नाईट मेअर (गूढकथा)

vaibhav deshmukh's picture
vaibhav deshmukh in जनातलं, मनातलं
19 May 2021 - 12:54 pm

नाईट मेअर (गूढकथा)

त्या अरण्यात मी कसा पोहोचलो? हा प्रश्न गौण असला तरी, मी आता प्रचंड जखमी झालोय. अंगावर जागोजागी जखमा झाल्या आहेत. त्यातून सारखे रक्त गळत आहे. आणि मी असाच काही वेळ या अवस्थेत राहिलो तर, मृत्यू मला कधीही गाठेल आणि मी गतप्राण होऊन जाईल, ही वस्तुस्थिती मात्र मला नाकारता येणार नव्हती. मी नुसता धावत आहे. किती वेळ झाला, मला माहित नाही. पण मी सलग धावत आहे. तेही प्रचंड वेगाने. अंगात जेवढे त्राण आहेत, तेवढ्या वेगाने. तो मागचा लांडग्यांचा कळप, मला कधी गाठेल याचा नेम उरला नव्हता. ते मोठ्या धुडाचे दहा- पंधरा लांडगे, कधीही माझा फडशा पाडू शकत होते. त्यांचे ते मोठे मोठे सुळे, त्यांची ती भुकेली नजर, तीन- चार इंच बाहेर आलेली जीभ, सगळे कसे भीतीदायक होते. मी का एकदा त्यांच्या तावडीत सापडलो की, मग माझे जगणे मुश्कील होते. त्यामुळे मला जिवंत राहायचे असेल तर, त्यांच्यापासून जेवढे दूर पळता येईल, तेवढे दूर पळावे लागणार होते. त्यामुळे मी पळत होतो. दिशा दिसेल तिकडे पळत होतो. वाट फुटेल तिकडे धावत होतो. मला माहित होते, मी जेवढ्या वेगाने धावेल, तेवढी माझी जगण्याची शाश्वती वाढत जाणार आहे. त्यामुळे मी मोठ्या आकांताने पळत होतो. पायाखाली अणकुचीदार काटे येत होते. पोटाला, पायांना काटेरी झुडुपे स्पर्शून जात होते. मोठमोठ्या वृक्षांच्या खोडावर अधून मधून डोकेही आदळत होते. मी जसजसा वेगाने पुढे पळत होतो, तसतसा जखमी होत जात होतो. पण मी त्या जखमांची पर्वा करत नव्हतो. कारण मला माहीत होते, मी त्या जखमांची पर्वा करायला गेलो, तर माझा वेग मंद होणार. आणि पाठीमागच्या त्या लांडग्यांच्या कळपांचे आणि माझ्यातले अंतर अजुन कमी होणार. म्हणजे थोडक्यात माझ्या मरणाची वेळ अजुन समीप येणार. आणि मला हे नको होते. त्या दहा- पंधरा लांडग्यांचा, त्यांच्या खालीवर होणाऱ्या त्या पोटाचा हुस्ss  हुस्sss आवाज अधून मधून माझ्या कानावर पडत होता, आणि आपोआप माझ्या पायांचा वेग वाढत होता. एक मध्यम आकाराची डगर ओलांडून मी पुढे पाच- सहा फूट उडी मारली, आणि ते घडले. एका मोठ्या दगडाचा काहीसा तुटलेला अणकुचीदार भाग, त्या पालापाचोळ्याखाली कदाचित अदृश्य झालेला असावा. आणि दुर्दैवाने ती पाच- सहा फूट लांब उडी, अगदी त्या पालापाचोळ्याखाली अदृश्य झालेल्या दगडावरच पडावी. तळपायातून रक्ताची एक चिळकांडी बाजूला उडाली. सरसर करत त्याची वेदना मेंदूपर्यंत गेली. माझा वेग मंद मंद होत, एकदम क्षीण झाला. पुढे एक पाऊल टाकण्यापुरतीही अंगात शक्ती उरली नव्हती. एका मोठ्या झाडाच्या खोडाचा आधार घेत, मी खाली बसलो. आणि मला आता शरीरभर झालेल्या जखमांच्या वेदना जाणवू लागल्या. अक्षरशः सगळे शरीर जखमांनी भरून गेले होते. त्यातून सारखे रक्त वाहत होते. तळपायाची ती पाच- सहा इंचांची खोलवर गेलेली जखम, प्रचंड वेदनादायी जाणवू लागली. माझे अंग शक्तिपात झाल्यासारखे अशक्त होऊन गेले होते. मला आता साधी हालचालही आवाक्याबाहेर जाणवू लागली. आता मला एक गोष्ट कळून चुकली होती, आपल्याला येथून आता तसूभरही हलता येणार नाही. काही वेळातच, आपल्या मागे असणारा तो लांडग्यांचा कळप, आपल्या नजीक येणार आहे. आणि तो एकदा आपल्या नजीक आला की, आपले हे सारे प्रयत्न व्यर्थ जाणार आहेत. तो लांडग्यांचा कळप साक्षात मृत्यू सोबत घेऊन येणार आहे. मी शांतपणे डोळे मिटले. तसाच डोळे मिटून काही वेळ स्वस्थ पडून राहिलो. अवती भोवती एक भयप्रद शांतता दाटून आली होती. आणि तितक्यात आजूबाजूला पालापाचोळ्यावर पडणाऱ्या पावलांचा आवाज आला. एकामागून एक अशी अनेक पावले माझ्या दिशेने येत आहेत, ही जाणीव झाली. पाठोपाठ हुश्शss हुश्शsss असा आवाजही आला. याचा अर्थ स्पष्ट होता, लांडग्यांचा कळप जवळ आलेला होता. मी मिटलेले डोळे उघडले. ते दहा- पंधरा लांडगे शंभर सात- दीडशे फुटांच्या अंतरावर उभे होते. त्यांचे ते भुकेने वखवखलेले डोळे, क्षणक्षणाला आतबाहेर होणारी लाल तांबडी जीभ, त्या जिभेतून भुकेमुळे टपकणारी ती लाळ, सगळे माझ्या दृष्टीसमोर होते. तो सगळा कळप स्थिरपणे उभा राहून माझा अंदाज घेत होता. त्यांच्या माझ्यातले ते तेवढे अंतर, हीच माझी जगण्याची आशा होती. एकदा का त्यांनी ते अंतर पार करून, माझ्यावर झडप घातली की मग, मला गतप्राण व्हायला कितीसा अवधी लागणार आहे? आता मला स्पष्ट दिसत होते. त्यांची हळू हळू हालचाल होत होती. ते पावित्रा घेत होते. ते शंभर दीडशे फुटाचे अंतर ते अवघ्या काही क्षणात पार करणार होते. आणि माझ्या जगण्याचा अवधीही तेवढाच क्षणाचा उरणार होता. माझा श्वास रोखला गेला. आणि मी झपकन डोळे झाकून घेतले. स्वतःचे मरण मी माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहू शकणार नव्हतो.
      
  थंड पाण्याची धार अंगावर पडावी, तसे माझे झाले. मी हडबडून जागा झालो. सगळे अंग घामाने डबडबले होते. भीतीने सर्वांग थरथर कापू लागले. मी भिंतीवरच्या घड्याळात नजर टाकली. रात्रीचे दोन वाजून गेले होते. मला आठवते, एक पर्यंत मी जागा होतो. अगदी पूर्णतः शुद्धीवर होतो. म्हणजे एक नंतरच मला झोप लागली होती. आणि त्यानंतर हे असे अभद्र स्वप्न पडले होते. मी कितीवेळ झोप टाळत होतो. पण ती नाही टाळता आली.
शेवटी तिचा अंमल मला चढलाच होता. अवघ्या एका तासात मला झोप लागली होती. आणि ते स्वप्न पडून गेले होते. शेवटी जे व्हायचे नव्हते, तेच झाले होते. मी माझ्या सर्वांगावरून नजर फिरवली. अंगावर जागोजागी जखमा झाल्या होत्या. मघाशी शरीर घामाने डबडबले नव्हतेच. ते त्या जखमांतून निघणाऱ्या रक्तामुळे माखले होते. तळपायाला वेदना जाणवत होती. मी तळपाय वर घेतला. त्यावर चांगली चार- पाच इंचाची चिर पडलेली दिसली. धावताना त्या दगडावर पाय पडलेला मला आठवला. एक तरी बरे झाले होते. केवळ जखमी होऊन हा असा मी स्वप्नातून बाहेर आलो होतो. यदा कदाचित त्या लांडग्यांच्या कळपाने, माझा लचका तोडला असता तर, मी असा कधी झोपेतून उठूच शकलो नसतो. कोणीतरी माझ्या खोलीचा दरवाजा, बराच ठोठावला असता, आणि मी दरवाजा उघडत नसल्याने, दरवाजा तोडून कोणीतरी खोलीत आले असते. आणि मग समोर माझा लचके तोडलेला देह त्यांना दिसला असता.
       माझे अंग चांगलेच ठणकत होते. मी तसाच अंथरुणातून उठलो. एका मोठ्या कापडाने सगळे अंग साफ केले. तळपायाला एक मोठे कापड बांधले. आता थोडेसे बरे वाटू लागले. मी पलंगाला पाठ लावून बसलो. झोप तर प्रचंड येत होती. पण झोपू शकत नव्हतो. कारण मला माहीत होते, मी आता झोपलो की, पुन्हा त्या स्वप्नाची साखळी सुरू होणार होती. जिथे ते स्वप्न थांबले होते, पुन्हा तेथून सुरू झाले असते. लांडगे खूप नजीक पोहोचलेले होते. केवळ पाच मिनिटांचा अवधी जरी त्यांना मिळाला तरी, तेवढ्या वेळात ते माझ्या शरीराचे लचके तोडून मोकळे होणार होते. त्यामुळे मी आज कमालीचा सावध होतो. स्वतःला झोप न लागू देणे, झोपेवर नियंत्रण ठेवणे, हे जोखमीचे काम  मला स्वतःलाच करावे लागणार होते. आज सलग दुसरा दिवस होता. मला ते स्वप्न पडत होते. पहिल्या दिवशी मी स्वैरपणे भटकत भटकत जंगलात पोहोचलो होतो. आणि मी जागा झालो होतो. आणि त्यानंतर आजचे हे स्वप्न.कालच्याच स्वप्नाची पुढची कडी. जंगलात भटकत असताना, मी एका भुकेल्या लांडग्यांच्या कळपाच्या नजरेस पडलो. आणि मग त्यांचे ते माझ्या मागे लागणे. माझा लचका तोडण्यासाठी त्यांची ती जीवघेणी कसरत. स्वतःचा जीव मुठीत घेऊन, त्यांच्यापासून दूर पळण्याचा माझा प्रयत्न. पण मधेच मी हा असा जखमी होऊन, त्या झाडाखाली पडणे. आणि तेवढ्यात मला जाग येणे. म्हणजे आजच्या दिवशी तरी मी, त्या कळपाच्या तावडीत सापडलो नव्हतो. पण उद्याचे काय? उद्या किंवा परवा किंवा मग कधीतरी मला झोप लागली, आणि पुन्हा स्वप्न पडले तर? मग तर तो कळप खूप जवळ आलेला असेल. कदाचित माझ्या अंगाचे लचकेही तोडत असेल. म्हणजे आता पुढची झोप आणि त्या झोपतील ते स्वप्न, साक्षात माझा मृत्यू घेऊन येणार होते. एकदम एक भीतीची सणक मेंदूपर्यंत गेली. मी कमालीचा अंतर्मुख होऊन गेलो.

मी आता एकटक समोरच्या भिंतीकडे बघत होतो.
"काय नशीब आहे आमचे?
एवढ्या ह्या जगात आमच्या दोघांइतके कोण दुर्दैवी असेल?"
 कदाचित कोणीच नसेल. आम्हाला मानवी जन्म तर मिळाला होता, पण नियतीने तो जन्म देऊन, आमच्या सोबत एक क्रूर खेळ खेळला होता. त्यापेक्षा हा मानवी जन्म नसता दिला तरी किती बरे झाले असते? पण कदाचित तसे व्हायचे नसावे. आमच्या मागील जन्मीच्या कर्मांची फळे, आम्हाला आता या जन्मी भोगावे लागणार होते.
    मी आणि महेश्वर. आम्ही दोघे जुळे भाऊ. आमच्या दोघात फार असा फरक नव्हता. पण साम्य मात्र बरेच होते. आम्ही दिसायला अगदी सारखेच. उंची, शरीरयष्टी, स्वभाव, हावभाव अगदी मिळते जुळते. आणि याच साम्यामुळे आमच्यात मतभेद असे काहीच नव्हते.
 आमच्या दोघांना नियतीकडून एक गोष्ट अतिरिक्त मिळालेली होती. ती मिळणे आमचे सुदैव मानावे की दुर्दैव, हा प्रश्न ज्याचा त्याचा. पण आम्हाला मात्र ती गोष्ट कधीच सुदैवी वाटली नाही. मागच्या जन्मीचे एखादे पातक आमच्यावर असे उलटले असेल, म्हणून ती विचित्र गोष्ट आमच्या वाट्याला आली असावी. स्वप्ने कोण पाहत नाही? ती कोणाला आवडत नाहीत? बहुतेक सगळ्यांना ते आवडत असतील. केवळ आम्ही दोघे त्याला अपवाद असू. आणि आम्ही अपवादही का नसावे? तुम्हाला पडणारी स्वप्ने जर, प्रत्यक्षात उतरत असतील तर?  तुम्ही काय कराल? स्वप्ने पाहणे बंद कराल? डोळे झाकणे बंद कराल? किंवा मग झोपनेच बंद कराल? कोणी काहीही करेल. पण स्वप्ने पडू नये याची काळजी घेणार. आम्ही दोघेही तेच करतोय. आमच्या वाट्याला आलेला तो स्वप्नांचा श्राप, आम्ही आमच्या उरात बाळगून कसे बसे दिवस ढकलत होतो.

जसा प्रत्येकजण जगण्यासाठी, स्वतःभोवती एक अनुकूल परिस्थिती निर्माण करत असतो, तसे आम्ही काहीसे केले होते. आम्हाला एक गोष्ट माहिती होती, हे स्वप्नांचे असे ओझे घेऊन, आपण जगायला शिकायला हवे. त्यावर काहीतरी उपाययोजना करायला हवी. मुळात माणसाला स्वप्न का पडतात? किंबहुना ती कोणती पडतात? तुमच्या अवतीभवती घडणाऱ्या गोष्टी, तुम्ही दैनंदिन जीवनात ऐकता त्या गोष्टी, किंवा ज्या निरग्रहापूर्वक तुम्ही पाहता, ऐकता,अनुभवता त्या सार्‍या गोष्टी, तुमच्या स्वप्नांचा ताबा घेत असतात. स्वप्ने म्हणजे दुसरे तिसरे काही नसून, तुमच्या अवतीभोवतीच्या गोष्टींचा परिपाक असतात. आणि याच गोष्टींच्या अनुषंगाने, आम्ही आमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा करायला सुरुवात केली होती. आम्ही कधी विनाकारण बाहेर पडलो नाही. मुळात आम्ही घरातच असायचो. बाहेर कुठे गेलो तर, काही काही ऐकायला भेटते, पहायला भेटते त्यामुळे रात्री ते स्वप्नात नको यायला. आम्ही दोघांनीही नेहमी सात्विक राहण्याचा प्रयत्न केला. मन शांत ठेवले. पूजा-प्रार्थना यात मन गुंतवले. त्यांना जगण्याचा एक भाग बनवला. राग, लोभ, मत्सर यांना जेवढे दूर ठेवता येईल, तेवढे दूर ठेवले. या अशा कित्येक गोष्टींचा आम्ही अंगीकार केला. आणि त्यांचा प्रचंड असा फायदा आम्हाला झाला.
मूळात शांत, संयमाने राहण्यामुळे झोप शांत लागायची. स्वप्ने पडायचीच नाहीत, असे नाही. पण ते अत्यल्प असायचे, आणि जेही पडायचे तेही खूप साधे-सरळ असायचे. कधी एखाद्या हिरव्या रानात हिंडत असायचो, आकाश भरून यायचे आणि धो- धो पावसाला सुरुवात व्हायची. कधी एखाद्या सुंदर फुलांच्या बागेत मनसोक्तपणे फिरत असू, तर कधी एखाद्या समुद्रकिनारी सायंकाळचा विलोभनीय सूर्यास्त पाहत, किनाऱ्यावरून फिरत असू. मग सकाळी जेव्हा जाग यायची, तेव्हा कधी अंग चिंब ओले झालेले असायचे, कधी अंगाला वेगवेगळ्या फुलांचा सुगंध लागलेला असायचा, तर कधी तळपायाला समुद्रकिनार्‍याची वाळू चिकटलेली असायची. कमी अधिक प्रमाणात, आम्हा दोघांनाही अशाच आशयाची सरळ स्वप्ने पडायची. त्यामुळे आमचे दिवस समाधानाने जात होते.

आतापर्यंत आमची कोणतीही तक्रार नव्हती. शेवटी जे वाट्याला आले, ते आम्ही स्वीकारले होते. त्याबद्दल आमची काहीच ना नव्हती. पण आजपर्यंत जपलेल्या, त्या आमच्या नित्यक्रमाला धक्का लागला होता. कुठल्या बऱ्या-वाईट स्वप्नांनी, आम्हाला आतापर्यंत गाठले नव्हते. पण या दोन दिवसात, मी मात्र त्या स्वप्नाच्या तावडीत सापडलो होतो. कधी नव्हे ते लांडगे स्वप्नात आले होते. अगदी माझ्या जीवावर उठले होते. हे स्वप्न कसे काय पडले? हे सांगणे मला कठीण जात होते. कधी त्या विषयी ऐकले नाही, पाहिले नाही, वाचले नाही मग हे स्वप्न डोक्यात आले कसे? काहीच कळत नव्हते. पण आता या सार्‍या गोष्टी गौण होत्या.आता फक्त या स्वप्नांची शृंखला कशी तोडायची, हेच महत्त्वाचे होते. कारण माझ्या हातात आता जास्त वेळ नव्हता. कदाचित आजच्या रात्रीच ते पुढचे स्वप्न सुरू झाले असते. त्यामुळे केवळ हा आजचा दिवस हातात होता. काहीतरी करणे गरजेचे होते, नाहीतर ते स्वप्न जीवघेणे ठरणार होते.
              
  एरवी सकाळ प्रसन्न वाटली असती, पण आता ती तशी वाटत नव्हती. अंगावर जखमा,चेहर्‍यावरचा मलूलपणा  मला लपवता येत नव्हता. मला आता स्वतःची काळजी लागली होती. त्या स्वप्नाचा काहीतरी बंदोबस्त करायचा होता, पण तो कसा करावा हेच कळत नव्हते. मी खूप विचार केला आणि शेवटी ठरवले. आपल्याला यातून कदाचित एकच माणूस बाहेर पडू शकतो. तो म्हणजे महेश्वर, माझा भाऊ. त्याच्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय माझ्याकडे नव्हता. महेश्वरला हे सगळे सांगायला हवे. तो यातून बाहेर निघण्याचा काहीतरी मार्ग नक्कीच सांगेल. आम्ही दोघे जुळे असलो तरी, तो माझ्यापेक्षा जास्त व्यवहारी आणि चतुर होता. त्यामुळे कदाचित तो मला यातून बाहेर पडण्याचा मार्ग नक्की सांगू शकेल.
माणूस सर्वाधिक कशाला घाबरत असेल? मृत्यूला ना? हो मृत्युलाच! भीतीचे अंतिम टोक मृत्यू असतो! मानवी अस्तित्वाचा परीघ, जेथे केवळ बिंदू बनून उरतो तोही मृत्यू असतो. आणि मला तो छोटासा बिंदू नव्हते बनायचे. आणि त्यासाठीच मी महेश्वरकडे निघालो होतो.

मी त्याच्या खोलीत पोहोचलो, तेव्हा तो शांतपणे ध्यान करत बसला होता. माझी चाहूल लागताच त्याने डोळे उघडले आणि आश्चर्याने माझ्याकडे बघत प्रश्न केला,
 "अरे हे काय?
तुझ्या अंगावर या जखमा कशा?
काय झाले?
 काय घडले?"
मी त्याच्या जवळ बसलो. त्याला दोन दिवसांपासून, पडत असलेले ते स्वप्न सांगितले. तो लांडग्यांचा कळप, त्यांचे ते माझ्या मागावर येणे, आणि माझ्या हातात असलेला हा शेवटचा दिवस. त्याला सगळे सगळे मी सविस्तर सांगू लागलो. मला माहित होते, तो यातून काहीतरी मार्ग काढणार. हरेक तपशील मी त्याला खुलासेवार सांगू लागलो. अगदी प्रथमपासून ते मी जखमी अवस्थेत पडेपर्यंत त्याला सगळे काही सांगितले. तो लक्षपूर्वक ऐकून घेत होता.

 "आता आजच्या रात्री जर, मला पुन्हा झोप लागली, तर तो लांडग्यांचा कळप, माझे लचके तोडून खाईल. मला काहीच करता येणार नाही. झोप आता नियंत्रणात राहील की नाही, हे सांगणेही कठीण जात आहे. एकदा झोप लागली की, मग माझा मृत्यू पक्का आहे. ते लांडगे, त्यांचा कळप मला असा सहजासहजी सोडणार नाहीत."
मी हताश होत त्याला म्हणालो.
माझ्यावरचे लक्ष त्याने आता बाजूला नेले. एक मोठा सुस्कारा सोडून, त्याने माझ्या पाठीवर हात ठेवला.

" हे बघ, तुझे हे सगळे सांगितले, त्यावर उपाय म्हणून आता एक काम कर. त्याच त्या स्वप्नाचा विचार करू नकोस. त्याला डोक्यातून काढून टाक. कारण तू जेवढा त्याचा विचार करशील, तेवढा ते तुझा पिच्छा करेल. त्यापेक्षा  डोक्यात काहीतरी, अध्यात्मिक विचार आण. डोके शांत ठेवून, एखाद्या प्रार्थनेत मन गुंतवून ठेव आणि घाबरून जाऊ नकोस. स्वतः वर विश्वास ठेव. एकदा का ते स्वप्न, तो त्यातील प्रसंग विस्मरणात गेला की, मग तुला काहीच भीती उरणार नाही. ती स्वप्नाची श्रुंखला तुटली जाईल आणि त्यापासून तुझी सुटका होईल."

तो बराच वेळ मला समजावून सांगत होता. धीर देत होता. मला त्याच्या शब्दांनी बराच धीर आला होता. भीतीच्या संवेदना बऱ्याच अंशी सौम्य झाल्या. त्याने सांगितलेल्या गोष्टी माझ्याही मनात आल्या होत्या. पण त्याने सांगितल्यामुळे माझी बेचैनी जरा कमी झाली.
महेश्वरच्या धीराने मला संतुष्टी मिळाली असली तरी,
माझी चलबिचल मात्र कमी झाली नव्हती. शेवटी माझ्या जीवन-मरणाचा प्रश्न होता. आत्ता पासूनचा पुढचा काही काळ कठीण परीक्षेचा होता. माझ्यासाठी कसोटीचा होता. मी माझ्या खोलीत आलो. मला आता महेश्वरजवळ थांबणे जमले नाही. उगाच माझ्यामुळे त्यालाही त्रास.

मी अस्वस्थपणे माझ्या खोलीत बसून होतो. करण्यासारखे काहीच नव्हते. कुठे मन रिझवण्यासाठी बाहेर जावे, तर मनात नाना विचार येतील याची भीती वाटत होती. विषण्ण मनस्थितीत मी शांत बसून होतो. एक एक पल सालासारखा वाटू लागला. हळूहळू मन सैरभैर होऊ लागले. फिरून फिरून त्या स्वप्नांच्या दिशेने जात होते. मी कितीही त्याच्यापासून, दूर जाण्याचा प्रयत्न करत असलो तरी, त्याच्यापासून सुटका करून घेऊ शकत नव्हतो.
      वेळ पुढे सरकत होती. सायंकाळचा प्रहरही ओलांडून गेला होता. संध्याकाळच्या काळया- तांबड्या छटा, चौफेर विखुरल्या होत्या. तसे हे सगळे वातावरण प्रसन्न करणारे होत. पण माझी मनस्थिती खिन्न झालेली होती. खोलीबाहेर पडावे असे मुळीच वाटत नव्हते. आजची रात्र मला सांभाळून राहावे लागणार होते. पुन्हा एकदा महेश्वर येऊन गेला होता. समजावून सांगून गेला होता. वेळ पुढे सरकत होती. रात्र जवळ येत होती. मी इकडे तिकडे बघत मन गुंतवून ठेवत होतो.
दिवसभराचा क्षीण, डोक्यातील ती भीती, नीरस झालेला अवतीभोवतीच्या परिसर याने मनावर अंमळ चढू लागला. शरीर थकल्यासारखे वाटू लागले. मनाची क्षीणता अंगभर पसरत चालली होती. मी प्रचंड थकलो होतो. शरीराची हालचाल कमी झाली होती. ही सगळी लक्षणे झोपेची होती. मी निद्रेच्या अधीन जात होतो.
       मी खडबडून जाग्यावर आलो. आपण झोपत आहोत, ही जाणीवच भितीसाठी पुरेशी ठरली. आपण झोपता कामा नये. झोपेचा मोह आपला जीव घेईल, ही जाणीव मी सतत मेंदूला करून देत होतो. कधी खोलीतल्या भिंतीकडे, कधी भिंतीवरील घड्याळाकडे तर कधी दरवाज्याकडे बघत, मी अंगातील झोप घालवण्याचा प्रयत्न करत होतो. डोळे जोरात ताणत होतो. गालावर चापटी मारत होतो. झोप घालवण्याचा हरेक प्रयत्न मी करत होतो. मला माझ्यावर झोप वरचढ झालेली चालणार नव्हती. मी कमालीची सावधानता बाळगणार होतो.
घड्याळाचे काटे पुढे सरकत होते. वेळ वेगाने पुढे जात होती. त्या सोबत माझे विचारही पुढे सरकत होते. मेंदू क्षीणला जात होता. अवयव शिथिल होत होते.
        आता   दरवाजा काहीसा हलत होता, मागे पुढे होत होता. घड्याळाचे काटे स्वतःभोवती नाचत होते. आजूबाजूचे अनेक आकार लहान लहान होत होते. डोळ्यासमोर हलकेच काळी वर्तुळे फिरत होती. आता ते वर्तुळे अजूनच गडद काळे होत होते. हळूहळू ते पूर्ण काळेकुट्ट बनले होते. एका खोल काळ्या गर्तेत माझी जाणीव गटांगळ्या खात होती.
                
मी झाडाखाली कण्हत पडलेलो होतो. जखमा चांगल्याच ठणकत होत्या. पण त्या जखामांपेक्षा, मला त्या समोर उभ्या असलेल्या लांडग्यांच्या कळपाची भीती जास्त होती. त्यांचे ते हपापलेले पोट खालीवर होत होते. त्यांचे आणि माझ्यातले अंतर शंभर- दीडशे फुटांचे असेल. पण एवढ्या अंतरावरूनही मला त्यांच्या डोळ्यांतून भूक जाणवत होती. लालसेने ओथंबलेले त्यांचे लाल डोळे, मनात धडकी भरवत होते. त्यांची ती तीन चार इंच बाहेर आलेली लाल तांबडी जीभ, त्या जीभेतून खाली टपकणारी लाळ, सगळे मला प्रचंड भयप्रद वाटू लागले.
मला आता माझा मृत्यू समोर दिसू लागला. माझी त्यांच्यासून वाचण्याची धडपड सुरू झाली. मी उठण्याचा प्रयत्न करू लागलो. मी धडपडू लागलो. माझ्या त्या हालचालीमुळे तो कळप अजुन चवताळला. आणि वेगाने तो माझ्या दिशेने पळत येऊ लागला. ते शंभर- दीडशे फुटाचे अंतर पार करायला, त्यांना कितीसा वेळ लागणार होता. अवघे वीस- तीस सेकंद! तो कळप आता मोठा मोठा होत होता. म्हणजे ते आता फुटा- फुटाने जवळ येत होते. ऐंशी, सत्तर, साठ, पन्नास असे करत करत अवघ्या दहा फुटांवर तो भला मोठा कळप आला. माझे डोळे वासले गेले. श्वास रोखला गेला आणि मी जगण्याची आशा सोडून दिली.             
           क्षणभर काय झाले काहीच कळले नाही. क्षण दोन क्षण सर्व जाणीवा स्थितप्रज्ञ झाल्यासारखे वाटले. आणि सरसर करत मला ते दिसले. अवघ्या दहा- बारा फुटावर आलेला तो लांडग्यांचा कळप, अचानक डावीकडे वळाला आणि वेगाने निघून गेला. मला तसेच सोडून. मला कशाचाच बोध होत नव्हता. अशे का घडले? काहीच कळत नव्हते. पण एक गोष्ट मात्र मला कळाली होती. मी वाचलो होतो. आधी नवल आणि नंतर प्रचंड आनंदाने मी धडपडून उठायचा प्रयत्न केला. कळप दूर गेला होता. अगदी नजरेच्या टप्प्याबाहेर. मी आनंदाने जोरजोरात टाळ्या पिटत होतो,ओरडत होतो. माझ्या जगण्याचा उत्सव साजरा करत होतो.
               
खाडकन् डोळे उघडून मी उठून बसलो. मला झोप कधी लागली, कधी मी स्वप्नात गेलो, हे कळलेच नाही. भराभर मला तो स्वप्नाचा सगळा संदर्भ आठवला गेला. मला स्वप्नात काय घडले हे आठवले. मी वाचलो होतो, ही जाणीव मला प्रचंड सुखावणारी होती. एक मोठे संकट, अगदी काही फुटांवरून माझ्यापासून दूर गेले होते. नवल, उत्सुकता, भीती, आनंद, हर्ष या सगळ्या भावनांनी मनात गर्दी केली. मी जिवंत आहे, ही जाणीवच माझ्यासाठी सर्वस्व होती.
पहाटेचा कोवळा प्रकाश वातावरणात शिरला होता. आताची सकाळ माझी होती. माझ्या विजयाची होती. मी वाचलो होतो. मी वेगाने माहेश्र्वरकडे जात होतो. कधी एकदा त्याला, मी जिवंत असल्याची बातमी देतो, असे झाले होते. त्या स्वप्नाच्या साखळीतून मी मुक्त झालेलो होतो. ते लांडगे माझ्यापासून दूर गेले होते. आता मरणाची भीती उरली नव्हती. मी महेश्वरच्या खोलीजवळ आलो. महेश्वर झोपेत असेल, मला माहित होते. पण त्याला उठवावे लागणार होते. त्याला ही आनंदाची गोष्ट सांगावी लागणार होती. तो झोपेत असला तरी मी त्याला उठवणार होतो. मी ते करणार होतो. मी त्याचा खोलीचा दरवाजा उघडून आत गेलो.
  
  डोक्यावर कोणीतरी हजारो घनाचे घाव घालत आहे, असे वाटत होते. समोर महेश्वरचा देह पडलेला होता. सर्व शरीराचे लचके तोडलेले होते. सर्व अंगावर जागोजागी मांस लोंबत होते. जणू अनेक जंगली श्र्वापदांनी त्याचे लचके तोडलेले असावेत. मी सुन्न होऊन ते समोरचे दृश्य पहात होतो. मी जिवंत असल्याची खबर त्याला द्यायला आलो होतो, आणि तोच असा मृत अवस्थेत पडलेला होता. मी अवाक् झालो होतो. एकदम सुन्न होऊन मी पुढे बघत होतो. क्षणभर माझ्या सगळ्या जाणीवा, संवेदना स्तब्ध झाल्या होत्या.
 
हळूहळू सगळे माझ्या डोळ्यांसमोर येत होते. अगदी स्वच्छपणे समोर येत होते. सगळ्या गोष्टी आता एकमेकाना जुळत होत्या. अगदी प्रथमपासून ते आत्तापर्यंत सगळे काही मला समजून आले होते.
फक्त एक गोष्ट माझ्या अंतर्मनाला कळत नव्हती.
नेमकी चूक माझी होती  की महेश्वरची.
मला त्याचे वस्तुनिष्ठ उत्तर देता येत नव्हते
पण एक होते. जे ढळढळीत सत्य होते.
मी त्याला स्वप्नाचा तपशील, अगदी सविस्तर सांगायला नको होता आणि दुसरे म्हणजे महेश्वरने तो तपशील अगदी मन मन लावून ऐकायला नको होता.
बस्स!
एवढेच!

वैभव नामदेव देशमुख.

वाङ्मयकथालेखविरंगुळा

प्रतिक्रिया

तुम्ही स्वप्नाचा तपशील, अगदी सविस्तर लिहायला नको होता, आणि दुसरे म्हणजे मी तो तपशील अगदी मन मन लावून वाचायलाही नको होत. बस्स! एवढेच!

आनन्दा's picture

19 May 2021 - 2:49 pm | आनन्दा

आता ग बया?

गॉडजिला's picture

19 May 2021 - 5:22 pm | गॉडजिला

_/\_

तुषार काळभोर's picture

19 May 2021 - 6:42 pm | तुषार काळभोर

मस्त कथा!

संग्राम's picture

20 May 2021 - 12:30 am | संग्राम

जुळे भाऊ यावरून थोडी वेगळी कल्पना वाटली होती .. दोन्ही भाऊ एकमेकाविरुद्ध असं काही ....
अनपेक्षित कलाटणी !

सोत्रि's picture

20 May 2021 - 7:26 am | सोत्रि

मस्त गूढकथा!

- (गूढ) सोकाजी

सौंदाळा's picture

20 May 2021 - 3:02 pm | सौंदाळा

छान आहे कथा
पण पुर्वीच्या कथांच्या तुलनेत तेवढी आवडली नाही.
जुळ्या भावाला सांगितल्यावरच अंदाज आला होता.

गुल्लू दादा's picture

28 May 2021 - 5:42 pm | गुल्लू दादा

कथा आवडली.