खेळ मांडीयेला, कोरोना भिववी दारी - भाग २: फुटबॉल (पूर्ण)

Primary tabs

शेखरमोघे's picture
शेखरमोघे in जनातलं, मनातलं
13 Jun 2021 - 1:06 am

(जसे कोरोनामुळे जगभरात सर्वसामान्यांचे जीवन काही ठिकाणी थोडेसे विस्कळीत तर कांही ठिकाणी जवळ जवळ उध्वस्त झाले आहे, तसेच थोडेसे वेगवेगळ्या खेळांचेही झाले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या जागतिक खेळांत  मोठ्या प्रमाणांत बदल अपेक्षित होते  आणि म्हणून त्याबद्दल  बरेच कांही  लिहिण्याचा संकल्प  ही मालिका सुरू करताना सोडला होता.   या आधीचे काही लिखाण केल्यानंतर वैयक्तिक जीवनांत  अनपेक्षितपणे सुरु झालेल्या आणि चालूच असलेल्या वादळामुळे हा संकल्प मधेच सोडून द्यावा लागत आहे. या विषयावरील लिखाण  सुरु करतांना बरेच नवीन कांही घडेल अशी अपेक्षा होती आणि त्याबद्दलची माहिती रंजक ठरेल ही अपेक्षा होती. "मोजक्याच प्रेक्षकांना प्रत्यक्ष मैदानांत प्रवेश ", "खेळाडूंना quarantine" अशा  ठोकळ आणि कल्पनारहित  उपायांचा जरी सुरवातीला वापर झाला तरी जसजसे  कोरोनाचे भय कमी होऊ लागले तसतसे त्याविरुद्धचे म्हणून अंमलात आणलेले उपायदेखील हळू हळू  बारगळू लागले आहेत . अशा अनेकविध  कारणांमुळे  या  मालिकेंत  प्रस्तुत भागानंतर कांही लिहिले जाणार नाहीं . ) 

आधीचे संबंधीत लिखाण     

खेळ मांडीयेला, कोरोना भिववी दारी - भाग १: क्रिकेट https://misalpav.com/node/47116
खेळ मांडीयेला, कोरोना भिववी दारी - भाग २: फुटबॉल (अपूर्ण) http://www.misalpav.com/node/47157

ही विविध प्रकारची खिचडी बनवतांना  जशा वेगवेगळ्या आवडी लक्षांत घेणे जरूर होते तसेच वेगवेगळ्या प्रवर्तकांच्या खिशांना काय परवडेल हे पहाणेही  जरूर होते कारण जर खेळल्या जाणाऱ्या सामन्यांना प्रेक्षक प्रत्यक्ष हजर राहू शकत नव्हते किंवा जाहिरातदारांच्या दृष्टीने जर प्रेक्षकांचा सहभाग अपुरा ठरला तर प्रवर्तकांना मिळणाऱ्या गल्ल्याचा मोठाच भाग गायब होणार होता. 

कांही प्रवर्तकांनी सगळ्यांत कमी खर्चात उरकण्याकरता म्हणून चक्क सामन्यांना  हजर राहू इच्छिणाऱ्या प्रेक्षक मंडळींकडून त्यांची छायाचित्रे मागवली आणि ती प्रेक्षक कक्षातल्या खुर्च्यांवर ठेवून लोक खेळाच्या मैदानांत प्रत्यक्ष हजर असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला.  कांहीनी प्रेक्षकांत जरा उत्साह निर्माण करण्याकरता ज्यांची नांवे सोडतीत निघतील  त्यांचीच चित्रे मैदानांत लावण्याचे ठरवले.  कांही  प्रवर्तकांनी हवा भरून फुगवण्याच्या मानवी आकाराच्या बाहुल्या वापरून हाच आभास निर्माण केला त्यामुळे दुरून बघणाऱ्याना नुसत्याच रिक्काम्या खुर्च्या दिसण्याऐवजी थोssडासा  वेगळा देखावा जरी दिसत असला तरी खेळाच्या मैदानातल्या जल्लोशाचा मात्र अशा "स्वस्त आणि मस्त" उपाय योजनेत पूर्ण अभाव होता. ही मायानगरी जरी डोळ्यांना फसवू शकली तरी गोल झाल्यावरचा उत्साही आरडाओरडा किंवा गोल करण्याचा प्रयत्न फसल्यावरचे  उसासे ज्या तऱ्हेने पुढच्या प्रयत्नातला जोश वाढवतात आणि सामन्याची रंगत अखेरपर्यंत टिकवतात  तसे आवाजाच्या अभावामुळे होत नव्हते. एकूणच जरी  प्रेक्षक प्रत्यक्ष मैदानांत नसतांना त्यांच्यापर्यंत दूरचित्रवाणीवरून खेळ पोचवणे (आणि म्हणून प्रवर्तकांना जाहिरातदार मंडळींकडून खंडणी मिळत रहाणे) हे तत्वतः जमण्यासारखे असले तरी असे  प्रयत्न सपक आणि फुसके ठरू नयेत (आणि त्यातून निर्माण होणारा जाहिरातदार पैसे खर्च करण्यास तयार नसण्याचा  धोका टाळता यावा) याकरता काहीतरी तोडगा शोधणे आवश्यक होतेच.   

अनेक तऱ्हेच्या संशोधनातून असे निष्कर्ष निघाले आहेत की एखादा सामना "छान रंगला" असे वाटण्याकरता नुस्तेच किती गुण कुणी मिळवले यापेक्षा देखील सामन्यातील अपेक्षित आणि अनपेक्षित चढउतार, खेळाच्या वेगातील बदल आणि त्यामुळे एखाद्या घटनेनंतर प्रेक्षक वर्गातून उत्स्फूर्तपणे उठणारे शिट्या, टाळ्या, आरोळ्या, ढोल आणि बिगुल असे, अगदी लगेचच किंवा थोड्या उशीराने  ऐकू येणारे  वेगवेगळे कमी जास्त आवाज हे देखील महत्वाचे असते. या आवाजामुळे स्फूर्ती मिळून खेळाडू आणखीनच उत्तेजित होऊन सामन्यात आणखी चुरस आणतात.  सामना जितका रंगेल अशी अपेक्षा असते तितके प्रवर्तक आणि दूरवाणी प्रक्षेपकांना जाहिरातदारांना जास्त पैसे खर्च करण्यास उद्युक्त करणे सोपे असते.  

सामना जितका जास्त रंगण्याची अपेक्षा तितकी प्रेक्षकांचीजास्त उपस्थिती आणि म्हणून तितक्या चढ्या भावात मैदानांतील विविध तऱ्हेच्या गाळ्यांच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न हे  कोरोनापूर्व काळांतले सर्वसाधारण कोष्टक मात्र  कोरोनानंतरच्या काळांत बाजूला ठेवावे लागले.      

प्रवर्तक आणि दूरवाणी प्रक्षेपकांना  पडलेला प्रश्न-  पुरेसे प्रेक्षक मैदानांत नसल्याने मैदानातून उठणारा आवाज अपुरा आणि त्यामुळे वर वर्णन केलेले - स्वस्त आणि लगेच वापरता येणारे -  दृष्टीभ्रम करणारे प्रयत्न जर अपुरे ठरत असले तर आणखी काही "स्वस्त आणि मस्त" उपाय म्हणून आधीच्या कुठल्या तरी सामन्यातले आवाज किंवा "software generated appropriate noises"  चालू असलेल्या सामन्याच्या  दूरवाणी प्रक्षेपणात (जिथे फक्त दृष्य हालचालीच टिपल्या जात आहेत आणि प्रेक्षक प्रत्यक्षात हजर नसल्याने जी काही "आवाजी" खेळाडू आणि पंच करतील तेव्हढीच फक्त दृष्य हालचालींबरोबर टिपली जात आहे) जोडता येतील का?

हा प्रश्न उभा करणे जरी सोपे असले तरी हा प्रयोग यशस्वी होण्याकरता बऱ्याच गोष्टी सुसंगतपणे जमवाव्या लागतील. खेळाडूंच्या व्यूहरचना आणि हालचाली नंतर जर अपेक्षित परिणाम प्रेक्षकांसमोर झाला तर उठणाऱ्या आरोळ्या आणि उसासे हे अनपेक्षित परिणामानंतरच्या कल्लोळापेक्षा पूर्णपणे वेगळे असतील. मराठी नाटकांकरता एके काळी (१९८०-९० या काळात) एका प्रयोगाला लागणारे  सगळे संगीत ध्वनिमुद्रित होत असे आणि नंतर प्रत्यक्ष प्रयोगाच्या वेळी जरूरीप्रमाणे "taperecorder"च्या माध्यमातून वापरले जात असे.  त्या काळांत ज्याला सगळे नाटक पूर्णतः माहीत आहे असाच मनुष्य (त्याचा सर्वमान्य हुद्दा किंवा "job description" : "टेपऱ्या") रंगपटातून किंवा इतर मोक्याच्या ठिकाणावरून जशी नाटकांतील कथेची आणि पात्रांची जरूर असेल तशी आपली "टेप" वाजवायचा किंवा थांबवायचा. जिथे प्रेक्षक गैरहजर आहेत आणि "software generated appropriate noises" वापरून प्रेक्षक असल्याचा आभास निर्माण करायचा आहे, तिथला टेपऱ्या  आणखीनच हरहुन्नरी लागेल : त्याचा (virtual) "tape deck" प्रचंड मोठा असावा लागेल आणि त्याला त्याच्याकडच्या आवाजाच्या अफाट खजिन्यातून क्षणार्धात जरूर असलेले आवाज मिळवून आणि मिसळून जवळ जवळ real time वाजवावे लागतील आणि सामन्याचा "tempo" जितका वाढेल तितके ही सुसंगती जमवणे अतिशय कठीण होऊ लागेल. 

ही सुसंगती जमवण्याचे महत्व समजण्याकरता - समजा पडद्यावर एखादी गाणारी स्त्री दिसत आहे, तिचा (आपल्याला कृत्रिमरित्या ऐकवला जाणारा) आवाज, गाण्याचे शब्द, देहबोली असे सगळेच  उषा उथुपचे किंवा सुनिधी चौहानचे गाणे चालू असल्याचे सुचवते आहे पण ज्या ध्वनीवर्धकांतून साथीचा आवाज येतो आहे तिथे मात्र एकतारी आणि चिपळ्यांची साथ वाटत आहे - असे गाणे  ऐकायला किती चमत्कारिक वाटेल? महालक्ष्मीच्या रेसच्या मैदानात गोंगाट वाढवण्यासाठी जर फक्त सस्त्यात मिळतो म्हणून "ग्यानबा तुकाराम"चा track लावला तर  घोडे जोमदार पळण्याऐवजी रिंगण धरू लागतील कां ?       

काही कल्पक लोकांच्या हे लक्षांत आले की जवळ जवळ अशाच तऱ्हेची अडचण - प्रेक्षक मैदानाबाहेर पण त्यांचे वेगवेगळ्या तऱ्हेचे आवाज मैदानात, खेळाच्या गतीशी सुसंगत अशाप्रकारे टिपता आणि प्रक्षेपित करता येणे जरूर -  २०१३ साली ट्युनिशियात उद्भवली होती आणि त्यावर शोधला गेलेला उपाय अत्यंत प्रभावी आणि यशस्वी ठरला होता.

ट्युनिशियातला Club Sportif de Hammam-Lif किंवा हम्माम -लिफ संघ ( हम्माम -लिफ या गावच्या खेळाडूंचा संघ) संकटांत होता - साखळी वर्षाच्या सुरवातीलाच त्यांना धास्ती वाटत होती की कांही महत्वाचे  सामने  त्यांना जिंकता आले नसते तर त्यांची साखळीतून हकालपट्टी झाली असती आणि त्यांच्या विजयाकरता जरूर असलेला प्रेक्षकांचा उत्साही पाठिंबा मिळणे तर दुरापास्त होते, कारण Arab Spring मुळे प्रेक्षकांना सामन्यांच्या मैदानांत हजर राहण्याची परवानगी नव्हती.      

हम्माम लिफने  Memac Ogilvy या  आंतरराष्ट्रीय जाहिराती  निर्माण करणाऱ्या व्यावसायिकांबरोबर एक app तयार केले. ते app ज्यांच्या मोबाईल फोनवर असेल ते आपल्या फोनवरचे आकडे वापरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया - शिट्ट्या, आरोळ्या, कर्णे, ढोल असे आवाज इ.इ.- तयार करून आपापल्या फोनवरून एका ठराविक नंबरला प्रक्षेपित करू शकत होते. हम्माम लिफने या सगळ्या प्रतिक्रिया खेळाच्या मैदानांत लावलेल्या मोठमोठ्या ध्वनीवर्धकांना  जोडण्याची व्यवस्था केली. त्यामुळे हे app वापरून हम्माम लिफचे चाहते प्रेक्षक, खेळाच्या मैदानांत हजर नसले तरी देखील  दूरचित्रवाणीवरून लिव्ह दाखवल्या जाणाऱ्या मैदानांतल्याघडामोडींवरची त्यांची प्रतिक्रिया, त्यांच्या मोबाईलवर तयार केलेल्या वेगवेगळ्या आवाजांच्या स्वरूपात, लगेचच मैदानांत लावलेल्या मोठमोठ्या ध्वनीवर्धकांवर (मैदानांत हजर असल्याप्रमाणेच) नोंदवू शकले.  या चाहत्यांच्या (मैदानात हजर नसतानासुद्धा दिलेल्या) सक्रिय पाठिंब्यामुळे आणि विशेषतः त्यामुळे मिळालेल्या खेळ चालू असतांना मिळत राहिलेल्या उत्तेजनामुळे हम्माम लिफच्या खेळाडूंनी त्यांचे सामने जिंकत त्यांची साखळीतून हकालपट्टी होण्याचे टाळले.        

अशा एकाच "पक्षाच्या" चाहत्यांच्या मैदानात हजर असल्यासारख्या वाटणाऱ्या आवाजांची निर्मिती हे त्यामानाने सोपे काम आहे. मोठ्या सांखळीत जे वेगवेगळे संघ खेळतात त्यांचे चाहते देखील आपापल्या संघाकरता आपापल्या "इष्टाइल" चे वेगवेगळ्या  तऱ्हेचे आवाज करत असतात. कुठे वेगळ्याच तऱ्हेच्या शिट्या असतात तर कुठे लाडक्या खेळाडूंच्या नांवाचा गजर असतो. त्यामुळे प्रत्येक सामन्यांत मैदानातून उठणारे प्रेक्षकांचे आवाज देखील फरक ओळखू येण्याइतपत वेगळ्या ढंगाचे - संगीतातल्या घराण्यासारखे - असतात. आंतरराष्ट्रीय सामन्यांत जर वेगवेगळ्या देशातील खेळाडू खेळत असतील तर मैदानांतून उठणाऱ्या आरोळ्यादेखील वेगवेगळ्या भाषातून  असतात.  आणि या सगळ्या गोष्टी लक्षांत ठेवूनच आभासी आवाजाची निर्मिती केलेली असेल, तरच तो आवाज (जवळ जवळ) खरा वाटेल.  

२०२० सालच्या सगळ्याच "मोठ्या" सामन्यांत प्रेक्षकांना मैदानांत हजर राहण्यास बंदी असल्यामुळे वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय चित्रवाणी प्रक्षेपण केंद्रांनी हम्माम लिफच्या   उदाहरणावरून स्फूर्ती घेत आणि तंत्रज्ञानाची मदत घेत आपल्या प्रक्षेपणांत रंगत आणण्याचा प्रयत्न केला. EA SPORTS FIFA च्या सहकार्याने  Sky Sports या इंग्लंडमधल्या चित्रवाणीने वेगवेगळ्या संघांच्या खेळाला  अनुरूप असे कृत्रिम आवाज आपल्या प्रक्षेपणात मैदानांतूनच निघत असल्याच्या आभासासकट Premier League चे सामने प्रक्षेपित करतांना वापरले. त्याच धर्तीवर Sky Deutschland ने देखील आधीच्या वर्षांतील सामन्यांच्या ध्वनिफितींतून अनेक तऱ्हेचे मैदानांत उठणारे आवाज वेगळे करून त्यांचा वापर Bundesliga च्या २०२० च्या सामन्यांच्या प्रक्षेपणाकरता केला.    

२०२० साली पुढे ढकललेल्या आणि नुकत्याच सुरू होत असलेल्या 2020 UEFA European Football Championship सामन्यांत प्रेक्षक (मर्यादित संख्येत) मैदानांत हजर असल्याने कदाचित कुठल्याच तंत्रज्ञानाचा उपयोग करायला न लागता, खेळ चालू असतानाचे मैदानांतले प्रेक्षकांचे आवाज सरळच टिपता येतील आणि कोविद-१९ च्या काळांत म्हणून तयार केलेली प्रणाली काळाच्या पडद्याआड जाईल.        

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

13 Jun 2021 - 9:52 am | कुमार१

रोचक माहिती !

गॉडजिला's picture

13 Jun 2021 - 10:34 am | गॉडजिला

पण हा लेख वाचताना माझ्या मनात फिफा गेमच तरळत होता ज्यात मैदानावरील प्रेक्षक खास नसले तरी त्यांचे गर्दीचे आवाज छान सिम्युलेट केलेले असतात... अन तितक्यात EA चे नाव लेखातच दिसले