पुस्तक परिचय: कोल्हाट्याचं पोर - लेखक: किशोर काळे

सुजित जाधव's picture
सुजित जाधव in जनातलं, मनातलं
9 Jan 2023 - 6:27 pm

मागच्या वर्षी वाचनालयात पुस्तक शोधत असताना माझ्या हाती किशोर शांताबाईं काळे यांचं कोल्हाट्याचं पोर नावाचं पुस्तक लागलं. पुस्तकाच्या मलपृष्टावरील ओळी वाचल्यानंतर दुःख झालं आणि किशोर काळे व त्यांच्या आईबद्दल मनात उत्सुकता निर्माण झाली. त्याच दिवशी हे पुस्तक मी घरी नेलं आणि एका बैठकीत मी ते वाचून काढलं होत.. काही दिवसांपूर्वी मी ते दुसऱ्यांदा वाचलं आणि त्याबद्दल लिहण्याचा मोह आवरला नाही…

कथेची सुरुवात होते जिजीपासून.. जिजींच खर नाव ताराबाई, त्यांचा जन्म साळी समाजात होतो. जिजींची आई लक्ष्मीबाई व वडील महादेव सोलापूरला राहत असतात. महादेव हा थोडा वेडसर असतो. महादेव एकदिवस घरातून पळून जातो आणि त्याला शोधण्यासाठी लक्ष्मी आपल्या मुलाबाळांना घेऊन घर सोडते. पण महादेव तिला काही सापडत नाही. अशावेळेस कृष्णा कोल्हाटी तिला साथ देतो, आपल करून घेतो. कृष्णा कोल्हाट्याला लग्नाची पहिली बायको असते आणि एक मुलगा देखील, त्याच नाव कोंडीबा. लक्ष्मी कृष्णा कोल्हाट्याची बायको म्हणून राहू लागते. कृष्णा कोल्हाटी जिजीला नाचगाणं शिकवतो. साळी समाजाची जीजी आता कोल्हाटी होते. एक दिवस नेरल्याला नाचत असताना नेरल्याचे माधवराव पाटील नावाचे गृहस्थ जिजीच्या प्रेमात पडतात आणि ते त्या संपूर्ण कुटुंबाला नेरल्यात ठेऊन घेतात.
त्यानंतर कृष्णा कोल्हाटी यांच्या मुलाचं म्हणजे कोंडीबाच लग्न होत. त्यांना पाच मुली व तीन मुलं होतात. त्यामधील पहिली मुलगी म्हणजे लेखकाची आई शांता. माधवराव पाटील शांताला शाळेत पाठवतात. त्या सहावी पास होतात, त्यांचं लग्न चांगल्या ठिकाणी लाऊन देतात. एका वर्षानंतर शांताबाई काळे मास्तरीन होणार असतात. पण त्याच वेळी माधवरावांचा मृत्यू होतो. आता सर्व कारभार कोंडीबाच्या हातात येतो. कोंडीबाला आधीपासूनच बसून खायची, मौजमजा करायची सवय लागलेली असते. पण माधवरावांच्या मृत्युनंतर घरात पैशाची तंगी चालू होते. तेव्हा कोंडीबा शांताबाई यांच्याऐवजी धाकट्या शालनच त्याच ठिकाणी लग्न लाऊन देतात. कारण शांता दिसायला थोडी देखणी असते आणि देखण्या मुलीच नाचायला सोडतात. कोंडीबा आता सगळ्या मुलींना नाचायला शिकवतो. नाचणाऱ्या शांताबाईंला वडिलांच्या धाकाने वडिलांचा व भावांचा संसार चालवण्यासाठी मजबुरीने नाचनारीण व्हावं लागतं.
कोल्हाटी समाजात चिरा उतरवणे नावाची एक प्रथा होती. ज्यानुसार एखादी नाचणारी मुलगी/बाई समाजातील मोठ्या व्यक्तीस आवडली तर ते त्या मुलीला बिना लग्नाची बायको म्हणून ठेऊन घ्यायचे व त्याबदल्यात ते त्या मुलीच्या घरच्यांना जामीन, घर व पैसा द्यायचे. पण हे लोक मुलींना जास्त वर्षे साथ देत नसत व त्यामुळे त्यांना परत नाचगाणं करून आपल व कुटुंबाचं पोट भरावं लागयचं. आसाच चिरा करमाळ्याचे आमदार शांताबाई यांचाही उतरवतात पण लेखकाच्या जन्मानंतर ते त्यांची साथ सोडतात. आता शांताबाईंच नाचगाणं परत सुरू होतं.
इथूनच किशोर काळे यांच्या खडतर प्रवासाला सुरुवात होते. किशोर काळे कोल्हाटी समाजातील नाचणाऱ्या स्त्रियांना कोणकोणत्या गोष्टींना समोर जावं लागत याच वर्णन करतात. त्यांना एका शहरातून दुसऱ्या शहरात सतत फिरावं लागायच. पुढे थिएटर सुरू झाल्यावर त्यांना एक-एक वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट मिळायचं. त्या थिएटरमध्ये १७-१८ वर्षाच्या तरुण पोरांपासून ते वयस्कर म्हातारे पुरुष त्यांच्यासोबत कसा व्यवहार करायचे याबद्दल लेखक सांगतात. त्यांनी त्यांचा तो भडक मेकअप करणं, पुरुषांनी त्यांच्या खोलीमध्ये येणं, अगदी ७० वर्षाचा म्हातारा १६ वर्षाच्या मुलीकडे वासनेच्या नजरेने पाहतो आश्याप्रकारचे अनेक प्रसंग पुस्तकात सांगितले आहेत. हे पुरुष थिएटरमध्ये पैसे उधळतात.. स्टेजवर एक-एक रुपया घेण्यासाठी नाचणाऱ्या स्त्रीला घोड्याची चाल करत यावं लागतं किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या नृत्याच्या चाली त्यांना कराव्या लागतात ज्यात स्त्रियांचे पाय अतिशय दुखतात आणि आंबटशौकीन पुरुष अत्यंत वाईट भाषेमध्ये त्यांना बोलतात, शिव्या देतात तरीसुद्धा या स्त्रिया हे सर्व सहन करत राहतात व घरातील पुरुष मात्र याबाबत कठोर भूमिका न घेता त्यातून पैसे मिळवून फक्त आरामात जगायचं अश्या दृष्टीकोनातून याकडे बघतात. लेखक एकाठीकानी संतापून लिहतात,

जर एखाद्या मुलीला पाहून कोणी शिट्टी वाजवत असेल तर त्या मुलीचा भाऊ नक्कीच त्या शिट्टी वाजवणाऱ्याचा खून करण्याचा प्रयत्न करेल, पण नाचनारीचे भाऊ बघा, आपली बहीण नाचताना हजारो शिट्ट्या वाजवतात, कित्येकजण तिचा हात दाबतात पण तो शिट्ट्या वाजवणारा पैसेवाला असेल तर त्याचा खून करण्याऐवजी त्याला मखमलीच्या गादीवर झोपवून हातपाय दाबण्याची तयारी या भावांची असते, कसलं नात आहे हे, कुठ गेलं बहीण भावाच नातं.

किशोर काळेंचे आजोबा कोंडीबा काळे हा या पुस्तकातला खरा खलनायक आहे. त्यांनी आपल्या कुटुंबातील मुलींना अत्यंत वाईट अनुभव येऊन देखील पुन्हापुन्हा नृत्य करायला भाग पाडलं. बारीमध्ये पाठवल आणि हे आणि यांची मुलं मात्र जे लोक या मुलींकडे चिरा उतरवायला येत, उपभोगाच्या दृष्टीने येत त्यांच्याकडून पैसे, जमीन घेत.
या सर्व प्रकाराला वैतागून शांताबाई त्यांच्यावर प्रेम करणारे सोनपेठचे सावकार कृष्णराव वडकर(नाना) यांच्यासोबत पळून जातात.
याच दरम्यान लेखकाची शाळा सुरू होते. प्रत्येक इयत्तेत त्यांना चांगले गुण मिळतात. नाना त्यांना त्यांच्या आईकडे ठेवण्यास नाकारतात, म्हणून ते नेरल्याच्या शाळेत शिकत असतात. नेरल्याला कोंडीबा व त्यांची मुलं लेखकाला खूप त्रास देतात, मारझोड करतात. घरची कामे, दळण, समान आणणे.. अक्षरशः सडा टाकण्यापसून, घरातील लोकांचे पाय दाबने, रात्रीच्या अंधारात स्मशानभूमीतून डबे घेऊन जाणे अशी कामे त्यांना करावी लागतात. लेखक शाळेत जाऊ नयेत म्हणून त्यांना पुस्तके घेऊन देत नाहीत. त्यांना शिळे अन्न खायला देतात. एकदा त्यांची आई त्यांना भेटायला आलेली असते त्यावेळेस ते तापाने फणफणत असतात, त्यांच्या हातावर आलेला फोड फुटलेला असतो. अशाही परिस्थितीत नाना त्यांच्या आईला परत घेऊन जातात. आई असून मातृत्वाचे प्रेम न मिळालेल्या मुलाची दशा काय असते आणि त्याला कश्या प्रकारची वागणूक मिळते हे सर्व वाचत असताना काळजात चर्र होत. एकदा त्याला मावशीने शाळेसाठी पैसे दिलेले असतात, ते पैसे त्याचे आजोबा चोरतात व त्या पैश्याची दारू आणतात. याबद्दल तक्रार केल्यानंतर त्याला प्रचंड मारहाण होते. त्यावेळेस त्याचे आजोबा त्याला बोलतात,

जीव जाईल एवढं मारीन. माझी लाज काढतो काय रे? तुझ्या आईनं इथं गाठोड पुरून ठेवलं नाही तुला सांभाळायला.

सहावीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत किशोर काळे एकदा आईला भेटायला सोनपेठला जातात. तिथे त्यांची कामे बघून नाना त्यांना ठेऊन घेतात आणि तिथल्या शाळेत सातवीला एडमिशन करून देतात. आता लेखक आईसोबत राहू लागल्यानंतर सुखी होतील व त्यांचे जीवन सुरळीत होईल असं आपल्याला वाटू लागत. पण त्यांच्या नशिबात मात्र वेगळंच लिहून ठेवलेलं असतं. नाना परत वाईट सवयींना बळी पडतात आणि ते लेखकाला व आईला त्रास द्यायला सुरुवात करतात. एवढ सगळ होत असतानाही लेखक असं ठरवतात की आपण शिक्षण थांबवायच नाही. पुढे एमबीबीएसला नंबर लागल्यानंतरही त्यांचे खूप हाल होतात, सातत्याने गावाला यावं लागतं. त्यांना कुणीही आर्थिक मदत करत नाही. गावाला आल्यानंतर स्वयंपाक करण्यापासून, गिरणीत राबण्यापर्यंत ते सगळी कामं करतात, तरीही वडील त्यांना व आईला बेदम मारहाण करत असतात. आई सातत्याने आजारी पडत असते तरीसुद्धा ते वडिलांचा निवडणुकीमध्ये प्रचार करतात. हे सगळं सहन करण्यापलीकडे जात तेव्हा एक दिवस त्यांना आत्महत्या करावीशी वाटते. पहिली आत्महत्या मित्रामुळे टळते, दुसऱ्या वेळेस औषध पिऊन आत्महत्या करायचा प्रयत्न करतात. या सगळ्यातून ते कसा मार्ग काढतात, त्यांना कोण मदत करत हे समजून घेण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा.
पुढे १९९४ साली किशोर काळे एमबीबीएसची परीक्षा पास होतात, हीच या पुस्तकातील शेवटची ओळ आहे.
स्त्री शरीराकडे भोगवस्तु म्हणून पाहण्याची समाजाची जी मानसिकता आहे, जी पुरुषप्रधान व्यवस्था आहे ती किती कुरूप, क्रूर आणि नीच आहे हे पुस्तक वाचताना आपल्याला पानापानावर जाणवत राहत… शून्यातून विश्व निर्माण केलं जाऊ शकत हे सिद्ध करणार हे आणखी एक पुस्तक आहे..

धन्यवाद…!!

वाङ्मयलेखमाहिती

प्रतिक्रिया

सुखी's picture

9 Jan 2023 - 9:49 pm | सुखी

अप्रतिम ओळख

कंजूस's picture

10 Jan 2023 - 6:49 am | कंजूस

समाजाच्या वर्तणुकीचा एक इतिहासच.

Bhakti's picture

10 Jan 2023 - 8:26 am | Bhakti

छान परिचय!
मराठी भाषेतील एक गाजलेले पुस्तक आहे.अनेकदा यांचा परिचय वाचला आहे. दुर्दैवाने लेखक किशोर काळे अपघाती मृत्यू झाला हे जेव्हा वाचलं,वाईट वाटलं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Jan 2023 - 9:14 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाचलं आहे, छान लिहिले आहे. लिहिते राहावे.

-दिलीप बिरुटे

सुबोध खरे's picture

10 Jan 2023 - 10:48 am | सुबोध खरे

हे पुस्तक मी खूप अगोदर वाचलेले आहे.( माझ्या संग्रही आहे). यात प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे कनिष्ठ आर्थिक वर्गात जेंव्हा जेंव्हा बाप कुटुंबाला आधार देत नाही तेथे मुलांचे आयुष्य अत्यंत कष्टाचे जाते.

डॉ किशोर काळे यांनी लिहिलेले आहे त्या कोल्हाटी समाजात तर पुरुष ऐदी स्वार्थी आणि अत्यंत नालायक असेच आढळतात. स्वतःच्या ऐदीपणासाठी आपल्या बायकोला मुलीला धंद्याला लावायला त्यांना जरा सुद्धा लाज वाटत नाही. त्यातून बायकोला मुलगी झाली तर आपल्या म्हातारपणाची सोय झाली असेच ते समजतात. याउलट मुलगा जन्माला आला तर त्याच्यावर पैसे खर्च करायला लागतो म्हणून ते मुलांचा दुःस्वासच करताना आढळतात. या समाजातून स्त्रियांची स्थिती अत्यंत वाईटच आहे. देहाच्या आड मन असेल हा विचार सुद्धा त्यांच्या पुरुषांच्या मनात येत नाही.

बहुसंख्य अनुसूचित/ भटक्या जमातीत जात पंचायतीत सुद्धा पुरुष दारू आणि मटणासाठी सहज विकले जातात असेच बहुतेक साहित्यात आढळते. त्यामुळे स्त्रियांना न्याय मिळतच नाही.

जितका समाज गरीब आणि अज्ञानी तितकी त्यातील स्त्रियांची स्थिती हलाखीची अशी स्थिती आहे.

गरिबीमुळे माणूस एकतर लाचार होतो किंवा मुर्दाड _ श्री व्यंकटेश माडगूळकर.

डॉ किशोर काळे हे अत्यंत लाचार आणि कशालाही विरोध न करू शकणारे असे व्यक्तिमत्व होते हे त्यांच्या स्वतःच्या लेखनातून जाणवते.

दुर्दैवाने त्यांच्या अपघाती मृत्यू नंतर सुद्धा त्यांच्या स्वकष्टार्जित मालमत्तेबाबत वादंग झाले असे वाचल्याचे आठवते.

गरिबीमुळे माणूस एकतर लाचार होतो किंवा मुर्दाड _ श्री व्यंकटेश माडगूळकर.

पुर्णपणे चुकीचे. गरीबीतुन पुढे आलेली कितीतरी लोक स्वतःच्या पायावर उभे राहुन कणखर असतात.
--
मुर्दाडचा अर्थ येथे दिलेला आहे. : https://मराठी.भारत/मराठी/शब्द/मुर्दाड/

सुबोध खरे's picture

10 Jan 2023 - 10:49 am | सुबोध खरे

डॉ किशोर काळे हे अत्यंत लाचार आणि कशालाही विरोध न करू शकणारे असे व्यक्तिमत्व झाले होते हे

कर्नलतपस्वी's picture

10 Jan 2023 - 11:11 am | कर्नलतपस्वी

या वर्षीच्या यादीत टाकले आहे. नक्कीच वाचेन.

टर्मीनेटर's picture

10 Jan 2023 - 11:41 am | टर्मीनेटर

सुरेख पुस्तक परिचय!

Nitin Palkar's picture

10 Jan 2023 - 7:07 pm | Nitin Palkar

सुमारे पंचवीस एक वर्षांपूर्वी वाचले आहे, हा परिचय वाचून परत एकदा वाचण्याची इच्छा झाली..

राजेंद्र मेहेंदळे's picture

10 Jan 2023 - 9:40 pm | राजेंद्र मेहेंदळे

पुस्तक परीचय आवडला असे कसे म्हणु? माणुस स्वर्थापोटी काय काय करेल याचा नेम नाही.

परंतु परीचय वाचुन पुस्तक वाचायची उत्सुकता चळवली गेली आहे ईतके मात्र म्हणेन.

सुजित जाधव's picture

11 Jan 2023 - 8:45 am | सुजित जाधव

सर्वांचे आभार..

श्वेता व्यास's picture

12 Jan 2023 - 10:29 am | श्वेता व्यास

पुस्तक परिचय छान आहे.
पुस्तकाबद्दल अनेकदा ऐकलं पण वाचण्याची हिम्मत झाली नाही.
खूप विषण्ण करणारा अनुभव असेल असं वाटतं.