या नव्या वर्षात मोरासारखं जगायला शिकायचं. कितीही नितांतसुंदर गोष्ट आपल्याला गवसली तरी त्यावर आपली मालकी अनंतकाळ नाही याचं भान तसंच ठेवायचं. शक्यतो ती मालकी योग्य वेळी आपणहून सोडायची. मोरपीस किती सुंदर असतात! कधी एखादा हाती लागला तर आपण हावरटा सारखे जपून ठेवतो तो ठेवा. मोराकडे तर गुच्छच असतो तशा पिसांचा. त्या मनमोहक पिसाऱ्याचा करायचा तो वापर तोही करतोच. पण नंतर त्या पिसाऱ्याचा गुलाम होत नाही. हिवाळ्याच्या सुरूवातीला सगळे मोरपीस झाडून टाकायला सुरुवात होते. मग निसर्ग अशा निर्लोभी जीवांना 'ते' सौंदर्याचं दान दरवर्षी देतो. तुमच्याकडे अशी मोरपंखी माणसं, आठवणी, वस्तू इ.इ. बरंच काही असेल. त्या टाकून द्या असं नाही सुचवत आहे. पण त्यात 'अडकून पडायचं' मात्र टाळा. कुणीही प्रचंड आवडती किंवा नावडती व्यक्ती मनात आणा. त्याची/तिची खरी किंमत/महत्त्व याचा अंदाज लावायला जमतोय का? नाही ना. इतरांचेही तुमच्या बाबतीत असेच होत असेल. म्हणून कुणाचे राग-प्रेम सदैव एकाच साच्यात बसवून नाही स्वीकारायचे. आपण सगळे एकाच कुंडीतले जीव आहोत. कुणी माती, कुणी काटा, कुणी गुलाब तर कुणी अत्तर! तेव्हा मोराला लक्षात ठेवायचं. संकटांचा मुसळधार पाऊस कोसळत असेल तर आपल्याकडचं सर्वोत्तम जगासमोर उघडं करून मनसोक्त नाच करायचा. आणि गरज संपली की 'ते' उत्तम दुसऱ्या कुणाला सुपूर्द करायचं. नाच विसरायचा नाही. लोभ धरायचा नाही. आयुष्याला कवटाळायचं आणि मनसोक्त हसायचं. कारण 'सुखाचा सदरा' नेसायला पैशांच कापड लागत नाही.
नूतन वर्षाभिनंदन :-)
प्रतिक्रिया
3 Jan 2022 - 8:11 am | आनन्दा
लेख अगदी मोराच्या पिसार्यासारखा आहे!!
3 Jan 2022 - 5:51 pm | अनुस्वार
आभार, आनन्दा जी.