दातही होते, दाणेही होते...

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
9 Mar 2021 - 7:48 am

मी रेडियोवर नोकरी करत असतानाची गोष्ट. मी माॅर्निंग ड्यूटी करत होते. मी पहाटे चार वाजता उठले. माझं आवरलं. सासूबाईंना बाय करुन आणि झोपलेल्या मुलाचं पांघरूण नीट करुन, पावणेपाचला मी माझी कायनेटिक सुरू केली. अर्ध्या रस्त्यात आले आणि लक्षात आलं की डबा घरीच राहिलाय. परत जाणं शक्य नव्हतं. साडेपाचला ट्रान्समिशन ओपन होणार होतं. त्याआधी मटेरियल चेक करायचं होतं.

मी कायनेटिक चा स्पीड वाढवला आणि ऑफिसला पोहोचले. कामाला सुरुवात केली. फक्त एक कप चहा पिऊन मी घरातून निघालेली होते. खूप काम होतं. सकाळी नऊ वाजता कोपऱ्यावरच्या चहावाल्याकडून चहा आणि वडापाव मागवला. प्यून सांगत आला चहा तयार होता. पण वडा अजून तळलेला नव्हता. पुन्हा फक्त एक कप चहा प्यायले. ट्रान्समिशन संपलं. लगेचच प्रोग्रॅम मीटिंग होती. त्यात एक तास वेळ गेला. तेवढ्यात माझी एक कलिग आली आणि म्हणाली,"मला तुझी कायनेटिक दे. मला अर्जंट हाॅस्पिटलला जायचंय. तू आज बसनं जा. तुझी गाडी घरी आणून पोहोचवते." मी तिला किल्ली दिली. नंतर रेकॉर्डिंग्ज होती. असं करता करता साडेबारा वाजून गेले. माझा रिलिव्हिंग ऑफिसर आला होता. माझी ड्यूटी संपली होती. आता घरी जायचं, जाणवलं, खूप भूक लागली आहे. कोपऱ्यावरच्या टपरीवर गेले. वडापाव पुन्हा संपला होता. त्यांच्याकडं मस्तपैकी खमंग भाजलेले शेंगदाणे मात्र होते. प्लास्टिकच्या छोट्या पुड्यांतले. तिथून एक पुडी दाणे घेतले. म्हटलं बसस्टॉपवर बसची वाट बघत बघत शेंगदाणे खाऊ. खाऱ्या शेंगदाण्याची चव आठवून तोंडाला चळ्ळकन् पाणी सुटलं. मी प्लॅस्टिकची पुडी दातांनी तोडून दाणे खाणार, इतक्यात बस येताना दिसली. मी पुडी पर्समध्ये टाकून बस पकडली.

बसमध्ये गर्दी होती. बसायला जागा नव्हती. मग उभ्याने हलत्या बसमधे दाणे कसे खाणार? सीट मिळाली की खाऊ म्हटलं. थोड्या वेळानं बसायला जागा मिळाली. तीही खिडकीजवळ! माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. म्हटलं, आता मस्तपैकी खमंग भाजलेले शेंगदाणे खात खात घर गाठू.

मी असा विचार करतेय तोपर्यंत शेजारच्या सीटवर कुणीतरी धपकन बसल्याचं जाणवलं.
वळून पाहिलं तर,"अय्या तू?..", ती म्हणाली, "मी तुला मागून पाहात होते. म्हटलं हिच्या जवळ जागा मिळाली तर बरं होईल." ही बाई मला गावात असूनही खूप वर्षांनी भेटली होती. नावही पूर्ण आठवत नव्हतं. अर्धवट ओळख.

माझ्या मनात विचार आला की आता दाणे खायचे म्हणजे हिला एवढ्याश्या पुडीतले निम्मे दाणे देणं आलं. त्याला माझी मुळीच तयारी नव्हती. उतरेल ही बहुतेक मधेच कुठेतरी. बघूया थोडी वाट.

"कशी आहेस?""तू कशी आहेस?" झालं. शेवटी तिला थोडे दाणे देऊन आपणही उरलेले खावेत अशी माझ्या पोटातल्या भुकेनं मला आज्ञा दिली. मी पुडी बाहेर काढणार,तेवढ्यात ती म्हणाली,"तुझे मिस्टर गेल्याचं कळलं ग! फारच वाईट झालं."

(माझे मिस्टर जाऊन त्यावेळी चांगली दोन वर्षं झाली होती. मी दैनंदिन जीवनात रुळले होते.)

"कशानं,कसे गेले ग?" त्यावर मी माझे 'हे' कसे गेले ते सांगायला सुरुवात केली. आता आपला नवरा कसा गेला ते सांगत असताना शेंगदाणे खाणं शक्यच नव्हतं.

मग इतर गप्पा मारल्या. मला मारुतीमंदिरपाशी उतरायचं होतं. ती आधी कुठेतरी उतरेल, मग ती गेल्यावर मी दाणे खाईन, या आशेनं मी तिला विचारले,"तू कुठं उतरणार?"

"मारुती मंदिर ."ती म्हणाली.

झालं!नो चान्स. पुढं आमच्या गप्पा झाल्या. पण त्या गप्पांमध्ये माझं लक्ष नव्हतं. इतक्यात आमचा स्टाॅप आला. नवीन पत्त्यांची देवघेव आधीच झाली होती. नशीब ती गळेपडू "मी आत्ताच तुझ्याकडे येते" असं म्हणाली नाही. आम्ही उतरलो. एकमेकींना बाय केलं. ती गेल्याची खात्री करून मी शेंगदाणे बाहेर काढले. म्हटलं, घरी पोहोचायला थोडं चालावं लागतं. मोकळ्या रस्त्यावर चालता चालता दाणे खाऊ. मी पुडीत हात घालणार, तेवढ्यात माझ्या शेजारी एक कार येऊन थांबली. मी बघितलं तर ते आमच्याच काॅलनीत राहणारे आमचे शेजारी देशपांडे होते. मिसेस देशपांडे म्हणाल्या,"वैनी, चला गाडीत बसा. तुमच्या घरी सोडतो. ऊन तापलंय. चालत कुठं जाता?"

मी मुकाट्याने पुडी पर्समध्ये ठेवली आणि गाडीत बसले.
घर आलं. देशपांडेना थॅंक्स देऊन आत गेले. घरात कोचावर बसून आरामात दाणे खायचं ठरवलं. पुडी बाहेर काढून खाणार तेवढ्यात सासूबाई म्हणाल्या,"भूक लागली असेल तुला. जेवणाची वेळ आहे. उगीच आवडकचवडक काहीतरी खाऊ नकोस. पिटत होईल मग. मी थांबलीय तुझ्यासाठी. जेवण गरम करते, तोपर्यंत फ्रेश हो. जेवायला बसूया. मी पुडी पुन्हा पर्समध्ये ठेवली. फ्रेश झाले. जेवायला बसले.

पुढं ती शेंगदाण्याची पुडी पर्समध्येच राहिली. मऊ पडली. त्यातली सगळी मजाच गेली.

दातही होते,दाणेही होते....पण संधीच नव्हती.

समाजजीवनमानप्रकटनविचार

प्रतिक्रिया

सोत्रि's picture

9 Mar 2021 - 8:31 am | सोत्रि

मस्त!

- (असा किस्सा अनुभवलेला) सोकाजी

चित्रगुप्त's picture

9 Mar 2021 - 8:33 am | चित्रगुप्त

मस्त. मजेदार ... भाजलेल्या खमंग दाण्यांसारखीच .

कानडाऊ योगेशु's picture

9 Mar 2021 - 11:16 am | कानडाऊ योगेशु

ह्यावरुनच ती हिंदीतली म्हण पडली असावी दाने दाने पे लिखा है खानेवाले का नाम!

राजेंद्र मेहेंदळे's picture

9 Mar 2021 - 11:20 am | राजेंद्र मेहेंदळे

फिरतीचा जॉब केला असल्याने असा अनुभव बरेच वेळा घेतलाय. डबा बरोबर असुनही खायला वेळ झाला नाही किवा जागा मिळाली नाही म्हणुन परत आणलाय. एकीकडे सतत बाहेरचे खाउन पोटाला त्रास आणि दुसरीकडे जेवणाच्या वेळा पाळणेही अशक्य त्यामुळे भूक पाचवीलाच पुजलेली. शेवटी ६-७ वर्षांनी देवाच्या कृपेने बैठी नोकरी मिळाली आणि तेव्हापासुन जेवण सुधारले. आता लॉक डाउन झाल्यापासुन तर वर्क फ्रॉम होम मुळे मज्जाच मज्जा

सुबोध खरे's picture

11 Mar 2021 - 12:07 pm | सुबोध खरे

मी जवळ जवळ कधीच जेवणाला उशीर केलेला नाही.

दुपारी साडे बारा पासून जेंव्हा कधी थोडासा वेळ मिळेल तेंव्हा ताबडतोब जेवायला घेत असे. मग अगदी कॉर्पोरेट रुग्णालयात सुद्धा समोर असलेल्या रुग्णाला पंधरा मिनिटे थांबायला सांगून मी जेवायला गेलो आहे.

एकदा असे एका रुग्णाला थांबायला सांगून मी जेवून आलो तेंव्हा हे महाशय तोंडात गुटखा लावून बसलेले होते. हृदयाच्या बायपास साठी आलेले हे महाशय तंबाखू खातात पाहून मी त्यांना भरपूर झाडले. नंतर विचारले कि आपण काय करता? त्यावर ते म्हणाले मी xx ठिकाणचा आमदार आहे. मी त्यांना अजूनच जोरात सांगितले कि तंबाखूला हे माहिती नाही कि तुम्ही आमदार आहात तेंव्हा त्याचा हृदयावर अपाय होणारच.

एक गोष्ट लष्करात शिकलो

eat and sleep whenever you can

and

work if you have to

टवाळ कार्टा's picture

9 Mar 2021 - 1:03 pm | टवाळ कार्टा

=))

उपयोजक's picture

9 Mar 2021 - 1:17 pm | उपयोजक

मजा आली वाचताना! :)

गोंधळी's picture

9 Mar 2021 - 1:22 pm | गोंधळी

😄

वामन देशमुख's picture

9 Mar 2021 - 1:45 pm | वामन देशमुख

ज्जाम मज्जा आली वाचताना!

तुषार काळभोर's picture

9 Mar 2021 - 2:21 pm | तुषार काळभोर

लई वाईट्ट!
कंपनीत कधी कधी अशीच लंच ची वेळ टळून जाते. कधी काम असतं, कधी एखादा रिपोर्ट द्यायचा असतो, कधी एखादा कॉल चालू असतो.
जेव्हा डबा नसायचा तेव्हा मग उपाशीच राहावं लागायचं.
डबा असल्यावर तीन साडे तीनला हळूच टेबलावर खाली मान घालून खाऊन घ्यायचा.

चांदणे संदीप's picture

9 Mar 2021 - 3:45 pm | चांदणे संदीप

असं बर्‍याचदा होतं खरं. पण एक आहे, कामात व्यस्त असताना अशा भुकेतून आपण पार होऊन जातो. पण रिकामे बसलेलो असताना मात्र भूक अनावर होते.

अलीकडेच, एका मित्रामुळे मला दोन वेगवेगळ्या दिवशी उपवास घडला. दुसर्‍या वेळचा किस्सा मजेशीर झाला. याच्यापेक्षा आधिक चांगला धागा आला नसता म्हणून इथे लिहितोच.

दिवस पहिला: शनिवार होता, मी ऑफिसमध्ये असतो शनिवारी. एका मित्राचा फोन आला मी येतोय तुझ्या एरियात तर भेटूया. मी डबा घेऊन गेलो नव्हतो म्हणून त्याला म्हटलो की दुपारी बाहेर जाऊ जेवायला, तो ओके म्हटला. दुपारचे दीड वाजले, एकेक करून कावळे जमा व्हायला लागले पोटात. दोन वाजता त्याला फोन केला. काम वाढल्यामुळे उशीर होत आहे झालं की फोन करतो म्हटला. तीन वाजता कावळ्यांची काव-काव वाढली पोटात. फोन केला, अरे अर्ध्या तासाचं काम राहिलंय झालं की पंधरा मिनिटात येतोच. म्हणजे अजून किमान पंचेचाळीस मिनिटे होती. मित्र जवळचा आहे, राहतो खूप दूर म्हणून सारखी भेट होत नाही. भेटणं होतंय तर सोबत जेवण झालंच पाहिजे म्हणून मी अजून थोडी कळ काढली. एव्हाना कावळे एकेक करून निघायला लागले होते. म्हणजे तसं जाणवत होतं. साडेचारला पुन्हा फोन केला तर म्हटला, अरे एकेक करून कामं वाढत चाललीयेत. आज काय योग दिसत नाही पुन्हा केव्हातरी भेटू. मी विचारले, जेवण करून परत गेलास तर नाही चालणार का? तर म्हणतो, अरे मी काम करता करता माझा डबा खाऊन घेतलाय. तू अजून जेवला नाही? मी कपाळावर हात मारून घेतला. ऑफिसच्या बिल्डींगमध्ये एक छोटं हॉटेल आहे, त्याला फोन केला तर तो म्हटला, सर अभी साफसफाई चल रही है आधा-एक घंटा लगेगा चलेगा क्या? मी म्हटलं राहू दे.

दुसर्‍या एका आठवड्यातला दिवस दुसरा: पुन्हा शनिवार. पुन्हा त्याच मित्राचा फोन. मी येतोय भेटूया. पुन्हा सोबत जेवणाचं ठरलं. यावेळी मात्र माझ्याकडेही डबा होता. तसं त्याला सांगितलंही. पुन्हा दुपारी आधीसारखेच फोन झाले. आधीसारखीच उत्तरे आली. नशीब एवढं होतं की माझ्याकडेही डबा होता. शेवटचा फोन चार वाजता झाला तेव्हा तो मला म्हटला, मी निघायच्या पंधरा मिनिटेआधी फोन करतो. साडेपाचला निघतोय असा फोन आला. सहाच्या ठोक्याला तो एकदाचा पोचला माझ्या ऑफिसात. माझ्या शेजारी आमचा कॉमन मित्र बसलेला होता. हा भाऊ आला. दिवसभरात कशी कशी डोक्याची मंडई झाली ते वैतागून सांगू लागला आणि सांगता सांगता ऑफिसातल्या वॉशरूममध्ये जाऊन हात-तोंड धुवून आला. त्याची बॅग उघडली. बडबड चालूच होती. बॅगेतून डबा बाहेर काढला माझ्या समोरच टेबलावर ठेवला आणि किती कडक भूक लागली आहे हे सांगत सांगत भाऊने खाणं चालू केलं. मला आणि माझ्या दुसर्‍या मित्राला जेवणाचं न विचारता किंवा आम्हांला काहीही बोलायची संधी न देता त्याने जेवणं सुरू केलं आणि संपवलं. जेवण झालं, तृप्तीचा ढेकर दिला गेला, डबा धुऊन खिडकीतल्या टेबलाजवळ सुकायला उपडा ठेवून तो आमच्याजवळ बोलायला येऊन बसला. आमच्या कॉमन मित्राने मग त्याला विचारलं, अरे तू सॅन्डीला (म्हणजे मला) नाही विचारलं जेवला का नाही ते? आता मघाशी अविरत बडबडणारे ते ओठ घट्ट मिटले गेले. डोळ्यात ओशाळल्याचा भाव आला. बोलला, अरे मला वाटल, तू खाऊन घेतलं असशील. शिव्या वगैरे सोपस्कार पार पाडून मी त्याला कोपरापासून हात जोडले. ____/\___ त्या दिवसापासून खाण्यावरून माझं मन उडालंय.

सं - दी - प

त्याला शब्द दिला त्याची किंमत ,वेळेची काय किंमत असते ह्याची जाणीव आहे का?
हा कसला मित्र कोणत्या च प्रसंगात हा तुमचा मित्र उपयोगी पडणार नाही.
सोडून ध्या मैत्री.

सविता००१'s picture

9 Mar 2021 - 6:05 pm | सविता००१

कठीणच आहे हा मित्र

कानडाऊ योगेशु's picture

9 Mar 2021 - 9:17 pm | कानडाऊ योगेशु

जेवायचे ठरवुन तुम्ही चूक केलीत. बसायचे ठरवायला हवे होते. हातातले काम सोडुन पळत आला असता.

सविता००१'s picture

9 Mar 2021 - 6:05 pm | सविता००१

खरंच होतं असं कधीतरी. अगदी वैताग वैताग होतो, पण आपण काही करूही शकत नाही. नंतर आपण ते हलक्यात घेतो पण तेव्हा अगदी संताप होतो

चिगो's picture

9 Mar 2021 - 6:08 pm | चिगो

खुप मस्त लेख..

आता आपला नवरा कसा गेला ते सांगत असताना शेंगदाणे खाणं शक्यच नव्हतं.

कहर ओळ आहे ही. डार्क कॉमेडीचा कळस..

मुक्त विहारि's picture

9 Mar 2021 - 7:36 pm | मुक्त विहारि

कधी कधी असेच होते...

शिफ्ट ड्युटी करत असतांना, भरल्या ताटावरून, खूप वेळा उठावे लागले आहे...

रमेश आठवले's picture

10 Mar 2021 - 12:18 am | रमेश आठवले

साध्याही विषयात आशय मोठा किती आढळे .

सुसदा's picture

11 Mar 2021 - 3:43 am | सुसदा

मस्त!!

असे झाले आहे काही वेळा. आशा वेळी मी चहा किंवा कोफी पिउन पोटोबा शांत करतो. काहीतरी पोटात गेले की थोडे बरे वाटते ...

जगप्रवासी's picture

11 Mar 2021 - 10:27 am | जगप्रवासी

छान लिहिलंय

आयुष्यात घडलेल्या छोट्या छोट्या गोष्टींच्या आठवणी मस्त असतात..
आपलं मन हळूच मागे जाते आणि पुन्हा त्या जगात एक फेरफटका मारून येते...
मस्त

शाम भागवत's picture

12 Mar 2021 - 12:14 pm | शाम भागवत

छान लिहीलं आहे.

शाम भागवत's picture

12 Mar 2021 - 12:52 pm | शाम भागवत

आपल्या जीवनाकडे त्रयस्थपणे पाहाण्याचा दृष्टिकोन फार थोड्या जणांचा विकसित होतो. अध्यात्मामधे तर याला खूपच महत्व आहे.

हा दृष्टिकोन आणखी परिपक्व होत जाओ. 🙏

मदनबाण's picture

12 Mar 2021 - 6:32 pm | मदनबाण

आजी लेखातील अनुभव आवडला. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Vaseegara | Geethiyaa Varman | Music Cover

सौंदाळा's picture

13 Mar 2021 - 11:46 am | सौंदाळा

छोटी घटना पण छान खुलवून लिहिली आहे.
माझ्या बाबतीत असे घडले होते. पुण्याहून मुंबईला काकूंच्या अंतिम संस्कारांसाठी पहाटे निघालो होतो, चहा पिऊन ते डायरेक्ट संध्याकाळी डेक्कन क्वीन मध्ये बसेपर्यंत 2, 3 ग्लास पाणी सोडून काहीच खाल्ले नाही. हालत खराब झाली होती.

योगेश कोलेश्वर's picture

13 Mar 2021 - 1:08 pm | योगेश कोलेश्वर

लेख आवडला..

सिरुसेरि's picture

13 Mar 2021 - 1:32 pm | सिरुसेरि

छान लेख

आजी's picture

14 Mar 2021 - 12:13 pm | आजी

सोत्रि-तुम्हांलाही असाच अनुभव आला वाटतं!

चित्रगुप्त-अभिप्राय वाचून बरं वाटलं.धन्यवाद.

कानडाऊ योगेशु-खरंय तुमचं!

राजेंद्र मेहेंदळे-भुकेलं राहण्याचा अनुभव तुम्ही बरेच वेळा घेतलेला दिसतोय. सेम हियर.

सुबोध खरे-"आपल्याला वाटेल तेव्हा जेवावं, आणि करावं लागलंच तर काम करावं" हे तुमचं तत्त्वज्ञान मस्त आहे.भले!

टवाळ कार्टा-थॅंक्यू.अभिप्रायाबद्दल.

उपयोजक-तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

गोंधळी-अभिप्रायाबद्दल आभारी आहे.

वामन देशमुख-"ज्जाम मज्जा आली"हा अभिप्राय वाचून समाधान वाटले.

तुषार काळभोर-तुमच्यावरही उपाशी राहण्याची वेळ आली आहे तर! आपण समदुःखी.

चांदणे संदीप-वाईट अनुभव आहे तुमचा! 'सोडून द्या ही मैत्री' राजेश 188चा सल्ला मलाही तुम्हांला द्यावासा वाटतो. पण एकदा वाटतं "जाने भी दो यारो"

सविता००१-तुम्हांलाही हा मित्र'कठीणच'वाटतो.

कानडाऊ योगेशु- तुम्हालाही या मित्राचं वागणं आवडलेलं नाही.

सविता ००१-खरंय तुमचं.धन्यवाद.

चिगो-"खूप मस्त लेख. डार्क काॅमेडीचा कळस"हा अभिप्राय वाचून बरं वाटलं.

मुक्तविहारी-खरंय तुमचं.

रमेश आठवले-"साध्या विषयात मोठा आशय"हा तुमचा अभिप्राय वाचून समाधान वाटले.

सुसदा-धन्यवाद.

सुक्या-भुकेलं राहण्याचा अनुभव तुम्हांलाही आहे तर!

जगप्रवासी-"छान लिहिलंय"ह्या तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

गणेशा-थॅंक्यू.

शाम भागवत-"आपल्याच जीवनाकडे मी त्रयस्थपणे पाहते"हा तुमचा अभिप्राय समाधान देऊन गेला.

मदनबाण-आभारी आहे.

सौंदाळा-"छोटी घटना पण छान खुलवून लिहिली आहे."हा अभिप्राय वाचून बरं वाटलं.

योगेश कालेश्वर-आभारी आहे.

सिरुसेरी-धन्यवाद.

माझ्या लेखाला भरभरुन प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानते.