सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा २: कुडाळ ते बिचोली (७२ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १: प्रस्तावना
✪ कुडाळमधील सायकलिस्टसकडून फ्लॅग ऑफ!
✪ अप्रतिम निसर्ग आणि पाऊस
✪ बांद्यामध्ये शाळा आणि सहज ट्रस्टसोबत भेट
✪ माय नेम इज एंथनी... मै साईकिल पे अकेला हूँ!
✪ गोव्याची झलक!
✪ संत गाडगेबाबा वृद्धाश्रम, शान्ती कुटीर वृद्धाश्रम आणि रोटरियन्ससोबत संवाद
✪ मानसिक रुग्णांचे कायदेशीर हक्क
✪ भेटणं आणि बोलणं खूप महत्त्वाचं
सर्वांना नमस्कार. काही दिवसांपूर्वी ४ राज्यांमध्ये केलेल्या सोलो सायकलिंगमधला म्हणजे निसर्ग तीर्थयात्रेतला आनंद ह्या लेखाद्वारे आपल्यासोबत शेअर करत आहे. २३ सप्टेंबरच्या रात्री कुडाळमध्ये मस्त आराम झाला. पहाटे लवकर उठून तयार झालो! आज पहिला दिवस! ठरलेल्या वेळेवर सकाळी ६.३० ला कुडाळमधले सायकलिस्टस- रूपेश तेली, गजानन कंदळगांवकर, अमितजी व इतर अनेक मला फ्लॅग ऑफ करायला आले. डॉ. दामलेंच्या कुटुंबियांनीही शुभेच्छा दिल्या आणि निघालो! कोणत्याही मोहीमेमध्ये पहिले तीन दिवस थोडे कठीण असतात. पण आता मोहीमांची सवय झाल्यामुळे विशेष काही वाटत नाहीय. सकाळच्या प्रसन्न वातावरणात सायकलिस्टसच्या सोबतीने सायकलिंग सुरू केलं. चक्क अंधार वाटेल असं धुकं पडलंय. विजिबिलिटी कमी आहे! पण धुक्यामुळे एक बरं वाटलं की, काही अंतरापर्यंत तरी पाऊस लागणार नाही. सायकल चालवता चालवता सोबतच्या सायकलिस्टससोबत थोडं बोलणं झालं. १० किलोमीटरवर असलेल्या झारापपर्यंत त्यांनी मला सोबत केली आणि तिथे परत एकदा शुभेच्छा देऊन माझा निरोप घेतला. आणि अर्थात् त्याआधी मला चिक्की- ड्राय फ्रूटसुद्धा दिले!
.
.
(सर्व लेख फोटोंसह इथे वाचता येतील: http://niranjan-vichar.blogspot.com/2022/11/cycling-in-4-states-on-singl... त्याशिवाय ब्लॉगवर ट्रेकिंग, सायकलिंग, रनिंग, ध्यान, आकाश दर्शन ह्यासंदर्भातील माझे अनुभव वाचता येतील.)
धुक्यामधून हळु हळु सूर्य डोकं वर काढण्याचा प्रयत्न करतोय. काय सुंदर रस्ता! कोंकण असूनही हा रस्ता तुलनेने सपाट वाटतोय. इकडची गावं खूपच इंटरेस्टिंग आहेत. काल वेंगुर्लाला राईड केली होती, त्या परिसरात आणि इकडे गोवा रूटवर सगळीकडेच अशी गावं आहेत- वेंगुर्ले, परुळे, मुणगे, बांदे, नेमाळे, अस्नोडा, तेंडोला, मांजरेकरवाडी, पेडणे, माजगांव, शिरोडा, माडखोल अशी! ह्या गावांवरून ज्यांची आडनावं आलीत असे लोक किती प्रसिद्ध आहेत! गंमत म्हणजे पुढे कर्नाटकातही अशी गावं लागली किंवा नकाशात बाजूला होती- तेलगी, केंभावी, मुधोळ वगैरे! अशी गंमत. हळु हळु धुकं कमी झालं आणि सूर्याने दृष्टी उघडली. आजचं अंतर तसं अगदीच कमी. त्यातही ३२ किलोमीटरवरच्या बांद्यामध्ये शाळेला आणि सहज ट्रस्टला भेट द्यायची आहे. हळु हळु दूर ढग येताना दिसत आहेत.
बांद्यात शाळा आणि सहज ट्रस्टसोबत संवाद
मानसिक आरोग्य हाच विषय घेऊन काम करणा-या सहज ट्रस्टच्या मीनाक्षी मॅडमसोबत संपर्क झाला होता. हा विषय घेऊन सायकलिंग करतोय, ह्याचा त्यांना खूप आनंद वाटला. त्यांचं मुख्य काम सावंतवाडी व परिसरात चालतं. सहज म्हणजे समृद्ध- हसरे- जग असं त्यांचं व्हिजन आहे. मुख्यत: मानसिक आरोग्यासंदर्भातले विषय लोकांना सांगणं, त्यावर कार्यशाळा आयोजित करणं आणि स्वमदत गट आणि समुपदेशन अशा प्रकारे त्यांचं काम चालतं. मीनाक्षी मॅडम गेली अनेक वर्षं ह्यावर काम करत आहेत. सुरुवातीला "हा" विषय घेऊन काम करण्याला घरातूनही विरोध होता, पण आता घरच्यांना ह्याचं महत्त्व कळालं आहे. अजूनही गावांमध्ये ऑटीझम असलेले किंवा slow learners ह्यांना झिडकारलं जातं. सहज ट्रस्ट त्यांच्याशी संवाद करते व त्यांना मदत मिळवून देते. मीनाक्षी मॅडमनी सहज ट्रस्टच्या संपर्कात असलेल्या बांद्याच्या शाळेत विद्यार्थ्यांसोबत माझी भेट ठेवली आहे. इथे मुलांनी मानसिक आरोग्यासंदर्भात वेगवेगळे पोस्टर्स बनवले आहेत! माझ्या सायकलिंगची मुला- मुलींना थोडक्यात माहिती दिली. शारीरिक फिटनेस व मानसिक फिटनेसबद्दल थोडक्यात बोललो. कोणता ना कोणता आवडीचा खेळ खेळण्याचं व रोज घाम येण्याचं महत्त्व ह्याबद्दल त्यांना थोडं सांगितलं. सायकलिंगच्या संदर्भात त्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. तासभराचा छान कार्यक्रम झाला. त्यानंतर लगेच निघालो.
.
.
माय नेम इज एंथनी... मै साईकिल पे अकेला हूँ!
बांद्याच्या बाहेर आलो तर हवा बदलली आहे! पाऊस आता तुफान कोसळण्याच्या बेतात आहे. लगेचच गोवा सुरू झाला! पहिल्यांदाच गोवा बघतोय! हायवे चकाचक आहे, त्यामुळे मस्त वेग मिळतोय. फक्त पुढे बिचोलीसाठी कुठे वळायचं हे तपासून घेतलं. सायकलिंग करताना आपोआप मनात गाणी प्ले होत आहेत. समुद्राची आज भेट नाहीय, तरी 'ने मजसी ने' आठवतंय. त्याशिवाय गोव्यात आल्यामुळे 'कोई कहे, कहता रहे' ही आठवतंय आणि मधूनच अगदी विपरित असं 'दिल तडप तडप के कह रहा' सुद्धा ऑटो प्ले होतंय! ही गाणी मनात मनसोक्त ऐकत जात राहिलो. पाऊस मस्त कोसळतोय पण थांबावसं वाटलं नाही. आणि मी थांबलो तरी पाऊस थांबेलच असं नाही! त्यामुळे मस्त जात राहिलो. दूरवर निळं आकाशही दिसतंय. ढग सगळीकडे नाही आहेत. हळु हळु पाऊस कमी झाला. पण आर्द्रतेमुळे परत खूप घाम आला! गोव्यात एका ठिकाणी एंथनी असं नाव बघितलं आणि लगेच मनातलं गाणं बदललं! माय नेम इज एंथनी... सुरू झालं. फक्त ओळ बदलली- मै साईकिल पे अकेला हूँ!
.
नारळाच्या बागा, डोंगर आणि हलक्या चढ- उताराचा रस्ता! एक चढ मात्र चांगलाच मोठा होता. तिथे माझी सिंगल गेअर सायकल अगदी हळु चढली. पण चालवत नेता आली. नंतर रात्री बघितलं तर तो चांगला साडेपाच अंशाचा चढ होता. आणि तो मला चढता आला म्हणजे त्याहून खूप मोठा पण पसरट चार अंशाचा चोरला घाटही जमणार, असं वाटलं. मस्त खाडीसारखी नदी लागली! अहा हा! गो गोवा! हा बारदेशचा परिसर असावा! पुढे बिचोलीचा रस्ता विचारत निघालो. इथे लोकांना मराठी समजते, पण तरी लोक हिंदीत उत्तर देत आहेत. त्यामुळे हिंदीतच बोललो. एक चहा- बिस्कीट- चिक्की ब्रेक घेतला आणि गोव्याच्या ग्रामीण परिसरातून बिचोलीकडे निघालो. मध्ये मध्ये तीव्र चढ- उतार आहेत! गोव्याचं ग्रामीण रूप बघत अस्नोडा- मूळगांव करत बिचोलीला पोहोचलो. पोहचताना रोटरी क्लबच्या दुर्गेश सरांची भेट झाली आणि मग संत गाडगेबाबा छत्र छाया वृद्धाश्रमात पोहचलो. पहिल्या दिवशीचा ७२ किलोमीटरचा टप्पा सायकलिंगच्या चार तासांतच पूर्ण झाला.
संत गाडगेबाबा छत्र छाया वृद्धाश्रम, शान्ती कुटिर वृद्धाश्रम आणि रोटरियन्ससोबत संवाद
भारत विकास संगम नेटवर्कद्वारे ह्या संस्थांशी संपर्क झाला होता. सेवा संकल्प, काणकोणच्या डॉ. अनिता तिळवे मॅडमनी संत गाडगेबाबा छत्र छाया वृद्धाश्रमासोबत जोडून दिलं. एक वेगळ्या विषयावर काम करणारी संस्था बघता आली. त्याशिवाय तिळवे मॅडमनी रोटरियन्सना माझ्या सायकलिंगबद्दल सांगितलं होतं. त्यामुळे रोटरी क्लब सदस्यांसोबत शांती कुटिर वृद्धाश्रम ह्या ठिकाणीही वेगळा कार्यक्रम झाला. गाडगेबाबा वृद्धाश्रमामध्ये वृद्ध व्यक्तींबरोबर इतरही दिव्यांग आहेत व काही गंभीर रोग असलेल्या व्यक्तीही आहेत. सायकलमुळे होणा-या भेटीमुळे इतरही नवीन लोक इथे आले आहेत. खरं तर आपल्या क्षेत्रातले हे खूप वरिष्ठ लोक! पण सायकलिस्टला भेटायला दूरवरून आलेत! संध्याकाळी छोटासा कार्यक्रम झाला. संस्थेच्या मंडळींनी संस्थेची माहिती दिली. रोटरीचे काही जण संस्थेमध्ये पहिल्यांदा आले आहेत. रोटरी संस्थेला मदत करेल असं ते म्हणाले. एक वकील आहेत, त्यांनी मानसिक रुग्णांच्या कायदेशीर हक्कांसंदर्भात चांगली माहिती दिली. आज त्यासाठी कायदे आहेत. मनोरुग्ण आहे म्हणून मालमत्तेवरून नाव व हक्क कमी करता येत नाही. हा कायदा इतका चांगला आहे की, केवळ अशा घटनेची शेजा-यांनी माहिती दिली तरी कायदेशीर अधिकार हिसकावण्यावर प्रतिबंध येतो. पण असे प्रकार कायदा असूनही होतात असं ते म्हणाले. कारण ह्या संदर्भात समाजात जागरूकता नाहीय. इतर नातेवाईक, शेजारी असे लोक ह्या बाबतीत मनोरुग्णांची मदत करू शकतात. छोटा पण सुंदर संवाद झाला. डॉ. तिळवे मॅडमनी थोडक्यात पण सुंदर मनोगत व्यक्त केलं. मानसिक आरोग्यासाठीचा हा सोलो सायकल प्रवास आम्हांला नेहमी प्रेरणा देत राहील, असं डॉ. गणपुले मॅडम म्हणाल्या! त्यानंतर काही रुग्णांनाही जाऊन भेटता आलं. डॉ. तिळवे मॅडम आजी- आजोबा व ऑटीझम असलेल्या दादासोबत प्रेमाने बोलत आहेत, हे दृश्य मनावर ठसलं.
.
नंतर शांती कुटिर वृद्धाश्रम आणि तिथलंच आधार हॉस्पिटल इथेही छोटेखानी भेट दिली. इथे मुख्यत: बिकट रोग असलेल्या वृद्धांना ठेवलं जातं. हॉस्पिटलमधल्या मॅडम खूप छान माहिती देत होत्या. त्यांचं कोंकणी तर ऐकत राहावं असं होतं. कोंकणीतले काही शब्द कळत नसले तरी अर्थ व भाव पूर्ण कळतोय. त्या सांगत आहेत की, टोकाला गेलेल्या पेशंटसना घरचेच लोक इथे आणून ठेवतात. कधी कधी घरच्यांचीही अडचण असते. काही पेशंटसना तर स्वत:ची स्वच्छताही करता येत नाही. अशा रुग्णांसाठी कर्मचारी मिळणं कठीण आहे. संस्थेला अशा अनेक अडचणी येतात. पण समाजातून अशा अडचणींवर मदतही मिळते. त्यासाठी हे प्रश्न, अडचणी व त्यावरचे उपाय समाजापुढे जायला हवेत. तसा संवाद व्हायला हवा. सायकलिंगच्या निमित्तानेही काही नवीन लोक ह्या दोन्ही संस्थांच्या संपर्कात आले. प्रत्यक्ष भेटून आणि समोरासमोर बोलून अनेक गोष्टी होतात. इथेही थोडा वेळ बोललो. इतके सिनियर लोक आणि दूरवरून भेटायला आल्यामुळे थोडं संकोचल्यासारखं वाटत होतं.
सायकलिंगचा पहिला काय दिवस गेला! सकाळी कुडाळमधल्या सायकलिस्टकडून फ्लॅग ऑफ, नंतर बांद्यात शाळेत भेट आणि संध्याकाळी गोव्यात दोन वृद्धाश्रम व अनेक मंडळींसोबत भेट! मुलांना भेटून व ह्या संस्थांना भेटून बरं वाटतंय की, मी हे सायकलिंग करतोय! फक्त वृद्धाश्रमात राहण्याची अनुमती नाहीय, त्यामुळे राहण्यासाठी रोटरी क्लबच्या सदस्यांनी एका लॉजमध्ये व्यवस्था केलीय. बिचोलीमध्ये रोटरीयन श्री. दुर्गेश सरांनी खूप सोबत केली. अगदी पोहचताना रस्ता सांगण्यापासून रात्री लॉजवर सोडण्यापर्यंत. रात्री २ किलोमीटरची छोटी राईडही केली. रात्री केळी खाल्ली आणि लवकर झोपलो. गोव्यातले मित्र कोणी कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. फक्त बिचोलीत राहणारे एक जुने एका प्रोजेक्टमधले सहकारी आवर्जून भेटले! असा पहिला दिवस गेला! वा! आता उद्या चोरला घाट!
पुढील भाग: सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ३: बिचोली- चोरला घाट- बेळगांव (८८ किमी)