मराठी आणि महाराष्ट्राशी तेलुगूचा संबंध

उपयोजक's picture
उपयोजक in जनातलं, मनातलं
28 May 2021 - 1:03 pm

मराठीत संस्कृतनंतर सर्वाधिक शब्द कन्नडमधून आले आहेत. 'मराठीने केला कानडी भ्रतार' अशा म्हणी यातून मराठी भाषेचा कन्नडशी घनिष्ठ संबंध असल्याचे दिसले आहेच पण महाराष्ट्राला लागून तेलुगूभाषिक तेलंगण राज्यसुद्धा आहे. कर्नाटकाप्रमाणेच तेलंगणचाही मोठा सीमावर्ती भाग महाराष्ट्राला चिकटून आहे.

तेलुगूचा प्रभाव आज जरी मराठीवर तितकासा नसला तरी राजस्थान,गुजरातमधून महाराष्ट्रात १५/१६ व्या शतकात मोठ्या प्रमाणात स्थलांतर होण्यापूर्वी तेलुगूचा प्रभाव बर्‍यापैकी असावा. तेलुगू भाषा ही उकारान्त शब्दांची आहे. ही पद्धत मराठीतही पूर्वी होती. अगदी उदाहरणच हवे असेल तर संत ज्ञानेश्वरांच्या काही रचना पाहू शकता. दिनु , घनु ,वेलु असे उकारान्त शब्द भरपूर आहेत. काही वेळा क्रियापदेदेखील उकारान्त आली आहेत. आपण बर्‍याचदा बोली मराठीला लिखित स्वरुपात दर्शवताना क्रियापदाच्या शेवटच्या अक्षरावर जोर दर्शवण्यासाठी त्यावर टिंब देतो(अनुस्वार नव्हे) उदा. होते~होतं , घडते~घडतं इ. ही टिंब दिलेली अक्षरे मुळची उकारान्त आहेत. म्हणजे होतु , घडतु अशी. हा तेलुगूचा प्रभाव. नंतर हा उकार गळून फक्त जोर राहिला.
तेलुगूमधले एक संबोधन 'गारु' जसे की अण्णय्यागारु , सीतारामय्यागारु इ. हे मराठीत पूर्वी ग्रामीण भागात प्रचलित होते. जसे की 'काय गा काय म्हंतोस?' 'कुटं गा निगालास?' यातला गा हा गारुचा प्रभाव आहे.
नाल , टाळे , तूप , गदारोळ , जाडी , शिकेकाई , अनारसा , गजगा , ताळा हे शब्द तेलुगूमधून मराठीत आले आहेत.

इ.स. १३०० मधे तेलुगू भाषेत 'पंडिताराध्य चरित्र' या नावाचा ग्रंथ लिहिलेला आढळतो. या ग्रंथात काही मराठी गाणी आहेत.

पेशव्यांच्या काळात बरेचसे ब्राह्मण हे सैन्य , राज्यकारभार इथे कामी आले. त्यामुळे मंदिरांतील पुजाअर्चा, होमहवन,पौरोहित्यासाठी ब्राह्मण कमी पडू लागले. त्यामुळे तेलंगणमधून बरेचसे ब्राह्मण महाराष्ट्रात आणावे लागले किंवा आले. तेलंग , वर्तक अशा आडनावांचे ब्राह्मण मुळचे तेलुगूभाषिक पण महाराष्ट्रात आल्यानंतर ते मराठी देशस्थ ब्राह्मणांमधे सामावून गेले. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचे मुख्य पुजारी मुनीश्वर हे सुद्धा मुळचे तेलंगणातीलच. साधारण ७०० वर्षांपूर्वी ते महाराष्ट्रात आले.
सोलापूर हा महाराष्ट्रातील तेलुगू लोक भरपूर संख्येने असणारा जिल्हा. तेलुगूभाषिक विणकर पद्मशाली समाज महाराष्ट्रात परिचित आहे. हे लोक घरात तेलुगू तर बाहेर मराठीत बोलतात.

जाताजाता सोलापूरबद्दलचे एक तेलुगू सिनेगीत.
https://youtu.be/jda6tZ1dl-k

संस्कृतीप्रकटनमाहिती

प्रतिक्रिया

मित्रहो's picture

30 May 2021 - 5:20 pm | मित्रहो

महाराष्ट्रातील राजुरा किंवा औरंगाबाद किंवा उस्मानाबाद पर्यंत निजामाच्या अधिपत्याखाली होते. तेंव्हा व्यवहार शब्द बरेच समान होते, आहे. अदिलाबाद, असिफाबाद इथे मराठी तेलुगु भाषा बोलली जाते तर झहीराबादच्या भागातील लोक बहुदा मराठी, कानडी आणि तेलुगु भाषा बोलतात.