मनातले माधवनगर -उत्सव-सण-वार...

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
27 Jan 2021 - 6:39 pm

‘मी पाहिलेले-अनुभवलेले आखीव माधवनगर’.

1

मनातले माधवनगर -उत्सव-सण-वार...

१.गणेशोत्सव...

माधवनगरातील कॉटन मिलमधे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असे. त्यात आरती-प्रसाद विसर्जन या भानगडीत न पडता आम्हा सवंगड्यांना त्यावेळचे खास आकर्षण असे ते दर शनिवारी ठेवल्या गेलेल्या विविध कार्यक्रमांचे. त्या काळात एकमेकांच्या घरी जाऊन गल्लीतील सगळे जण बसायला पटकुरं घेऊन रात्री आठ वाजल्यापासून घोळक्याने मिलच्या गेटपाशी रेटारेटी सहभागी होत, आत झुंडीने जात. बॉयलर रुमपाशी कोळश्याच्या ढिगांची पर्वा न करता हजारोंच्या संख्येने प्रेक्षकांची दाटीवाटी असायची. त्या घाई गर्दीतही आपल्या आवडत्या ‘ती’ ला पहायला अनेकांच्या नजरा भिरभिरत्या होत.

त्या काळात पाहिलेली काही नाटके आजही आठवतात. ‘करीन ती पूर्व’,‘बेबंदशाही’, अशा ऐतिहासिक पाच अंकी नाटकातून सूर्यकांत, मा. दत्ताराम, वसंत शिंदे, शांता तांबे अशा दिग्गजांची आठवण होते. तर ‘लग्नाची बेडी’ या एव्हरग्रीन नाटकात बापुराव मानेंची रश्मी, राजा परांजपेंचा बायाळ गोकर्ण अन् राजा गोसावींच्या विवाहोत्सुक अवधूतच्या मुखातून आचार्य अत्र्यांच्या लेखणीचे उत्तुंग षट्कार ऐकल्याचे आठवते. पुढे लग्नाची बेडी नाटक मी नंतर विविध संचात पाहिले, पण त्या मिलमधील गणेशोत्सवातील खेळाची मजा काही और होती. काही वर्षांनी माझ्यातल्या नाट्यवेडाने उचल खाल्ली तेंव्हा हवाईदलातील गणेशोत्सवात लग्नाची बेडी नाटकाचे एक लघुरुप सादर करायला मला त्या प्रयोगांची प्रेरणा झाली असावी.

असेच एक नाटक आठवते ते ‘रंग रात्रीचा होता हिरवा’ नावाचे. मिलमधेकाम करणाऱ्या कोणा एका कलाकाराचे ते लेखन व सादरीकरण त्यावेळच्या बालमनात हिरव्या रंगाला एक वेगळी जागा देऊन गेले. माझा मामा मधुसूदन पर्वते तेंव्हा कॉटन मिलमधे नोकरीलाहोता. नाटकात त्याला भूमिका मिळे. त्यावेळी मी त्याचे संवाद पाठांतर व तालमींत रस घेई. मामाने भररंगमंचावर ओलेल्या हिरॉईनला मारायला लागलेल्या मिठीची मजा, बोटे सोलवटणारी त्याची तबल्याची तालीम, मनोहरांच्या बुधवारपेठेतील खानावळीतील मामाबरोबर रविवार-फिस्टची चव चाखणारा तर कांजी कडक पांढऱ्या वेषातील मधूमामा माझा त्या वेळचा हीरो होता.

एकवर्षी पुण्याच्या सुप्रसिद्ध रघुवीर जादुगारांचे प्रयोग मोहवून गेले. हर हर महादेव म्हणून दरवेळी मोकळ्या कळशीतून पाणी बाहेर ओतून तर कधी दोलायमान दोऱ्याला लावलेल्या लोलकाचा अचुक धनुवेध वगैरे चित्तवेधक खेळ मनात घर करून गेले.असेच आठवतेय, त्यावेळी हिप्नॉटिझमवरील एका

प्रयोगात सानुनासिक बोलणाऱ्या गणुकाका द्रविडांच्या चिमुरड्या माधुरीला मंचावर जायचा चान्स मिळाला. त्यावेळी तिने त्यांच्या काही प्रश्नांना धिटाईने दिलेल्या उत्तरांनी प्रभावित होऊन जा. रघुवीरांनी‘मोठेपणी नाव काढशील बेटा’ असा दिलेला आशीर्वाद नंतर खरा ठरला. खेळानंतर त्यांनी विकलेल्या छोट्या पुस्तिकांतून काही हातचलाखीचे खेळ शरद सोवनी शाळेतील संम्मेलनात करत असे.

कॉटन मिलमधील कार्यक्रमात एक ऐतिहासिक नाटक आणले तर तिकडे साखर कारखाना गणेशोत्सवात बेबंदशाही सारख्या दमदार नाटकाने भरपाई करून हम भी कुछ कम नहीं अशी अलिखित चुरस असे. नाटकांतून कोल्हापुरच्या त्यावेळच्या प्रसिद्ध गायिका कान्होपात्रा, सध्याच्या प्रिया अरुणची आई - डोळे मिचमिचवणाऱ्या लता काळे, तर कधी दिलखेचक लावणी नृत्यांगना माया जाधव, सुंदर कमल बेडगकरआदीं नावांच्या स्त्रीपात्रांची वर्णी आम्हाला पाठ होती. सांगलीतील अरुण नाईक, रेडिओ स्टार प्रभाकर वेलणकर, मधुसूदन करमरकरांचे नाट्यगुणदर्शन आम्हाला कळले. भावले.

.... बुधवार पेठेतून आताच्या सुप्रसिद्ध कारखानदार रवी भिडेने गल्ली अभिमान आड आणता गुरुवार पेठेत दणकेबाज एन्ट्री घेऊन बालगणेश मंडळ अशा नावाने कॉटन मिल चाळीतील गणपतीला गल्लीत आणून गणेशोत्सवाचा मोहरा बदलून टाकलान. आमच्या बंगल्याच्या मोकळ्या जागेत संत तुकारामांचे स्वर्गारोहण असा देखावा एकदा साधारण ७०-७१ साली मांडला होता. त्यानंतर पुढे कित्येक वर्षे मंडळातून अनेक देखावे व कार्यक्रम साजरे झाले. नंतर यायचा तो...

२.दसरा..

आदल्या दिवशी खंडेनवमीला कॉटनमिलच्या मशिनरीची पूजा म्हणून, पहायला मुद्दाम ती उघडी असे. तर दसऱ्याला आपट्याच्या पानांचे सोने द्यायला घरोघर जाऊन माधवनगर गाव पालथा घातला जायचा. नवरात्रीत घागरी फुंकून आयाबाया नऊवारीचा कासोटा घट्ट बांधून दणक्यात उदाच्या धुरातून एक प्रकारची झिंग अनुभवत असत.

तिकडे मारवाडी समाजाचे वैशिष्ट्य असलेला रामलीलेचा खेळ नवरात्रतात जाग्रणे घडवे. हिन्दी भाषेत एकमेकांशी ओरडून बोलणारे व दर काही अंतराने तुलसी रामायणातील दोहे-सोरठे गाऊन, गोलगोल फिरून, वनवासी धनुकली धारीराम-लक्ष्मण, सीतेचे अपहरण, हनुमानाचे आवेशपुर्ण लंकादहन, धनुष्यबाणाचे युद्ध व शेवटी रावण वधाने सांगता होई. बालमनाला वाटे की राम खरोखर असे गोल फिरून त्याच ठिकाणी रानावनात कशाला जात असावेत? असो...

३.दिवाळी...

यायची ती आपली शान घेऊन. साखरकारखाना, छोट्या पावरलूमच्या व मिलच्याआधारवडाखालीलघराघरातबोनसच्या प्राप्तीने नोकरवर्ग नव्या कपड्यात, फराळाच्या ताटाने

सजलेला असे. आम्हा मुलांना किल्ले बनवायला, आकाशकंदिल करायला मनसोक्त मुभा मिळे. दिवाळीला आलेल्या मामा-काकांकडून किरकोळ का होईना बक्षिशीची कमाई होई, त्यावर आम्ही खुश होत असू.

किल्ला बनवून मातीचे मावळे व शिवाजी महाराज बनवण्यातील रससंपल्यावर एकदा गुरुवार पेठेतील आमच्या घरच्या अंगणात एकदा माधवनगरची प्रतिकृती केल्याचे आठवते. मित्रांना घरी फराळाला बोलवाची प्रथा होती. एकेकांकडील दातांची परीक्षा घेणारे पदार्थ खाता खाता ओठ सोलवटायचे तर कधी तिखट लागून ठसका लागे. बरं नावडता पदार्थ पटकन खावा तर तोच आग्रहाने ताटात पुन्हा हजर होई!....

४. पन्हे व वाटल्या डाळीचे आकर्षण असलेले चैत्रातील हळदीकुंकू.

माझी आई मंगला ओक, माधवनगर महिला मंडळातील सक्रिय सदस्य होती. शिवाय सुरेल कीर्तनकार म्हणून ख्यात होती. त्यामुळे तिच्या मैत्रिणींचे मंडल मोठे होते. वडीलांची मिलमधील लोकात उठबस असल्याने हळदीकुंकवाचे निमंत्रण फक्त स्त्रियांपुरते सीमित नसायचे. थंडगार बर्फ घालून बनवलेले आंब्याचे पेलाभर पन्हे व झणझणीत वाटली डाळ निमंत्रितांना आमच्या घरी भेट न चुकवण्यास भाग पाडत असे. आरास व दिव्यांच्या जोडणीला आईला मी हाताखाली लागे. मग श्रम परिहार म्हणून मित्रांना आमंत्रित केले जाई. तेंव्हा लता व माझी लगबग असे. लताच्या मैत्रिणींचा भोंडला असो वा हत्तीच्या चित्राला गोलफेऱ्यामारून हादग्याची गाणी, त्यातला प्रसाद खायला मित्र मंडळींचा डोळा असे.

५.आठवणीतील मंदिरे–

माधवनगरच्या आठवणीतील मनात उजळलेली मंदिरे आठवतात. रेल्वेमार्गापलिकडे विठ्ठल मंदिराचा मान प्रथम. त्याच्या खालोखाल आठवते ते शुक्रवार पेठेतील हनुमान मंदिर. त्यातल्या दासनवमी व हनुमान जयंतीच्या काळातील भंडाराने, नंतरच्या काळातील संभाजी (व त्यांचे कीर्तनकारबंधू- प्रभाकर)जोशींच्या तत्पर सेवेने मंदिराचे व्यवस्थापन सांभाळले गेले.तिथल्या जागेतील महिलामंडळाचे वाचनालयातून अनेक पुस्तके वाचली गेली. शनिवार पेठेतील दत्तमंदिर जरा दुर्लक्षित राहिलेले. मंगळवार पेठेतील नानिवडेकरांचे राम मंदिर, घैसासांच्या अंगणातील छोटेसे कृष्णमंदिर येता-जाता नजरेत राही. तिकडे नव्याने झालेले नीटस राम मंदिर नव्या माधवनगराचे आकर्षण. मंगळवार पेठेतील जुन्या प्राथमिक शाळेशेजारचे जैन मंदिर व सट्टा हॉलजवळील घरातअंबाबाईची आराधना करणारऱ्यांना नवरात्रीत आकर्षण वाटे.

६. पौर्णिमेची वारी व श्रावणी सोमवारच्या यात्रा–

अनेक माधवनगरकर नरसोबाच्या वाडीला खास नियमाने पायीजाऊन वेळोवेळी वा पौर्णिमेला खव्याच्या पेढे, कवठाच्या बफींचे प्रसाद म्हणून देताना तो श्रद्धा पुर्वक घेतला जाई. श्रावणात पायी

चालत जाऊन हरिपुरच्याशिव मंदिरात जायचा शिरस्ता फार पाळला जाई. वाटेतील बागेतला गणपती, गो. ब. देवलांचे घर व कृष्णेच्या काठी धनदाट वृक्षराजीवर बागडणारे पोपटांचे थवे, जत्रेतील नाविन्यपूर्ण खेळणी घ्यायला, काही खायला खिशातील नाण्यांचा वापर आता, मॉलमधील रोजच्या उरुसासमोर किरकोळ वाटतो.

७.फाल्गुनातील बोंबाबोंब–

होळी धडाडून पेटलेली आहे, त्यात टाकायला घराघरातून पुरणाच्या पोळीचा नेवैद्य येतोय, तिकडे पोरांचा गलका वाढतोय, पळवून आणलेल्या लाकडांचा ढीग सरणात भस्म होतोय. हळू हळू बोंबा कमी होत पौर्णिमेचा चंद्र आता कंटाळून ढगाआड होतोय अशा नीरवतेत एका घरी वेगळे नाट्य रंगात आले होते.

...आजची रात्र कसोटी होती.‘आज मी तिला घेऊन जाणार! पाहू ना कोण मला अडवतेयते?’ असा घोगरा आवाज आव्हान देत होता. एक व्यक्ती भिंतीचा आधार घेऊन एकटक नजरेने तोंडावर बसणाऱ्या मंतरलेल्या पाण्याच्या सपकाऱ्यालाअसे सहन करत होती की जणु काही झालेलेच नाही! मात्र जसजशी रात्र वाढत गेली, तशी त्या चेहऱ्याची उग्रता कमी झाली.

‘तू सांगितलेले काहीही केले जाणार नाही. बऱ्या बोलाने जा. नाहीतर आणखी हाल वाढतील.’

‘नको मला जायचे आहे पण एक अट ऐका,… मला गरम पाण्याने न्हायला घाला. अन् खायालाद्या मग मी कायबी करणार न्हाय... ऐका वाईच....’ आता मलूल पडलेला आवाजात विलक्षण नरमाई आली होती!

‘जनार्दना, आता अंत नको पाहू रे बाबा. म्हणत्यैना ते करा. मी लागते बंब पेटवायला’. माझी आजी वडीलांकडे पहात म्हणाली, ‘मंगला, लाग कामाला’ असे त्यांनी अधिकाराने माझ्या आईला म्हटल्यावर भात व इतर पदार्थ बनायला लागले. माझे वडील सुपारीचे खांड अडकित्यात धरून कातरत विचारात गुंतले. बहीण लता, काय होतेय यावर लक्ष ठेवून होती. मग पेंगुळलेली लता पहातापहाता जमिनीवरच आडवी झाली. अन् मी पहारेकर्‍यासारखा मावशीवर लक्ष ठेवून होतो.

‘काही बोलली तर सांगरे शशी’, असे म्हणून वडीलांनी १२ वर्षाच्या त्यांच्या मुलावर भिस्त ठेवत तंबाखूचा बार भरला. मावशी गेले ४ महिने आमच्याकडेच राहत होती, सहज हवा पालटायला म्हणून पुण्याहून आली काय आणि रात्री अंथरुणातून उठून बंद दरवाज्याची कडी काढून घराबाहेर जाऊ काय लागली! लक्षात आल्यावर आमची झोप उडाली होती. नंतरचा प्रत्येक दिवस असुरी शक्तीचे नवनवे प्रताप दाखवत आम्हा कुटुंबियांची सत्वपरीक्षा घेत उगवत होता. माझी आई ते शारीरिक अत्याचार न सहन होऊन अगतिकपणे,‘ नको ती बहिणीची ब्याद’ म्हणत, तिला घरी परत पाठवायला चालली होती!धीरोदात्त वडिलांचा मंत्रसामर्थ्यावर व प्रबळ मनोनिश्चयावर अढळ विश्वास होता, त्यांच्यासोबत टक्कर देत देत त्या फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री मावशीला अदृष्य असुरी शक्तीपासून सोडवायला आम्ही कटिबद्ध

झालो होतो. तिला गरम पाण्याने नाहून झाल्यावर, पदार्थांचे ताटभर जेवण मावशीसमोर ठेवले गेले. तिच्यातील माज कमी झाला होता. आता ती निपचित पडून होती. ते सर्व पदार्थ गुरुजींच्या पूर्वकथनाप्रमाणे मावशीच्या हाताने विहिरीतील जीवजंतूंना अर्पण केले गेले. अरिष्ट टळले होते...

आज ६० वर्षांनंतर...त्या दोघी बहिणीमुलाबाळांच्या संसारातून दूर, एकत्र रहात आहेत... कालाय तस्मै नमः

मनातल्या माधवनगरात आठवणींच्या खोल गर्तेतीलमंदिरे.. असे उत्सव असे सण... कधी सुखद तर कधी भीषण....

----------------------------

शशिकांत ओक...

मांडणीसमाजआस्वादअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

27 Jan 2021 - 8:57 pm | मुक्त विहारि

जादूगार रघूवीर, उत्तम धनुर्धारी होते.

सुदैवाने, ते प्रयोग मी पाहिले आहेत

शशिकांत ओक's picture

29 Jan 2021 - 10:47 am | शशिकांत ओक

म्हणून ख्यात रघुवीर भोपळे विदेशात फिरून आपल्या कलेला परदेशात सादर केले. तिथल्या प्रवासातील घटना, जंगल सफारी वगैरे पुस्तक रूपाने सादर करून रसिकांची वाहवा मिळवली.
मुक्त विहारी, आपण त्यांचे जादूचे प्रयोग कुठे पाहिलेत?

खूप छान लिहील्या आहेत माधवनगरच्या आठवणी. १९६४-६५-६६ ही तीन वर्षे (सातवी ते नववी) मीही माधवनगरात होतो, पण आता मला त्या काळातील फार कमी गोष्टी आठवतात. रवि भिडे, माधुरी द्रविड, गोक्या, चित्रकार जांभळीकर पंत, शविकु-लीविकु ही भावंडे, 'जाफर जयलाणी मुलाणी' नामक वर्गमित्र, रवि आणि दिग्या जोशी, जप्तीवाले मास्तरांचा 'चुकीची समजूत आहे' हा 'तकिया कलाम' मधु पर्वतेच्या खोलीतुन घुमणारा तबला, आम्हाला चित्रकला शिकवणारे जोशी मास्तर आणि संध्याकाळी त्यांचे म्हशीमागून हिंडणे, रेल्वेलाईनच्या कडेकडेने केलेल्या सायकल सफरी आणि पारंब्यांवर झोके घेणे, तालमीतील डबलबार-सिंगलबार, सांगलीच्या बसस्टँड वर १५ पैश्यात मिळणारी आंबोळी ऊर्फ डोसा ... अश्या काही आठवणी हे वाचताना जागृत झाल्या.

चित्रगुप्त's picture

28 Jan 2021 - 5:39 am | चित्रगुप्त

आज ६० वर्षांनंतर...त्या दोघी बहिणीमुलाबाळांच्या संसारातून दूर, एकत्र रहात आहेत... कालाय तस्मै नमः

हे वाचून या आठवणी काही वर्षांपूर्वी लिहिलेल्या असाव्यात असे वाटले. त्या दोघी कुठे रहायच्या ? मावशी अद्याप हयात आहे का ? 'सुमन मावशी' असे नाव होते का? त्यावरील तुम्ही लिहीलेले 'अपछायिता' पुस्तक प्रकाशित केले गेले का?

शशिकांत ओक's picture

28 Jan 2021 - 1:51 pm | शशिकांत ओक

हे लेखन पुण्यातील माधवनगरकर स्नेहमेळाव्यासाठी ग्रुपवर १० वर्षांपूर्वी सादर केले होते...
तेंव्हा त्या दोघी बहि‍णी पद्मश्री अण्णासाहेब बेहेरे यांच्या खराडी - पुणे- वृद्धाश्रमात राहात होत्या. कालमानानुसार आता त्या निवर्तल्या.
...

तू अन मी अनुभवलेले काही प्रसंग आठवतात...
चांदोबा मासिकातील भयानक दरी दीर्घकथेतील खलनायक 'ब्रह्मदंडी' माधवनगरात आला म्हणून आपण त्याचा गुपचुप घेतलेला मागोवा...!
तात्यासाहेवांच्या मळ्यातील स्वच्छंद विहार...!!

सिरुसेरि's picture

31 Jan 2021 - 6:01 pm | सिरुसेरि

सांगली , माधवनगर परिसरातल्या सुरेख आठवणी .