोकने जन परी होती पहा आंधळे!

याची प्रचिती देणारे सुंदर लेखन.

चला या निमित्ताने संपूर्ण कविताही वाचूया:

रांगोळी घालतांना पाहून
होते अंगण गोमये सकलही संमार्जिले सुंदर,
बालार्के अपुली प्रभा वितरली नेत्रोत्सवा त्यावर;
तीची जी भगिनी अशी शुभमुखी दारी अहा पातली;
रांगोळी मग त्या स्थळी निजकरे घालावया लागली.

आधी ते लिहिले तिने रविशशी, नक्षत्रमाला तदा,
मध्ये स्वस्तिक रेखिले मग तिने आरेखिले गोष्पदा;
पद्मे, बिल्वदले, फुले, तुळसही, चक्रादिके आयुधे,
देवांची लिहिली न ते वगळिले जे चिन्ह लोकी सुधे.

होती मंजुळ गीत गात वदनी अस्पष्ट काही तरी,
गेला दाटुनी शांत तो रस अहा तेणे मदभ्यंतरी;
तीर्थे, देव, सती, मुनी, नरपती, देवी तशा पावना,
अंतर्दृष्टिपुढूनिया सरकल्या, संतोष झाला मना!

चित्रे मी अवलोकिली रुचिर जी, काव्ये तशी चांगली,
त्यांही देखिल न स्मरेच इतुकी मद्वृत्ति आनंदली;
लीलेने स्वकरे परंतु चतुरे! तू काढिल्या आकृती,
त्या या पाहुनि रंगली अतिशये आहे मदीया मति.

रांगोळीत तुझ्या विशेष गुण जो आर्ये! मला वाटतो,
स्पष्टत्वे इतुक्या अशक्य मिळणे काव्यात, चित्रात तो;
स्वर्भूसंग असा तयात इतुक्या अल्पावकाशी नसे
कोणी दाखविला अजून सुभगे! जो साधिला तू असे.

आदित्यादिक आकृती सुचविती दिव्यत्व ते उज्ज्वल,
तैसे स्वस्तिक सूचवी सफलता धर्मार्थकामांतिल;
पावित्र्याप्रत गोष्पदे, तुळसही, शोभेस ही सारसे,
पुष्पे प्रीतिस, चक्र हे सुचविते द्वारी हरी या असे!

तत्त्वे मंगल सर्वही विहरती स्वर्गी तुझ्या या अये!
आर्ये! तू उपचारिकाच गमसी देवी तयांची स्वये.
नाते, स्नेह, निदान ओळख जरी येथे मला आणिती,
होतो मी तर पाद सेवुनी तुझे रम्य स्थळी या कृती!

चित्ती किल्मिष ज्याचिया वसतसे ऐशा जनालागुनी
या चिन्हांतुनि हा निषेध निघतो आहे गमे मन्मनी-
“जा मागे अपुल्या, न दृष्टि कर या द्वाराकडे वाकडी,
पापेच्छूवरि हे सुदर्शन पहा आणिल की साकडी!”

“आहे निर्मल काय अन्तर तुझे? मांगल्य की जाणसी?
लोभक्षोभजये उदात्त हृदयी व्हायास का इच्छिसी?
ये येथे तर, या शुभाकृति मनी घे साच अभ्यासुनी.”
आर्ये स्वागत हे निघे सरळ या त्वल्लेखनापासुनी.

साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे,
नित्याच्या अवलोकने जन परी होती पहा आंधळे!
रांगोळी बघुनी इत:पर तरी होणे तयी शाहणे,
कोठे स्वर्गसमक्षता प्रकटते ते नेहमी पाहणे!

टर्मीनेटर's picture

14 Jun 2023 - 2:14 pm | टर्मीनेटर

हलका फुलका, मजेशीर लेख आवडला 👍

सिरुसेरि's picture

17 Jun 2023 - 7:03 pm | सिरुसेरि

हलका फुलका, मजेशीर लेख आवडला . +१