गेले काही दिवस रोज एक कावळा पुनईच्या उंंचच उंच झाडावर बसून आपल्या घराण्याचा तीव्र स्वर सोडून कोमल स्वरात साद घालताना दिसत होता. त्याच्या गोड बोलण्याला दाद देणारे आसपास कोणीच दिसत नव्हते.
गावात कावळे दिसेनाचे होवूनही कितीतरी काळ लोटला हे त्याला माहीतीच नसावे असे वाटत होते.
आज सकाळी त्याच्या हाकेला दूरवरुन
उत्तर आले, आणि थोड्याच वेळात आसमंत कावळ्यांच्या कर्कश्य गाण्यांनी गजबजून गेले.
सगळं काही संपून गेल्यावर
कोणी पुन्हा पुन्हा साद घालतो
तेव्हा मनात येतं
याला काही अर्थ नाही.
हे किती खोटं आहे हे आज लक्षात आले.
आपल्या गोड बोलण्याने किती उपयोग होतो ते देवालाच माहीत,पण कावळ्याच्या प्रयत्नाने आज त्याच्यासाठी पुन्हा एकदा पहाट झाली.