सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १: प्रस्तावना
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा २: कुडाळ ते बिचोली (७२ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ३: बिचोली- चोरला घाट- बेळगांव (८८ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ४: बेळगांव ते लोकापूर (१०८ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ५: लोकापूर- बागलकोट- कोल्हार (७१ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ६: कोल्हार- विजयपूरा- सिंदगी (१०१ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ७: सिंदगी- गाणगापूर- कलबुर्गी (९० किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ८: कलबुर्गी- मन्नेखेली (९६ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ९: मन्नेखेली- संगारेड्डी (८२ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १०: संगारेड्डी- हैद्राबाद (७० किमी)
✪ अपरिचित प्रदेशातली वाटचाल
✪ निसर्गाकडून ऊर्जेची लयलूट
✪ ग्रामीण तेलंगणामधून प्रवास
✪ जनगांवमध्ये मुलांसोबत संवाद
✪ बदकम्मा उत्सवाचा जल्लोष आणि सामुदायिक सोहळा
✪ सणासुदीचे पदार्थ आणि सावधानता
✪ १० दिवसांमध्ये ८६१ किमी पूर्ण
सर्वांना नमस्कार. सायकल मोहीमेतला १० वा दिवस, ३ ऑक्टोबरची सकाळ. काल नेरापल्लीमध्ये चांगली झोप झाली. खूप सुंदर भेटींच्या व अनपेक्षित कनेक्शन्सच्या आठवणी सोबत घेऊन नेरापल्लीतून निघालो. आता वाटेत मला वारंगलव्यतिरिक्त कोणतंही मोठं शहर लागणार नाही. इथून पुढे हळुहळु अपरिचित प्रदेशाकडे म्हणजे दुर्गम अशा गडचिरोलीच्या दिशेने जात राहीन. आता ह्या मोहीमेने खूप वेग घेतलाय. पृथ्वीची फिरण्याची गती तीच आहे, पण दिवसांचा वेग फार वाढलाय! क्रिकेटच्या भाषेत सांगायचं तर एखादी बॅटींग टीम ३४० रनचं टारगेट पूर्ण करत असेल तर जेव्हा त्यांचा अर्धा टप्पा १८०-२ असा पूर्ण होतो, तेव्हा पुढचं काम खूप सोपं होतं. आपण कोणतंही काम करत असलो तरी त्यामध्ये मानसिक घटक असतातच. आणि कोणत्याही एंड्युरन्स किंवा फिटनेसच्या कृतीमध्ये मोठ्या प्रमाणात मानसिक भागही असतो.
.
(सर्व लेख फोटोंसह इथे वाचता येतील: http://niranjan-vichar.blogspot.com/2023/04/cycling-in-4-states-on-singl... त्याशिवाय ब्लॉगवर ट्रेकिंग, सायकलिंग, रनिंग, ध्यान, आकाश दर्शन ह्यासंदर्भातील माझे अनुभव वाचता येतील.)
मनात आपोआप येणारी हिंदी गाणी ऐकत राईड सुरू केली. पाय पेडलिंग करत आहेत, मनात आपोआप आठवणारी गाणी ऐकली जात आहेत आणि मी हे बघतोय आणि त्याचा आनंद घेतोय! काय मेजवानी आहे ही! मी कालच हैद्राबादच्या थोडं पुढे आलो होतो, त्यामुळे लगेचच हायवेवर पोहचलो व पुढे निघालो. थोड्या वेळातच ग्रामीण परिसर सुरू झाला! हायवे अर्थातच चकाचक आहे, २-२ लेन आहेत. मी अनेक छोटी खेडी आणि गावांमधून जातोय. पण त्याबरोबर हिरवागार परिसर आणि निसर्गाचाही आनंद घेतोय. ही निसर्गातल्या ऊर्जेची लयलूट आहे किंवा खरं तर अय्याशी आहे! इतका निसर्ग नुसता शोषून घेणं- त्यातून जाणं हेही एक ध्यान आहे! निसर्गामधून खूप मोठी ऊर्जा मिळते आहे. थोड्या वेळाने थोडा डोंगराळ भाग लागला. एका डोंगरावर एक मंदिर आहे. भुवनगिरी असं समर्पक नाव आहे. दाक्षिणात्य शैलीची मंदिरं! ह्या महामार्गाला लागून एक सरोवरही लागलं आणि एक रेल्वे लाईनसुद्धा जवळूनच जातेय! ही राईड करतोय हे केवढं मोठं सौभाग्य!
भुवनगिरीजवळ थोडा चढ होता आणि पुढे उतारही मिळाला. जनगांवमध्ये अनेक जण मला भेटणार आहेत. माधवजी रेड्डींचे मित्र सगळीकडे आहेत असं दिसतंय! जनगांवला आरामात पोहचलो. गावातल्या मुख्य चौकात श्री. राजू जी आणि श्री. वीरेंदरजी मला भेटले व इतरही अनेकांनी स्वागत केलं. तिथेच एक छोटासा कार्यक्रमही झाला. इथे बरीच मुलंही आहेत! मुलांसोबत व मोठ्यांसोबत बोलण्याची ही संधी सोडली नाही आणि त्यांना सांगितलं की, मे करतोय ते फक्त एक उदाहरण आहे. प्रत्येकाकडे अशा गोष्टी करण्याची क्षमता आहे. फक्त आपला मानसिक आणि शारीरिक फिटनेस वापरत राहिला पाहिजे. थोडक्यात पण छान संवाद झाला हा. इतक्या लोकांची आपुलकी बघून निशब्द व्हायला होतंय! काही जण मला मुक्कामाचं घर दाखवण्यासाठी सोबत आले. आज ७६ किमी पूर्ण झाले आणि १० दिवसांचे मिळून ८६१ झाले. ही सायकल अविश्वसनीय आहे!
.
.
.
दुपारी चांगला आराम झाला. जिथे थांबलो होतो, तिथल्या ताईंना हिंदी किंवा इंग्लिश थोडंही येत नाहीय. पण जेवताना त्या खाणाखुणांनी बोलल्या. अशा लोकांसोबतच्या ह्या सगळ्या भेटी व हे प्रसंग नंतर खूप मिस करेन. पुढच्या टप्प्यांमध्ये जिथे जाईन त्या ठिकाणच्याही लोकांशी फोनवर बोललो. शक्यतो मी पुढच्या २-३ मुक्कामाच्या मंडळींसोबत बोलून ठेवत असतो. म्हणजे जाण्यापूर्वी माझ्याकडे पत्ता असतो व त्यांना काही संवाद किंवा भेटीही ठरवता येतात. ही सायकल मोहीम फक्त पेडलिंग किंवा फक्त अंतर पूर्ण करणं नाहीय. ह्यात मिळणारी विजिबिलिटी वापरायची आहे. हे अतिशय सशक्त माध्यम आहे, त्यामुळे लोकांपर्यंत पोहचण्यासाठी ते वापरायचं आहे.
संध्याकाळी सगळीकडे बदकम्मा उत्सवाचं वातावरण आहे! सगळीकडे जल्लोषाचं वातावरण आहे! बदकम्मा उत्सव तेलंगणा व आंध्र प्रदेशचं व तेलंगणा सीमा परिसराचं खास वैशिष्ट्य आहे. देवी गौरीला उद्देशून हा सोहळा असतो. नवरात्रीच्या काळातच हा सण साजरा केला जातो. महिला सजतात, नृत्य करतात, आनंद घेतात आणि उत्साहाने हा सण अनुभवतात! खरंच चुकवू नये असा हा सोहळा आहे. ह्या सणामध्ये एक समुदायाचा भावसुद्धा दिसतोय. शेजारी- पाजारी सगळे एकत्र येऊन त्यात सहभागी आहेत! महिला व मुली गाणी आणि नृत्यात दंग आहेत!
सणासुदीच्या वातावरणामुळे मिठाई आणि सुका मेवा अशा पदार्थांची रेलचेल आहे! माझ्यासाठी हे तर अगदी परिपूर्ण रिचार्ज आहे! प्रोटीन्स, मिनरल्स, फायबरची मला खूप गरज आहे. कार्बोहायड्रेटससुद्धा. पण इतके पदार्थ खाणा-या इतर लोकांचं काय? बहुतांश भारतीय सण व उत्सव आणि पारंपारिक पदार्थही खूप गोड पदार्थ व मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेटस असलेले असतात. सामान्य मेहनत व व्यायाम करणा-या लोकांसाठी हे जड असंच सेवन आहे. आणि आपल्या सणांमधील पदार्थ हे त्या काळापासूनचे आहेत जेव्हा जीवनात खूप कष्ट होते आणि जीवनशैली खूप थकवणारी असायची. इतक्या प्रमाणात असे पदार्थ घेताना आपल्याला थोडं सजग राहिलं पाहिजे. असो.
ह्या सोहळ्यामध्ये काही जणांसोबत थोड्या गप्पा झाल्या. उद्याच्या वारंगलमधल्या एका सायकलिस्टबद्दलही कळालं. जल्लोष पुढेही सुरू राहील. रात्री उशीरापर्यंत चालेल. पण मी ९.३० ला झोपायला गेलो. किती स्वप्नवत् हा प्रवास आहे! आणि पुढच्या टप्प्याबद्दल अस्वस्थता आणि उत्सुकताही आहे!
पुढील भाग: सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १२: जनगांव- वारंगल (५४ किमी)
(लेख वाचल्याबद्दल धन्यवाद! सायकलिंगमधले फोटो वर दिलेल्या ब्लॉगवर बघता येतील व ट्रेकिंग, सायकलिंग, रनिंग, ध्यान, आकाश दर्शन ह्यासंदर्भातील माझे अनुभव वाचता येतील. अशा उपक्रमांचे अपडेटस हवे असतील तर संपर्क करू शकता. निरंजन वेलणकर 09422108376)