भाग १. https://www.misalpav.com/node/51032
भाग २ https://www.misalpav.com/node/51038
भाग ३ https://www.misalpav.com/node/51041
भाग ४ https://www.misalpav.com/node/51045
अमोलच्या डोक्यात चाललेल्या विचारांनी त्याला चांगलंच पछाडलं होतं. त्याला जितका विचार करु तितके जास्त प्रश्न पडत होते. गुंता वाढतच चालला होता. शेवटी त्याने अभ्यालाच फोन करुन एके दिवशी निवांत गप्पा मारायच्या तयारीने ये असे म्हणून बोलवून घेतले. बराच वेळ शिळोप्याच्या जनरल गप्पा झाल्यावर अमोलने विषय काढला.
" अभ्या तू मागच्या काही महिन्यात जे जे बोलला आहेस ते माझ्या डोक्यातून काही जात नाहीये. तू जे पैशाने स्वातंत्र्य विकत घेण्या बद्दल, ईमर्जन्सी साठी पॅसिव्ह ईन्कम तयार करण्याबद्दल बोललास ते लईच डोक्यात बसलं आहे. तुला तर माहीतच आहे की माझ्या कडे दोन्ही नाही. पण मला ते मिळवायचे आहे. माझ्याकडून ईतक्या वर्षात ज्या चुका झाल्या त्या सगळ्या सुधरायच्या आहेत. पण काय करु, कसं करु ते सुधरत नाहीये. सुरुवात कुठून करु हेच कळत नाहीये"
" कोणत्याही गोष्टीची सुरुवात आपण जिथे आहोत तिथूनच करावी लागते अमल्या."
" म्हणजे?"
" तुला गरिबीचं दुष्ट्चक्र भेदून संपत्तीच्या भाग्यचक्रात जायचं आहे. तुला तू आहेस तिथूनच सुरुवात करावी लागणार. गरिबीतून श्रीमंतीकडे जाताना सगळ्यात पहिलं पाऊल असतं ते म्हणजे जो पैसा आपण कमवत आहोत तो योग्य प्रकारे कामी लावणे आणि दुसरं म्हणजे जास्त पैसा कमाविण्याचे मार्ग शोधणे. "
" पैसा योग्य प्रकारे कामी लावायचा म्हणजे?"
सांगतो, आधी विचार कर की जनरली आपल्या सारख्या सामान्य माणसाच्य खिशात आलेला पैसा कोण कोणत्या मार्गांनी बाहेर जातो.
१. अन्न, वस्त्र, निवारा ज्या आपल्या बेसिक गरजा आहेत त्या आणि त्याच्याशी संबंधित बाकी गॅस, लाईट बिल, प्रॉपर्टी टॅक्स आणि घरखर्च वगैरे.
२. आपली हौस मौज म्हणजे गाड्या, मोबाईल, हॉटेलिंग, ट्रिप्स, पिक्चर, टिव्ही आणि त्यांचा मेंटेनन्स वगैरे वगैरे. आता आज काल गाड्या व मोबाईल पण गरज झालेली आहे म्हणा....
३. सेव्हिंग. अडीनडिला म्हणुन आपण चार पैसे बाजूला काढून ठेवतो
४. वेगवेगळे ईन्शुरन्स, त्यांचे हप्ते.
५. लाँग टर्मसाठी केलेली गुंतवणूक जसे की ज्याला भविष्यात भाव येऊ शकेल अशी कुठे तरी घेऊन ठेवलेली जागा, चांगल्या कंपन्यांचे शेअर्स,
म्युच्युअल फंड, बाँड्स ईत्यादी
६. एखादा किंवा अनेक बिझनेस किंवा दुसरा एखादा ईन्कम सोर्स तयार करण्यासाठी केलेली गुंतवणूक.
७. आपलं आणि मुलांचं शिक्षण.
८. वेळ विकत घेणं.
यातले जे पहिले 3 आहेत ते कधीही आपल्याला श्रीमंत करणार नाहीत. ते भविष्यात कधीही आपल्या खिशात पैसे परत आणणार नाहीत. ते आपल्या खिशाला कायमस्वरूपी पडलेलं भोक आहे. ते जितकं छोटं ठेवता येईल तितके बेस्ट. चौथा आहे तो बॅक अप.
आपल्याला लंबी रेस का घोडा बनविणारे असतात ते शेवटचे चार. आपला सगळा फोकस त्यावर पाहिजे. तू जेवढा जास्त पैसा त्यात टाकशील, जितक्या लवकर टाकायला सुरुवात करशील, तितका तुझा धनवान व्ह्यायचा चान्स जास्त.
सर्वात आधी शेवटच्या ४ मार्गां साठी आपल्या महिन्याच्या ईन्कम मधली किती टक्के पैसे बाजुला काढायचे ते ठरव. ही ट्क्केवारी प्रत्येकाने स्वतःची स्वतः ठरवायची. माझ्या मते ईन्कमच्या ४० ते ५०% तरी ठेवावी. जितकी जास्त ठेवता येईल तितके ऊत्तम. त्यासाठी एक वेगळे अकाउंट काढ. त्यात ते पैसे टाकायचे. त्यात आलेला पैसा फक्त शेवटच्या ४ पर्यायांपैकी कोणत्या गोष्टीला लागत असेल तरच त्यातून जायला हवा. बाकी कशासाठीही त्याला हात लावायचाच नाही. तुझ्या डोक्यात लगेच काही प्लॅन नसेल तर RD कर, त्या पैशांची १२ महिन्यांनी एफडी कर किंवा सरकारी बाँड मधे गुंतवणूक कर किंवा Debt Fund मधे पार्क कर.
हे पैसे बाजूला काढल्यावर जे पैसे राहतील त्यातच बाकीचे सगळे खर्च भागवायचे. म्हणजे माझा ईन्कम जर १५ हजार असेल तर मी आधी पाच- सात हजार बाजूला काढणार आणि बाकी पैशात घरखर्च, हौसमौज वगैरे सगळं बसवणार. जर एक लाख ईन्कम असेल तर ५०- ५५ हजार बाजूला काढणार आणि ३०-३५ हजारात सगळे खर्च बसवणार.
हे झालं की दोन गोष्टींचा विचार करायला चालू करायचा, मला अजून पैसा आणि ज्ञान कसे मिळेल?
पहिलं म्हणजे आपल्याकडे जो रिकामा वेळ आहे त्यातून भविष्यात आणि लाँग टर्म मधे ऊपयोगी पडणारं एखादं स्किल, कशाचं तरी सखोल ज्ञान, अनुभव मिळायला हवा.
दुसरे अजून पैसे कमावायच्या संधी काय काय आहेत, त्यावर विचार कर? त्यात जर अशा संधी मिळाल्या की, ज्यात तुला सुरुवातीला थोडेफार भांडवल आणि वेळ गुंतवता येईल, आणि मग नंतर काही न करता त्यातून पैसे येत रहायचे चान्सेस असतील, तर त्यावर आधी काम कर. ज्या धंद्यामधे आपल्याला काम करावे लागते, आपल्याशिवाय जो चालणार नाही असा व्यवसाय म्हणजे दुसरी नोकरीच. त्यातून तू जास्त रिटर्न तयार कर शकत नाही. बिझनेस असा हवा की तो आपण नसताना चालू राहिला पहिजे. किंवा मग सरळ तुला पॅसिव्ह ईन्कम देऊ शकतील अशा ठिकाणी पैसे गुंतव.
जर अशी काही संधी समोर दिसत नसेल तर जिथे काहीतरी ऊपयोगी शिकायला मिळेल अशा ठिकाणी काम कर. काम करताना कान, डोळे सतत ऊघडे ठेव. कुठे काय खपतंय, काय विकतंय, कशाचे शॉर्टेज आहे, लोकांचा कल कुठे जात आहे, कुठे संधी आहे, हे सतत बघायचा प्रयत्न करत रहा. काही तरी सापडेल. संधी त्यांनाच मिळते जे ती शोधत असतात. संधी ओळखायला पण नजर लागते. ती तयार कर.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे यातून जो पैसा मिळेल, तो जे अकाउंट आपण शेवटच्या ४ मार्गांसाठी काढलं होतं, त्या अकाउंट मधे गेला पाहिजे. यातून आलेल्या पैशातून राहणीमान, फालतूचे खर्च नाही वाढवायचे. तुझ्या खिशात येणारा पैसा फक्त एकाच सोर्स मधून न येता वेगवेगळ्या मार्गातून कसा येत राहील ते बघ आणि भविष्यात तो येत राहिल याची सोय कर.
जितका जास्त पैसा कमावता येईल तितका कमव, हाती येत आहे तो पैसा शक्य तितका वाचव, तो आरोग्य, ज्ञान आणि चांगल्या परतावा देणार्या गोष्टींमधे गुंतव, आपण जगलो काय नाही जगलो काय भविष्यात पैसा येत राहील याची सोय कर. पैसा गुंतवताना जी रिस्क घेशील ती कायम लिमिटेड ठेव. अपयश येणारच आहे, गुंतवलेल्या पैशावर रिटर्न यायला वेळ लागणारच आहे, त्यासाठी बॅक अप प्लॅन तयार ठेव.
तु काही न करता पैसे नुस्ता बँकेत ठेवले तरी महागाई मुळे त्याची किंमत कमी होते. गाड्या, मोबाईल, फर्निचर, टिव्ही या सारख्या गोष्टींची किंमत पण कायम कमीच होत राहते, त्यामुळे या सर्वांपासून शक्य तितके लांबच रहायचे.
गुंतवणूकीच्या क्षेत्रात आपले दोन मोठे शत्रू. पहिला महागाई, दुसरा डिप्रिसिएशन.
गुंतवणूकीच्या क्षेत्रात आपला मित्र फक्त एकच, कंपाऊंडींग.
कंपाऊंडींग नीट शिकुन घे, त्याचे परिणाम समजून घे. ते फार फार महत्वाचे आहे. जिथे जिथे कंपाऊंडींग चा चान्स आहे तिथे तिथे तुटून पडायचे."
" ओक्के आलं लक्षात. फक्त वेळ विकत घेणं म्हणजे काय ते नाही लक्षात आले. वेळ विकत घेणे म्हणजे काय, ते का आणि कसे करायचं ते पण सांग"
" अरे एकदम साधं आहे. तुझ्याकडे घरकामाला बाई येते ना? ती असे कोणते काम करते जे तुला येत नाही? शिवाय ती करते ते काम फार काही श्रमाचे पण काम नसते. मग आपण कामाला बाई का ठेवतो? आपल्याला त्या कामासाठी वेळ वाया घालवायचा नसतो आपला वेळ त्यापेक्षा जास्त किमती असतो. म्हणून मग आपण त्या व्यक्तिला त्या कामाचे पैसे देतो आणि त्याच्याकडून ते काम करुन घेतो. अनेक कामावर जाणार्या बायका निवडलेली भाजी विकत घेतात, त्यांना काय भाजी निवडता येत नाही का? येते की, पण त्यांना तो वेळ वाया घालवायला नसतो.
जिथे जिथे शक्य आहे तिथे वेळ विकत घ्यायचा. जे जे काम आपणच केले पाहिजे असे नसते त्या सगळ्या कामांसाठी माणसं ठेवायची. आणि आपला वेळ ज्ञानार्जनामधे घालवायचा. नविन काही तरी शिकण्यात घालवायचा. प्रत्येकाला दिवसाचे चोवीसच तास मिळतात. त्यात जिथे जिथे वेळ वाचवता येईल तिथे तिथे वाचवायचा. पैसे देऊन वेळ विकत घेता येत असेल तर तो नक्की घ्यायचा."
" येस्स मी हा विचार आधी कधीच केला नव्हता. वेळ फार महत्वाचा आहे. पुढे प्रगती करायची असेल तर जेवढा वेळ मिळतो आहे तो सत्कारणी लावायला हवा, येत असलेला पैसा नीट योग्य प्राकारे वापरायला हवा. हे सगळं सोप्पं आहे. म्हणजे श्रीमंत होणं हे मला ईतके दिवस वाटत होतं तेवढं अवघड नाहीये. मी आरामात करु शकतो"
अभि शेवटच्या वाक्यावर फक्त हसला आणि काही न बोलता घरी निघाला.
प्रतिक्रिया
31 Jan 2023 - 9:44 am | कर्नलतपस्वी
अत्रंगी भौ...
किती सोप्या भाषेत कठीण वाटणारा विषय मांडला आहे.
जब जागो तब सवेरा....
अगदी याच पद्धतीने शुन्य मंडळ भेदून आज सेवानिवृत्तीनंतर चे आयुष्य मस्त चालले आहे.
लेख पुढे वाढवा, मार्गदर्शक ठरू शकेल.
हा लेख त्यांच्या करता,
आम्हा नकळे ज्ञान नकळे पुराण
यम बी ए फायनान्स चे वचन
नकळे आम्हां