शाप

पाटिल's picture
पाटिल in जनातलं, मनातलं
24 May 2021 - 7:32 pm

नेटफ्लिक्स,ॲमेझॉन,सोशल मीडिया
अन-इन्स्टॉल कर सगळं
गच्च भरून गेलंय डोकं
अजून किती कोंबशील
वाचू नकोस
काही अर्थ नसतो त्यात
पुस्तकांचाही वैताग येण्याचे दिवस
आणि व्हिस्कीचाही कंटाळा येण्याच्या रात्री
सगळे स्वतःपासून पळण्याचे धंदे
बंद करून घे चहुबाजूंनी कडेकोट
मग स्वतःला कवटाळ
व्हायचं ते होईल भेंचो
कायकू डरताय ?
साधी हुरहूर तर आहे
तिला डरण्याचं वय आहे का हे?
संध्याकाळी ग्रेसची प्रॅक्टिस कर,
भय इथले संपत नाही वगैरे..

मग पाठोपाठ आत्मकरुणेचा महापूर
मोठमोठ्ठे लोंढे येतायत दुथडी..
झेपणार नाही तुला.. पळ..
शेपूट घाल नेहमीसारखा
गटांगळ्या खा
ओरड.. बचाव बचाव..
शेवटी कण्ह..
कण्हणं महत्वाचं..
ते जमलं की बाकी काही अवघड नाही

कोऱ्या पानांकडं दुपारभर बघत बसून शब्दांचा पाऊस पडणार असतो का?
त्यापेक्षा झाडाच्या सळसळत्या पानांना जास्त माहिती असतं,
त्यांना विचार.
तुझ्या आत उरलंय का तसं काही सळसळणारं ?
जिवंत जीवघेणं संज्ञाप्रवाही वगैरे काही?

मग काही लिहूबिहू नकोस
आणि लिहिलंस तर मला पाठवू नकोस
पाठवलंस तर वाट पाहू नकोस
वाट पाहलीस तर तसं सांगू नकोस
स्वतःचेच त्रास पुरे झालेत
त्यात हे आणखी नको

साचलायस तू..
फुटशील एखाद्या दिवशी
किंवा सुकून जाशील

थांब तुला तसा शापच देतो
तुझी नौका फुटो
वल्ही तुटो
तटबंदी ढासळो
उतरो हे मुखवटे
वाहो तुझ्यात काही
आणि तुझ्यातूनही काही वाहो
उसळो थुईथुई कारंजे पेशीपेशींतून
लाभो निष्कंप मन अखेरीस
लख्ख होवो जाणिवा
आणि त्यांच्या उजेडात मरणवाट दिसो..

(हे ललितबिलित नाही
आणि कविताबिविताही नाही..
काय आहे कुणास ठाऊक..
)

कवितामुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

गॉडजिला's picture

25 May 2021 - 10:38 am | गॉडजिला

हे ललितबिलित नाही
आणि कविताबिविताही नाही..
काय आहे कुणास ठाऊक..

जे काही आहे मनापासून आहे आणि तेवढेच पुरे आहे

एकदम समर्पक शीर्षक "शाप"!
मले तर शिव्या शाप असं शीर्षक दिसून र्हायलय.
(चूभूमाक)

गॉडजिला's picture

25 May 2021 - 6:20 pm | गॉडजिला
अनन्त्_यात्री's picture

25 May 2021 - 7:54 pm | अनन्त्_यात्री

लिहूबिहू शकणार्‍या फार थोड्यांची सुटका आहे त्यातून!

चित्रगुप्त's picture

26 May 2021 - 7:40 pm | चित्रगुप्त

जबरी सुचले आणि लिहीले आहे.

संजय पाटिल's picture

27 May 2021 - 10:21 am | संजय पाटिल

माझ्याच मनातलं व्यक्त केल्यासारखं वाटतय.........

पाटिल's picture

27 May 2021 - 4:51 pm | पाटिल

प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार _/\_

अनुस्वार's picture

31 May 2021 - 6:41 pm | अनुस्वार

मोक्ष असल्यास त्या अवस्थेत मन निष्कंप असणार नक्की.

भारी जमलंय जे काय असेल ते.

सोत्रि's picture

4 Jun 2021 - 8:12 am | सोत्रि

मोक्ष असल्यास त्या अवस्थेत मन निष्कंप असणार नक्की.

योग: चित्तवृत्ती निरोध:

ह्यातला चित्तवृत्ती निरोध म्हणजेच मनाची निष्कंप अवस्था. ती अवस्था कायम होणं हाच मोक्ष.

मोक्ष असल्यास त्या अवस्थेत मन निष्कंप असणार नक्की.

योग: चित्तवृत्ती निरोध:

ह्यातला चित्तवृत्ती निरोध म्हणजेच मनाची निष्कंप अवस्था. ती अवस्था कायम होणं हाच मोक्ष.

-(मुमुक्षू) सोकाजी

तुषार काळभोर's picture

4 Jun 2021 - 7:07 am | तुषार काळभोर

तुझ्यातूनही काही वाहो
उसळो थुईथुई कारंजे पेशीपेशींतून
लाभो निष्कंप मन अखेरीस
लख्ख होवो जाणिवा
आणि त्यांच्या उजेडात मरणवाट दिसो..
>> वा!!

कविताबिविताही नाही..
काय आहे कुणास ठाऊक..
>> आपल्याला काय करायचं! भारी लिव्हलंय , ते महत्त्वाचं!

सोत्रि's picture

4 Jun 2021 - 8:07 am | सोत्रि

ह्या आशयघन आणि खुप आतून आलेल्या लेखनातून जो गर्भितार्थ दडलाय आणि तो उलगडून दाखवण्याचा प्रयत्न झालाय तो अत्यंत चोख झालाय.

मरणवाट ह्या शब्दप्रयोगाबद्दल तर खास दाद द्यावीशी वाटतेय.

हुरहूर, भय, भावनांचे महापूर, आत्मनिर्भत्सना ह्यांनी भरलेल्या जीवनसागरात ज्या ‘नेणिवेच्या’ नौकेतून प्रवास चाललाय ती नौका फुटून, सगळे मुखवटे गळून पडून जो ‘जाणिवेचा’ मार्ग दिसणार त्यासाठी मरणवाट हा शब्दप्रयोग अत्यंत चपखल उतरलाय.

_/\_ _/\_ _/\_

- (शापित) सोकाजी

गॉडजिला's picture

4 Jun 2021 - 9:49 am | गॉडजिला

म्हणजे कुठून कुठून ,अध्यात्मिक अर्थ आपण शोधता व त्याची संगती लावता .... आपण अध्यात्मात फार पुढे पोचलेले दिसता तिकडून हिकडचे जग कसं दिसते हो ?

अध्यात्म = अधि + आत्म म्हणजे स्वत:संबंधी.

जे काय दिसायचं ते दिसतं - तो वैयक्तिक अनुभव असतो जो प्रत्यकाने वैयक्तिकरित्या अनुभवायचा असतो. तो षट्कर्णी करायचा नसतो.

आणि हो, जे समोर असतं ते शोधावं लागत नाही! :)

- (वैयक्तिक) सोकाजी

( षट्कर्णी अनुभवी)
- गॉडजिला

अध्यात्म = अधि म्हणजे जास्त + आत्म म्हणजे स्वत:संबंधी

स्वतः संबंधी अतीरेक म्हणजे अध्यात्म

अध्यात्म = अधि म्हणजे अधिकार + आत्म म्हणजे स्वत:संबंधी

स्वतः संबंधी अधिकाराने बोलता येणे म्हणजे अध्यात्म

अजून दहा डेफिनिशन बनवता येतात...

पण महत्वाची गोष्ट म्हणजे षट्टकर्णी न करणे थोडक्यात झाकली मूठ स्ववा लाखाची

प्रसाद गोडबोले's picture

4 Jun 2021 - 1:17 pm | प्रसाद गोडबोले

छान !

एका मिपाकर मित्राने आवर्जुन व्हॉट्सॅप्प व्र कविता पाठवली ही. (कविता नाही तर नाही लिन्क म्हणु वाटल्यास. ) म्हणुन वाचनमात्र मोड मधुन बाहेर येऊन प्रतिसाद देत आहे !

कविता छान आहे . पण जरा निराशाजनक वाटली. भावली नाही, तसेही मुक्त छंद गेयता नसल्याने आवडला नाही कधीच, त्यामुळे असेल.
पण कवितेतील विचार विचार करायला लावणार आहे !
दीडेक वर्षं घरात बसुन आहोत, सोशलमीडीयाचा थोडा अतिरेकच झालाय अन निराशाजनक वाटतंय हे मान्यच !
पण कविता पॉझिटीव्ह नोट वर संपली असती तर अजुन छान वाटलं असतं .

पुढील लेखनासाठी शुभेच्छा !

पाटिल's picture

5 Jun 2021 - 9:23 am | पाटिल

आवर्जून दिलेल्या प्रतिसादांबद्दल सर्वांचा आभारी आहे..
@सोत्रि... @मार्कस... _/\_