आप मुझे अच्छे लगने लगे-२

पाटिल's picture
पाटिल in जनातलं, मनातलं
12 Dec 2021 - 9:37 am

भाग-१:
https://www.misalpav.com/node/49462

(पुढे चालू)...

'भाभी,असं कसं विसरून जाऊ सपनाला? माझा दिल
दुखतो. मला आत्ताच सपनाला जाऊन भेटलं पाहिजे'
रोहित-निशिगंधाभाभीचा होस्टेलच्या गेटवर संवाद चाललाय.

ह्यावर भाभीचं म्हणणं असं पडतं की, 'तू सुरक्षित रहावास ह्या भूमिकेतूनच सपनाने हे नातं संपवण्याचा निर्णय घेतला आहे..! ह्यामध्ये माझा काही विशेष रोल नाही. मी फक्त हा निरोप सांगण्याचं कर्तव्य करत आहे..! याउप्परही तुला तुझ्या प्रेमाची अभिव्यक्ती करायची असेल तर तू स्वतंत्र आहेस..! परंतु तू तसे केलेस तर वो लोग तुला कुत्र्याप्रमाणे मारून टाकतील, हे तू समजून घ्यावंस अशी माझी विनंती आहे.'
या बिंदूवर रोहितकडे बांगड्या सोपवून भाभी पुन्हा 'वो लोगों'च कडे वापस जाते.

तिकडे सपनाच्या सगाईचा सीन.
एका हॉलमध्ये धरून आणलेले पाहुणे रावळे, व-हाडीमंडळी वगैरे व्यवस्थित रांगेमध्ये उभे आहेत.

रोहितची एंट्री..! रोहितने आता बहुदा लग्न समारंभांमध्ये
नाचण्याच्या सुपाऱ्या घ्यायला सुरुवात केली आहे.
कारण घरभर मेणबत्त्या घेऊन फिरणारे आलोकनाथ ह्याला शिकायला पैसे कुठून देणार?
ते फक्त सल्ले देणार..!
आणि अधूनमधून ह्याच्या फुग्यात हवा भरून मोकळे
होणार..!
त्यामुळे नाचा, कमवा आणि शिका..!
ही योजना रोहितसारख्या होतकरू विद्यार्थ्यासाठी
अतिउपयुक्त आहे.

म्हणून मग डान्स, गाणं इत्यादी..!
बोल साधारण गाण्याचे असे आहेत की,
'हे माझे राणी, तू भिऊ नकोस. हा मौसम बदलून जाईल
आणि मग आपण दोघे प्रेमकहाणी लिहू.आपलं प्रेम
हे असं आहे. तसं आहे. इत्यादी. इत्यादी.'

अशा पद्धतीने रोहितकडून सपनाकडे आश्वासन
आणि धीर प्रवाहीत होतोय...!
हॉलमध्ये दोन-तीनशे पाहुणे उपस्थित आहेत.
परंतु त्यांना काहीही होत नाही. कारण ते नकली
आहेत... आणि त्यांना प्रेम,आश्वासन,धीर वगैरेंची काही
गरजही नाही.
फक्त सपना तेवढी स्टेजवर जागच्या जागी थरथरतेय..!
कारण ते सगळं गाणं तिच्यासाठीच आहे..!

{मंद असणे हा गुन्हा नाही. जगात तसे खूप लोक मंद
असतात. अभिनयाचे सूक्ष्म कंगोरे माहिती असणाऱ्या
अभिनेत्रींचीही काही कमतरता नाही. परंतु गल्ला
जमवण्याच्या दृष्टीने त्यांचा फारसा उपयोग होत नाही..!
परंतु आपला मंदपणा अभिनयातून तमाम प्रेक्षकांपर्यंत
पोहोचवणे आणि त्यांना बधिर करणे, हे कौशल्य फार
दुर्मिळ..! आणि ते सपनाकडे पुरेपूर आहे..!
तिला काहीच अडचण नाही..! ती जिंदाबाद आहे..!}

आता सपना थोडा वेळ रूममध्ये जातेय आणि इथे
रोहितकडून सपनाकडे बांगड्यांचं आणखी एकदा
हस्तांतरण होतेय. ह्या बांगड्यांचा प्रवासही मोठाच
रोमहर्षक आहे.

इकडे ग्रुपफोटो वगैरे काढताना सपना स्टेजवर नाही,
हे ढोलकीयाच्या लक्षात येते आणि तो रमनला तिच्या
रूममध्ये पाठवतो.
रमनला फक्त एवढेच दिसते की खिडकीच्या काचा रूममध्ये विखरून पडलेल्या आहेत आणि सपना
गायब आहे.
एवढ्यावरून रमन ताबडतोब अंतिम निष्कर्षाप्रत
पोचतो की सपनाला कालिया दुष्मनाने पळवून नेले..!

रोहितचे नियोजन असे आहे की आपण इथेच समारंभामध्ये ढोलकियाच्या नजरेसमोर राहिलो तर आपल्यावर त्यांचा संशय येणार नाही.
शिवाय एवढा डान्स केला त्याची मजुरी पण मागितली
पाहिजे, हा ही मुद्दा आहेच..!

रमन ढोलकिया ॲसिस्टंटवर किंचाळतोय की,
'कालियाच्या एकेका माणसाला मारून टाका.
संपूर्ण शहराला आग वगैरे लावा..!'
परंतु ॲसिस्टंट टोलवाटोलवी करतो की,'आपल्या घरी
एवढे पाहुणे रावळे आले आहेत. त्यामुळे आता
उगाच आगी वगैरे लावणं काही बरं नाही.'

मग सपनाला घेऊन रोहित होस्टेलमध्ये..!
दुसरीकडे कुठे जाणार?
सगळ्या शहरभर सपनाचा शोध चालू आहे ना..!

बाकी ह्या होस्टेलमधील रूम्स बघितल्या तर
ह्या फिल्मी लोकांना आपल्याकडच्या होस्टेल्सच्या
बाबतीत बिलकुल ज्ञान नाही, हे दिसून येते.

म्हणजे एका रूममध्ये फक्त दोनच विद्यार्थी. शिवाय
प्रत्येकास समजा ऐसपैस चौसोपी बेड आणि
त्यावर समजा पांढरेशुभ्र बेडशीट, शिवाय पॉलिश्ड सागवानी दरवाजा, प्रायव्हसीसाठी पडदे वगैरे..!!
हे सगळंही एकवेळ समजून घेतलं तरीही रूममध्ये
टेबललॅम्प, पाण्याच्या ग्लासवर ठेवण्यासाठी प्लेट्स,
तीनफुटी आरसा आणि स्वच्छ चकाचक भिंती वगैरे
हे आम्ही कसं पचवून घ्यावं..!!
किमान दोऱ्या वगैरे बांधून सगळीकडे वाळत घातलेल्या,
पताकांसारख्या फडकणाऱ्या चड्ड्या वगैरे तरी
दाखवायला हव्या होत्या.
आम्ही सगळं माफ केलं असतं. पण असो.

रूममेटचा चष्मा काढून टाकला की त्याला सपनाच्या
अस्तित्वाबद्दल काहीच सुगावा लागणार नाही,
ही रोहितची आयडिया बाकी उत्कृष्ट आहे.
अगदीच बेस्ट. काही सवालच नाही.

मग सपनाचं अस्तित्व जाहीर होतंय.
कारण ती होस्टेलभर पळत सुटतेय.
त्यासंबंधी होस्टेलमध्ये मुलांनी मिटींग वगैरे बोलावलीय.
तिथे भाषण ठोकण्याच्या हेतूने प्रॉपर स्टेज,
पोडीयम तसेच माईक वगैरे साग्रसंगीत नियोजन आहे.
रोहित भाषण करतोय..आर्त साद घालतोय..!
पोरांवर काही परिणाम होत नाहीये.
मग ज्या ज्या मुलावर कॅमेरा जातोय तो तो मुलगा
आळीपाळीने एका ओळीचा डायलॉग मारतोय.
विरोधी सूर उमटतायत..!

सारांश असा की ही मुलगी 'मुसीबत' आहे. तिला इथं
ठेवणं धोक्याचं आहे. आणि शिवाय महत्वाचा मुद्दा
म्हणजे तू एकटाच ऐश करणार आणि त्यासाठी
आम्ही मार खायचा, ही गोष्ट आम्हाला रूचत नाही.

'मुसीबत' हा शब्द ऐकताच सपनाच्या आत काहीतरी
हलतंय. टोचतंय. हुळहुळतंय. डहुळतंय.
मग ते सगळं बाहेर येतंय..!
सपना माईक ताब्यात घेतेय. स्वतःच्या एकूणच
हाल-अपेष्टांबद्दल प्रकट चिंतन करतेय.

इथे पहा सपनाचे विचार मूळातूनच ऐकण्यासारखे आहेत.!
ते नुसते ऐकून भागणार नाही तर ते समजूनच घेतले पाहिजेत..! त्या विचारांचा व्यवस्थित बसून अभ्यासच केला पाहिजे..!
मार्टिन ल्युथर किंग, मंडेला, आंग स्यान स्यू की, चावेझ
इत्यादी गांधीवादी मंडळींनी अशाच पद्धतीने लोकांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत..!

इथेही होस्टेलमधील निबर, थोराड पोरांच्या
ह्रदयाला तस्साच हात घातला गेला आहे.
एक छोटीशी क्रांतीच इथे घडून आलेली आहे..!
आणि त्यापाठीमागे सपनाच्या विचारांची ताकद आहे,
हे आपल्याला विसरून चालणार नाही..!

मग रोहितचा जयजयकार. सपनाचा जयजयकार.
'प्रेम' या भावनेचाही जयजयकार.
ह्यानंतर सपना होस्टेलमधील पोरांच्या भावविश्वाशी,
जीवनाशी कशी एकरूप झालीय, रमलीय, हे सगळं
एका गाण्याच्या माध्यमातून आपल्याला लगेचच
कळून यावं, अशी अपेक्षा आहे..!
नाही कळून आलं तरी काही हरकत नाही.
त्यांनी काही तुम्हाला पिक्चर बघायला बोलावलं नव्हतं.
थेटरात न येण्याचं स्वातंत्र्य प्रेक्षकांना असतंच..!

तिकडे ज्युनिअर ढोलकिया सपनाला शोधण्याच्या
नादात शहरभर गोळीबार इत्यादी करण्याच्या
माध्यमातून, बराच वेळ दाबून धरलेली किंचाळण्याची
तलफ भागवून घेतोय.

एका अज्ञात स्थळी, ढोलकिया-कालिया मिटिंग.!
हे ढोलकिया बापलेक आपल्या गॅंगस्टरीच्या धंद्याचा बेस
विस्तारण्यासाठी वगैरे काही हालचाली करण्याच्या
भानगडीत कधीच पडत नाहीत..!

त्यामुळे मिटींगचा अजेंडा एकच.
सपनाचा शोध..!
निष्कर्ष:- कालिया किंवा अंडरवर्ल्डमधील इतर
कोणत्याही टोळीने सपनाला पळवलेले नाही.
मिटींग खलास.

नंतर घरातील टेलिफोनच्या डिटेल्स वरून
ढोलकियाच्या लगेच लक्षात येते की सदर कांड
रोहितने केलेय.
ढोलकिया पितापुत्र आणि सगळे ॲसिस्टंट्स वगैरे
सुसाट होस्टेलवर..!

कर्कश रमन रोहितला विचारत राहतोय..
'बोल मेरी बेहेन कहां हैं?'
हा प्रश्न चार वेळा विचारून झाल्यावर कदाचित
रोहितला प्रश्न कळलेला नाही, असे वाटल्याने
प्रश्न बदलून, 'सपना कहा हैं?' असंही विचारतोय.

इथे रोहितचा एक काळजावर कोरून ठेवण्यासारखा
डायलॉग येतो की,"तुझ्या बंदुकीच्या गोळ्या संपतील
पण गोळ्या झेलणाऱ्या आमच्या छात्या
संपणार नाहीत.!"
भले बहाद्दर!!

ह्या सीनच्या आधीच होस्टेलमधल्या सगळ्या
मुलांना एकाच प्रकारच्या स्टंप्स, हॉकी स्टीक्स वगैरे
शस्त्रांचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे काही अडचण नाही.
स्टंप्स वगैरे उगारून संतप्त चेहऱ्याने सगळे जण
उभे आहेत.
हा सगळा सपनाच्या भाषणाचा परिणाम..!
क्रांती अशीच होत असते..!

पारडे फिरतेय हे पाहून सिनियर ढोलकिया सूत्रे हातात
घेतोय. सर्वांना शांत होण्याचे आवाहन करतोय.
सपनाला पाहताच त्याच्यातला बाप मध्येच उसळी
मारून वर येतोय.
तो सपनाचे लग्न रोहितशी लावून देण्याची घोषणा
करतोय.
जावईबापू रोहितला उद्देशून ढोलकिया म्हणतोय की,
'डोली, कन्यादान वगैरे गोष्टी माझ्या घरी मोठ्या
धुमधडाक्यात व्हाव्यात, अशी माझी तुला
विनंती आहे.'

सासरा चतुर आहे. चतुरलिंगम आहे.
सासरा शब्दांचे मायाजाळ गुंफतोय.
जावई पाघळतोय.
सासऱ्याने आता हात जोडलेले आहेत.
आता जावई पाघळून पाणी पाणी
झालेला आहे.
जावई रोहित हा गुणी बाळ आहे. सुसंस्कारी आहे.
शिवाय नीतीमूल्यं वगैरे गोष्टीही असतातच.
आणि रोहित हा तर साक्षात आलोकनाथांचा मुलगा
असल्यामुळे हे सगळं रक्तामधून किंवा तत्सम
गुणसूत्रांमधून वगैरे त्याच्यापर्यंत वाहत आलेलं आहे.
काही प्रश्नच नाही..!

परंतु हे काय! ओह् माय् माय्..!
हा सगळा ट्रॅप होता तर..!
जीझस् क्राईस्ट!

पण आता कळून काय उपेग?
जब चिडिया चुग गई खेत!

इकडे रोहितची कणीक मजबूत तिंबली जातेय..!
तिकडे सपना ढोलकिया पितापुत्रांपुढे विलाप करतेय..!
ढोलकिया ॲंड सन्स मग्रूर आहेत. ते ऐकत नाहीयेत.
तिथे गफूरचाचा नामक ॲसिस्टंटही संतप्त चेहऱ्याने
बसले आहेत. म्हणून जाताजाता त्यांच्यापुढेही विलाप
उरकावा लागतो..!
आता हिचे बाप आणि भाऊच ऐकत नाहीत, तिथे
हे गफूरचाचा गृहस्थ काय करणार! परंतु तरीही..!

मग सपनाकडे काय उपाय उरतो अखेरीस?
टोकाची भूमिका!! झोपेच्या गोळ्या!!
अरे बापरेss!!
गोळ्यांच्या त्या पांढऱ्या डबीवर लाल अक्षरांत
'डेंजर' असे स्पष्ट लिहिलेले आहे..!
काही प्रेक्षक माठ असतात..!
त्यांना समजणार कसं? म्हणून तसं लिहावं लागतं..!
शिवाय लाल रंग म्हणजे धोका, हे एक आहेच.!
काही कलर ब्लाईंड प्रेक्षकही असतील !
त्यांचीही सोय पहावी लागते.! इलाज नाही.

सपनाचे महाप्रयाण..!
सपना महायात्रेस निघतेय..!
जीवन-विन्मुख सपना..!
आयुष्यातले सगळे रंग उडालेली सपना..!
म्हणूनच पांढरा ड्रेस..! वरती पांढरी ओढणी..!
सगळ्यांचा निरोप घेतेय..!
डोळे पैलतीराला लागलेले आहेत..!
भाषा अतिशय निरवानिरवीची..!
काय करील बिचारी..!
मरणवाट स्वीकारलीय..!
प्रेम हे असंच असतं !!
आग का दरिया है
और गोळ्या खाके जाना है !

परंतु सदर महाप्रयाण लांबतच चाललेय.
झोपेच्या गोळ्या खाल्लेल्या सपनाला आता गाडीत
बसून थेट लंडनला वगैरे निघावं लागतं आहे.
तिकडे रोहितला मज्जा यायला लागल्यामुळे
तो हाणामारी थांबवण्याची काही लक्षणं दिसत नाहीत.
सपनाच्या तोंडातून कसलातरी लाल रंगाचा द्रव उसळून
बाहेर येतोय..! हे असं होणारच..! मघाशी खाल्लेल्या
गोळ्यांची रिॲक्शन आली असणार..! दुसरं काय?

तिकडे निशिगंधा सूनबाई ढोलकिया सासऱ्यापुढे
एक तडाखेबंद भाषण सादर करतेय..!
नणंदेच्या प्रेमविषयक न्यायहक्कांसाठी सासऱ्याला
खडसावणारी निशिगंधाभावजय..!
परंतु हे काय!!
मध्येच ही भावजय ट्रॅक सोडून स्वतःच्या जीवनासंबंधीही
चिंतन प्रकट करायला लागली आहे.!

बाकी सासरा गॅंगस्टर असला म्हणून काय झालं?
शेवटी माणूसच आहे..!
किती बोलावं बिचाऱ्याला..!

परंतु सौ. निशिगंधासूनबाईंचा सात्विक क्रोध..!
भेदक डोळे..!
शब्दांचा लोळ..! ठिणग्या..!
जोडीला पूरक म्युझिकचा दणदणाट.!
आणि कॅमेऱ्यांच्या हालचाली..!
आणखी काय लागतं??
परिणाम अचूक..!
ढोलकिया पश्चात्तापदग्ध..!
वाल्याचा वाल्मिकी होतो तिथे, हा ढोलकिया
काय चीज??

मग शेवटी आलोकनाथसकट दोन्ही फॅमिलींचा सगळा
बारदाना हॉस्पिटलमध्ये..! अंत भला तो सब भला..!

{किती रडतेस सपना. मेकअप खराब होतो मग..!
तुला समजा काही अडचण नाही कारण तुझ्यासाठी मेकअप आर्टिस्टची फौज हजर आहे..!
निशिगंधाभाभीही स्वतःच्या मेकअपच्या
व्यवस्थेबद्दल तक्रार करणार नाहीत...!
कारण त्या स्वतः डॉक्टरेट आहेत..!
पण त्या रोहितच्या आईचा तरी विचार कर..!
तू तिलाही रडवतेस आणि त्यात तू तिच्या बांगड्याही
घेतल्यास..! हे बरं नाही सपना.}

जाता जाता:
तर तर असं आहे हे सगळं. आता आम्हास काही नको..! आप मुझे अच्छे लगने लगे बघितला म्हणजे सगळंच बघितल्यासारखं आहे..!
स्वतःस व्यक्त करण्यासाठी या प्रसंगी समर्थांचे शब्द समर्पक ठरतील असे आम्हास वाटते..

धन्य कृतकृत्य जाहलो
विचार घेता निमालो
आता फिटला रे संदेहो
देह जावो अथवा राहो

विडंबनचित्रपटप्रकटनसद्भावनाआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

12 Dec 2021 - 9:58 am | तुषार काळभोर

एवढा तर शोले अन मेरा नाम जोकरला पण नव्हता.

बाकी लेख वाचताना अनेकवार मेलो आणि फुटलो.

धन्य कृतकृत्य जाहलो
विचार घेता निमालो
आता फिटला रे संदेहो
देह जावो अथवा राहो

हेच परत एकदा म्हणतो!

आनन्दा's picture

12 Dec 2021 - 6:14 pm | आनन्दा

बऱ्याच दिवसांनी टाकलात..

लिंक लागायला थोडा वेळ लागला..
पण मस्त लिहिलाय, आता मागचं सगळं आठवल्यावर तर वाचायला जाम धमाल येतेय.

थोडी recap लिहिली असती तर बरं झालं असतं

nutanm's picture

12 Dec 2021 - 6:15 pm | nutanm

विडंबन ठीक, छान म्हणावे इतके नाही.