गँग ऑफ बदलापुर -

Primary tabs

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
20 Jan 2021 - 8:41 pm

"एस पी साहेब, एक विधायक को सरेआम थानेमें थप्पड मारनेके लिये कितना दिन जेल में जाना पडता है?"

काल गॅबावर ४५ ओव्हर्समध्ये १ बाद १०७ अशी परिस्थिती असताना ६ फूट ५ इंच उंचीच्या मिचेल स्टार्कला ३ चेंडूंत १४ धावा चोपतानाचा शुभमन गिलचा उर्मटपणा "गँग्स ऑफ वासेपुर" च्या सरदार खानपेक्षा काही कमी नव्हता. आणि वर "और एसपी साहब हमऊ जाएंगे अबतो अंदर" म्हणणार्‍या असगरच्या स्टाइलमध्ये पुजारानी अजून एक कानफटात मारली.

Gill vs Starc

त्या परिस्थितीत - जेव्हा भारत मॅच वाचवण्याच्या पलिकडे काही करू शकेल हा विचारही कोणाच्या ध्यानीमनी नव्हता - ही आक्रमकता अनपेक्षित होती. पण त्यापेक्षाही जास्त अनपेक्षित होती ती शुभमन गिलची देहबोली. जेलमध्ये शिरता शिरता "विधायक जे पी सिंग को कूट दिये - एसपी आफिसमें" म्हणणार्‍या मनोज वाजपेयी इतक्याच शांतपणे तो १ सिक्स आणि २ चौकार मारल्यावर स्क्वेअरलेगला फिरून आला. हा होता पहिला बदल.

दुसरा प्रसंग - ७० ओव्हर्समध्ये ३ बाद १९५ स्कोअर असताना लॉयनचा एक चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरच्या एका भेगेवर पडून मैलभर वळून डायरेक्ट स्लिप्समध्ये गेला. तेव्हा कॉमेन्टरीला असलेला निक नाईट म्हणाला "Pant will be cautious on the next ball". पण अजित आगरकरला ह्या नव्या भारतीय संघाची मानसिकता बरोब्बर कळाली होती. तो म्हणाला "Knowing Pant I feel he may step out and go over long on". आणि झालंही तेच. पुढे सरसावत पंतनी लॉयन ला लॉन्गऑनच्या वरून फेकून दिला. आणि तेव्हा पहिल्यांदा जाणीव झाली की एखाद दुसरा खेळाडू नाही.... ही सगळी गँगच वेगळी आहे.

Pant

क्रिकेट निर्विवादपणे भारताचा सर्वात लोकप्रिय खेळ. आणि सिनेमा हा सर्वात लोकप्रिय टाईमपास. कित्येक वर्षं ह्या दोन्हीमध्ये त्या त्यावेळेच्या समाजाचं प्रतिबिंब दिसायचं. नंतर नंतर सिनेमाचं Corporatization झालं आणि सिनेमाची सामान्य जनतेच्या इच्छा - आकांक्षा, स्वप्नं, समस्या ह्यांच्याशी असलेली नाळ तुटली. पण खेळांमध्ये पैसा नाही तर Performance बोलतो. आणि म्हणूनच भारतीय संघाच्या attitude मध्ये त्या त्या वेळेच्या भारताचंच चित्र दिसतं.

आधीच्या बुजर्‍या संघांनंतरचा १९७० च्या दशकातला आपली ओळख निर्माण करू बघणारा अजित वाडेकरचा संघ. मग आत्मविश्वास वाढलेले गावसकर - कपिल चे संघ. मग हातात पैसा खेळू लागल्यावर गोंधळलेला आणि थोडा भरकटलेला अझरचा संघ. महिन्याच्या शेवटी वाचलेले पैसे डोळे मिटून बँकेत किंवा पोस्टात टाकणार्‍या, त्यानंतर पुढे जाऊन LIC आणि इंदिरा विकास पत्र घेणार्‍या आणि मग १९९० आलं तसं पहिल्यांदाच शेअर्समध्ये पैसे गुंतवणार्‍या सामान्य मध्यमवर्गीय भारतीय मानसिकतेचंच दर्शन ह्या संघांत घडत होतं.

२००० च्या दशकातला भारत आणि भारतीय क्रिकेट संघही आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी धडपडत होता. त्यातच क्रिकेटचंही Corporatization झालं आणि खेळातल्या सृजनाला व्यावसायिकतेची जोड मिळाली की काय घडू शकतं हे दिसू लागलं. एकीकडे विशेषतः आयटी सारख्या क्षेत्रात भारतीय उद्योग आपलं अस्तित्व निर्माण करत असताच सौरव गांगुलीने एखाद्या बिझनेसमननी धडा घ्यावा अशी संघबांधणी सुरू केली. सचिन आऊट झाल्यावर टीव्ही बंद करायच्या सवयीतून आपल्याला बाहेर काढलं ते दादानी. आपला नेता नुसतं "पाठीवर हात ठेऊन लढ म्हणाला" की पोरं काय पराक्रम गाजवू शकतात ह्याची अनेक उदाहरणं बघायला मिळाली. टेस्टमध्ये ओपनिंगला पाठवलेला सेहवाग असो, ३ नंबरला प्रमोट केलेला धोनी असो किंवा "अब इज्जत तुम्हारे हाथमें है" म्हटल्यावर हातात नि:स्वार्थीपणे विकेटकीपिंगचे ग्लव्हज चढवणारा द्रविड असो. हरभजन, युवराज, कैफ, रैना, इरफान, झहीर, नेहरा, इशांत - दादानी मजबूत इमारत घडवायला घेतली होती. आणि ह्या इमारतीचे दगड मुंबई, दिल्ली बेंगलोरचेच नव्हे तर नजफगढ, जालंधर, रांची, श्रीरामपुर, बडोदा, लखनौ, मीरठ इथल्या खाणींतले होते. सचिनच्या खांद्यांवरचा भार हलका केला तो ह्या लोकांनी.

२००० चं दशक संपता संपता भारतीय कंपन्या जागतिक स्पर्धेला टक्कर देत होत्या - जगात नाव कमवायला लागल्या होत्या. २००८ साली आयपीएल चा वार्षिकोत्सव सुरू झाला आणि आपल्या छोट्या शहरांतल्या आणि गावातल्या रक्ताचं पाणी करणार्‍या क्रिकेटपटूंना देशातल्याच नव्हे तर जगातल्या सर्वोत्तम क्रिकेटपटूंच्या खांद्याला खांदा लावून खेळण्याची संधी मिळाली. आणि हळू हळू नजरेला नजर भिडवण्याचीही हिंमत आली. दादाच्या शेवटच्या कसोटीत त्याला नेतृत्व करायला लावणारा धोनी आणि धोनीच्या शेवटच्या सामन्यानंतर "You will always be my captain" म्हणणारा कोहली ह्यांनी दादाची मशाल योग्य हाती गेल्याची ग्वाही दिली.

गेल्या काही वर्षांपासून भारतात स्टार्ट-अप संस्कृती रुजायला लागली. नवीन विचार, नवी स्वप्नं, नव्या कल्पना साकारताना देखील सुरुवातीला धाकधूक होतीच की. पण हळू हळू उद्योगांचा आत्मविश्वासही वाढला, इतरांवर अवलंबून राहण्यापेक्षा ही तरुण पिढी "लाथ मारीन तिथे पाणी काढीन" अश्या मानसिकतेनी काम करायला लागली. आणि सर्वांत जास्त महत्वाचं म्हणजे अपयशाची भीती नाहीशी झाली. No risk no reward हे सूत्र ह्या पिढीने परफेक्ट ओळखलं. यशस्वी होण्यासाठी तुमच्यामागे दरवेळी कोणाची पुण्याई असण्याची गरज नाही हे ही त्यांना कळालं आणि यश हे फक्त मोठ्या शहरांमध्ये नाही हे ही. ह्या पिढीला संधीचं सोनं कसं करायच हे पक्कं ठाऊक आहे.

काल गॅबावर आपल्या पूर्ण शक्तिनिशी उतरलेल्या एकेकाळच्या जगज्जेत्या ऑस्ट्रेलियन संघाला त्यांच्याच घरात घुसून धूळ चारणार्‍या आमच्या नवख्या संघात हीच मनोवृत्ती दिसली. जवळपास पूर्ण पहिली फळी नसताना ह्या पोरांनी गेली कित्येक वर्ष क्रिकेटजगतावर अधिराज्य गाजवणार्‍या, मुत्सद्देगिरीत मुरलेल्या ऑस्ट्रेलियन्सना वेडानी झपाटून जाऊन, out of their skins खेळून नव्हे तर अतिशय थंडपणे, calculated risks घेत, प्रतिस्पर्धी टाकत असलेल्या दबावाला न जुमानता अत्यंत व्यावसायिक पद्धतीने हरवलं.

आणि ही पोरं कोण?

पंजाबातल्या फझिलकाचा शुभमन, राजकोटचा पुजारा, हैदराबादच्या रिक्षावाल्याचा मुलगा सिराज, सेलमचा थंगरसू नटराजन, हरिद्वारचा ऋषभ पंत, चेन्नईचा वॉशिन्ग्टन सुंदर, कर्नालचा नवदीप सैनी, पालघरचा शार्दुल ठाकुर, काकीनाडाचा हनुमा विहारी. अक्षरशः भारताच्या कानाकोपर्‍यातून आलेले हे सळसळत्या रक्ताचे तरुण. अ‍ॅडलेडमध्ये ३६ धावांत उखडले गेल्यावर आपल्या धीरोदात्त कर्णधारामागे खंबीरपणे उभी राहणारी पोरं. सीनियर खेळाडू नसताना कमालीची परिपक्वता दाखवत आपल्या खांद्यावर जबाबदारी घेणारी पोरं. फास्ट बोलर्सचे घाव छातीवर झेलणारी पोरं, ऑस्ट्रेलियन खेळाडूच नाही, तर मीडिया आणि माजी खेळाडूंची तोंडं आपल्या बॅट - बॉलनी बंद करणारी पोरं. आणि हो - इतक्या अभूतपूर्व विजयाच्या उन्मादात वाहावत न जाता नेथन लॉयनला शंभराव्या कसोटीनिमित्त संस्मरणीय भेट देण्याची दिलेरी दाखवणारी पोरं.

Winners

आणि ह्यावरही कडी आहेच. इतका पराक्रम गाजवूनही ही पोरं टीममधली आपली जागा गृहित धरू शकत नाहीत. कारण इकडे मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये कितीतरी नव्या पोरांनी दरवाज्यावर थाप मारायला सुरुवात केली आहे. Welcome to new India. येणारी काही वर्षं तरी भारतीय क्रिकेटसाठी खूप आशादायक दिसत आहेत हे नक्की.

ऑस्ट्रेलिया झालं डेस्टिनेशन बदलापुर. ऑस्ट्रेलियन्सच्या वर्षानुवर्षाच्या वर्चस्वाचा बदला आणि भारतीय क्रिकेटमधला "बदल" अश्या दोन्ही अर्थानी.

सौरव गांगुलीसारखा नेता बीसीसीआयचा अध्यक्ष असताना आणि साक्षात द्रविड गुरुजींचे आशीर्वाद पाठीशी असताना ही पोरं भारतीय क्रिकेटमध्ये नवे पराक्रम घडवत राहोत आणि ही "गॅग ऑफ बदलापूर" अशीच प्रगती करो हीच सदिच्छा!

जे.पी.मॉर्गन

क्रीडाप्रकटनसद्भावनाअभिनंदनआस्वादलेख

प्रतिक्रिया

अक्षय देपोलकर's picture

20 Jan 2021 - 10:10 pm | अक्षय देपोलकर

मस्त लेख..
आढावा चांगला घेतलाय..

राघवेंद्र's picture

20 Jan 2021 - 10:16 pm | राघवेंद्र

खूप दिवसानी एक मस्त क्रिकेटची मालिका आणि त्यावरचा खुमासदार लेख

श्रीगुरुजी's picture

20 Jan 2021 - 10:29 pm | श्रीगुरुजी

मस्त लेख. छान लिहिलंय.

बांवरे's picture

20 Jan 2021 - 10:37 pm | बांवरे

व्वा जेपी !!!
खूप दिवसांनी चांगली मालिका आणि त्यावरचे तुमचे भाष्य वाचायला मिळाले.
यथायोग्य वर्णन !

तुमच्या लेखाची वाटच बघत होतो पण थोडक्यात आटपलात.
अजून एक भाग येऊ दे.
द्वारकानाथ संझगिरी यांचे पोस्ट पण व्हाट्सएपवर जोरात फिरतायत आणि मस्तच आहेत.
ते इथे चिकटवतो

मुंग्यांनी मेरू पर्वत गिळला.

द्वारकानाथ संझगिरी.

डोळे आनंदाश्रूने डबडबलेले आहेत. एका डोळ्यात आनंद ओसंडून वाहतोय. दुसऱ्या डोळ्यात बसलेला सुखद धक्का आहे. मध्येच चिमटा काढून मी मनाला विचारतोय, 'आपण कसोटी सामना जिंकला?' नुसती मॅच ड्रॉ झाली असती, तरी नाचलो असतो.
आंधळा मागतो एक डोळा, देवाने तीन डोळे दिले.
लहानपणी एक अतिशयोक्ती अलंकार मी निबंधात वापरत असे - " मुंग्यांनी मेरू पर्वत तर गिळला नाही ना?"
आज मला खरंच वाटलं 'मुंग्यांनी मेरू पर्वत गिळला.'

माझ्या आयुष्यात, भारतीय क्रिकेटपटू लिहीत असलेली अनेक सोनेरी पानं पाहाण्याचा किंवा ऐकण्याचा योग आला. मग तो इंग्लंडमधला १९७१ चा विजय असो, किंवा १९८३ चं ते वर्ल्डकप जिंकणं, किंवा मग पाकिस्तानात पाकिस्तनाला हरवणं, तो वेस्टइंडिज मधला 400 धावांचा पाठलाग . कितीतरी!पण आजचा विजय सुद्धा त्याच दर्जाचा होता. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या विजयाने सर्वबाद ३६ धावांच्या राखेतून जन्म घेतलाय. विजयाचं बाळ रांगता रांगता एका मागोमाग एक संकटं कोसळत गेली. या संघाकडे टायटॅनिकचं वैभव कधीच नव्हतं. पण सर्वबाद ३६ नंतर भारतीय संघाकडे कुणी शिडाची बोट म्हणून सुद्धा बघत नव्हतं. आणि तरीही ती प्रत्येक वादळात तरली. किनाऱ्याला लागली. तेव्हा त्या अजस्र लाटांचं संगीत कानाला अधिक गोड वाटायला लागलं. वास्को दि गामाचं धैर्य आणि चिकाटी या भारतीय संघाने दाखवली.

मागे वळून पाहताना आपल्याला असं लक्षात येतं की, या कसोटीत नव्या संघाचंच उदघाटन कर्णधार राहणेने केलं होतं. जवळपास फिट असलेले ११ जणं खेळले आणि त्याला आपण संघ म्हटला. गोलंदाजांच्या बाबतीत तर इतका अननुभवी संघ १९३२ सालानंतर झाला नसेल. १९३२ साली आपण पहिला कसोटी सामना खेळलो त्यावेळेस सर्वच अननुभवी होते. भारतीय संघात अनुभवापेक्षा जिद्दी तरुण अधिक होते. त्यांच्या गुणवत्तेची पूर्ण कसोटी नीट झालेलीच नव्हती. त्यांची मानसिक ताकद सुद्धा फारशी जोखली गेलेली नव्हती. पण या संघाने आपल्या सर्व अपेक्षांच्या मर्यादा पार ओलांडल्या. आणि ते खूप पुढे पुढे गेले. प्रत्येक पावलावर त्यांनी आपल्याला एक विलक्षण आनंद वाटला.

या मॅचचा विचार केला तर काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात.
भारतीय संघ ५ गोलंदाजांने खेळला. आणि ते योग्यच झालं. कारण पाचही गोलंदाजांचा कसोटी अनुभव हा जेमतेम ४ कसोटीचा होता. त्यामुळे नुसत्या ४ गोलंदाजांवर खेळून काही होणार नव्हतं. आणि पाचवा गोलंदाज घेतला गेला. ते सर्वच जवळपास नवे कोरे होते. एक दोनच एकदाच घडी उघडलेल्या कपड्यांसारखे!. त्यांनी या कसोटीत ऑस्ट्रेलियाचे २० बळी घेतले. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया कधी डाव घोषित करणार यावर चर्चा होत होती. भारतीय गोलंदाजांना ती चर्चा झोंबली असली पाहिजे. त्यांनी सरळ ऑस्ट्रेलियन संघाला धूळ चारत ऑलआऊट केलं.

शेवटच्या दिवशी 328 धावांचा पाठलाग करताना, सामना नुसता अनिर्णित झाला असता ना तरी आपण गावस्कर-बॉर्डर ट्रॉफी घेऊन घरी गेलो असतो. माझ्या लहानपणी १० पैकी १० भारतीय संघांनी ही मॅच ड्रॉ करून शॅम्पेन उघडली असती. ही दादागिरी, रिची बेनाॅ , क्लlईव्ह लाॅईड किंवा स्टीव्ह वाॅ च्या संघाने दाखवली असती .
समोर आव्हान काही सोपं नव्हतं. गोलंदाजी दर्जेदार होती. खेळपट्टी वारंवार खोड्या काढत होती. मध्येच चेंडू उसळायचा, मध्येच तो खाली जायचा. नॅथन लायनचा चेंडू हातभर वळायचा. तर कधी सरळ जायचा. नॅथन लायनचा चेंडू एकदा तर विकेटकिपरला चुकवून थेट स्लिपमध्ये गेला. पण महत्त्वाची गोष्ट अशी होती की, अशा खेळपट्टीवर आणि दर्जेदार गोलंदाजीसमोर सुद्धा आपल्या संघाची जिंकण्याची जिद्द कधी कमी झाली नाही. स्लिपमध्ये गेलेल्या त्या चेंडूनंतर पुढे सरसावत रिषभ पंतने नॅथन लायनला षटकार ठोकला. 'आज मी दादा आहे' हे त्याला दाखवायचे होते .मला सलीम दुराणी आठवला . तो चूक करून जर बाद झाला असता तर आपण त्याचे वाभाडे काढले असते. पण यश बऱ्याचदा अशाच जोखमीतून जन्म घेतं.

ही पाखराची ज्योतीवर उडी होती. पण इथे ज्योत विझली. पाखरू जिवंत राहिलं. या पाठलागामागे एक आखणी होती. भारतीय संघ जिंकू शकतो हा भुंगा ऑस्ट्रेलियन कर्णधाराच्या कानाभोवती घोंघावणार हे भारतीय संघाने पाहिलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियन कर्णधार फार आक्रमक क्षेत्ररचना करू शकला नाही. शुभमन गिलने ९१ धावांची खेळी करून विजयाच्या ताजमहालाची बैठक तयार केली. पंत मुळे त्याचं कौतुक कमी झालं.नेहमीच शिखर पटकन दिसत. लंच नंतर रहाणेने स्वतःकडे आक्रमक भूमिका घेतली. पुजाराला त्याने तंबू ठोकायला लावला. रहाणे मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. त्यावेळेला मला ते बाद होणं फारसं आवडलं नाही. कारण अशा खेळपट्टीवर अप्पर कट हा सेफ फटका कधीच नसतो. पण त्यामागे त्याच्या भावना वेगळ्या होत्या. विजयाकडे जायची त्याने वृत्ती दाखवली होती. आणि त्यांनतर येऊन पंतची बॅट नेमकी तीच भावना वारंवार बोलायला लागली. पंतच्या रक्तात बचावात्मक पेशी फार कमी असल्या तरी त्यांच्यावर त्याने ह्या वेळी थोडंफार काम सोपवलं. पण कधी संधी उत्पन्न करताना त्याच्या त्या आक्रमक पेशी उसळायच्या. अशा फलंदाजांना नेहमीच सुदैवाचा पांढरा घोडा मिळतो. कारण दैवाला ठाऊक असतं की, हा परिकथेतला राजपुत्र आहे. आणि त्याला राजकन्या जिंकायची आहे.
पण तितकीच महत्त्वाची भूमिका ही पुजाराची होती. आणि ती त्याने एखाद्या अशोक कुमार सारख्या बुजुर्ग नटाप्रमाणे अत्यंत सुंदरपणे रंगवली. ऑस्ट्रेलियाला ठाऊक होतं की पुजारा हा दीपस्तंभ आहे. त्याला एक बाजू लावून धरायची आहे तरच इतर फटकेबाज फलंदाजांना आक्रमण करायची संधी मिळू शकेल आणि विजयाकडे भारताला जाता येईल. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनाही पुजाराची विकेट मिळवण्यासाठी त्याच्यावर बाउन्सरचा मारा केला. बरेच चेंडू त्याला अंगावर घ्यावे लागले. काही चेंडू त्याने सोडले. चेंडू अंगावर घेणे हे काही तंत्राच्या दृष्टीने फार चांगलं लक्षण नाहीय. पण सर्वजण सुनील गावस्कर नसतात. काही जणांकडे तितकं अचूक तंत्र नसतं. पण यातून दिसते ती हिंमत.1976 साली गायकवाड अणि मोहिंदर अमरनाथने ती वेस्ट इंडीज मध्ये दाखवली होती.पुजारा चेंडूच्या डागाने काळा निळा झाला असेल पण त्याने तिथे दीर्घकाळ उभं राहण्याचा प्रयत्न केला.ते काळे निळे डाग ही लढाऊ वृत्तीची मेडल्स होती.
ऑस्ट्रेलियाला आधी नॅथन लायन जिंकून देईल असं वाटत होतं. पण पुजारा - पंत यांनी बचाव आणि आक्रमणाचा सुरेख संगम आपल्या खेळात दाखवला आणि ते मनसुबे हाणून पाडले. त्याचबरोबर डाव्या, उजव्या हाताच्या फलंदाजांमुळे त्याला वांरवार चेंडूची दिशा बदलावी लागली. नंतर त्यांची मदार होती नव्या चेंडूवर. नव्या चेंडूवर त्यांना पुजाराची विकेट सुद्धा मिळाली. ती षटकं या मॅचच्या दृष्टीने फार महत्त्वाची होती. पॅट कमिन्सची गोलंदाजी सर्वात जास्त धोकादायक वाटत होती. त्याने पंतसाठी तीन स्लिप, गली लावले. आणि चेंडूचा टप्पा खोलवर ठेवला. डावपेच चुकीचा नव्हता. पंत ड्राईव्ह करताना स्लिपमध्ये झेल देईल ही त्यांची अपेक्षा होती. कदाचित ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजानी चेंडू जास्तच खोलवर टाकले. आणि त्यामुळे पंतला ड्राईव्हज् करायला सुवर्ण संधी मिळाली. ती त्याने सोडली नाही. त्याने अप्रतिम कव्हर ड्राईव्हज् आणि ऑफ ड्राईव्हज् मारले. हे पंतचे जे आव्हान स्वीकारणं होतं ना, ते मला आवडलं. आणि तिथे पुन्हा त्याने एक गोष्ट सिद्ध केली, आम्ही मॅच जिंकायला आलेले आहोत. आम्हाला मॅच ड्रॉ करायची नाहीये. तेव्हा ऑस्ट्रेलियन संघाची जिद्द हरवली. त्यांच्या हातून चुका व्हायला लागल्या. पंतला साथ वॉशिंग्टन सुंदरने दिली. वॉशिंग्टन सुंदर अशी बॅटिंग करत होता की, कमीत कमी १० कसोटी सामने त्याच्या खिशात आहेत आणि तो ११ वा खेळतोय. अमेरिकेतलं वॉशिंग्टन डीसी सध्या कडेकोट बंदोबस्तात आहे. या वॉशिंग्टन सुंदरने इथे गब्बावर स्वतःच्या विकेटभोवती कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. आणि मधूनच त्याने जो एक हूकवर षटकार लगावला त्यामुळे ऑस्ट्रेलियाचं अवसान गळलं मग स्लिपच्या डोक्यावरून चौकार आला.. तिथून ही मॅच टीट्वेन्टी व्हायला लागली. आणि भारतीय संघाने डोकं थोडं शांत ठेवलं तर आरामात जिंकणार असं वाटत होतं. आणि अचानक वॉशिंग्टन सुंदर रिव्हर्स स्वीप मारायला गेला. खरं तर त्याची काही गरजच नव्हती. कारण अपेक्षित रनरेट आपल्या खिशातच होता. पण त्याला ती आपली चूक उमगली सुद्धा. कितीतरी वेळ तो खेळपट्टीवर उभा होता. आणि निघाला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर उद्ध्वस्त हिरोशिमाचे भाव होते.
त्यानंतर 'खास प्रयत्न 'केले असते तरच भारतीय संघ हरला असता. गंमत पहा ही मॅच कसोटी म्हणून खेळली गेली. नंतर तिची वनडे झाली. आणि शेवटी शेवटी टीट्वेन्टी झाली. तिन्ही प्रकारची फलंदाजी यात पाहायला मिळाली. पुजाराने कसोटीत कशी बॅटिंग करावी याचं प्रात्यक्षित दाखवलं. गिलने कसोटीत खेळताना वनडेचा कसा उपयोग होतो हे पण दाखवलं. आणि पंतने तर वनडे आणि टीट्वेन्टी या दोन्ही फॉरमॅटचा टेस्टमध्ये कसा उपयोग करायचा याचं प्रात्यक्षिक दाखवलं. आणि भारतीय संघ सामना जिंकला.

मला सर्वात महत्त्वाची गोष्ट जी जाणवते ती या नव्या खेळाडूंचा पेशन्स त्यांची जिद्द, त्यांचा निर्धार आणि त्याच्यासाठी त्यांचं कौतुक किती करावं ते कमीच आहे. एका बाबतीत मी अजिंक्य रहाणेचं कौतुक करीन की, अजिंक्य रहाणेने त्या सर्वांना प्रचंड कॉन्फिडन्स दिला. अजिंक्य रहाणे असा माणूस आहे की, ज्याच्याकडे कुठलाही नवखा फलदांज जाऊन आपलं मन व्यक्त करतो. काही काही गोष्टींना उत्तरच नाही. म्हणजे आता साधं उदाहरण जर घ्यायचं झालं तर, शार्दूल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर हे किती आंतरराष्ट्रीय सामने खेळलेत? काहीही नाही. त्यांना नेटमध्ये सुद्धा नीट बॅटिंग करायला मिळत नसेल. कारण नेटमध्ये नेहमीच वरच्या फलंदाजांना बॅटिंग करायला मिळते. तरी पहिल्या डावात त्यांनी अशी भागीदारी केली की, ती धावांच्या तराजूत तोलताच येत नाही. ती सोन्यामध्येच तोलली पाहिजे. आपलं या मॅचमध्ये आव्हान टिकलं हे केवळ त्याच भागीदारीमुळे टिकलं. त्या दोघांकडे विशेषतः शार्दूल ठाकूरकडे पाहिल्यानंतर आपल्यातला फलंदाज तो विसरलाय की काय? असं मला वाटायला लागलं. त्याने त्याच्यातल्या फलंदाजाला पुढे प्रत्येक वेळी कानाला धरून बाहेर काढायला पाहिजे.

एक विचार करा अख्या भारतीय गोलंदाजीचा अनुभव होता ४ कसोटीचा आणि तरीही त्यांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजीला दोनदा बाद केलं. मला एक गोष्ट मान्य आहे, गेल्या तीन वर्षातली ही अशक्त ऑस्ट्रेलियन फलंदाजी आहे, अशी ऑस्ट्रेलियन फलंदाजी मी माझ्या आयुष्यात कधी पाहिलेली नाही. तरी सुद्धा आपल्या गोलंदाजांचं कौतुक कमी होत नाही. कारण त्यांच्याकडे तरी कुठे अनुभव होता?. मी तुलना करत नाही पण माझ्या लाडक्या इतिहासात शिरतो. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या समोर केवढं प्रचंड आव्हान होतं. एका बाजूला आदिलशाही होती, दुसऱ्या बाजूला मोगल होते. शिवाजी महाराजांनी सामान्य माणसातून, मावळ्यांमधून सैन्य उभं केलं. ते मावळे बघता बघता भाले झाले. भारतीय संघाच्या बाबतीतही तेच झालं. हे खेळाडू बघता बघता भाले झाले. आणि त्या तीक्ष्ण भाल्यांनीऑस्ट्रेलियन संघ कोसळला. भारतीय संघाने आग्र्याहून नुसती सुटका नाही केली, तर भारतीय संघ आग्रा जिंकूनच परतला.
म्हणुनच म्हणतो मुंग्यांनी मेरू पर्वत गिळला.

बोका's picture

20 Jan 2021 - 10:54 pm | बोका

मस्त लेख, आवडला !

श्रीगुरुजी's picture

20 Jan 2021 - 10:59 pm | श्रीगुरुजी

कोहली, राहुल, अश्विन, जडेजा, ईशांत शर्मा, भुवनेश्वर, बुमराह, शमी व उमेश यादव हे भारताचे ९ प्रमुख खेळाडू चौथ्या कसोटी संघात नव्हते. शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर, सैनी, सिराज, ठाकूर व नटराजन हे ११ पैकी ६ खेळाडू एकत्रित एकूण फक्त ६ कसोटी सामने खेळले होते. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ प्रमुख खेळाडू घेऊन सामन्यात होता. तरीसुद्धा भारताने सामना जिंकला. भारताचे राखीव खेळाडू इतके जबरदस्त कामगिरी करताना बहुधा पहिल्यांदाच दिसले असावे.

यापूर्वी २००१ मध्ये भारतात इंग्लंडविरूद्ध कसोटी मालिकेत झहीर, नेहरा, श्रीनाथ वगैरे प्रमुख मध्यमगती गोलंदाज जायबंदी असताना एकाच सामन्यात टिनू योहानन, इक्बाल सिद्दीकी व संजय बांगर या तीन मध्यमगती गोलंदाजांनी पदार्पण केले होते. या मालिकेत शुभमन गिल, सिराज, नटराजन, सुंदर, सैनी या पाच खेळाडूंनी पदार्पण केले.

बेहद फिदा झालो तुमच्या लेखावर, वाह वाह वाह.

कपिलमुनी's picture

21 Jan 2021 - 3:00 am | कपिलमुनी

सर जडेजा चे नाव चुकून राहिले वाटतं !

श्रीरंग_जोशी's picture

21 Jan 2021 - 4:33 am | श्रीरंग_जोशी

लेख आवडला, गँग्ज ऑफ वासेपूर अन बदलापूर चित्रपट पाहिले नसल्याने संदर्भ फारसे कळले नाहीत.

बादवे कर्णधार अजिंक्य रहाणेचे नाव लेखात नसल्याने आश्चर्य वाटले.

ज्ञानोबाचे पैजार's picture

21 Jan 2021 - 10:34 am | ज्ञानोबाचे पैजार

आणि तो लिहिलाही आहे तेवढ्यात प्रेमाने आणि आपुलकीने.
सौंदाळा यांनी चिकटवलेला संझगिरींचा लेखही तेवढाच आवडला.
पैजारबुवा,

साहना's picture

21 Jan 2021 - 12:03 pm | साहना

क्रिकेटचे ज्ञान नाही पण उत्कृष्ट लेख आहे. IPL ने भारतीय क्रिकेट आणि सर्वच क्रीडाक्षेत्राचे चित्र पालटले आहे. पूर्वी गांगुली किंवा द्रविड सारखी पोरे सरळ बेंगलोर कोलकातातील सध्या खेळपट्टीवरून सरळ इंग्लंड च्या लॉर्ड्स वर इंग्लंड च्या भेदक गोलंदाजीचा सामना करायची. पैसा वगैरे ह्यांनी पहिला सुद्धा नव्हता मग विनोद कांबळी सारखे अत्यंत गुणवान खेळाडू भरकटयाचे.

पण शार्दूल असो वा वॉशिंग्टन सुंदर, पैसा आणि प्रसिद्धीची सवय आहे तसेच जागतिक दर्जाची गोलंदाजी सुद्धा खेळण्याची क्षमता IPL द्वारे निर्माण झाली आहे. अनेक क्रीडापटू जखमी आहेत हे ऐकून अत्यंत आश्चर्य वाटले. फिटनेस खरेतर वाढायला पाहिजे होते.

ह्याशिवाय राहुल द्रविड ह्यांना ह्या विजयाचे बरेच श्रेय जाते युवा क्रिकेटपटूंना ह्यांनी मार्गदर्शन बऱ्यापैकी केले आहे.

येत्या २० वर्षांत भारत देश क्रिकेट मधील अद्वितीय असा बलाढ्य देश असणार आहे. दुःख फक्त एका गोष्टीचे वाटते कि ICC ने क्रिकेट खेळाला इतर देशांत लोकप्रियता मिळवण्याच्या दृष्टीने काहीही विशेष काम केले नाही. अफगाणिस्तान, अमेरिका, कॅनडा इत्यादी देशांत क्रिकेटचे वेड भारी आहे तिथे खरे तर त्यांनी पैसे ओतून क्रिकेट ची लोकप्रियता वाढवायला पाहिजे होती.

BCCI ची व्यावसायिकता सुद्धा थोडी मागे पडत आहे असे वाटते. सामान्याशिवाय आणि IPL शिवाय मर्चन्डाईस, action फिगर्स, थीम पार्क्स, कॉर्पोरेट इव्हेंट्स, व्हिडीओ गेम्स, अप्प्स, इत्यादी क्षेत्रांचे व्यावसायिकरण अजून केले गेले नाही.

टीप : जगमोहन दालमियांनी ह्या व्यवसायीकरणाचा पाया रचला, शरद पवार ह्यांनी त्याला खूप हातभार लावला आणि श्रीनिवासन ह्यांनी त्यावर कदाचित कळस चढवला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

राघव's picture

21 Jan 2021 - 12:24 pm | राघव

लेख आवडला. वेगळा दृष्टीकोन छान मांडलात!
तसेच संझगिरींचा लेखही सुंदर. धन्यवाद!
जिंकलेली पूर्ण मॅच बॉल-टू-बॉल बघूनसुद्धा आढावा घेणारे लेख खूप आनंद देतात. त्यात जेपींसारखे दर्जेदार लिहिणारे असतील तर क्या कहने!

जाता जाता: अजिंक्य रहाणेचे खास कौतुक करणे अगत्याचे आहे हे मात्र अगदी खरे.

मुक्त विहारि's picture

21 Jan 2021 - 12:37 pm | मुक्त विहारि

अजून एक जाणवलेली गोष्ट म्हणजे, अंडर 19 Cricket World Cup...

विशेषतः, ह्या Under 19, मधले बरेच खेळाडू, आता IPL मध्ये येतात.

गिल, पृथ्वी शाॅ, पंत, वाॅशींग्टन सुंदर, हे पण Under 19, मध्ये खेळले होते .

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Jan 2021 - 1:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखन आवडलं. लेखनातील भावना अतिशय उत्तम. आपण नेहमीचं हटके लेखन केलं आहे. धंस. खेळाडू कोण आहेत, कोण गोलंदाजी करतो. हा कोण आहे ? अशी ओळख परेड करायला लावणारा सध्याच्या भारतीय संघ. ३६ धावात गुंडाळले गेल्यावर, ही जखम अजून किती वर्ष भळभळत राहणार असे वाटत होते. आणि चमत्कार झाला...

सर्व नवोदित खेळाडू. तरी या संघाने एकदिवशीय, ट्वेंटी ट्वेंटीचा आनन्द आनंद, या कसोटी सामन्यांनी दिला. एकेक चेंडू , एकेक धाव, एकेक फलंदाज आणि हृदयाची धड़धड वाढवणारे सामने कायम मेंदूत रेकॉर्ड झाले. देहभान हरपून जाणे म्हणतात तो आनंद या काही दिवासातल्या क्रिकेटने दिला.

-दिलीप बिरुटे

कुमार१'s picture

21 Jan 2021 - 2:09 pm | कुमार१

मस्त लेख, आवडला !

खेडूत's picture

21 Jan 2021 - 3:07 pm | खेडूत

आवडला.
जिगरबाज भारतीय संघाचे अभिनंदन!
या निमित्ताने ज्येष्ठ खेळाडूंना योग्य संदेश गेला असेल हा आणखी एक फायदा.

मुक्त विहारि's picture

21 Jan 2021 - 4:19 pm | मुक्त विहारि

हो ना ....

चौथा कोनाडा's picture

21 Jan 2021 - 4:55 pm | चौथा कोनाडा

खुमासदार लेख लेख आवडला !

फारएन्ड's picture

21 Jan 2021 - 9:40 pm | फारएन्ड

अतिशय सुंदर आढावा! गेल्या काही दशकातील क्रिकेटचा प्रवास व भारतातील आर्थिक्/सामाजिक बदलाचे त्यात पडलेले प्रतिबिंब बरोब्बर जमले आहे.

सचिनने या सामन्याचे वर्णन "Every session produced a new hero!" असे चपखल केले. या सिरीज मधे इतक्या विविध लोकांनी कामगिरी केली आहे! त्यांची गावे वरती लेखात वाचली त्यावरून नकाशावर प्रत्येकाच्या गावावर एक पिन ठेवली तर भारतभर पिना दिसतील. पहिल्याच मॅच मधे खेळणारा वॉशिंग्टन सुंदर दुसरीकडून शार्दूल ठाकूर आउट झाल्यावर उरलेल्या "शेपटा" ला सांभाळत, स्ट्राइक स्वतःकडे ठेवत सिनीयर बॅट्समन सारखा खेळताना पाहिला तेव्हाच हे पाणी वेगळे आहे लक्षात आले. पहिल्या डावात लायन ला व दुसर्‍या डावात कमिन्सला त्याने मारलेल्या सिक्सेस अफलातून होत्या.

टोटल रिस्पेक्ट!

तुषार काळभोर's picture

22 Jan 2021 - 8:03 am | तुषार काळभोर

आदरणीय प्रा डॉ साहेबांनी म्हटल्याप्रमाणे ३६ आकड्याची जखम २००७ एकदिवसीय वर्ल्ड कप मधल्या बांगला देशाकडून झालेल्या पराभवासारखी कायम भळभळत राहणार यात शंका नव्हती. पण २००७ मध्ये त्यानंतर काही दिवसातच एका नव्या कर्णधाराने नव्या जोषाच्या तरुण रक्ताच्या खेळाडूंना घेऊन टी २० वर्ल्ड कप जिंकून दिला.

त्याही आधी २००१ मध्ये, मॅच फिक्सिंग च्या वादळानंतर, मुंबईत पहिला सामना तीन दिवसांत गमावल्या नंतर नव्या जुन्या (त्यातला एक होता नुकताच मिसरूड फुटलेला एक सरदार) खेळाडूंना लढायला लावून स्टीव्ह वॉ ची फ्रंटीयर रोखली होती. आणि नंतर जिंकली होती.

२००२ मध्ये NatWest अंतिम सामन्यात लॉर्ड्स वर गांगुलीने अंगातला शर्ट काढून फडकवला होता तेव्हा त्याच्या ओठांच्या हालचाली पाहा.. तो सामना जिंकून देणारे युवराज - कैफ किती वर्षांचे होते.

परत तेच झालं.
३६ ही राख होती तर शेवटचा विजय म्हणजे भारतीय फिनिक्सचं उड्डाण होतं.

१९९६ शारजा, २००१ कोलकाता, २००२ लॉर्ड्स यांच्यासारखा हा सामना आयुष्यभर लक्षात राहील.

श्रीरंग_जोशी's picture

22 Jan 2021 - 10:27 am | श्रीरंग_जोशी

१९९६ शारजा की १९९८ शारजा? -
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सचिनची पाठोपाठ दोन शतके व मालिका जिंकणे प्रत्येक भारतीय क्रिकेटप्रेमीसाठी अविस्मरणीय आहे.

बादवे १९९६च्या शारजा दौर्‍यातही प्रथमच भारतीय संघाने एक दिवसीय सामन्यात ३०० धावांचा टप्पा पार केला होता.

तुषार काळभोर's picture

22 Jan 2021 - 6:13 pm | तुषार काळभोर

डेझर्ट स्टॉर्म

श्रीगुरुजी's picture

22 Jan 2021 - 9:44 am | श्रीगुरुजी

२००७ ची जखम भळभळत राहणार कारण तुलनेने अतिसामान्य संघाकडून पराभव झाला होता व त्या पराभवामुळे पुढील फेरीचे दार बंद होऊन घरी परतावे लागले होते.

त्या तुलनेत ३६ धावांच्या जखमेचे दु:ख अल्पकालीन आहे कारण हा नीचांक परदेशात व तगड्या गोलंदाजांसमोर झाला होता आणि त्यामुळे मालिका हरली नव्हती किंवा मालिका जिंकण्याची/अनिर्णित ठेवण्याची संधी संपली नव्हती.

मित्रहो's picture

22 Jan 2021 - 1:10 pm | मित्रहो

या विजयानंतर मी इतका खूष आहे की यावर काहीही लिहिले तरी आवडते हा तर नितांत सुंदर लेख आहे त्यामुळे प्रचंड आवडला आहे. दिल खूष केला तुम्ही.
गाबावर शेवटल्या दिवशी ३२८ धावा काढून मॅच जिंकायचा प्रयत्न करायचा नसतो तर विकेट वाचवून सामना अनिर्णीत राखता आला तरी खूप झाले. तेवढे करुनही बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सु्द्धा मिळेल. जिंकण्याच्या प्रयत्नात हार नको. से जर कुणी या नवीन खेळाडूंना सांगितले तर ते म्हणतील हॅ हम नही मानते, ३०० धावा तर काढायच्या आहे आणि पूर्ण दिवस आहे. सिडनीत जर शुभमन, अजिंक्य किंवा ऋषभ पंत यापैकी एकाला जरी एक तास अधिक मिळाला असता तर कदाचित तो सामना सुद्धा भारताने जिंकला असता.

डोंबिविलीच्या अजिंक्य रहाणेचे योगदान पण खूप मोठे आहे, त्याचे शतक खऱ्या अर्थाने मालिकेचा निकाल बदलणारे आहे.
गावस्करने एका मुलाखतीत मांडलेला विचार महत्वाचा आहे IPL मुळे ही मंडळी मोठमोठ्या खेळाडूंसोबत सतत खेळतात त्यामुळे मोठ्या आंतरराष्टीय खेळाडूंची ती भिती तितकी आता तितकी राहिली नाही. IPL मधे किंवा नेटमधे त्याला खेळलेले असतात. फार काही मोठे आहे असे त्यांना वाटत नाही.

गांगुलीची बेधडक प्रवृत्ती ही अशी सहजासहजी अंगात येत नाही आणि आली तर जात नाही. आता काही दिवसापूर्वी कुण्या खेळाडूने गांगुलीने दिलेल्या सल्लयाचे आभार मानले. एका पत्रकाराने कुचकट प्रश्न विचारला. तेंव्हा अजिबात बचावात्मक पवित्रा न घेता गांगुलीने सांगितले मी अध्यक्ष वगैरे नंतर आहे, मी खेळाडू आधी आहे इतके इतके सामने खेळलो आहे तेंव्हा कुणीही खेळाडू मला सल्ला विचारु शकतो आणि तो मी देणार.

चौकटराजा's picture

22 Jan 2021 - 5:51 pm | चौकटराजा

या सर्व आक्रमणासाठी चेतेश्वर पुजारा सारखा एक तरी एक बाजू लढवणारा संघात असावा लागतो . व्ही व्ही एस , द्रवीड, बिल लॉरी, स्टीव्ह वॉ , शिवनारायण चन्दरपॉल , मुदस्सर नझर ,जेफ बॉयकॉट या तार्‍यानी ते काम वेळोवेळी केले म्हणून त्यान्चे सन्घ जिन्कले ! चौथ्या डावात २७५ पेक्षा जास्त धावा करणे सामान्यतः कोणत्याही सन्घाला अवघड असते खास करून खेळपट्टी फिरकीला व त्यातही खास करून लेग स्पिनर् ला अनुकूल असेल तर ! ४०० पेक्शा जास्त धावा करून सामना चौथ्या डावात जिंकण्याचा पराक्रम भारतीय सन्घाने केला आहे पण अशावेळी एखादी मोठी खेळी त्यात असतेच . ४०४ च्या " त्या" डावात गावस्कर व विश्वनाथ दोघान्चीही शतके तर मोहिन्दर अमरनाथ च्या ४४० मिनिटातील ८६ धावा सामील होत्या. आताच्या यावेळचे खास विशेष असे की सर्वानी विजयास हातभार लावला. सबब कपिल देवने याचे वर्णन व्ही व्ही एस च्या २८१ वाल्या डावाशी न करता १९८३ च्या वर्ल्ड कप फायनलशी केले आहे. खरे तर हा ३२९ चा विजय " त्या' पेक्शाही महान आहे असे कपिल म्हणतो ते उगाच नाही !!